तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळा कशी निवडलीत / निवडाल?

Submitted by निवांत पाटील on 19 September, 2014 - 04:21

बरेच दिवस हा विषय मनामध्ये घोळत होता. काहि बाफ वर या विषयी थोडीफार चर्चा झाली आहे.

तर लहान मुलांची शाळा हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. काहि ठिकाणी तर त्यावर राजकारण केले गेले. पेपरमध्ये कित्तेकदा सकाळी ४-५ वाजल्यापासुन प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांचे फोटो आले. काहि शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणुन लोक लोकप्रतिनिधींची चिठ्ठी घेउन येतात तर काही ठिकाणी पैसे. याउलट काहि शाळा मुलांअभावी बंद पडताहेत (या सगळ्या सरकारमान्य नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या अथवा जिल्हापरिषदेच्या आहेत ज्या पटसंख्येअभावी बंद पडायच्या मार्गावर आहेत) याची कारणे सर्वश्रुत आहेत त्याबद्दल कृपया इथे चर्चा नको.

विषय असा कि, तुम्ही तुमच्या मुलाला / मुलीला शाळेत घालताना नेमका काय विचार केलात? ( the decision making process).

१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या?
२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले? (नेमका काय सर्वे केलात?)
३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का? किती प्रमाणात? कि पुर्ण अपेक्षाभंग झाला? आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात?
४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला?
५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का?
६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते? ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला? )
७) दुसर्‍या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत?

या फक्त काहि रुपरेषा आहेत. याव्यतिरिक्त काहि गोष्टी असतील तर त्याही जरुर नमुद कराव्यात.

धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळा घरापासून जवळची आणि जिथे प्रवेश मिळेल अशी निवडली. आधीची शाळा शिक्षक, अ‍ॅक्टीव्हिटीज याबाबतीत खूप चांगली होती. पण शाळेला स्वतःचं मैदान नव्हतं. रस्त्यापासून आत आणि अरुंद बोळीत असल्याने नेहमी सोडताना आणताना ट्रॅफीक जाम लागत होता. रिक्षावाले दहा मिनिटाच्या अंतराला दोन तास घेत. हे सर्व पाहून घराजवळची त्यातल्या त्यात चांगले शिक्षक आहेतसे वाटणारे निवडली. बाकीचं नंतर लिहीन जमल्यास.

चांगल्या आणि आवडत्या शाळेत प्रवेश मिळतोच असंही नाही.

पुतण्याला शाळेत घालायचं आहे आता.. त्याकरता आम्ही एकेका प्रश्नाचा निकाल लावतोय. होम स्कुलिंग करता आमच्याकडे योग्य वातावरण नाहिये. त्यामुळे शाळेतच घालणार आहोत.
१) मराठी की इंग्लिश?
२) बोर्ड कोणतं हवय (त्याचे आई वडील ठरवतील)
३) शाळा घराच्या किती जवळ आहे?
४) कितवीपर्यंत आहे शाळा?
५) एका इयत्तेच्या किती तुकड्या?
६) एका तुकडीत किती मुलं?
७) एका तुकडीला किती शिक्षक?
८) शाळेचं ग्राउंड किती मोठय?
९) वॉशरुम्स किती अन कश्या आहेत?
१०) डब्ब्यात काय द्यायचं याचे शाळेचे काय नियम आहेत?

आम्ही अजुन मराठी कि इंग्लिश यावरच अडलोय.. त्यामुळे शिकवण्याची पद्धत, प्रॅक्टिकली कितपत शिकवतात, व्यवहार ज्ञान कितपत देतात, होम वर्क कितपत अन कश्या पद्धतीचा असतो, इ. लिस्टीत घातले नाहियेत..

स्वतःच शाळा चालु करावी असं वाटतय

तुम्ही विचारलेल्यातलं मी काहीच केलेलं नाही, पण सगळ्यांनी केलेले विचार, आलेले अनुभव वाचायला आवडतील.
चांगला धागा सुरू केलात.

