पाऊस - रायगड प्रदक्षिणेतला!

Submitted by आनंदयात्री on 28 July, 2014 - 01:59

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत!

सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

उजव्या हाताला महादरवाजापासून निघालेली तटबंदी. कडा चढायला जाल, तर अजूनही अभेद्य! हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. टकमक टोकाखाली पाऊस कमी झाला. रेनकोट नावापुरताच अंगावर. पाठीवरच्या बॅगेलाही हौसेने कव्हर चढवलेलं. बॅगेत कॅमेरा! पावसाला थट्टा करायची लहर आली आणि त्याने एक वेडीवाकडी सर धाडून दिली. आता सगळीकडून पाऊस. सगळीकडून ओली सोबत. पायवाटेशेजारच्या लुशलुशीत गवतात अंग झोकून द्यावं, मनसोक्त लोळावं इतकं ते लोभस रूप! रायनाक किल्लेदाराच्या समाधीपाशी थोडं रेंगाळलो. पाऊस तिरक्याचा सरळ झाला.

कावळ्या-बावळ्याची खिंड, कोकणदिवा, लिंगाणा, भवानी कडा - काही दिसत नव्हतं. धुकं, ढग आणि पाऊस. खिंडीखालच्या रानात पावसाने धुमाकूळ घातलेला. झाडं पाडून वाट रोखलेली. त्यांची खोडं, फांद्या, काटे तोंडावर सपके मारत होते. त्यावर समजूत काढायला हा होताच! निरनिराळे डास, किडे, माश्या यांच्याकडून मग स्वतंत्र पाहुणचार झाला. हे सगळे इथलेच खास रहिवासी. यांच्या घरात आपण पाहुणे, त्यामुळे काही बोलताही येईना. खिंडीच्या चढाने दम काढला. पावसाने ओली गच्च झालेली माती बुटाने घसरायला लागली. नंतर कळलं की घसरत मी होतो, माती तर पावसाने केव्हाच जमिनीत घट्ट रुजवली आहे.

खिंडीत निम्मी प्रदक्षिणा झाली. राजाचे पाय इथे लागले असतील. 'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.' आज दिसतंय आणि पटतंय हे!

खिंड ओलांडून पलीकडे उतरलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या. तर पुन्हा पाऊस सुरू. भर पावसातली पंगत. कुणी झाडाखाली उभ्याने खातंय, कुणी दगडावर बसलंय, कुणी गवतावरच गोल करून बसलंय. कुणाच्या डब्यातल्या पराठ्यात पाऊस, तर कुणाच्या चमच्यावरच्या लोणच्यामध्ये पाऊस. कुणी भातावर पाऊस ओतून खातंय तर कुणी पिशवीतल्या चिवड्यावर पेरून खातंय. डबा उलटा केला की पाऊस रिकामा आणि जॅम-बटर पुन्हा जेवण्यात रुजू! वर 'अन्न कोरडं खाऊ नये, ओलं करून खाल्लं की पचतं' हे समाधान!

उतार दिसला की ओहळ सुरू. सगळ्या आसमंतात पाऊस होता. पोटल्याच्या डोंगरावरती होता, रोपवेभवती होता, खाली रानात होता, कोकम-लिंबात होता, धबधब्यात होता, कातळावरच्या शेवाळात होता. महाडात काळ नदीला आलेलं पाणी पाहिल्यापासून माझ्या मनातही शिरला होता. कुडकुडणारी थंडी नशिबाने यावेळी सोबत नव्हती. या पावसाची मायाच अशी होती की थंडीलाही त्याने दूर ठेवलं.

चालायला सुरूवात केल्यापासून साडेपाच तास होत आलेत. आता अंगावर एकही जागा अशी नाही की जिथे पाऊस नाहीये. प्रदक्षिणेच्या या बाजूचं रान प्रेमळ आहे. त्या बाजूसारखी काट्याची झाडं जाब विचारायला नाहीयेत. इथल्या फांद्या वाट अडवून उभ्या आहेतच, पण दूर होताना हातालाही मऊशार शुभेच्छा देतायत.

मी एकटाच पुढे आलो. दुखर्‍या गुडघ्यामुळे इतरांना उशीर होऊ नये म्हणून थांबत नव्हतो कुठेच. आता भवती बंद जंगल आहे. मगाशी काहीतरी झुडूपातून धावत गेलं. रानडुकर असावं. तेही पावसाने कावलं असेल, झुडूपात शिरलं असेल, आणि त्यात माझी चाहूल लागून गांगरून धावलं असेल. पाण्याचा आवाज वाढत चाललाय आता. बहुतेक धबधबा येतोय वाटेत. हा या बाजूचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. अंदाज लावायचा झाला तर हा वाघ दरवाजातून निघणारा धबधबा असणार. म्हणजे कुशावर्त तलाव आलाच. आणि मग रोपवे.

