उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Submitted by जीएस on 20 October, 2014 - 20:20

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये अधिकृत मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले विश्लेषण! विनाशकाले विपरीत बुद्धी! मोडेन पण वाकणार नाही ह्या चुकीच्या सो कॉल्ड मराठी बाण्याने वागत राहिले तर मोडणार नाही तर दुसरं काय होणार!

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ? >>>>

अगदी मनातलाच प्रश्न दिसला मला.
अख्ख्या महाराष्ट्रालाही हाच प्रश्न पडला असावा.
उद्धव अगदीच अपरिपक्व, किंबहुना बालीश वागतांना आढळत आहेत.
त्यांचा भ्रमनिरास यथावकाश होईलच.
मात्र त्याकरता महाराष्ट्राला भारी किंमत मोजावी न लागो!

शिवसेनेच्या चाहत्यांनो, उठा. राजाला जागे करा. परिस्थितीचे सम्यक भान द्या!

सेनेने प्रथम बालिश वाचाळवीर संजय राऊत ना गप्प करावे .या व्यक्तीमुळे सेनेचे प्रचंड नुकसान होत आहे ...
आतल्या गोटातील खबरीनुसार बाळराजे आदित्य चा बालहट्ट आणि संजय राऊत मुळेच युती तुटली होती. आता सरकारात सहभागी व्हायचे असेल तर या महाभागांना आवरावे उधोजी राजांनी !

अहो महाराजांनी नाही का औरंगजेबाच्या कैदेतून सुटकेसाठी झोपून राहण्याचे नाटक केले होते आणि मदारी मेहेतर व हिरोजी फर्जद भेटायला येणारे वगैरे सगळं सांभाळंत होते, तसंच आहे हे.

दिल्लीवरून (?) आलेल्या अफझलखानाच्या (?) कैदेतून, त्याच्या जाचातून अखंड (?) महाराष्ट्राची व जनतेची सुटका करण्यासाठी त्यांना हे झोपेचं नाटक करणं जरूरी आहे. मदारी आणि हिरोजी आपलं राऊत आणि धाकले राजे बघतील काय कोणाला भेटायचं बोलायचं, मिठाईचे किती पेटारे (खोके) आले म्हणजे आत वर्दी द्यायची.

काहीच ईतिहास शिकला नाहीत राव तुम्ही.

कोणीतरी त्यांच्या कानात जाऊन सांगितलंत 'राजे, अफझल खानाने तुमची मिठाई जनतेलाच वाटून टाकली आणि जनतेला अफझल खानच प्यारा आहे आणि तुम्ही जनतेला नकोतच' मग बघा कसे ते अफझल खानाला स्वतःहून आलिंगन द्यायला ते येतात की नाही.

फलाटावर गाड्या लागल्या आहेत त्यांच्या टाईमटेबल आणि ठेसनाच्या शेड्युलप्रमाणे.
बसायचं तर बसा नाहीतर चालू लागा. उगाच मोटरमनशी हुज्जत कशाला.

जी एस. अगदी बरोबर लिहीलेय.

कुठल्यातरी खुळचट कॅल्क्युलेशन वर युती तोडणं हा जेवढा वेडेपणा होता तेवढाच वेडेपणा त्यांनी भाजपा, मोदी व शहा यांच्या विषयी गरळ ओकून केला. जेव्हा भाजपानी जाहीर केलं की आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, तेव्हा उ. ठा. ना समजायला हवं होतं की भाजपा निवडणुकीनंतरच्या संभाव्य ( लागलीच तर ) युती साठी ग्राऊंड तयार करतंय. इतकी वर्षं राजकारणात घालवलेल्या माणसाला स्वतःच्या, शत्रुपक्षाच्या ताकदीबद्दल व शत्रुपक्षाच्या खेळींबद्दल एवढं देखील जज्मेंट नसावं?

त्यांना अद्दल घडायलाच पाहिजे.

