परमहंस स्वामी स्वरुपानंद -एक अलौकिक जीवन

Submitted by पुरंदरे शशांक on 15 August, 2014 - 02:15

परमहंस स्वामी स्वरुपानंद -एक अलौकिक जीवन

स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे |
म्हणुनी वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे || स्वामी स्वरुपानंद ||
स्वामीजी स्मर्तृगामी (मनापासून त्यांचे स्मरण करायचा अवकाश, ते दर्शन देणारच) असल्याने त्यांचे प्रसन्न दर्शन भाविकांना कायमच परमात्म्याचीच आठवण करुन देते.

स्वामीजींचे लौकिक चरित्र बर्‍याच जणांनी लिहिले आहे - त्यात त्यांचा जन्म केव्हा झाला, ते आजारी केव्हा पडले, देसायांकडे रहायला कधी गेले, त्यांचे ग्रंथ कसे कसे प्रकाशित झाले हे सगळे वाचायला मिळते. त्यांच्या काही आठवणीही त्यात दिलेल्या असतात. पण स्वामीजींच्या ठायी जी पारमार्थिकता ओतप्रोत होती ती थोडीफार समजणारे जर कोणी असतील तर त्यांना स्वामीजी कसे वाटले हे जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल.

अगदी प्रथमच स्वामीजींच्या दर्शनाला येणार्‍या व्यक्तिचेही नाव, उद्योग-धंदा, राहण्याचे ठिकाण इतकेच काय तर त्या व्यक्तिची पारमार्थिक जाण काय हे सगळे स्वामीजी सहज जाणू शकत असत - हे जेव्हा त्या व्यक्तिच्या लक्षात येत असे तेव्हा ती व्यक्ति अतिशय आश्चर्यचकित होत असे. पण स्वामीजी मात्र त्यावर पुढे फार काही न बोलता त्या व्यक्तिकडून परमार्थ साधना कशी घडेल याकडे लक्ष देत असत व त्यानुसार मार्गदर्शन करीत असत. जर एखादी व्यक्ति नुसती दर्शनाला आली असेल तर ते परमार्थाबद्दल फार बोलतही नसत (एकंदरीतच ते फार कमी बोलत असत). येणार्‍या व्यक्तिची योग्यता जाणूनच ते त्यानुसार प्रतिसाद देत असत, जो येईल त्याला सरसकट शिष्य बनवण्याकडे त्यांचा अजिबात कल नव्हता.

स्वामीजींनी मूळ ज्ञानेश्वरी ही जशी "अभंग ज्ञानेश्वरी" या त्यांच्या ग्रंथातून सहज उलगडून सांगितली तसे त्यांच्या नित्य वा विशिष्ट वर्तनातूनही ते परमार्थ कसा सहज जगत होते हे जर ऐकायला/वाचायला मिळाले तर मग स्वामीजींचे काहीबाही अंतरंग दर्शन घडल्यासारखेच होइल. स्वामीजी सर्वच्या सर्व जाणणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखी केवळ एक दुष्प्राप्य गोष्ट आहे.

परमार्थ म्हणजे संसारातील कामे अजिबात न करणे वा कशीतरी करुन मोकळे होणे असा विपरीत अर्थ ते कोणालाही काढून देत नसत. संपूर्ण जीवनाचा (म्हणजेच संसार आणि परमार्थाचा) पायाच कर्म असल्याने कुठलेही काम अतिशय नेटकेपणाने करण्याकडे स्वामीजींचा कटाक्ष होता. कसेतरी काम उरकून टाकायचे त्यांना अजिबात मान्य नव्हते. स्वतः उत्तम कर्मे करुन ते आसपासच्या मंडळींना त्याचा आदर्श घालून देत. ( ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा जो छोटेखानी ग्रंथ त्यांनी लिहिला आहे, त्यातील जवळपास ४०-५० ओव्या या कर्मासंबंधीच आहेत यावरुन त्यांना कर्माबद्दल किती कळकळ होती हे स्पष्ट होते)

त्याकाळात लोकमान्यांच्या "गीतारहस्य" ग्रंथामुळे विद्वानांमधे गीता हा ग्रंथ प्रवृत्तीपर का निवृत्तीपर असे अनेक वाद झाले. लोकमान्यांनी गीता हा ग्रंथ संपूर्णतः प्रवृत्तीपर आहे असे जे प्रतिपादन केले ते स्वामीजींना पूर्ण मान्य होते. ते स्वतःला "टिळकाईट" म्हणवून घेत. कर्मे टाकणे हे मुळीच योग्य नाही, तर आपल्या वाट्याला आलेली कर्मे उत्तम प्रकारे करताना त्यातील आसक्ती (मी माझेपण) टाकूनच त्या कर्मापासून सुटका होते असे त्यांचे रोखठोक सांगणे होते.

