कुरमुर्‍याचा चिवडा

Submitted by मामी on 23 September, 2014 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी.

ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं.

क्रमवार पाककृती: 

कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या धुवून, सुकवून बारीक कापा. डोळे चोळा ........ यचे असतील तर हात साबणानं धुवून घ्या आणि मग चोळा. लसणाचं म्हणाल तर घालाल तितका थोडाच. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या.

एका मोठ्या कढईत कुरमुरे घालून व्यवस्थित भाजून घ्या. अधूनमधून चार कुरमुरे तोंडात टाकून पहात रहा. कुरकुरीत भाजले गेले, थोडा रंग पालटून सावळ्यावर गेले की परातीत पसरून काढा. (कुरमुरे पसरा.)

मग त्या कढईत २ ते ४ चमचे तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, मीठ, लसूण, कढिपत्ता, मिरच्या घालून लसूण चांगला लाल होईपर्यंत परत परत परता. मिरचीच्या खकाण्यानं जीव हैराण झाला तर चिवडा झाल्यावर दुपारच्या चहाच्या वेळी बकाणे भरताना किती मजा येईल याचं स्वप्नरंजन करा. निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण करत गॅसपाशीच उभे रहा.

लसूण लाल झाला की त्यात भाजलेले कुरमुरे घालून पुन्हा पाच-सात मिनिटे परतत रहा. सर्व कुरमुर्‍यांना हळद लागली की गंगेत घोडं न्हालं असं समजून पुन्हा परातीत घालून थंड होऊ द्या. मग लगोलग चहा करायला घ्या. गरमागरम चहा आणि झणझणीत, लसणीच्या चवीचा गरमागरम कुरमुर्‍याचा चिवडा खाल्ला की आत्मा थंड होतो असा स्वानुभव आहे.

उरलाच तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

टाकणारे! धीर धरा.

वाढणी/प्रमाण: 
ख्यॅ! ख्यॅ!! ख्यॅ!!!
अधिक टिपा: 

१. पावसाळा संपल्याने ओले, चिकट, चेमट, खवट असे शब्द मोडीत निघाले आहेत. हा काळ चिवड्याचा.

२. शेंगदाणे, डाळे, खोबरं वगैरे वजनदार मंडळी कुरमुर्‍यांना हलके समजून त्यांच्यात न मिसळता डब्यात खाली बसणे पसंत करतात. दरवेळी डबा हलवून त्यांना बाबापुता करून वर आणावे लागते आणि हे करताना वर पंखा सुरू असेल तर (किंबहुना नसेल तरीही) काही कुरमुरे हवेत उड्या मारत जमिनीवर जाऊ बघतात. मी काय म्हणते... हवेत कशाला हे नसते उपद्व्याप? त्यापेक्षा माझं ब्रीदवाक्य लक्षात ठेवा : शेंगदाणे टाळा, कुरमुरे सांभाळा!

३. यात पनीर घातलेले नाही याची कृपया नोंद घ्या आणि पनीरकरता बटाटे, अंडी वगैरे ऑप्शन्स देऊ नका. कुरमुर्‍यांकरताही ऑप्शन्स देऊ नका. मुळात ऑप्शनच देऊ नका. जर ऑप्शन द्यायची इतकी खुमखुमी असेल तर वेगळी पाककृती लिहा.

माहितीचा स्रोत: 
कुरमुर्‍याचा साग्रसंगित चिवडा करणारी आई आणि डबा हलवून हलवून खाण्याचा कंटाळा आलेली मी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी, पुण्यात मंडई पोलीस स्टेशन आहे ना, त्याच्या अलीकडे २ दुकाने आहेत. बिस्किटे, चॉकलेटचे सामान, सॉसेस वगैरे काय काय मिळते. त्यांच्याकडे मिळते टॉमॅटोची, चीजची पावडर.

आइगं.. सगळं लहानपण माझं झोपाळ्यावर गोरे भडंग खात पुस्तक वाचत गेले आहे. करणार नक्की.
नाव बदल बाई. कुरमुर्‍याचा चिवडा अगदी 'हे' वाटतंय. हे तर भडंगच.

निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण करत गॅसपाशीच उभे रहा.:)

आमच्यात भडंग म्ह्णतात. पण लसूण न घालता करतात. कढीपत्ता असतो. आता लसूण घालून करुन बघते. धन्स मामी!

पावसाळ्यातही कुरकुरीत करण्याची रेसपि शोधली आहे. तुमच्या विनंती परवानगीने देतो. नाहीतर दुसरा धागा काढावा लागेल उगाच खोकल्याची उबळ वाढायला नको.
जुन्नरला बाजारात तीन रंगात भरलेली आकर्षक भडंग पाकिटे मिळतात शेव कुरमुरे शेव.

इथे पुण्यात स्लीम अस्तील तर चुरमुरे, व बाळसेदारअसतील तर भडंग म्हणतात. कुरमुरे नाही म्हणत.

कोल्हापूरकडे चिरमुरे पण ऐक्ले आहे.

Srd >>>> परवानगी मागितलेली पाहून भरुन आलं अगदी.

इथे लोकं भडंगाबद्दल बोलत आहेतच तर तुम्ही रेसिपी द्यायला घाबरुन कसं चालेल?