उद्धव यांनी आपले पत्ते लगेच ओपन न करण्यात शहाणपणा आहे. परीस्थिती अशी आहे कि, भाजपाला सेनेची जितकी गरज आहे त्याच्या १०% हि भाजपची गरज सेनेला नाहि. सो हि मस्ट बी सिटींग प्रिटी अँड वॉचींग, रादर वेटींग फॉर द ड्रामा गेटींग अनफोल्ड. Happy

छान छान!
यातील एक महत्त्वाचा मुद्दा- युती तुटली नसती तर निर्विवाद सत्तेवर आली असती हे मान्य!

आता जागा खरेच २२३ असत्या की कसे हे ठरवताना-
१. युती तुटली नसती तर आघाडीही तुटली नसती
२. आघाडी तुटली नसती तर कित्येक दलबदलु भाजपा शिवसेनेत गेले नसते
३. कॉ आणि रा कॉ यांची प्रत्येक मतदारसंघातल्या मतांची बेरिज शिवसेना आणि भाजपा यांच्या मतांपेक्षा किती अधिक किंवा कमी?
४. उगाच अपक्षाना इतकी मते पडली असती का.

अश्या काही अगदीच किरकोळ मुद्द्यांकडे दुर्लक्षं झालं आहे.

चालायचंच . बडेबडे विश्लेषणमें ऐसी छोटी छोटी बाते होतीही रहती है!

महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात भाजप आणि सेनेला त्यांना नको असताना एकत्र सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. यात आघाडी शासनाने केलेल्या भ्र्ष्टाचाराचा विरोध असाही भाग आहेच.

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या दोघांच सरकार याव अस असताना खेळ्या कसल्या करताय ?

तुमचा खेळ चाललाय पण जनतेच्या मनाचा काही विचार कराल की नाही ?

हे एवढ सगळ आपल्याला कळत आणि तिकडे काहिच कलत नाही असे असेल का? शॉर्ट ट्र्म आणि लाँग टर्म विचार होतच नसेल का? एक मेकांचे छुपे इरादे , करणे, दाखवणे , तिसरेच निर्णय घेणे हे प्रकार होत नसतील का? फरफट नेमकि काय असते?... इत्यादी इत्यादी... माझ्या मते ठाकरे इस गोइंग वेल दिस टाइम. ठंडा करके खाव.

विरोधी पक्षात बसुन असे काय नुकसान होणार आहे जे सत्तेत असुन होणार नाहि. आणि केंद्रातील उदाहरण समोर असताना. आता काँग्रेसमुक्त नंतरचे लाट प्रादेशिक पक्ष मुक्त असेल. फक्त सुरवात महाराष्ट्रात होणार नाही. जर शक्य झाले तर शेवट मात्र इथे होउ शकतो.

वाचाळवीर : ही एक मस्त स्ट्रॅटेजी अस्ते. कारण संभाळुन घेणे, सारवासारव करणे खुप सोपे जाते. आणि मेसेज जायचा तो जातोच. Wink

त्रयस्थ म्हणुन वाचल्यावर लेख गंडलाय असेच वाटते कारण तुमच्या मनात जे आहे ते होत नाहीय याचा पुरेपुर 'आवाज' ल्खात येत आहे. बस्स्स

उद्धव ठाकरे झोपलेत हे कोणी ठरवले? भाजप शिवसेनेत लोकसभेच्या राष्ट्रीय पक्षाने आणि विधानसभेच्या प्रादेशिक पक्षाने अधिक जागा लढवायच्या हे अनेक वर्षांचे समीकरण होते.ते तोडायचेच होते तर लोकसभेच्या वेळीच का नाही तोडले? लोकसभेत भाजपला २७२च्या वर जागा मिळाल्या नसत्या तर तुटले असते का?

बचेंगे तो और भी लडेंगे ही वृत्ती कायम राहू दे.

छान लिहिलयंस जीएस... आकडेवारीतून वस्तुस्थिती बरीच स्पष्ट होऊ शकते...