सर्व कर्मे ठरलेल्या वेळेला करणे याला स्वामीजींच्या लेखी फार महत्व होते. दिलेली वेळ चुकवणे हा त्यांच्या दृष्टीने फारच मोठा अपराध होता. सहाजिकच स्वामीजींच्या सगळ्या नित्य कर्मांच्या वेळा अगदी ठरलेल्या असायच्या. त्यांना भेटायच्या (दर्शनाच्या) वेळाही अतिशय ठरलेल्या असायच्या.
या वेळ पाळण्याबाबत ते जरी आग्रही असले तरी तेवढेच सह्रदयही होते. स्वामीजींच्या उतारवयात बहुतांशकाल ते त्यांच्या बिछान्यातच पडून असत त्यावेळेसची गोष्ट. मुंबईहून काही भाविक त्यांच्या दर्शनाला आले होते. त्यांच्यासाठी दर्शनाची एक वेळ ठरवली गेली. एका भाविकाला काही प्रकृती त्रासामुळे नेमकी ती वेळ साधणे जमले नाही. या सर्व मुंबईकरांना (नोकरदार असल्याने) लगेच परत जाणेही आवश्यक होते. परत निघताना स्वामीजींच्या खोलीसमोर सगळे बाहेरुनच नमस्कार करुन निघत असताना ज्यांना स्वामीजींचे प्रत्यक्ष दर्शन घडले नव्हते त्यांना अतिशय वाईट वाटत होते (की स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी आपण एवढ्या लांबून आलो आणि दर्शनाशिवायच परत जावे लागत आहे). आणि नेमके त्या भाविकाचे नाव घेऊन जेव्हा स्वामीजींचा सेवेकरी बाहेर येऊन त्यांना स्वामीजींनी आत बोलावले आहे हे सांगू लागला तेव्हा त्या भाविकाच्या डोळ्यात अश्रूधाराच ओघळू लागल्या.

एकदा स्वामीजींच्या एका शिष्येने काही व्रत केले व त्या व्रताची सांगता म्हणून काही जोडप्यांना भोजनाला बोलावले. त्या भोजनाकरता स्वामीजींनी तिला काय काय सामान आणायचे व किती प्रमाणात आणायचे याची एक यादीच करुन दिली (केवळ तांदूळ -डाळी-गहू नव्हे तर मोहरी, हिंग, इ. बारीक सारीक गोष्टींसकट). त्यानुसार सर्व सामान आणण्यात आले व त्यातून सर्व स्वयंपाक करण्यात आला. त्या शिष्येची मनातल्या मनात फार उलघाल होत होती की जर हा स्वयंपाक सगळ्यांना पुरला नाही तर ??? मात्र सर्वांची जेवणे झाल्यावर फक्त एक गोळाभर भात शिल्लक राहिलेला पाहून त्या शिष्येला राहवले नाही व ती स्वामीजींना तो चमत्कार सांगायला गेली.
- यावर स्वामीजींचे म्हणणे एवढेच होते - "आपले सगळ्याच बाबतीतले मोजमाप नेमके पाहिजे. संसार अगदी कुशलतेने करणे ही त्या सर्वात्मक ईश्वराची सेवाच होय."

१९३३ साली स्वामीजी फारच आजारी झाले. तेव्हापासून पुढे तो अशक्तपणा जवळ जवळ आयुष्यभर टिकून होता. तसे ते निरोगी होते पण धट्ट्याकट्ट्या माणसासारखे दिवसच्या दिवस श्रमाची कामे ते करु शकत नसत. हे सगळे लक्षात घेऊन अनेक डॉक्टर्स, वैद्य त्यांची तब्येत नीट व्हावी म्हणून आपणहून मोठ्या प्रेमाने येऊन त्यांना तपासत व काही सुचवीत असत. यामधे मुम्बईचे विख्यात डॉ. गिंडेदेखील होते. त्यांनी स्वामीजींना नीट तपासून निर्वाळा दिला की स्वामीजी अगदी निरोगी आहेत - पण हा अशक्तपणा जाण्यासाठी सकाळची कोवळे ऊन्हे स्वामीजींच्या तब्येतीसाठी उत्तम. स्वामीजी असे मिश्किल की सकाळचे कोवळे उन त्यांच्या खोलीत आले की त्यांच्या सेवेकर्‍याला म्हणायचे - हे पहा, आले डॉ. गिंडे ......