खूप काही ऑप्शन नव्हता निवडीसाठी.
तिन ते पाच किमी रेडीयसमधल्याच सगळ्या शाळांचे फॉर्म भरले होते. आमच्याकडे अ‍ॅडमिशनसाठी पॉइंट सिस्टिम आहे. घर ते शाळा अंतर (१०), पहिलं मुलं (१०), मुलगी (५), भाऊ-बहिण शाळेत शिकत असणं(२०) किंवा आई वडील शाळेचे माजी विद्यार्थी(२०) असणं अशा घटकांवर हे पॉईंट्स अवलंबून असतात. आमच्या वेळी याव्यतिरिक्त जर आई-वडिलांपै़ई कोणी आंतरराष्ट्रिय /राष्ट्रिय समाजसेवी संस्थेसाठी काम केलं असेल तर(१०) आणि दिल्लीमध्ये भाषा किंवा धर्म , समाज या मायनॉरिटीज (१०) मध्ये तुम्ही असाल तर पॉइंट्स मिळणार होते. उरलेले पॉइंट बहूतेक शिक्षकांची मुलं , डिसेबल, बदली नोकरी, सैन्य इ. साठी होते.
३०-४० च्या वर पॉइंट असतिल तरच शाळांमध्ये प्रवेशाची खात्री असते. नाहीतर वेटींग मध्ये नंबर येतो. क्वचीत कधी मिळतो ही प्रवेश, पण खातॄ नसते.

आम्हाला अंतर, पहिलं मुल हे पॉइंट मिळणार होते. माझ्या युएन व्हॉलेंटिअर कामाचं सर्टीफिकिट जोडलं समाजसेवी संस्थेचे पॉइंट मिळावेत म्हणून. आणि माझा मराठी भाषिक असण्याचाही उल्लेख केला. नवरा पंजाबी आणि मी मराठी यामूळे बहूतेक इथनीसिटीचे मार्क मीलाले आम्हाला एका शाळेत.

१०-१२ शाळांचे अर्ज भरले. त्यात ४-५ ठिकाणी यादीत नाव होतं. त्यातली एक जरा दुर होती. साडेचार किमीवर, त्यात त्या शाळेला ग्राउंड पण नाहीये असं कळालं. म्हणून ती बाद झाली. दुसरी एक घरापासून खूप जवळ होती. पण त्या शाळेत अर्ज देतानाच मला ती आवडली नव्हती. तिथे भेटलेले शिक्षक शिकवण्यात रस नसलेले वाटले. तसंही आजूबाजूला कुणाकडूनच या शाळेबद्दल काहीच चांगलं न ऐकल्याने तीपण बाद केली.
दोन शाळा गुरद्वाराशी संबंधित होत्या. त्या दोन्ही शाळा वेस्ट दिल्लीतल्या पहिल्या ५-७ शाळांपैकी आहेत. पण त्यांन स्वतःची स्कुलबस नव्हती. (ज्युनियर विद्यार्थ्यांसाठी) मला व्हॅनमध्ये कोंबून लेकाला शाळेत पाठवायचं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे केजीपासूनच हिंदी, इंग्रजीच्या जोडीला पंजाबी भाषा आणि गुरुमुखी होते. (थोडं उशिरा पहिली-दुसरीत शिकवलं असतं तर चाललं असतं मला) आणि इक ओंकार आणि तत्सम बर्‍याच गोष्टी मुलांना नर्सरी-केजीमध्येच पाठ करवून घ्याव्या लागतात असंही कळालं होतं.
आम्ही मुलावर घरीसुद्धा कसले धार्मिक संस्कार करत नव्हतो, मग शाळेतही नकोच असं ठरवून त्याही दोन्ही शाळा बद केल्या.
चौथी उरलेली शाळा (जिथे प्रवेश घेतला) दोन किमी अंतरावरच आहे. शाळेला मोठ्ठं ग्राउंड आहे. फीस पण इतर इंटरनॅशनल शाळांच्या फी इतकी जास्त नाही. अ‍ॅडमिन फी पण खूप कमी होती आणि तिची पावती मिळणार होती. शाळा २०-२२ वर्ष जुनी असली तरी संस्था ६०-७० वर्ष जुनी आहे. शाळेचं नाव सेंट्रल दिल्लीतल्या पहिल्या १५ मध्ये होतं त्यावर्षी तरी. मग घेतला प्रवेश.

मला आवडलेल्या शाळेत (तिथे साचेबद्ध पद्धतीने शिकवत नाहीत. वेगवेगळे वर्ग, परिक्षा असं काही नाहीये) अंतरामूळे आम्हाला प्रवेश मिळणारच नव्हता. त्यामूळे जिथे मिळतोय तिथे घेतला.

शाळा खूप काही आवडली नाहीये. पहिलीपासून पृऑपर परिक्षा, मार्क इ सगळं आहे इथे. तरी अजून सहा महिन्यांनी माझं मत जास्त क्लिअर होईल.

स्वतःची शाळा सुरु करावी असं खूप दिवसांपासून वाटतंय. पण त्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक सध्या शक्य नाहीये. बघू... पुढे मागे काही जमतंय का.

