उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Submitted by जीएस on 20 October, 2014 - 20:20

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये अधिकृत मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊंना इतके अ‍ॅक्टिव्ह कोणत्याच धाग्यावर पाहिले नव्हते. तेव्हा, भाऊंची माफी मागून,

bhau.JPG

हलके घ्या प्लीज.

इब्लिस Rofl

भाऊ, सॉरी हा हसल्याबद्दल Happy पण ते मॉडिफाईड व्यंगचित्रं इतकं इनोसन्ट आणि तितकंच उत्तम विनोद निर्मिती करतंय की हसू आवरलंच नाही.

हे मुख्यमंत्री बनन्यापुर्वी च मयेकर... आता मुख्यमंत्री आहेत आणि पुढे पण मुख्यमंत्री म्हणुन राहयाच आहे ना..Dolo.gifDolo.gif

मटा आता ही नवीन बातमी दाखवतय.. म्हणा अशा सेम बातम्या किती आल्या आणि किति गेल्या.. rofl.gifrofl.gifrofl.gifrofl.gif09:22 PMविधानसभाध्यक्षपदाची निवडणूक: मुख्यमंत्र्यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन. शिवसेनेची उमेदवारी मागे घेण्याची केली विनंती.

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास आम्ही तयार - भाजप

महाराष्ट्राच्या विकासासाठी कॉंग्रेस व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांचा पाठिंबा घेण्यास आम्ही तयार आहोत, असे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी मंगळवारी स्पष्ट केले

विकास परत आला.

<< मुख्यमंत्र्यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन. शिवसेनेची उमेदवारी मागे घेण्याची केली विनंती.>> आतां राष्ट्रवादीचे तटकरे म्हणताहेत आपले सर्व आमदार जमून विश्वासदर्शक व इतर ठरावांवर गैरहजर रहायचं, तटस्थ रहायचं किंवा कसं मतदान करायचं यावरचा निर्णय उद्यां सकाळीं दहा वाजतां घेतील ! सगळीच बनवाबनवी !!!
<< भाऊंना इतके अ‍ॅक्टिव्ह कोणत्याच धाग्यावर पाहिले नव्हते.>> राजकारण व क्रिकेट हे दोनच विषय असे आहेत कीं त्यातलं कांहींही कळत नसूनही कुणीही तासन तास त्यांवर चर्चा करूं शकतो. इब्लीसजी, आतां तुम्हीच सांगा, ह्या विषयांवरचे धागे सोडून इतर धाग्यांवर अ‍ॅक्टिव्ह असणं मला कसं शक्य आहे ? Wink
[ मूळ व्यं.चि.मधील उभ्या व्यक्तीला आडवी करून नविन व्यंचि बनवणं हें कसब राजकारणात विरोधकाला आडवं करण्याइतकंच कौतुकास्पद, हें मात्र मीं पक्कं जाणतो. इब्लीसजी, तुम्ही तर यांत पवारसाहेबच निघालात !! Wink ]
<< भाऊ, सॉरी हा हसल्याबद्दल >> अश्विनी के, हंसल्याबद्दल 'सॉरी' म्हणण्यासारखा अक्षम्य गुन्हा नाही | निदान माझ्याबाबतींत तरी !! Wink

उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला Happy
आज तर खुप महत्वाचा दिवस

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत, क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ: तत् कवयो वदन्ति |

<< उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला >> महाराष्ट्रातल्या मतदारांचा जीव टांगणीला लागला असताना, फेट्यासहीत नवा कोरा भगवा पेहराव मिरवत व भाजपसाठी खास आणलेली हिरवी टोपी कॅमेर्‍यांसमोर फडकावत सेनेचे वीर सुसज्ज होवून शपथविधीसाठी आलेच होते ना ? आणखी 'उठा' काय सांगणार त्याना !! Wink
[ विरोधी पक्ष म्हणून तुम्ही विधानसभेत प्रवेश करताय तर तिथं घ्या ना भाजपला फैलावर उर्दूच्या मुद्द्यावरून; विधानसभेच्या बाहेर आमदारानीच असं प्रदर्शन करणं सवंग नाहीं वाटलं कुणालाच ? आणि भाजपबरोबर 'जुळलं तर जुळलं' या मानसिकतेत असताना तर असं करणं म्हणजे अपरिपक्वतेचा कळसच नव्हे ? ]

शिवसेनेवर आतापर्यंत कोणी परिपक्वतेचा, संयत वर्तनाचा आरोप केल्याचे दिसले नव्हते. ('अ' सुटलेला नाही.)

<< शिवसेनेवर आतापर्यंत कोणी परिपक्वतेचा, संयत वर्तनाचा आरोप केल्याचे दिसले नव्हते. ('अ' सुटलेला नाही.) >> सॉरी, मयेकरजी, तसं चुकलंच म्हणा माझं; पण पूर्वींचं सेनेवरचं प्रेम गप्प बसूं देत नाहीं ना !

जे जे होईल ते ते पहावे Happy

बाकी शपथ घेताना 'जय विदर्भ' म्हणुन भाजपायी आमदारांनी पुढे काय होईल याची चुणुक दाखवली आहेच.