इथे पुण्यात स्लीम अस्तील तर चुरमुरे, व बाळसेदारअसतील तर भडंग म्हणतात. कुरमुरे नाही म्हणत>>> यस

सांगलीतील भट्टीतून दोन महिन्यांपूर्वी मोठे पाकीट आणले होते, अर्धा किलोचे असेल.
मज्जा आली भडंग खायला!!

आज न राहवून दोन मुठी कुरमुर्‍याची भडंग केलीच. आता संध्याकाळी त्याच वेळी त्याच क्षणी फोटो टाकेन इकडे Wink

मानुषी, फोडणीत बेसनाची आयडिया नवीन आहे. छान खमंग लागेल असं वाटतंय. पण किती कुरमुर्‍यांसाठी एक चमचा बेसन घ्यायचं?

कुरमुर्‍यासारखी कुरकुरीत, चिवड्यासारखी चुरचुरीत अशी रंगतदार, लज्जतदार, खुमासदार आणि हो.... हसत-हसवत शिकवणारी पा.कृ.

हो मंजूडी..........खूपच खमंग लागतं. साधारण अर्धा कि. कुरमुर्‍यांना १ चमचा(टीस्पून) बेसन पुरतं. तेल जितकं जास्ती घ्याल तितकं बिसन जास्ती वापरता येतं. पण तेलावर हात बेतानेच असतो ............त्यामुळे अगदी १ चमचा तेलात एक दीड च. बेसन साधारण मावते. आणि खरपूस भाजले जाते.

मानुषी, बेसनाची आयडिया मस्त Happy पुढच्या वेळेस नक्की करून बघेन. बंगाल्यांना लसणाची चव फारशी प्रेमाची नसल्याने मी लसूण विरहित भडंग करते नेहेमी

आहाहा! एकदम आवडता पदार्थ. मीपण सेम करते फक्त कुरमुरे आधी भाजुन न घेता फोडणीतच घालते तरीही कुरकुरीत होतात. आणि ते बनविताना कुरकुरीत झालेत की नाही हे सारखेसारखे खाऊन बघताना निम्मे तिथेच संपतात.
पाककृती व पदार्थ दोन्हीही चटकदार आहेत.

हे दोन प्रकारे करतात.

वर दिले आहे तसे फोडणी घालुन.

दुसरा प्रकार : चिरमुरे घ्यावेत . लागेल तसे कच्चे तेल तिखट मीठ व किंचित साखर घालावे.

याला कच्चा भडंग म्हणतात. तात बारीक कांदा घालुन खाणे. शक्य असल्यास तिखट मिठाबरोबर मेतकूट घालणे

व्हय जी आमी टाकतो.

मामी झक्कास कृती आहे.:स्मित: तुमचे पन्चेस पण कुरकुरीत आहेत.:फिदी: घरात एक मोठ्ठे पाकिट पडलय, उद्याच करते. डाळे, दाणे मात्र घालावेच लागणार, तसेही ही वजनदार मन्डळी घरातली चिल्लर सम्पवुन टाकतात, खाली नुसते चुरमुरे रहातात. पण नाही टाकले तर आत्म्याला शान्ती नाही मिळणार.

भडन्ग, हो वाडीहून येताना जयसिन्गपूर च्या रस्त्यावरुनच घेतले होते. गोरे नाही भोरे बन्धुन्चे. भारी होते.

गोरे भडंग सांगली सातारचा.

भोरे व अंबा भडंग जयसिंगपुरचा.

पहिल्या पानावरच्या वरदेच्या पोस्टला अनुमोदन (जरा उशीरच झालाय तरी..)
चिवडा असतो तो पोह्यांचा- पातळ किंवा भाजके किंवा कॉर्नफ्लेक्स.
हे भडंग, तेही 'चुरमुर्‍यांचे' Proud
मिरची घालून घरी केलेले मस्त लागते. वरच्या कृतीने, लसूण मस्टच, तसंच दाणे अन खोबरंही मस्ट. ते ऑप्शनला नो नो नो!
तिखट घालून विकतसारखे होत नाही, त्यामुळे ते विकतचेच खावे. गोरे अथवा भोरेंचे Happy

अजून एक टिप- ऊन येत असेल घरात, तर चुरमुरे उन्हात ठेवावेर अर्धा तास, ज्याम कुरकुरीत होतात. हेच पोह्याच्या चिवड्यालाही लागू.

वा वा... मामी ची पाक्रु पण भडंगासारखीच कुर्कुरीत...

सांगलीलाच मिळतो की गोरे नी भोरे भडंग, आवडीने खातो आम्ही...:)

मानुषीताई पर्फेक्ट्...आपण त्याला चिरमुरे च म्हणतो..

विकतच्या भडंगात लसुण नसते पण घरी केलेल्या भडंगात घालावीच.. मातै ची बेसन ची आयडीया करुन बघणार आता...

मी मेतकुट वापरते.
हल्ली सांगलीला अजुन एक ब्राण्ड चा भडंग मिळतो... तो पण मस्त आहे..

मामी, आम्ही ह्याला कुरमुर्‍याचा चिवडा म्हणतो. मी एक आहे तुमच्यासाथीला ह्याला भडंग न म्हणणारी. Happy
मी नेहमी बनवून ठेवते पण तुमच्या ऑप्शनलचे सगळे जिन्नस घालून फक्त लसूण वापरत नाही. भूक लागली की लगेच खायला उपयोगी म्हणून.

Pages