तसे ऑप्शन्स बरेच होते , पण माझ्या ज्या अटी होत्या त्याप्रमाणे कमी .

१. आमचे प्राधान्य एस.एस.सी ला होते . अगदीच नाही जमले तर आय.सी.एस.सी.
२.मला स्वताला त्याला बॉईज कॉन्व्हेंट मध्ये घालायचे नव्हते .
३. अर्थातच एन्ग्लिश मिडिअम हवी होती.
४.आम्ही नोकरीला बाहेर पडल्यावर घरात फक्त आजी-आजोबा . कधी अचानक काही कारणाने शाळेत जावे लागले किन्वा तसही स्कूल बसमध्ये एक एक तास प्रवास करून पेंगुळणारी मुलं बघितलं की वाईट वाटत म्हणून शाळा जवळचीच हवी होती .
५.शाळेचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला हवा .
६." क्राउड" उच्चमध्यमवर्गिय असावा. अगदी हाय-फाय लोकांमध्ये माझाच जीव गुदमरतो.
६. आणि मुख्य म्हणजे कोणाच्या वशिल्याने प्रवेश नको होता .

सध्याची शाळा ,
को-एड , ईन्ग्लिश मिडिअम आहे . चालत गेले तर २०-२५ मि. अण्तरावर आहे ( मुंबईत हे अंतर जास्त नाही , रिक्शाने मिनिमम)
किमान २५ वर्शे जुनी आहे . सध्या आमचा मित्र परिवार आमच्या सारखाच नोकरदार घरातुन आलेला आहे. शाळेने अ‍ॅडमिशनच्या वेळी डोनेशन घेतले पण नंतर कशासाठीही परत मदत मागत नाहीत .

पहिल्या वर्शी वर्गशिक्षिका इतक्या आवडल्या नव्हत्या .
माझा लेक वर्गात सगळ्यात लहान आहे , त्यामुळे इतरांच्या मानाने थोडा स्लो होता .
एक्दा नवरा काही कारणाने शिक्षिकाना भेटायला गेला तर त्यालाच जाम सुनावलेलं.
तो वर्गात लक्श देत नाही . आम्हाला सारख त्याच्या मागे लागायला लागत , खूप स्लो आहे .
आम्ही काही बोललो तर त्याच्या लक्शात येत नाही , आपल्यातच असतो.
आम्ही एकाच मुलाकडे सारख कस बघत राह्णार , वर्गात इतरही मुलं आहेत .

दूसर्यावर्शीच्या शिक्शिका खूप चांगल्या होत्या .
त्यान्च्याही तक्रारी होत्या पण त्यानी आम्हाला व्यवस्थित समजावलेलं ,
तो सगळ लिहितो पण हाताला जोर नाही , अमुक्तमुक उपाय करून बघा.
त्याला खोदून खोदून विचारलं तर पोएम्स वगैरे बोलतो , त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या .
शिकेल हळूहळू , सगळीच मुलं एक्दम सगळ शिकत नाही.
आपल्यातच असतो म्ह्णून आम्ही त्याला ईकडे समोरच बसवतो .

एकदम आश्वासक !

त्यातल्या एक शिक्शिका यावर्शी ही आहेत आणि लेकाला त्या आणि त्यांना लेक खूप आवडतात .
आत लेक खूश असतो .

मी एक दोन वेळा विचार केला शाळा बदलायचा पण आता वाटतं तो सेटल झाला आहे , आता कशाला .

धन्यवाद लोकहो, पण बेसिक शाळेपासुन असणार्‍या अपेक्षा (शैक्षणिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर) लिहा ना. थोडक्यात तुम्ही स्वतः शाळा काढली / किंवा आता असलेल्या शाळेची धुरा तुमच्या खांद्यावर दिली तर तुम्ही काय बदल करु इच्छिता. अगदी वरचे प्रतिसाद एडीट करुन लिहलेत तर खुप बरे होइल. Happy अगदी शिक्षण पध्द्दती, शिक्षकांचे बिव्हेयिअर, वातावरण इत्यादी. Happy

१) तुम्हाल शाळेकडुन काय अपेक्षा होत्या?
शाळा ICSE/CBSE असावी. इमारत्/वर्ग चांगले हवे. क्रीडांगण हवे. क्लास साईज लहान हवा.शिक्षक चांगले हवेत.जवळ असली तर चांगले आहे पण जवळ असणे हा पहिला निकष नव्हता.