उद्धव ठाकरे झोपलेत हे कोणी ठरवले? >>>>> +१००

भाजप शिवसेनेत लोकसभेच्या राष्ट्रीय पक्षाने आणि विधानसभेच्या प्रादेशिक पक्षाने अधिक जागा लढवायच्या हे अनेक वर्षांचे समीकरण होते.ते तोडायचेच होते तर लोकसभेच्या वेळीच का नाही तोडले? >>>>> त्यावेळी ही प्रोसेस जोर्शोर्से सुरु होती. पण संघाने हस्तक्षेप केला. संघाच्या ग्राउंडसर्वे नुसार भाजपा बहुमतात आलेच असती आणि त्यांना कसलेच लोडणे नको होते. पण ती रिस्क घ्यायची गरज वाटली नाही.

लोकसभेत भाजपला २७२च्या वर जागा मिळाल्या नसत्या तर तुटले असते का?>>>> नाही.

निकालाच्या दिवशीच एक विश्लेषक म्हणाला की राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिम्बा दिलाय, भाजपाला आता तशी अवदसा नाही आठावली म्हणजे झाले. त्यानी सेनेबरोबरच जावे हे उत्तम. स्व. बाळासाहेबानी सुद्धा असे कधी केले नाही. ते स्वतः बोलत.

जी एस मनातले बोललात.

राकाँचा बाहेरून पाठिंबा घेणे= अवदसा आठवणे

हे समीकरण कळले नाही.

मग बबनराव पाचपुते, अनिल गोटे यांच्यासारख्यांना तिकीट देणे = ?

की पवार पायाखालचे कधीही खेचून घेतील अशी भीती आहे?

युती तुटली, युती तोडली, ह्याने तोडली त्याने तोडली, एवढ्यावरून तोडली तेवढ्यावरून तोडली .....अरे हे काय टाळ कुटणं चालू आहे पार ईलेक्षन होऊन सुद्धा.

जरा तरी कॉंंग्रेस, राष्ट्रावादीसारखे प्रोफेशनल वागा की राव. दोघं मिळून कामं करा (खा प्या मजा करा) नसेल जमत तर तुझं तू माझं मी. फार काही धुसफुस झाली नाही त्यांच्यात.
तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार किती मस्त दोस्ती होती राव दोघांची.

आणि हे बघावं तेव्हा नुसते ईमोशनल बोलत असतात. ही अशी ईमोशनल आणि ईमॅचुअर, ऊतावीळ आणि शॉर्ट साईटेड लोकं आमचे नेते होणार.. लाज वाटते ह्यांची.

किती जणांना वाटते 'चांगले झाले युती तुटली/तोडली ते' मला तर जाम आनंदच झाला आहे.

'कॉंग्रेसमुक्त भारत' बरोबरच 'कोअलेशन मुक्त भारत' भाजपाने आता जनतेला दिलाच पाहिजे. अमित शहा बोललेही तसं टाईम्सच्या मुलाखतीत.

अक्कल आहे का? स्व. बाळासाहेबानी सुद्धा असे कधी केले नाही. ते स्वतः बोलत.>>> Uhoh

तशीही याला राजकीय जाण कमीच आहे, नुसता अर्ध्या हळकुन्डाने पिवळा झालाय.>>> Uhoh
बघायचय का खळ्ळ फट्याक कशाला म्हणतात ते. अ‍ॅडमिन..... वाचताय ना ?

पण एक मात्र आहे, भाजपाच्या गुजराती हत्तीला सेना किँवा NCPचा अंकुश बसेल व मोदी शहांच्या महाराष्ट्रद्वेषी मानसिकतेला लगाम बसेल.

प्रदेशिक पक्षांचे महत्व कमी असलेलेच बरे. गेल्या १० वर्षात केंद्रतिल सरकारचे प्रदेशिक पक्षांच्या वर्चस्वामुळे काय झाले हे बघुन तरी हे लोकांना समले पाहीजे. कॉंग्रेसची वाताहत प्रादेशिक पक्षांवर अतिरेकी अवलंबुन राहाण्यानेच झली आहे.

भा ज प काय कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची ही स्ट्रॅटेजी योग्यच आहे.