<< भाऊ तुम्ही देखील पक्ष बदललात ना? >> मीं कधींच कोणत्याच पक्षांत नव्हतों व आतांही नाही. म्हणूनच तर इथं सगळ्याच पक्षवाल्यांकडून टपल्याच खात असतों !! Wink

पवारसाहेबांनी अत्यंत योग्य आणि दुरदृष्टी असलेला निर्णय घेतला आहे. त्यांनी आजचा नाही तर भविष्यात घडु शकणार्या घडामोडींचा आढावा घेतला आहे. भाजपाला या निवडणुकित १२३च जागा मिळाल्या आहे. परंतु आता लगेच काही महिन्यात निवडणुका झाल्यास कदाचित बहुमत देखील मिळु शकेल अथवा शिवसेनेशी युती करुन बहुमत मिळु शकेल. त्यामुळे आता जशी भाजपा कोंडीत सापडली आहे तशी नंतर सापडणार नाही. त्यामुळे हीच वेळ आहे की नंतरची वेळ येउच द्यायची नाही. भाजपाला शिवसेनेपासुन दुर सारल्यावर विरोधीपक्षनेता शिवसेनेचा होईल आणि काँग्रेसवर विरोधी पक्षनेत न मि़ळण्याची परिस्थिती ओढावेल. म्हणजे एकाच दगडात २ पक्षी मारले जातील.
तसेच बाहेरुन पाठिंबा दिल्याने १-२ वर्षात सरकार ने काही चुकिचे केले की लगेच खाली पाडता येईल अश्यावेळेला भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळाणार नाही. सरकारची निती माहीती करुन त्याविरुध्द डावपेच देखील लढवता येणार आणि जोरदार विरोध देखील.

अश्या सर्व बाजुंचा योग्य विचार करुन पवार साहेबांनी "धोरण" आखले आहे. म्हणुन म्हणतात "साहेबांचे धोरण" जे दिसते ते नसते. आणि जे असते ते कुणालाच सुचत नसते Biggrin

भाजपने आणि सेनेने मिळून मोठी गेम खेळली आहे.

निवडणूकीपूर्वी युती मोडायची. ते पाहून कुजलेली आघाडीही मोडेल. स्वबळावर लढायचे. मरून पडलेल्या सापाला लोक लाथेने दूर करतील हे माहीतच आहे. मग मतमोजणीतून पुढे आलेले नेमके चित्र बघायचे. कोणालाच बहुमत नसेल तर भांडणे करत बसायचे. सत्तेपासून दूर राहण्यास, स्वतळ्च्या पक्षातील नेत्यांवरची प्रकरणे बाहेर फुटण्यास आणि अस्तित्व संपण्यास घाबरणारे पवार साहेब कधीतरी पाठिंबा देऊ करतीलच. पवार नेमके येथेच फसले. त्यांनी त्याचदिवशी बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

आता पुढची गेमः

राकाँचा पाठिंबा घेऊन सरकार टिकवायचे. सेनेने विरोधी पक्ष बनायचे. सहा महिन्यांनी सेनेने पाठिंबा द्यायचा. तोवर झारखंड, जम्मू काश्मीर उरकलेले असेल. सेनेने पाठिंबा दिला की राकाँ एकटे पडेल आणि अस्तित्वहीन होईल. झारखंड आणि काश्मीरमध्ये 'भाजपला त्यांचे विरोधकही पाठिंबा देऊ लागले आहेत' असा ढोल वाजवता येईल. पवारही आपले काही शिलेदार त्या निवडणूकीत भाजपच्या मदतीला पाठवतील.

(आता हे मला कसे माहीत असे विचारण्यापूर्वी आपण काय काय अंदाज ठोकले आहेत तेही तपासून बघावेत)

Biggrin

Light 1

<< म्हणुन म्हणतात "साहेबांचे धोरण" जे दिसते ते नसते. आणि जे असते ते कुणालाच सुचत नसते >> दूरदॄष्टीचा मुत्सद्दी हा राज्याचं, देशाचं खरं हित पाहूनच आवश्यक असेल तरच डांवपेंच आंखतो, तर सर्वसाधारण राजकारणी तात्पुरत्या खेळी करून इतरांवर मात करत स्वार्थ साधण्यातच धन्यता मानतो. पवाराना कोणत्या भूमिकेत आपल्याला पहायला आवडेल यावर त्यांच्या असल्या खेळींचं मूल्यमापन अवलंबून राहील. पवारसाहेबांसारखा मातब्बर, कर्तृववान नेता अजूनही फक्त असल्या खेळींतच रमावा हें महाराष्ट्राचं व देशाचं दुर्दैवच, हें माझं खरं दु:ख ! Sad

पवार साहेब आणी आपले मुख्यमन्त्री झिम्मा खेळतायत, आणी अजीत पवार व विनोद तावडे फुगड्या खेळतायत अशी भलती सलती दृष्ये माझ्या डोळ्यासमोर तरन्गायला लागलीत.:अओ:

माझ्या वाघांनो, थोड्याच वेळात होणारे विश्वासदर्शक ठरावावरील मतदान ही महाराष्ट्राचे हित आणि महाराष्ट्राचा सन्मान यांची लढाई आहे. पण ही हित आणि सन्मान यांची आपापसातीलच लढाई आहे.

आमच्या महिनाभर चाललेल्या लाचार प्रयत्नांना यश येऊन जर त्यांनी सत्तेचा एखादा चतकोर तुकडा फेकलाच तर आम्ही केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी तो चवीचवीने चघळू पण त्यांनी जर नाहीच घेतले त्यांच्यात तर अतिशयच स्वाभिमानाने (या न मिळालेल्या) सत्तेला लाथ मारून आम्ही महाराष्ट्राच्या सन्मानाची गर्जना करू.

Pages