२) त्या अपेक्षा तुम्ही निवडलेली शाळा पुर्ण करेल असे तुम्हाला का वाटले? (नेमका काय सर्वे केलात?)
आम्ही ब्लु रिज हिंजेवडी जेव्हा सुरु झाली तेव्हा प्रवेश घेतला होता. पार्ले र्टिळकच्या परांजपेंची शाळा हे एकच पुरेसे झाले मलातरी.

३) तुम्ही निवडलेल्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा पुर्ण झाल्या का? किती प्रमाणात? कि पुर्ण अपेक्षाभंग झाला? आणि झाला तर त्यावर तुम्ही काय उपाय केलात?
अपेक्षेप्रमाणे चांगली शाळा आहे.

४) आता अपेक्षा व्यतिरिक्त तुम्ही नेमका कोणता कन्व्हिनियन्स बघितला?
बस सर्विस आहे, महिला अटेंडंट आहेत. वक्तशीर आहे.

५) प्रवेश घ्यायच्या अगोदर तेथील मॅनेजमेंट / स्टाफ यांच्याशी बोललात का?
हो.. जे पाहिले ते आवडले.

६) समजा ३-४ शाळांची निवड करुन त्याची प्रायोरिटी ठरवली असेल तर निवड करण्याचे निकष आणि प्रायोरिटी ठरवण्याचे निकष कोणते होते? ( नेमक्या कोणत्या हव्या हव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार झाला? )
जास्त शाळा नाही पाहिल्या. हीच आवडली.

७) दुसर्‍या लोकांना तुम्ही या प्रोसेस मध्ये कशी मदत केलीत किंवा त्यांच्याकडुन घेतलीत?
टाइम्स ऑफ इंडिया मधे जाहिरात पाहुन वडिलाना त्यांच्याशी संपर्क करायला सांगितले. मी त्यावेळी भारतात नव्हतो. इतरांना जरुर सांगतो पण सध्या शाळेत जाहिरात न देताच प्रवेश फुल होतात.

आम्ही मुलाला शाळेत घातलेलं नाही, घालायचं नाही हे तो जन्माला येण्यापूर्वीपासूनच ठरलेलं होतं.
- माध्यम मराठी हवं होतं.
- शाळा ३-४ किमीच्या परिसरातच हवी होती.
- अभ्यासेतर गोष्टींकडे अभ्यासाइतकंच लक्ष असलेली शाळा हवी होती.
- शाळेच्या वेळा जाचक नको होत्या. तो ५-६ वर्षाचा होईपर्यंत तरी त्याची झोप पूर्ण झाल्यावर तो शाळेत जाईल अशा वेळा हव्या होत्या.
- स्कुलबस / रिक्षा शक्यतो नको होती.
- गृहपाठ, प्रोजेक्टवर्क्स, या कशाचंही दडपण मुलावर आणि आमच्यावरही नको होतं.
- त्याच्या उपक्रमांमधे आमचाही योग्य तो सहभाग असावा अशी इच्छा होती. केवळ शिक्षक आणि त्या त्या वर्षी तो तो अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे जाणं हे नको होतं.
- सुट्ट्यांसाठी परवानग्या घ्या, घेतल्या तर कारणे द्या वगैरेही नको होतं.
- जीवनावश्यक कौशल्ये शिकणं अपेक्षित होतं / आहे, आयुष्य जगण्याचा चौफेर आनंद घ्यायला शिकावं, सर्वच बाबतीत त्यानं योग्य तितकं संवेदनशील व्हावं असं वाटतं.
- सगळ्यात महत्वाचं तो मजेत असायला हवा होता, हे सगळं त्यानं आनंदानं करायला हवं होतं.

आणखीही बरीच बारीक सारीक कारणे होती. आठवतील तशी अ‍ॅड करते. पण ही आखुडशिंगी, बहुदुधी शाळा मिळणं मुश्किल होतं. मुलगा झाला तेव्हा नव-याने शिक्षणासंदर्भात बरंच वाचन केलं, ब-याच तज्ज्ञांशी बोलला आणि आल्टरनेटिव्ह स्कुलिंग पक्कं झालं.

तिस-या वर्षी पुण्यातल्या एका तथाकथित प्रथितयश 'होम स्कुलिंग' करणा-या संस्थेत मुलाला घातलं होतं. तिथे दोघांपैकी किमान एका पालकाचा पूर्ण सहभाग अपेक्षित होता, ते नीलच्या बाबाने उत्साहाने केले. तो सहभाग डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाचं स्वरूपही बदलून वेळेची मॅनेजमेंट केली. पण वर्षभरातच तिथला गोंधळ लक्षात आल्यामुळे, जे अपेक्षित होतंच, शिवाय वरती चिमुरी आणि अल्पनाने म्हटल्याप्रमाणे, दुस-या कोणत्याही पर्यायाचा विचार न करता त्याने स्वतःच नीलसाठी पूर्ण वेळ द्यायचे ठरवले.