अवकीरकरांच्या 'जय मल्हार' मध्ये अगत्याचा चहा झाला, कपडे बदलले, आणि पाऊस घेऊन परतीला लागलो. सोबत होता शिवराजाचा अभिमान - नेहमीसारखाच! थोडा जास्तच!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/07/blog-post_28.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ प्र ति म!!!!

खिंड ओलांडून पलीकडे उतरलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या. तर पुन्हा पाऊस सुरू. भर पावसातली पंगत. कुणी झाडाखाली उभ्याने खातंय, कुणी दगडावर बसलंय, कुणी गवतावरच गोल करून बसलंय. कुणाच्या डब्यातल्या पराठ्यात पाऊस, तर कुणाच्या चमच्यावरच्या लोणच्यामध्ये पाऊस. कुणी भातावर पाऊस ओतून खातंय तर कुणी पिशवीतल्या चिवड्यावर पेरून खातंय. डबा उलटा केला की पाऊस रिकामा आणि जॅम-बटर पुन्हा जेवण्यात रुजू! वर 'अन्न कोरडं खाऊ नये, ओलं करून खाल्लं की पचतं' हे समाधान! >>>>>>क्या बात है!!! Happy

हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. >>> या वाक्याला कडक सलाम !!!

सुंदर लिखाण. आवडेश Happy

व्वा! मस्त वर्णन. वाचूनच थंडी वाजायला लागली. Proud
हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. >>> या वाक्याला कडक सलाम !!!>>>>>>>>>+ १
फोटो पाहिजेतच...>>>>जोरदार अनुमोदन. जे काहि थोडेफार फोटो काढले असतील ते टाक ना इथे.>>>>>>>>>>फोटो....फोटो....फोटो. Lol

सुंदर लिखाण.
हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. >>> या वाक्याला कडक सलाम !!! =++१००
फोटो पाहिजेतच...>>>>जोरदार अनुमोदन. जे काहि थोडेफार फोटो काढले असतील ते टाक ना इथे.==+१००
तुम्ही पाऊस खाल्लात किती छान.

. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता.---- >>>>>>>>>>>>>साध्या चिखलचे एवढे छान वर्णन

पावसाने ओली गच्च झालेली माती बुटाने घसरायला लागली. नंतर कळलं की घसरत मी होतो, माती तर पावसाने केव्हाच जमिनीत घट्ट रुजवली आहे. ----- >>>>> खुप अर्थ आहे

सगळ्या आसमंतात पाऊस होता. पोटल्याच्या डोंगरावरती होता, रोपवेभवती होता, खाली रानात होता, कोकम-लिंबात होता, धबधब्यात होता, कातळावरच्या शेवाळात होता, या पावसाची मायाच अशी होती की थंडीलाही त्याने दूर ठेवलं. ----- >>>>>> खरच आहे, आहेच पाऊस मायाळू Happy

आता अंगावर एकही जागा अशी नाही की जिथे पाऊस नाहीये ---- >>>>>> व्वा साहेब

इथल्या फांद्या वाट अडवून उभ्या आहेतच, पण दूर होताना हातालाही मऊशार शुभेच्छा देतायत. ------ >>>>> हे वाचूनच तो स्पर्श जाणवला,

नचि जोरदार लिहीले आहेस

कीप इट अप Happy

. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता.---- >>>>>>>>>>>>>साध्या चिखलचे एवढे छान वर्णन

पावसाने ओली गच्च झालेली माती बुटाने घसरायला लागली. नंतर कळलं की घसरत मी होतो, माती तर पावसाने केव्हाच जमिनीत घट्ट रुजवली आहे. ----- >>>>> खुप अर्थ आहे

सगळ्या आसमंतात पाऊस होता. पोटल्याच्या डोंगरावरती होता, रोपवेभवती होता, खाली रानात होता, कोकम-लिंबात होता, धबधब्यात होता, कातळावरच्या शेवाळात होता, या पावसाची मायाच अशी होती की थंडीलाही त्याने दूर ठेवलं. ----- >>>>>> खरच आहे, आहेच पाऊस मायाळू Happy

आता अंगावर एकही जागा अशी नाही की जिथे पाऊस नाहीये ---- >>>>>> व्वा साहेब

इथल्या फांद्या वाट अडवून उभ्या आहेतच, पण दूर होताना हातालाही मऊशार शुभेच्छा देतायत. ------ >>>>> हे वाचूनच तो स्पर्श जाणवला,

नचि जोरदार लिहीले आहेस

कीप इट अप Happy

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत! सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

>> कातिल वर्णन... थेट रायगडवाडीत पावसात पोहोचलो.... अप्रतिम!
प्रचि, अजून ब्लॉग्ज येऊ द्यात...
येत राहू द्यात...

नच्या अप्रतीम लिहीले आहेस्...खास नची टच...मनाने एकदम रायगडी पोचलो...पावसाळ्याचा ट्रेकचे अप्रतीम वर्णन खरतर.. ट्रेकचे वर्णन न वाटता एक सफर शब्दात पकडली आहेस..

Pages