हा त्यांचा अशक्तपणा जावा म्हणून बेळगावचे प्रख्यात कविवर्य बेंद्रे यांनी आपल्या बरोबर चांदीची ताट, वाटी, भांडे इ. आणून देसायांकडे दिले व सांगितले की या चांदीच्या ताट-वाट्यातूनच स्वामीजींनी जेवायला -खायला द्या - यामुळे त्यांचा अशक्तपणा भरुन निघेल. स्वतः बेंद्रे पावसला २-४ दिवस रहायला होते. त्याकाळात स्वामीजी त्या
चांदीच्या ताट-वाट्यातूनच जेवण-खाण करीत असत. पुढे बेंद्रे बेळगावला परत गेल्यावर स्वामीजींनी देसायांना सांगितले की ते चांदीचे ताट-वाटी आता यापुढे नको. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. तेव्हा स्वामीजी म्हणाले की श्री. बेंद्रे यांनी ज्या मोठ्या प्रेमाने आणि भावाने हे सर्व आणले तो भाव जपण्यासाठी मी काही दिवस त्या चांदीच्या ताट-वाटीचा उपयोग केला - आता ते काही नको - मी एक साधे-सरळ जीवन जगू इच्छितो - या चांदीच्या ताट-वाटीत जेवले काय आणि साध्या ताट-वाटीत जेवले काय - जे अन्न पोटात जाणार त्यानेच तुष्टी-पुष्टी येणार. उगाच कोणाच्या मनात -पहा, महाराज कसे चांदीच्या ताट-वाटीत जेवतात असा भाव निर्माण होईल - तेव्हा ती गोष्ट टाळणेच चांगले.

स्वामीजींना अनेकजण शुभविवाहाच्या निमंत्रण पत्रिका देत. स्वामीजींना त्यांच्या शरीरप्रकृतीमुळे कुठे जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे ते ती निमंत्रण पत्रिका त्या लग्न मुहुर्ताच्या आधीच समोर घेऊन बसत आणि नेमके त्या मुहुर्तावर त्या पत्रिकेवर अक्षदा टाकून त्या नवविवाहितांना तेथूनच मंगल आशीर्वाद देत. कोणाचाही भाव जपण्याकडेच त्यांचा कल होता. कोणी नवविवाहित जोडपे त्यांच्या दर्शनाला आले तर त्या जोडप्याला यथोचित आहेर स्वामीजींकडून दिला जात असे.

एकदा स्वामीजींकडे एक व्यक्ति आली व संसारातील त्रासासंबंधी काय काय सांगू लागली -स्वामीजींनी ते शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले की तुम्हाला संसारात जो त्रास आहे, अडचण आहे त्यामुळे मलाही खूप दु:ख झाले आहे - या त्रासामुळे तुमच्या मनाचा जो दाह झाला आहे तो दूर व्हावा म्हणून मी काही काळ सोऽहं स्मरण करतो (ते या सोऽहं स्मरणाला भजन म्हणत असत) - तुम्हीही माझ्याबरोबर ते केलेत तर चांगलेच ....

स्वामीजींच्या उतारवयात त्यांच्या सेवेकरीता काही सेवेकरी होते. ते सारे मोठ्या प्रेमाने स्वामीजींची सेवा करीत. तरीही स्वामीजी त्याचा योग्य तो मोबदला(पैसे) त्यांना देत असत. पण आपल्या पश्चात या मंडळींना पैशाची अडचण येऊ नये म्हणून स्वामीजींनी प्रत्येकाच्या नावाने काही रक्कम श्री. देसाई यांच्याकडे देऊन ठेवली होती व त्याप्रमाणे स्वामीजींच्या महानिर्याणानंतर श्री. देसाई यांनी त्या त्या सेवेकर्‍याला ती रक्कम दिली. सर्वच्या सर्व सेवेकर्‍यांनी डोळ्यात पाणी आणून पैसे घेण्याला स्पष्ट नकार दिला. यावर श्री. देसाई यांनी स्वामीजींच्या स्पष्ट सूचना सांगितल्या की स्वामीजी अतिशय व्यवहारी होते - त्यांनी ही रक्कम देताना पारमार्थिक भाव व व्यवहार याची गल्लत न करता ही रक्कम त्या सेवेकर्‍यांनी घेणे कसे योग्य आहे हेदेखील लिहून ठेवल्याचे सांगितले व ते जेव्हा वाचून दाखविले तेव्हा तेथील सर्व मंडळींना जणू एक मोठा धडाच मिळाला.

