तंदूरी गोभी

Submitted by इब्लिस on 26 September, 2014 - 12:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फ्लॉवरचा गड्डा सुमारे १/२ किलो

मॅरिनेटसाठी :

घट्ट दही २०० ग्राम
२ चमचे एव्हरेस्ट चिकन तंदूरी मसाला
२ चमचे आलंलसूण वाटण
चमचाभर लोणी किंवा तेल
मीठ
लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

खालील फोटोत दिसताहेत तशी कोबीची (हो आमच्याकडे फुलकोबी म्हणतात. जास्त कीस काढू नये.) सुमारे १ इंच साईजची फुलं खुडून/कापून स्वच्छ धुवून घ्यावीत.

मॅरिनेशनसाठीचे सगळे साहित्य एकत्र मिसळून त्यात फ्लॉवरचे तुकडे टाकावेत, व नीट मिसळून घ्यावेत. इच्छा असेल तर अर्धा तास झाकून ठेवावे.

मॅरिनेटेड कोबी

बेकिंग ट्रेवर अ‍ॅल्युमिनियम फॉइल टाकून तिला तेला/लोण्याचा हलका हात लावून त्यावर हे तुकडे ठेवावेत.

२०० डीग्री सेल्सिअसवर २ मिनिटे प्रिहीट केलेल्या ओव्हनमधे सुमारे ७-८ मिनिट सर्वात वरच्या कप्प्यात ठेवावे. (मला क्रिस्पि आवडते म्हणून) पैकी ४ मिन्टांनी फ्लॉवर उलटवणे अपेक्षित आहे.

कोबीच्या निबरपणानुसार कुकिंगटाईम कमीजास्त लागू शकतो. हे मासे वा चिकन नाही त्यामुळे काडी टोचून मऊ पडलंय का ते पाहू नये. काडी टोचली जाणार नाही.

बशीत काढून त्यावर लिंबू पिळून थोडा चाट मसाला भुरभुरावा. सोबत कांद्याचे काप घेऊन फोटो काढावा, व इथे झब्बू द्यावा.

घ्या तोंडी लावायला :
तंदूरी कोबी

मी गार्लिक ब्रेड घेतला होता सोबतीला.
गार्लिक ब्रेड

वाढणी/प्रमाण: 
आवडलं तर दोघांसाठी.
अधिक टिपा: 

१. मॅरिनेट तयार झाले की चाखून पहावे. आपल्याला आवडेल अशी चव आली की त्यात फ्लॉवरचे तुकडे घालावेत. जास्त वेळ मुरल्यावर चव वाढते का, ते उद्या सकाळी मला समजेल Wink
२. वरच्या कप्प्यात कोबी होत असताना खालच्या कप्प्यात गार्लिक ब्रेड तयार होतो.
३. फोटोत ब्रेड गोरा दिसत असला तरी तो होल व्हीट ब्राऊन ब्रेड आहे. त्याला बटर + लसूण पेस्ट + कोथिंबिर मिक्स लावून, फॉइलमधे गुंडाळून भाजून घेतले आहे.
४. "लागणारा वेळ" तंदूरी कोबीचा (गार्लिकब्रेडसह) फन्ना उडविण्यासाठी लागणार्‍या वेळेसकटचा आहे.

माहितीचा स्रोत: 
पाकिटावरील कृती. माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्कास दिसतेय. @ दिनेशदा.
तुम्ही मायक्रोवेव्हमधे केलेली दिसतेय. ओलसर दिसतेय मस्त.
अख्खा गड्डा केला तर मॅरिनेट मधेमधे पोहोचत नाही असा प्रथम प्रयत्नात अनुभव होता.

इब्लिस.. गड्डा देठाकडून शंकूच्या आकारात कोरायचा आणि त्या पोकळीत मरिनाड ओतायचे. व्यवस्थित आतून लागते.
मी मायक्रोवेव्ह ३ मिनिटे, मायक्रोवेव्ह ग्रील कोंबो ३ मिनिटे आणि ग्रील ३ मिनिटे केले.

आणि पापाचे धनी व्हा बरं.. मला रीया आणि स्वस्ति यांना दुखवायचे नाही !