<पण अरे भाऊ हे तू त्या उधोजीला सान्ग ना. सन्जय राऊत आणी मिलीन्द नॉर्वेकर सारखे भाट याला येड्यात काढतात आणी हा मिसरुड फुटलेल्या मुलाला वाटाघाटी साठी पाठवतो, अक्कल आहे का? स्व. बाळासाहेबानी सुद्धा असे कधी केले नाही. ते स्वतः बोलत.>

बाळासाहेब कोणाकडे गेले होते वाटाघाटींना?

निपा, जाऊ द्या हो. त्या, उधोजीरावांना त्यांच्या (उधोजीरावांच्या) लहानपणापासून ओळखत असतील. आदुबाळालाकटीखांदी खेळवले असेल. आपल्याला काय माहीत?

.

जीएस....

लेख तर अगदी अभ्यासपूर्ण असा झालाच आहे त्या शिवाय तुम्ही प्रस्तुत केलेला तो संख्याशास्त्रीय विश्लेषणाचा भागही योग्य मांडणीमुळे वाचनीय झाला आहे. तुमचे या क्षेत्रातील स्वारस्य अगदी स्पष्ट दिसते जे निश्चित्तच अभिनंदनीय आहे. अशा लेखांची सर्वसामान्यांना वाचनासाठी आवश्यकता असते.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप+शिवसेना (२३+१८ जागा) याना जे नेत्रदीपक यश मिळाले, त्याहीपेक्षा कॉन्ग्रेसला केवळ २ आणि राष्ट्रवादीला ४ हे आकडे या दोन्ही पक्षांच्या पायाखालचे घोंगडे जनतेने काढून घेतल्याचे अधोरेखीत झाले होते. २३ खासदार असलेले कमळ (मोदी करिष्मा या जोरावर) पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी आपला उचित असा डौल दाखविणार हे शिवसेनेला समजले नसेल असे म्हणणे भाबडेपणाचे होईल. कमळ की मोदीप्रभाव याहीपेक्षा धनुष्यबाण की उद्धव ठाकरेप्रभाव हे कोडे महाराष्ट्र मतदारासमोर समोर आणले तर इथला नागरिक प्रथम मोदी नावाने भारून गेला होता हे उघड होते. शिवसेनेच्या मागे बाळासाहेबांची जी पुण्याई आहे ती तशीच राहील यात संदेह नाही, त्यामुळेच उद्धव ठाकरे वा त्यांच्या भक्तांनी यानी माझ्यामुळे १८ खासदार निवडून आले असे म्हणणे प्रौढपणाचे लक्षण नव्हते. विधानसभेसाठी शिवसेना १४० व भाजपा १३० हा प्रस्ताव कमळाकडूनच आला होता, जो अगदी योग्य होता असे त्यावेळीही वाटले होतेच. पण निवडणूक कुठल्या कुठे तर त्या अगोदरच मुख्यमंत्री पदावरील आपला हक्क राखण्याची तयारी करणे हेच पचनी पडणे कठीण गेले. आज निकाल जाहीर झाल्यावर उमजते की हे दोन पक्ष एकत्र असते तर त्रिशंकू अवस्थेला प्रवेश मिळाला नसता. घड्याळाने कमळाला पाठिंबा दिला, त्याचे राजकीय विश्लेषण होत आहेच....त्यातून एकच बाब स्पष्ट होत जाते ती म्हणजे शिवसेनेने आता अटी न घालता एकतर सरकारात सामील व्हावे....मुख्यमंत्री पद तर गेलेच, तरीही सरकार चालविण्यातील एक प्रमुख घटक म्हणून आपले स्थान राखणे अन्यथा ना विरोधी ना मित्रपक्ष म्हणून तटस्थतेने विधानसभेत आपल्या ६० जागा सांभाळणे.

चांगलं विश्लेषण..

पण युती तोडणं हे ठरवूनच केलं असण्याची शक्यता अधिक वाटते आहे. मॅच फिक्स्ड केल्यासारखं...

Pages