पावसला एक साधा पोस्टमन होता. न चुकता स्वामीजींचे दर्शन घेऊन मगच तो पत्रवाटपाचे काम करायचा. जेव्हा स्वामीजींची प्रकृती क्षीण होत गेली तेव्हा सहाजिकच त्यांचे दर्शन घेण्यार्‍यांवर बंधने घालावी लागली. मात्र या पोस्टमनचा जो दृढभाव होता त्यामुळे ज्या अगदी मोजक्या मंडळींना स्वामीजींचे दर्शन व्हावयाचे त्यात या पोस्टमनलाही आवर्जून स्थान दिलेले होते.

स्वामीजी कधीही कोणा शिष्यालाही हे अमुक करा अशी आज्ञा देत नसत. ते पाहून एकाने स्वामीजींना विचारले की तुम्ही नाथ-संप्रदायाचे अध्वर्यू असताना आपल्या शिष्यांनाही कधी चुकूनदेखील - अमुक अमुक करा - अशी आज्ञा करीत नाहीत तर- "अमुक असे करावे" असे विध्यर्थी का बोलता ? त्यावर त्या महात्म्याचे शब्द होते - चुकून जरी त्या शिष्याला ते करायला जमले नाही तर निदान गुरु-आज्ञा मोडल्याचे पातक तरी त्याच्या माथी लागू नये म्हणून ....
असा शिष्यांबद्दलचा जगावेगळा कळवळा असलेला हा महापुरुष ....

स्वामीजींसारख्या कुठल्याही संतांचे संतत्व हे त्यांच्या चमत्कारात अजिबात नसते तर त्यांच्या ठायी जे दैवी गुण असतात त्यामधूनच ते प्रकट होत असते. या संतांचा असा अजिबात भाव नसतो की मी कुणी मोठा आहे, देवतुल्य आहे. मात्र अतिशय भक्तिभावाने त्यांच्याकडे येणार्‍याचा भाव जपण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. कारण हा भक्तिभावच त्या व्यक्तिची परमार्थ मार्गात यशस्वी वाटचाल घडवून आणतो याची पूर्ण जाणीव त्या संतांना असते. पुढे हाच भक्तिभाव परमेशाच्या ठायी कसा वाढेल याकरताच त्यांची सारी खटपट असते.

स्वतः स्वामीजी प्रसिद्धी पराङ्मुख होते. परमहंस पदावर आरुढ होऊनही अतिशय साधे जीवन ते जगत होते. सुरुवातीला त्यांच्या आसपासच्या कोणालाही ते संत वाटतही नव्हते इतके ते सर्व सामान्यांसारखे रहात होते. सारेजण त्यांना "अप्पा" म्हणूनच संबोधत. जेव्हा त्यांच्याकडे फार मोठ मोठी मंडळी (श्री श्रीधरस्वामी महाराज, रा. स्व. संघाचे श्री. गोळवलकर गुरुजी, इ.) येऊ लागली तेव्हा मग आसपासची मंडळी त्यांना स्वामीजी म्हणू लागली.

कोणाचेही संसारातले गार्‍हाणे, संकट दूर करणे हे संतांचे कार्य नसते तर या संकटाला जे आपण पार घाबरुन जातो ते त्यांना आश्चर्यकारक वाटते. त्या संकटांना धैर्याने तोंड कसे द्यायचे याकरता त्यांचा सारा खटाटोप असतो. याकरता परमात्म्यावर अढळ निष्ठा कशी ठेवायची हे ते स्वतःच्या कृतीतूनच दाखवून देतात. ( जेव्हा १९३३ साली ते अतिशय आजारी झाले तेव्हा फक्त परमेश्वरावरच संपूर्ण श्रद्धा ठेऊन ते रहात होते - हे त्यांच्या "अमृतधारा" या साकीबद्ध ग्रंथातूनही वाचायला मिळेल)