येस बघते Happy माझ्याकडे सध्या माबो सर्च गंडलाय आणि मला त्या धाग्याचे नाव पण आठवत नव्हते. धन्स गं

दिनेशदा, तुम्ही फ्लॉवर अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये ठेवला होता का ?
मी मायक्रो करताना फॉईलमध्ये ठेवताच फॉईल आक्रसल्यासारखी झाली मग पटकन फॉईल काढून तसंच मायक्रो केलं.

मायक्रोवेव्ह या फॉईलपासून परावर्तित होतात. त्यामूळे फॉईलमधे झाकलेला भाग भाजलाच जात नाही ( कधी कधी ठिणग्याही उडतात. ) मुद्दामच जे भाग भाजायचे नसतात. चिकनच्या पंखाचे टोक, लेगचे हाड असे टोकदार भाग फॉईलने झाकले जातात... तात्पर्य मावेमधे फॉईल सहसा नाहीच.

होय होय.
मी जस्ट चेक करत होते.
Wink

माझ्या मायक्रोत नुसते ग्रिल्/कन्वेन्शनही आहे. कन्वेन्शनमध्ये २०० डिग्री वर चांगले २० मिनिटे ठेवूनही फ्लॉवरला धग पण लागली नाही. बहुदा फॉईल असल्याने. मग चुकून मायक्रो मोड ऑन झाला तर फॉईल क्रम्पल व्हायला लागली.
नशीब लगेच लक्षात आलं.
आमच्याकडे एल जी च्या मायक्रोत बेक्ड मशरूम असा प्रीसेट मेन्यू आहे. त्यावर हे प्रकरण नुसतं काचेच्या बोलमध्ये घालून ठेवलं तर आपोआप ११ मिनिटे मायक्रो दहा मिनिटे बेक होऊन सुरेख क्रिस्पी बेक्ड कॉलीफ्लॉवर झाला.

आपोआप ११ मिनिटे मायक्रो दहा मिनिटे बेक होऊन सुरेख क्रिस्पी बेक्ड कॉलीफ्लॉवर झाला.>>>>>
साती,तुम्ही वरील डिश करताना काचेच्या भांड्याला झाकण लावले होते का? कारण चिकन,/कलेजी इ. बेक /ग्रिल करताना मावेभर तुषार उडाले होते.त्यानंतर मी कधीच या गोष्टींसाठी मा.वे. नाही वापरत.

गड्डा देठाकडून शंकूच्या आकारात कोरायचा आणि त्या पोकळीत मरिनाड ओतायचे << बापरे दिनेशदा किती मेहनत घेता तुम्ही पदार्थ बनवतांना. अगदी मनापासुन करता.
फोटो बघुन तोंडाला पाणी सुटल अगदी.

मायक्रोवेव्हमध्ये करायचं तर अख्ख्या फ्लॉवरची देठाकडची बाजू कापून, धुऊन प्लास्टिक फिल्मने कव्हर करून तीन मिनिटे मावे करायचा. बाहेर काढून कोरडा करून घ्यायचा मग मागून पुढून मॅरिनेट करायचा. तासभर ठेवायचा. मावे करायच्या आधी त्यावर थोडा सोय सॉस शिंपडला त ब्राउन रंग येईल.

मयेकर, तंदूर मसाला आणि सोया सॉस यांची काँबीनेश चव काहीतरीच लागेल. तंदूर इफेक्ट हवा असल्यास ओव्हन किंवा तवा हे दोन ऑप्शन आहेत. मायक्रोव्हेव मधे तो इफेक्ट येणार नाही. अगदी कन्व्हेक्शन मोडवर ठेवलं तरी.

सही आहे हे. करून बघायला (व खायला) हवे

बर्‍यापैकी हेल्दीही असावे, कारण फक्त थोडे तेल, बटर आहे असे दिसते.

झब्बू :
caulifl.jpg

परवा 'बॉन अ‍ॅपेटिट'वर मॅरिनेट केलेले फ्लोरेट्स कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवायची आयडिया वाचली क्रिस्पी होण्यासाठी. पण तोवर माझं हे प्रकरण करून झालं होतं.

Pages