आता नील पूर्ण वेळ बाबासोबत त्याच्या आवडीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज करत असतो. बाबाचा व्यवसायाचा वेळ आणि नीलचा वेळ त्याप्रमाणे आखलेला आहे. घरही आधी थोडंसं लांब होतं, ते बदलून ऑफिसजवळ, चालत जाण्याच्या अंतरावर रहायला गेलो.

नीलसोबत आता आणखी दोन मैत्रिणींची मुलं आहेत. त्यांनाही मुलांना शाळेत घालायचं नव्हतं. त्यापैकी एक पूर्ण वेळ मुलांबरोबर असते, तर एक सिंगल पेरेंट असल्यामुळे तिला वेळ देणे शक्य होत नाही. पण बाकीचे पालक पूर्ण वेळ मुलांसोबत असल्यामुळे तिच्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष दिले जात आहे.

पुण्यात सध्या अशा पालकांची संख्या लक्षणीय आहे. नेटवरती त्यांचे विविध गटही कार्यरत आहेत. आवश्यकतेनुसार ते सगळे एकमेकांच्या संपर्कातही असतात. पण आपल्या मुलाकडून काय अपेक्षित आहे ते शेवटी प्रत्येक आई-वडिलच ठरवत असल्यामुळे प्रत्येकाची मुलांना हाताळण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

या पर्यायात मुलांच्या बौद्धिक्-शारिरीक विकासात संतुलन ठेवले जाते. त्या त्या वाढीच्या टप्प्यावर आवश्यक त्या अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या जातात. मुलांचा कल आणि मुलांकडूनच मागणी, नो स्पूनफिडींग हे मुख्य सूत्र आहे. त्यासंदर्भात अनुताई वाघ, ताराबाई मोडक, गिजुभाई बधेका, मादाम माँटेसरी यांनी अनेक मार्गदर्शक तत्वे, पुस्तके लिहून ठेवली आहेत. इंग्लंडमधे 'समरहील' याच तत्वावर १९२४ सालापासून सुरू आहे. त्याशिवाय घरचे-दारचे-आजुबाजुचे-समाजातले ओळखीचे-बिनओळखीचे अनेक मार्गदर्शकही आहेतच. आणि भरीला आपलं आपलंच पडणं-धडपडणंही Happy मुलं आणि आम्ही सगळेच एकत्र शिकतोय.

या कुणाचंही कसलंही मूल्यमापन करत नाही कारण प्रत्येक मूल वेगळं अस्तं, आहे. याला हे गणित आलं तर तो एखादी सुंदर कविता करेल. तिसरा एखादा पक्षी चटकन ओळखेल तर चौथा छानपैकी पदार्थ तयार करेल. त्याबरोबरच मूलभूत जीवनावश्यक कौशल्येही अगदी पैसे मिळवण्यापासून स्वतःचं स्वतः बनवून पोट भरण्यापर्यंतही त्यांना सगळं आलं पाहिजे हा कटाक्ष सर्वांच्या डोक्यात एकमताने आहे. घर आणि शाळा हे दोन स्वतंत्र विभाग नाहीत, जे शाळेत सुरू असतं तेच घरीही असतं. त्यामुळे मुलांचा गोंधळ कमी होतोय.

सध्या इतकंच सुचतंय.

सई मस्त पोस्ट. Home Schooling बद्दल खूप कुतुहल होतं मला Happy

अल्पनाचीही पोस्ट आवडली Happy

माझ्या लेकीच्या शाळा निवडीबद्दल थोड्याच वेळात लिहिते.

खुप उपयुक्त धागा. अजुन ६-७ महिन्यांनी मुलासाठी शाळा शोधण सुरू होइल, तेव्हा फार फायदा होईल या धाग्याचा.
सईची पोस्ट उत्तम, मलाही माझ्या मुलाला अस शिकवता आल असत तर खुप आनंद झाला असता पण ते शक्य नाही.

