दिवाळी अंक २०१४

Submitted by नंदिनी on 6 October, 2014 - 07:29

२०१४ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.

बाजारामध्ये कुठले अंक उपलब्ध झाले आहेत तेही इथं नमूद करता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचे धन्यवाद हे नक्कीच ऐकायला चुक वाटते पण "मी त्यांचे आभार मानतो' हे तर बरोबर आहे ना? मी धन्यवाद आणि आभार हे शब्द वापरताना बरोबर माझ्याकडून "त्यांना माझे धन्यवाद" अथवा "त्यांचे मी आभार मानतो" असे लिहितो.

बी, माझ्या लेखनात जाऊन बघ - ते सगळे लेख इथेही आहेत. लोकसत्तात ते कधी कधी प्रकाशित झालेत ते मी तिथे लिहिलेलं आहे. Happy

ओके ललिताताई, नक्की निवांत सगळे लेखन वाचून काढेन. खरे तर नुसते वाचायचे असेल तर माबो बेस्ट आहे. नवीन लेखन वगळून जुने धागे उकलत गेले की सकाळची संध्याकाळ होऊन रात्र सुद्धा उलटून जाते.

>>>>>
ललिता-प्रीति | 2 November, 2014 - 10:39

अक्षर दिवाळी अंक :

- सेल्फी ही विशेष लेखमाला आवडली. खूप काही विचारधन वगैरे नाहीये, पण तरूण पिढीचे 'यंग अ‍ॅण्ड रेस्टलेस' सुरातले उथळपणा टाळून मांडलेले विचार चांगले वाटतात वाचायला
>>>>
अक्षर वाचला. छान आहे. चित्ता खूपच आवडली. ९ वर्षाच्या भाचीला पण वाचून दाखवली. ना.मा.निराळे बद्दल तुमच्या मताशी सहमत. सुरुवात वाचून काहीतरी नवीन वाचायला मिळेल असे वाटले. तसे नवीनच पण उत्तरार्धाने जरा निराश केले.

सध्या वाचनालयातून मौज आणला आहे. चित्रपट विषयावर ४ लेख आलेत. सुदैवाने पहिला चित्रा पालेकरांचा लेख वाचला. सुंदर लिहिलंय. विशेषत: रंग दे बसंती आणि मृत्युदंड सारख्या चित्रपटांबद्दल माझे मत त्यांच्याशी जुळते. चित्रा पालेकरांचा लेख वाचल्यावर सचिन कुंडलकर आणि परेश मोकाशी दोघांचे लेख फारच थिटे वाटले. उगीचच "classes and masses" चा घोळ केलाय. एकादशी आणि हरिश्चंद्र पाहिल्यावर परेश मोकाशिन्बद्दल आदर वाढलेला, तो थोडा कमी झाला.

<एकादशी आणि हरिश्चंद्र पाहिल्यावर परेश मोकाशिन्बद्दल आदर वाढलेला, तो थोडा कमी झाला.>

परेश मोकाशी यांनी मांडलेली मतं खरं म्हणजे खूप महत्त्वाची आहेत. ती पटली नाहीत, असं होऊ शकतं. पण मोकाशी हे अतिशय अभ्यासू दिग्दर्शक आहेत आणि त्या मुलाखतीतलं प्रत्येक मत अतिशय जबाबदारीनं त्यांनी मांडलं आहे, हे मुलाखत वाचताना जाणवतं.

आदर कमी होण्याइतपत त्या मुलाखतीत काय आहे, हे अजिबातच न कळल्याने हे लिहीत आहे.

मला चित्राताईंच्या लेखापेक्षा सचिन आणि परेश मोकाशी यांचे लेख आवडले. चित्राताईंनी त्यांच्या लेखात मुख्यतः त्यांचा प्रवास मांडला आहे. मराठी चित्रपट - प्रेक्षक - निर्मिती - समीक्षण यांबद्दल त्यांनी फारसं लिहिलेलं नाही. उलट सचिन आणि परेश मोकाशी यांनी या बाबींचा पुरेसा विचार केलेला दिसतो.