सतत सोऽहं (तो परमात्माच मीच आहे) चे अनुसंधान यापलिकडे स्वामीजींना काहीही प्रिय नव्हते. त्याचाच उपदेश त्यांच्याकडे येणार्‍या सद्भक्तांना ते करीत असत. मात्र हे अनुसंधान टिकण्यासाठी मोठ्या प्रेमाने नामस्मरण, पूजाअर्चा तसेच ज्ञानेश्वरी-दासबोध अशा सदग्रंथांचे नित्य नेमाने वाचन, मनन व त्यानुसार आचरण यालाही ते कमालीचे महत्व देत.

कितीही पारमार्थिक ग्रंथ वाचून, पारायणे करुनही जे आपल्या सारख्या सर्व सामान्यांना कधीही कळण्याची शक्यता नाही ते स्वामीजींसारख्या संतांच्या केवळ अस्तित्वातून, कृतीतून सहज शिकायला मिळते - यापलिकडे संत संगतीचे माहात्म्य काय वर्णन करायचे ??
त्यामुळेच की काय - आत्मज्ञाने चोखडी | संत ही माझी रुपडी | तेथे दृष्टी पडो आवडी | कामिनी जैसी || - ज्ञानेश्वरी || असे प्रत्यक्ष भगवंतच म्हणतात त्यात नवल ते काय बरे ??
स्वामीजींचा एक मोठा चमत्कार असा - की जी व्यक्ति उभ्या जन्मात कधीही परमार्थाच्या वाट्याला जाणारी नसली तरी केवळ स्वामीजींच्या दर्शनानेही अशा व्यक्तिच्या चित्तामधे पालट घडत असे व ती सद्वर्तनी बनण्याचा प्रयत्न करीत असे.

अजूनही पांवस या पुण्ण्यक्षेत्री स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेताना त्यांचे चैतन्यस्वरुपातले अस्तित्व भाविकांना जाणवतेच. तसेच श्री. देसाई यांच्या "अनंत निवास" या वास्तूत जी स्वामीजींची खोली नीट जतन करु ठेवली आहे तिथेही एक सोऽहं तत्व भरुन राहिले आहे हेही जाणवतेच.

स्वामीजींची जी ग्रंथ संपदा आहे त्याचे डोळसपणे आणि सश्रद्धतेने वाचन आणि त्यानुसार काहीबाही आचरण एवढे (माझ्यासकट) आपल्याकडून व्हावे ही स्वामीजींच्या चरणी मनोभावे, प्रेमपूर्वक प्रार्थना.

मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी
तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी |

सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य
तुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवन धन्य || अमृतधारा ||
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो" - हे त्यांच्या चरित्रग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले त्यांचेच एक वचन परमार्थाचे सर्व सार सांगून जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(१५ ऑगस्ट - श्रीस्वामी स्वरुपानंद पुण्यतिथी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिले आहे !
>>स्वामीजींनी मूळ ज्ञानेश्वरी ही जशी "अभंग ज्ञानेश्वरी" या त्यांच्या ग्रंथातून सहज उलगडून सांगितली >> हे त्यांचं एक महान कार्य . मूळ ज्ञानेश्वरीकडे वळायला प्रवृत्त करणारा हा ओवीछंदातला आणि समकालीन सोप्या मराठीतला ग्रंथराज तशाच श्रेष्ठ संताकडून लिहिला जाणं क्रमप्राप्त होतं..

सुंदर.
डोळे भरून आले. पुढे पुढे तर डोळे नीट पुसल्याशिवाय वाचता येणेही कढीण झाले.

तुमचे हे वाक्य अगदी खरे आहे.
स्वामीजींचा एक मोठा चमत्कार असा - की जी व्यक्ति उभ्या जन्मात कधीही परमार्थाच्या वाट्याला जाणारी नसली तरी केवळ स्वामीजींच्या दर्शनानेही अशा व्यक्तिच्या चित्तामधे पालट घडत असे व ती सद्वर्तनी बनण्याचा प्रयत्न करीत असे.