मनस्मिच्या पोस्टमुळे आयसीएसईचा मुद्दा लक्षात आला. पूर्वीपासून एसएससी बोर्ड नको असं वाटत होतं. सीबीएसई आणि आयसीएसई हे दोन्ही चालले असते. पैकी आयसीएसईला प्राधान्य होतं. योगायोगाने सर्वात जवळच्या शाळेत हा पर्याय उपल्ब्ध झाला. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासक्रमांप्रमाणे अपडेट करण्याची ग्वाही दिली गेली होती. शाळेने स्वतःहून सर्व पालकांशी चर्चा आयोजित केली होती. तीत सर्व शंकांचे निरसन करणारे प्रेझेम्तेशन दिले गेले होते. पण काही काळानंतर मुलाला अजिबातच वेळ शिल्लक राहत नसल्याने मैदानी खेळ आणि भूक लागणे या गोष्टींचा अभाव असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. शाळेने याचा विचार करून एक्स्ट्रा अ‍ॅक्टीव्हिटीज मधून काही गोष्टी कमी केल्या. तरी देखील आयसीएसईचा अभ्यासक्रम हा अभ्यासापेक्षा होमवर्क आणि दिले जाणारे प्रोजेक्ट्स यामुळे दमवणारा वाटतोय (यात शाळेचा वाटा किती आणि बोर्डाचा किती हे माहीत नाही). आता मात्र शाळा तक्रारी ऐकून घ्यायला तयार नाही. शाळा बदला असे उत्तर मिळते. अभ्यासापेक्षा प्रोजेक्टवर्क आणि इतर अ‍ॅक्टीव्हिटीजमधे वेळ गेल्यानंतर मुलांनी होमवर्क करायचा आणि यात स्वयंअध्ययनाला कधी नि कसा वेळ द्यायचा हेच समजत नाहीये.

मुलं थोडी मोठी झाल्यावर एसएससी बोर्डाच्या शाळेत घालावे का आसा विचार चालू आहे.

<तुम्ही स्वतः शाळा काढली / किंवा आता असलेल्या शाळेची धुरा तुमच्या खांद्यावर दिली तर तुम्ही काय बदल करु इच्छिता>

हे शक्यतेच्या चौकटीत बसेल का याबद्दल शंका आहे पण तरीही.

माझ्या शाळेतली वर्ग/इयत्तापद्धती वेगळी असेल. प्रत्येक विषयासाठी (दोन/ तीन किंवा अधिक भाषा, गणित) मुलांना त्या त्या विषयात आधी किती येतंय हे पाहून त्या त्या विषयासाठी वेगवेगळ्या इयत्तेच्या वर्गात ठेवलं जाईल. म्हणजे एकच विद्यार्थी इंग्रजीसाठी सातवीत, मराठीसाठी तिसरीत, गणितासाठी चौथीत असू शकेल.
खालच्या वर्गांत विद्यार्थी-शिक्षक हे गुणोत्तर एका आकड्यात असेल.
सगळ्या मुलांना दरवर्षी सगळे विषय असतीलच असं नाही. सगळ्यांच्या विषयांची एकूण संख्या सारखी असेलच असेही नाही.

या सगळ्यात शाळेचं प्रशासन बघणारा माणूस वेडा होऊ शकेल कदाचित.

कधी विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका वठवतील. (हे काम मुलं आवडीने करतात असं लक्षात आलं आहे.)

भाषा विषयांसाठी मुलांनी भाषा वापरण्यावर भर असेल. म्हणजे त्यांना आवडतील ती पुस्तकं त्यांनी पाहायची, उच्चारासाठी.संभाषणासाठी रोल प्ले असेल. आधार म्हणून नाटके, चित्रपट, पुस्तके यांचा आधार घेता येईल. व्याकरणाचा बाऊ सुरुवातीपासून असणार नाही. एखादा शब्द नाम, सर्वनाम, विशेषण नक्की काय आहे हे माहीत नसलं तरी तो वापरताना काहीही अडत नाही. कधी, कुठे, कसा वापरायचा हे सरावाने कळतंच.

वर्गात इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतील. काही विषयांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे संगणक असलेले वर्ग असतील.

मुलांना खेळात किंवा पुस्तकी विषयांव्यतिरिक्त अन्य गोष्टींत करियरची सोय असायला हवी. खरे तर सचिन, सानिया, सायना टाइप मुलांसाठी वेगळी शाळा हवी.

आतासाठी इतकं स्वप्नरंजन पुरे.

अरे वा ! सई यांची पोस्ट मस्त आहे. एखादी उपयुक्त लिंक असेल तर द्या ना.
होम स्कूलिंग बद्दल अनभिज्ञ आहे.