*

'मुशाफिरी'चा अंक आवडला.

'शब्दस्नेह'चा दिवाळी अंक संपादनात रुची असणार्‍यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यंदाचा 'संपादन विशेषांक' आहे. पुस्तकं, चित्रपट यांचं संपादन, संपादनाचे विविध पैलू यांवर उत्तम लेख आहेत.

आता मौज वाचतोय, कालच परेश मोकाशींचा लेख वाचला. चिन्मयशी सहमत, विचारपूर्वक अभ्यासकरून तळमळीने लिहिलाय हे जाणवतंय. काही मुद्दे वाचताना पटत न्हवते, पण बरंच काही नवीन समजलं आणि वेगळा दृष्टीकोन मिळाला.

>>>>काही मुद्दे वाचताना पटत न्हवते, >>>>
असेच असेल कदाचित. मोकाशींची मुलाखत होती त्यामुळे ती प्रश्नांच्या अनुरोधाने गेली. पण त्यांनी प्रेक्षकाच्या अभिरुचीबद्दल केलेले statement तितकेसे पटले नाहीत. त्यांचे म्हणणे शहरात साधनसामुग्री उपलब्ध असेलेल्याची अभिरुची हि बीड अकोल्यातल्या लहान गावातल्या प्रेक्षकापेक्षा जास्त विकसित होईल. शहरी प्रेक्षकाच्या सामाजिक जाणीवा जास्त विकसित होतील. पुढे नैसर्गिक आवडीनिवडीचा सुद्धा उल्लेख केला आहे. पण मला ते उगीचच पूर्वग्रहदुषित वाटले. चित्रा पालेकरांनी स्वत:चा चित्रपट प्रवास मांडला आहे हे खरे, पण त्यांनी काही विचारसुद्धा मांडले आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीवर बोट ठेवण्याआधी त्यांनी चित्रपट व्यावसायिकांच्या जबाबदारीची सुद्धा आठवण करून दिली आहे. "चांगली, वेगळी कलाकृती पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली तर कुठलीही व्यक्ती - शिक्षित असो कि अशिक्षित, शहरी असो कि ग्रामीण - त्या कलाकृतीचा आपापल्या परीने आनंद घेऊ शकते." आणि हे मत त्यांनी आपली नाटके छोट्या शहरात, गावात, कॉलेज, फिल्म सोसायट्या पर्यंत पोहोचवून त्यांना आलेल्या अनुभवातून केलेले आहे.
सचिननी तर सरळ सरळ म्हटले आहे मराठी समाज चित्रपट बघणारा राहिलाच नाही असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि आजकाल जे मराठी चित्रपट चालतात ते महाराष्ट्राच्या कमी संपन्न भागातून संपन्न शहरामध्ये मोठ्या संख्येने येतात अशा निमशहरी संस्कृतीच्या प्रेक्षकांच्या पाठींब्यावर चालतात.

चांगली, वेगळी कलाकृती पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळाली तर कुठलीही व्यक्ती - शिक्षित असो कि अशिक्षित, शहरी असो कि ग्रामीण - त्या कलाकृतीचा आपापल्या परीने आनंद घेऊ शकते. >>> हे नाही पटले. कलाकृती आवडण्यामागे त्या कलाकृतीशी रिलेट होता येणे गरजेचे असते. प्रत्येक कलाकृतीशी शिक्षित आणि अशिक्षित माण्सांना रिलेट करता येइलच असे नाही.

