पाऊस - रायगड प्रदक्षिणेतला!

Submitted by आनंदयात्री on 28 July, 2014 - 01:59

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत!

सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

उजव्या हाताला महादरवाजापासून निघालेली तटबंदी. कडा चढायला जाल, तर अजूनही अभेद्य! हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. टकमक टोकाखाली पाऊस कमी झाला. रेनकोट नावापुरताच अंगावर. पाठीवरच्या बॅगेलाही हौसेने कव्हर चढवलेलं. बॅगेत कॅमेरा! पावसाला थट्टा करायची लहर आली आणि त्याने एक वेडीवाकडी सर धाडून दिली. आता सगळीकडून पाऊस. सगळीकडून ओली सोबत. पायवाटेशेजारच्या लुशलुशीत गवतात अंग झोकून द्यावं, मनसोक्त लोळावं इतकं ते लोभस रूप! रायनाक किल्लेदाराच्या समाधीपाशी थोडं रेंगाळलो. पाऊस तिरक्याचा सरळ झाला.

कावळ्या-बावळ्याची खिंड, कोकणदिवा, लिंगाणा, भवानी कडा - काही दिसत नव्हतं. धुकं, ढग आणि पाऊस. खिंडीखालच्या रानात पावसाने धुमाकूळ घातलेला. झाडं पाडून वाट रोखलेली. त्यांची खोडं, फांद्या, काटे तोंडावर सपके मारत होते. त्यावर समजूत काढायला हा होताच! निरनिराळे डास, किडे, माश्या यांच्याकडून मग स्वतंत्र पाहुणचार झाला. हे सगळे इथलेच खास रहिवासी. यांच्या घरात आपण पाहुणे, त्यामुळे काही बोलताही येईना. खिंडीच्या चढाने दम काढला. पावसाने ओली गच्च झालेली माती बुटाने घसरायला लागली. नंतर कळलं की घसरत मी होतो, माती तर पावसाने केव्हाच जमिनीत घट्ट रुजवली आहे.

खिंडीत निम्मी प्रदक्षिणा झाली. राजाचे पाय इथे लागले असतील. 'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.' आज दिसतंय आणि पटतंय हे!

खिंड ओलांडून पलीकडे उतरलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या. तर पुन्हा पाऊस सुरू. भर पावसातली पंगत. कुणी झाडाखाली उभ्याने खातंय, कुणी दगडावर बसलंय, कुणी गवतावरच गोल करून बसलंय. कुणाच्या डब्यातल्या पराठ्यात पाऊस, तर कुणाच्या चमच्यावरच्या लोणच्यामध्ये पाऊस. कुणी भातावर पाऊस ओतून खातंय तर कुणी पिशवीतल्या चिवड्यावर पेरून खातंय. डबा उलटा केला की पाऊस रिकामा आणि जॅम-बटर पुन्हा जेवण्यात रुजू! वर 'अन्न कोरडं खाऊ नये, ओलं करून खाल्लं की पचतं' हे समाधान!

उतार दिसला की ओहळ सुरू. सगळ्या आसमंतात पाऊस होता. पोटल्याच्या डोंगरावरती होता, रोपवेभवती होता, खाली रानात होता, कोकम-लिंबात होता, धबधब्यात होता, कातळावरच्या शेवाळात होता. महाडात काळ नदीला आलेलं पाणी पाहिल्यापासून माझ्या मनातही शिरला होता. कुडकुडणारी थंडी नशिबाने यावेळी सोबत नव्हती. या पावसाची मायाच अशी होती की थंडीलाही त्याने दूर ठेवलं.

चालायला सुरूवात केल्यापासून साडेपाच तास होत आलेत. आता अंगावर एकही जागा अशी नाही की जिथे पाऊस नाहीये. प्रदक्षिणेच्या या बाजूचं रान प्रेमळ आहे. त्या बाजूसारखी काट्याची झाडं जाब विचारायला नाहीयेत. इथल्या फांद्या वाट अडवून उभ्या आहेतच, पण दूर होताना हातालाही मऊशार शुभेच्छा देतायत.