स्वीडन या देशातल्या एका कंपनीत मी कामाला होतो (भारतीय शाखेत). तिथे शाळेतून बाहेर पडणा-या मुलांना कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलं जातं. या कंपनीत बेअरिंग्ज बनवतात. काही विद्यार्थ्यांना फक्त बोअर ( छिद्र, भोक या अर्थी) हाच विषय शिकवला जायचा. पण बोअर या विषयाशी संबंधित सर्व मशीन्स, टूल्स, सरफेस क्वालिटी, रफनेस, रफनेस चेक करणा-या मशीन्स, मायक्रॉन मधील उंचवटे, खड्डे, त्याप्रमाणे मशीनचं सेटिंग अशी सर्व माहीती असायची. तसंच टूलचा हार्डनेस, मटेरीयला आर्डनेस यामुळे पडनारा फरक हे ही त्याला माहीत असायचं. त्याला बोअर इंजिनीयर म्हटलं जातं. अशाच पद्धतीने होनिंग, ग्राईंडिंग, क्वालिटी कंट्रोल या विषयातले स्वतंत्र पण सखोल ज्ञान घेतलेले प्रशिक्षणार्थी तिथे काम करतात.

शाळेत देखील सुरुवातीच्या काही वर्षात विद्यार्थ्याचा कल पाहून त्याला त्या त्या विषयात (फक्त) सखोल ज्ञान घेता यावं याची सुविधा (ऑप्शनल) असावी. ज्याला गणित जमतच नाही त्याला इतर विषयात गती नसते असं काही नाही. त्यासाठी त्याला नापास ठरवणे हा दोष दूर व्हायला हवा.

http://ecotude.wordpress.com/
हा इकोट्युड चा ब्लॉग आहे. ज्यांना आणखी जाणून घ्यायची उत्सुकता आहे, त्यांनी जरूर भेट द्या.
रोजच्या दिनक्रमात वाचन, लेखन, चित्रकला, स्वैपाक, गवंडीकाम, सुतारकाम, स्वच्छता, एकत्र चित्रपट / डॉक्युमेंट्रीज पहाणे आणि त्यावर बोलणे, विविध व्यावसायिकांना भेटी हे चालू असते. तळजाई टेकडीच्या पायथ्याशीच इकोट्युड असल्यामुळे दिवसातून एकदा वरती फेरी असते, अधेमधे मेंढपाळांसोबत किंवा आमच्या गवळीकाकांसोबत गोठ्यात एखादा दिवस, प्रत्येक ऋतूमधे मोठे ब्रेक घेऊन त्या त्या हवामानाची वैशिष्ट्ये - जसे त्या कालावधीतली पिके, फळे, भाज्या, फुले, सणवार, समुद्रावर जाणे, जंगल भेट आणि तिथले प्राणी-पक्षीजीवन अनुभवणे असे बरेच काही असते.

याशिवाय १५ दिवसातून एकदा होम व्हिझिट असते. सगळी मुले एकेकाच्या घरी पूर्ण दिवस किंवा अधेमधे रहायला जातात. प्रत्येक घर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातले सदस्य, त्यांचे रुटिन, सवयी, भाषा, त्यांचे स्वभाव, स्वैपाकाच्या पद्धती सगळे वेगळे असते. धर्माप्रमाणे त्यांचे सणवारही वेगळे, वेगळ्या पद्धतीने साजरे होतात. हे सगळं मुलांना सामाजीकदृष्ट्या खुप उपयोगी ठरते.

....

अल्पना , मस्त पोस्ट

गण्या., आयसीएसइ शाळांबद्दल योग्य लिहिलेत . माझा नातलगापैकी एकांचा पाल्य या बोर्डाच्या शाळेत आहे . शाळेचे तास भरपूर , खूप सार्या एक्टिविटीज , अभ्यासक्रम ही बराच आहे. या सर्वात त्याचा स्वताचा असा वेळ नाहीच. अजून एक म्हणजे आठवीपासून त्याला दोन विषयांसाठी नववी इयत्तेची पुस्तकही अभ्यासाला आहेत. म्हणजे आठवीच्या पुस्तकांबरोबर नववी इयत्तेची पुस्तकही अभ्यासायाची . भरपूर अभ्यास असतो या बोर्डांना .

माझ्या मुलांची शाळा cbsc बोर्ड आहे . bagless school आहे. अभ्यासाबरोबर इतर activities साठी पण भरपूर वेळ असतो . जेवण आणि snaks शाळेतच देतात . प्रत्येक सण मुलांना छान साजरा करावा म्हणून बर्याच महत्वाच्या सणांना सुट्टी असते . गणपती मध्ये तर दहा दिवस सुट्टी! मी आणि मुले तरी खुश आहोत ह्या शाळेवर !