हितगुजच्या एका जुन्या दिवाळी अंकात अरभाटने या रिलेट होण्यावर लेख लिहिला होता. आवर्जून वाचावा असा लेख आहे तो. (कोणत्या वर्षीच्या दिवाळी अंकात ते नका विचारू Happy )

फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' २०१४

आणि इंग्रजी अंक 'द फोटो सागा' २०१४

यावर्षी या अंकात जेष्ठ इंडस्ट्रियल फोटोग्राफर हरी महिधर , प्रख्यात फॅशन फोटोग्राफर विक्रम बावा यांच्या मुलाखती, आयडीयाज्@वर्कचे प्रशांत गोडबोले, सिनेमॅटोग्राफर संदीप यादव यांची मनोगते, अतुल धामणकर, युवराज गुर्जर, बैजू पाटील, गिरिश वझे, डॉ. सुधीर गायकवाड अशा प्रख्यात वन्यजीव प्रकाशचित्रकारांचे लेख आणि स्लाईड शोज, किशोर साळी, ज्योती राणे यांचे वेगळ्या प्रकारच्या प्रकाशचित्रण आणि कला यासंबधीचे लेख, वारी या विषयाचे स्वप्नील पवार आणि रेखा भिवंडीकर यांचे रेखलेले शब्दचित्र, सुभाष जिरंगे, अंकिता वनगे, मेघना शहा यांचे लेख, तन्मय शेंडे यांची अमेरिकेतील लँडस्केप्स, योगेश जगताप यांची लाहौलस्पिती येथील लँडस्केप्स, नंदिनी बोरकर यांची ऑस्ट्रेलीयावारी, स्वप्नाली मठकर यांचे फुजी पर्वताचे शब्दचित्र, संघमित्रा बेंडखळे यांनी साकारलेला मणिपुर येथील इमा बाजार, जॉयदिप मुखर्जी आणि सायली घोटीकर यांची स्ट्रीट फोटोग्राफी, इंद्रनील मुखर्जी यांचा फोटोजर्नालिझम मधील नितीमत्ता यावरचा लेख असे विविध विषयावरील लेख वाचायला मिळतील.

यावर्षी फोटोग्राफी जगतातील तीन महत्वपूर्ण तारे निखळले. श्री. गोपाळ बोधे, श्री. अधिक शिरोडकर आणि श्री के. जी. महेश्वरी या तिन्ही दिग्गजांना श्रद्धांजली वाहणारे आणि त्यांच्या आठवणी सांगणारे बिभास आमोणकर, प्रविण देशपांडे आणि मिलिंद देशमुख यांचे लेखही या अंकात वाचता येतील.

माहेर दिवाळी अंकाविषयी : मायबोलीकरांचे लेख नेहमीप्रमाणेच मस्त. चिनूक्स, लली, वरदा, नंदिनी, आर्फी, शर्मिला यांचे लेखन आवडले. ललीची कथा दोनदा वाचावी लागली, तेव्हा पक्की उलगडली. चिनूक्सने ज्याविषयी लिहिले आहे त्याविषयी आधी वाचले होते, पण चिनूक्सचा लेख जास्त तपशीलात आहे. मुग्धमानसी आणि कविताची कथाही आवडली.
माहेरच्या बाकी लेखांबद्दल लिहायचे तर मंगला गोडबोलेंची कथा आवडली. विषय नेहमीचाच आहे, पण त्यांची शैली आवडते, त्यामुळे कथा आवडली. अश्विनी बर्वे, मृणालिनी वनारसें यांच्या कथा फारश्या आवडल्या नाहीत. आणि प्रविण दवण्यांची कथा वाचून तर रसभंगच झाला. माहेरसारख्या दिवाळी अंकात नावाजलेल्या लेखकाची इतक्या घीश्यापिट्या विषयावरची इतकी सामान्य कथा वाचून अचंबा वाटला.
अजून दोन-तीन लेख वाचून व्हायचे आहेत.

पासवर्ड दिवाळी अंक खूपच छान आहे. मला बंगळूरूत चाळायला मिळाला होता. तिकडे प्रीति छत्रे नाव वाचून अभिमानाने ऊर भरून आला होता. इकडे परत आल्यावर अंक मिळवून वाचून संपवला.

Pages