मात्र बरेच वेळा हे लागलीच घडत नसल्यामुळे असा चमत्कार लक्षात येत नाही. कारण ते अशा व्यक्तिच्या चित्तात बीजारोपण करतात. येथे 'बीजारोपण करतात' असे म्हणणे योग्य होणार नाही. तर ते त्यांच्याकडून सहज होते किंवा तो त्यांचा स्वभावच बनलेला असतो. असो. असे हे बीज अनुकुलतेच्या प्रतिक्षेत पडून राहिलेले असते व भविष्यात जेव्हा केव्हा अनुकुलता लाभते तेव्हा ते बीज अंकुरते.

तुमचा लेख वाचून खूप छान वाटले.

सर्वांना मनापासून धन्यवाद ...

श्री. भागवत - तुम्ही म्हणताय ते अग्दी खरे आहे - शुद्ध परमार्थाचे बीजारोपण स्वामीजी आपल्या अंत:करणात अशा खुबीने करतात की तो एक अनुभवच आहे. पुढे त्या बीजाचे जे रोप होणार त्यासाठी मात्र आपल्यालाच फार नेटाने प्रयत्न करावे लागणार (साधना करावी लागणार) व या रोपाला फोफावण्यासाठी स्वामीकृपेचीही अतिशय गरज असल्याने त्यांच्या चरणांशी अनन्यभावाने प्रार्थना करणेही खूप गरजेचे आहे.
तुम्हाला प्रत्यक्ष स्वामीजींचे दर्शन झाले हे महद्भाग्यच - तुमच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत ... ___/\____

श्री. शशांक पुरंदरे
सा.न.

सत्गुरूंनी सांगितली म्हणून मी साधना करतोय बाकी मला काही कळत नाही तसेच त्यांनी सांगितलेली साधना मी करत असलेली पाहून सत्गुरूंना खूप आनंद होतोय आणि त्यांना आनंद होतोय म्हणून मी साधना करत राहणार आहे अशा प्रकारचा भाव साधना करताना धरता आला तर खूप फायदा होऊ शकतो. मुख्य म्हणजे परमार्थातील आपले वाचन मनन व चिंतन यांचा विक्षेप साधनेत येत नाही. सत्गुरूंचे अनुसंधानही कायम राहते. मग मात्र साधना नेटाने करता करता ती नेटाने होऊ लागते. एखादी गोष्ट करण्याऐवजी जेव्हा ती होऊ लागते तेव्हा त्याला कृपा म्हणतात.

सर्वांना नमस्कार
सर्वांना शुभेच्छा.

परमहंस पद म्हणजे नक्की काय ? ते कसे प्राप्त होते ? >>>> श्री प्रसाद गोडबोले -

तें परम तत्त्व पार्था | होती ते सर्वथा | जे आत्मानात्मव्यवस्था- | राजहंसु ||ज्ञानेश्वरी अध्याय १३ ओवी ११४३||

अनात्म वस्तूपासून आत्मा निवडून काढणारे जे महात्मे ते राजहंस असे माऊलींचे वचन आहे. (दूध आणि पाणी एकत्रित केले असता त्यातील पाणी बाजूला सारून फक्त दूध पिणारे ते राजहंस अशी जी कविकल्पना आहे त्याला अनुलक्षून माऊलींनी ही उपमा दिलेली आहे). त्यानुसार जे कोणी आत्मज्ञानी असतात त्यांना परमहंस असे संबोधले जाते.
धन्यवाद.

परमहंस या पदाबद्दल शशांक पुरंदरे यांनी सांगितलेले बरोबरच आहे पण आणखी थोडा अधिक अर्थ आहे असे वाटते. साक्षात्कारी व सिध्द पुरूषांचे पण दोन प्रकार असतात.

साक्षात्कार झाल्यावर काही त्यातच रममाण होतात. परत देहभावावर येत नाहीत. त्यांना आणावे लागते. उदा. स्वामी नेहमी समाधी अवस्थेतच असायचे. कोणी जर भेटायला आला तर त्यांना स्पर्श करावा लागे. निदान बोट तरी लावावे लागे. जर बोट काढले तर ते परत समाधी अवस्थेत जात. अशीच अवस्था रामकृष्ण परमहंसांची असायची. गादीच्या खाली एखादे नाणे ठेवले तरी त्यांना त्याचा त्रास व्हायचा.

पण काही संत मात्र परत समाजात समाजोध्दारासाठी परत येतात. ते जगतात देवबुध्दीने पण भासतात देहबुध्दीने वागणार्‍यांसारखे उदा. गोंद्वलेकर महाराज किंवा रामदास स्वामी वगैरे.