मी एकटाच पुढे आलो. दुखर्‍या गुडघ्यामुळे इतरांना उशीर होऊ नये म्हणून थांबत नव्हतो कुठेच. आता भवती बंद जंगल आहे. मगाशी काहीतरी झुडूपातून धावत गेलं. रानडुकर असावं. तेही पावसाने कावलं असेल, झुडूपात शिरलं असेल, आणि त्यात माझी चाहूल लागून गांगरून धावलं असेल. पाण्याचा आवाज वाढत चाललाय आता. बहुतेक धबधबा येतोय वाटेत. हा या बाजूचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. अंदाज लावायचा झाला तर हा वाघ दरवाजातून निघणारा धबधबा असणार. म्हणजे कुशावर्त तलाव आलाच. आणि मग रोपवे.

अवकीरकरांच्या 'जय मल्हार' मध्ये अगत्याचा चहा झाला, कपडे बदलले, आणि पाऊस घेऊन परतीला लागलो. सोबत होता शिवराजाचा अभिमान - नेहमीसारखाच! थोडा जास्तच!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/07/blog-post_28.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार डाला. आंद्या कसलं कातिल लिहितोस रे?? अगदी त्या सफरीवर असल्यासारखं वाटतं.

पुनः पुनः त्या पाऊलवाटा ओळखीच्या वाटायला लागतात कारण तू म्हणतोस तस साडेतीनशे वर्षांपुर्वी आपलाच कुणीतरी ज्याचा अभिमान बाळगावा असा होऊन गेलाय पुन्हा आपल्याला त्या वाटेवर नेण्यासाठी.

या प्रदक्षिणेनं बरच काही दिल असेल ना? असो.

शेवटचे पॅरेग्राफ तर भ्रमणगाथेत घेऊन गेले अगदी ओघवत तरिही आतपर्यंत पोचणारं वर्णन.

"...दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा..." ~ अगदी तो संतुष्ट चेहराच समोर आला. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी ही प्रदक्षिणा केली होती, दिवाळीच्या सुट्टीत, त्यामुळे पावसाचा आनंद घेता आलाच नाही....आज आनंदयात्रींनी केलेले हे सुरेख चित्रमयी वर्णन वाचताना वाटू लागले की अरे, हा तर मीच आहे ३० वर्षापूर्वी अशाच ठिकाणी मी गेलो होतो, दोन मित्रांसमवेत....अशीच दमछाक आणि इतकेच अनोखे असे समाधान.

महाराजांना अनुभवायचे असेल तर आनंदयात्री यानी संपन्न केलेली ही यात्रा प्रत्येकाने किमान एकदा तरी पूर्ण केली तर लेखकाच्या या सुंदर लिखाणाला खर्‍या अर्थाने दाद मिळेल.

नचिकेत, पावसाचा असा महोत्सव अनुभवणारा तो ट्रेकर होता तुमच्यातला आणि त्या चंचल सख्याला चक्क शब्दात पकडून इथे आमच्या भेटीला हाजिर करणारा तो कवीच, दुसरं कोण करेल हे काम !

मजा आली. त्या हिरव्याओल्या वादळवाटा तुडवत गेल्यासारखं वाटलं.

सर्वांचे मनापासून आभार... Happy

ट्रेकबद्दलच, पण नेहमीच्या ट्रेकवृत्तांतापेक्षा काहीतरी वेगळं लिहून बघायचं होतं, त्यामुळे एक ललित लिहून पाहिलं. तुम्हाला आवडलं, याचा आनंद आहे. Happy

रायबागान, दिलसे शुक्रिया Happy

सुंदर शब्द. फोटोंची अजिबात गरज नाही कारण हा पाऊस...ही धारा या चिंब शब्दांतून अनुभवायची आहे.
>>> अमेय, होय, एकतर तुफान पावसामुळे एक्कही फोटो काढला नाही मी, त्यामुळे शब्दातूनच पाऊस मांडायची संधी मिळाली...

डिस्क्या, दगडू, जिप्स्या, सेना, इंद्रा, संदीप, स्वच्छंदी, तुम्हा ट्रेकर्स मित्रांचे अभिप्राय आले की अगदी घरचं कौतुक झाल्याचा आनंद होतो... Happy

गुब्बे, अशोकजी, खूप खूप धन्यवाद Happy

कवे Happy

रायगडचा अभिमन आहेच तो दुणावला.

अप्रतिम लिखाण. फोटो ही टाका असतील तर.

दोन वर्षं झाली या प्रदक्षिणेला... आठवलं म्हणून वर काढला धागा...

सुंदर शब्द. फोटोंची अजिबात गरज नाही कारण हा पाऊस...ही धारा या चिंब शब्दांतून अनुभवायची आहे.
>>> अमेय,
>>>>>>>+111111111

Pages