सई मस्त लिहलात. तुमच्या अपेक्षा कळाल्या आणि त्या मळलेल्या वाटेने पुर्ण होत नाहित हे लक्षात आल्यामुळे तुम्ही तुमची नवी वाट निवडलीत. Happy

मयेकर, तुम्ही म्हणताय हे स्वप्नरंजन नाहीच, फक्त ते अमलांत कसे आणता येइल एवढेच म्हत्वाचे. आणि एकदा या गोष्टी एकत्र आल्या नेमके काय करायला पाहिजे ते क्लिअर झाले कि मग कसे करता येइल ते विचार करणे सोपे जाइल. पण तुम्ही ज्या पध्दतीने मांडले आहे ते ऑस्सम आहे. मी धागा काढण्यामागे प्रयोजन हेच आहे. असे वेगवेगळे विचार एकत्र करुन काहितरी अमलांत येण्यासारखा मार्ग ही काढता येइल.

बाकि सगळ्यांना पण धन्यवाद.

चांगला धागा, अनेक उत्तम प्रतिसाद.... धागाकर्ताही जातीने हजर राहून दखल घेतोय असे सुखद दृष्य

भरत, आपल्या स्वप्नपुर्तीसाठी काही ठोस करायचे ठरले असल्यास, नक्की कळवा. माझाही हातभार लावेन म्ह्णतो.

सई, तुझे होम स्कूलिंग बाबतचे लिखाण प्रतिसादांपुरते मर्यादित ठेवू नयेस असे वाटते. विषयाला संपुर्ण न्याय देण्यासाठी स्वतंत्र धागाच का काढेनास?

माझा अनुभव विचाराल तर, शाळा घराजवळ हवी आणि मराठी माध्यमाची हवी याखेरिज जास्त विचार केलाच नव्हता हे आत्ता जाणवतंय आणि जरा कमीच लक्ष दिले की काय आपण असे वाटून स्वतःची जराशी लाजही वाटत्ये. अर्थात सद्यस्थितीतल्या शिक्षणपद्धतीत / अभ्यासक्रमामधे, आपल्याला व्यवहारज्ञानी बनवण्याची / माणूस म्हणून बरे-वाईट घडवण्याची खूप अशी ताकद आहे असे वाटत नसल्यानेही कुठलीही शाळा चालेलच असा विचार मनात कोठेतरी असावा असेही जाणवते आहे.

मला स्वतःला शाळा सुरु करायची असेल तर 'तोत्तोचान'ची जशी शाळा होती, त्याप्रकारची शाळा चालू करायला आवडेल.

सई, छान पोस्ट.. नील च्या प्रगतीला आम्ही साक्षीदार असणार आहोत, याचा खुप आनंद होतो.

होम स्कूलिंग कितीही रम्य वाटलं तरी 'नॉट फॉर अस '
खूप डिव्होटेड पॅरेंटिंग हवं याकरिता.
टाईम , मनी आणि एनर्जी यापैकी फक्त मनी आहे. टाईम आणि एनर्जि नाही.

बाकी होम स्कूलर्सना पुढे काय ऑप्शन्स आहेत.
म्हणजे तुम्ही लोकानी काय करायचं ठरवलंय?

बरं शाळेकडून माझ्या अपेक्षा-

१. धोकटीमुक्त
२. गृहपाठमुक्त
३. एका वर्गात १० मुले आणि १ शिक्षक १मदतनीस
४. खालच्या वर्गात अतिशय हुशार आणि प्रशिक्षित शिक्षक
५. पाठांतरापेक्षा आकलनावर भर. तरिही थोडेफार पाठांतर हवेच
६. शाळा ५ तासांहून जास्त वेळ असल्यास मोठे मैदान आणि भरपूर खेळायची सोय
७. घराच्या २-३ किमीमध्ये
८. स्वच्छ, निटनेटकी आणि सुरक्षित
९. न रागावणारे आणि समंजस शिक्षक शिक्षिका.

यापैकी एकही अपेक्षा पूर्ण करणारी एकही शाळा या जिल्ह्यात नसल्याने घरापासून जवळ आणि धर्मनिरपेक्ष अशी शाळा निवडून मुलाला त्यात घातलं.
मुलीला १,२ आणि ४ क्रमांकाचे मुद्दे सोडल्यास उरलेल्या ६ मुद्द्यांची पूर्तता करणारी शाळा मिळाली.

थोडी उपयुक्त चर्चा इथे ही आहे:

http://www.maayboli.com/node/33117

अमोल कुलकर्णी चा हि ह्याच विषयावरील धागा होता. तिथे ही खूप सविस्तर चर्चा झालेली. शोधून देते.

Pages