हा फक्त स्वभाव आहे ज्याचा त्याचा. यात चांगले वाईट किंवा श्रेष्ठ कनिष्ठ असे काहीही नाही. समाजोध्दाराचे कार्य दोघेही करतात फक्त पध्दत वेगवेगळी. असो.

मला वाटते यावर आणखी चर्चा करणे म्हणजे मूळ विषय सोडल्यासारखे होईल. म्हणून थांबतो.

धन्यवाद पुरंदरे , भागवत काका !

आपण परमहंस पदाला किंव्वा अद्वैताच्या अपरोक्षानुभुतीला पोहचलो आहोत हे आपल्याला कसे समजणार अशी शंका आमच्या एका मित्राने विचारली होती , त्याला काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडला होता म्हणुन विचारले !

बाकी आपले उत्तर पाहुन तो परमहंस पदाला पोहचला आहे असे माझे मत झाले आहे , आता त्याला कळवतो Happy

पुनश्च एकवार धन्यवाद Happy

जाबालोपनिषद् - परमहंस कोण ?

तत्र परमहंसा नाम |
(त्यात परमहंस कोण ?)

अव्यक्तलिंगा अव्यक्तचारा: | अनुन्मत्ता उन्मत्त्वद् आचरन्तः |
(ज्यांना (काषायवस्त्र आदि) कसलीही खूण नाही, ज्यांचे आचरण लोकांना कळत नाही. ते उन्मत्त नसतात, पण (लोकदृष्टीने) उन्मत्तासारखे, वेड्यासारखे आचरण करणारे असतात.)

जातरूपधरो निर्द्वंद्वो निष्परिग्रहः | ब्रह्ममार्गे सम्यक् संपन्नः शुद्धमानसः | प्राणसंधारणार्थं भैक्षमाचरन् | अनिकेतवासी अप्रयत्नो निर्ममः | शुक्लध्यानपरायणः अध्यात्मनिष्ठः | अशुभकर्मनिर्मूलनपरः | संन्यासेन देहत्यागं करोति | स परमहंसो नाम |
(जन्मला असताना जसा होता तसा राहणारा, निर्द्वंद्व, परिग्रह न करणारा, ब्रह्ममार्गात (अध्यात्ममार्गात) नीट रीतीने संपन्न झालेला, शुद्ध मन असलेला, प्राणधारणापुरती भिक्षा मागणारा (म्हणजे प्राणवृत्तीने राहणारा), अनिकेत, काहीहि प्रयत्न न करणारा, ममत्व नसणारा, निरुपाधिक ध्यान करणारा, आत्मनिष्ठ, अशुभ कर्मांचे निर्मूलन करणारा जो संन्यासाने देहत्याग करतो, तो परमहंस होय.)

(अष्टादशी - आ. विनोबा, परंधाम प्रकाशन, पवनार (वर्धा). - पान क्र. २५८-२५९ )

पावसला गेल्यावर एक खुप शांत, प्रसन्न भावना होते. त्या वातावरणातच ती भरलेली असते. तुमच्यामुळे त्याची काही कारणं समजली. स्वामीजींबद्दल फक्त ऐकलेलं आहे आजवर, वाचलेलं काही नाही. मागे एकदा चुलतबहीण अमृतधारा वाचताना भारावलेली आठवतेय. आता वाचायला हवं.
खुप सुंदर परिचय करून दिलात तुम्ही. धन्यवाद.

जी शान्तता पावसला गेल्यावर वाटते.. लेख वाचत असतानाच तशीच शान्तता वाटायला लागली.. अन्य लोकान्चे अभिप्रायातून बरीच माहीती मिळली.

>>>खरा परमार्थ परिस्थितीत बदल घडवून सुखाची प्राप्ती करून देत नसून प्रत्येक प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला शिकवीत असतो" >>>>
अगदी खरं..
स्वामी किती साधे होते . त्यांचे साधेपण खरच आचरण्यासारखेच.

अवांतर- एकाला स्वामींनी दिलेली सोहंसाधना उलटली होती. ह्या व्यक्तीला अमानवीय गोष्टींमध्ये जरा जास्तच नाद आणि गती होती त्यामुळे त्याला काय हि उपासना झेपली नाही. कोणाला तो प्रसन्ग पूर्ण माहित असेल तर कृपया इथे लिहावा.