भीक देतो पण ढोंग आवर..

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2014 - 05:34

गेल्या आठवड्याची गोष्ट. तो ट्रेनमध्ये सरपटत भीक मागत होता. फर्स्टक्लासचा डब्बा. खरे तर या डब्यात जास्त भीक मिळत नाही. आपल्या डब्यात भिकार्‍यांचा त्रास नको म्हणून फर्स्टक्लासची हुशार पब्लिक त्यांना भीक मिळायची सवय लावत नाही. अर्थात मी देखील दिली नाहीच. पुढचेच स्टेशन माझे होते. मी दारावर उभा राहिलो. तो सुद्धा सरपटत सरपटत दारावर आला. उतरणारे आणखी कोणीच नव्हते, तरीही मी बाजूला सरून त्याला जागा करून दिली. "तू उतर बाबा पहिला, उगाच उशीर झाला आणि गाडी चालू झाली तर माझे काय, मी आहे धडधाकट, मारेन आरामात उडी." आता हि दर्यादिली दाखवायचे आणखी एक कारण म्हणजे सतत सरपटल्याने त्याचे मळलेले कपडे. उगाच आपल्या शुभ्र विजारीला वा पॉलिश केलेल्या बुटांना त्याचा स्पर्श नको हा त्यामागचा हेतू.

असो, तर स्टेशन आले तसे तो गुडघा सरपटवत खाली कोसळला. मागोमाग मीही उतरलो. आता इथून त्याला नक्कीच पुढच्या डब्यात जायचे असणार. तो कसा हे जमवतो हे पाहण्यासाठी मी मागेच रेंगाळलो. पण बाजूचा डबा लेडीज फर्स्टक्लास होता, जवळपास रिकामाच, आणि त्यापुढचा दरवाजा बर्‍यापैकी लांब. आता याला हि ट्रेन सोडून पुढची ट्रेन पकडावी लागणार. धंद्याची पाच-दहा मिनिटे बुडाली. त्याच्यासाठी मलाच हळहळ वाटली.

पण इतक्यात अचानक काय तो दैवी चमत्कार, बाबाने दे दी अंधी औरत को आंख और लंगडे भिकारी को पैर. जय माता दी म्हणत तो उठला आणि तुरूतुरू चालत पुढच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. ट्रेन सुरु होणार न होणार तोच त्या दरवाज्यापाशी जाऊन पुन्हा एकदा कोसळला. घसपटतच पुन्हा एकदा ट्रेनचा दांडा पकडून ट्रेनने वेग पकडायच्या आधी आत शिरला. आतील ज्या संवेदनशील प्रवाश्यांनी त्याला असे चढताना पाहिले असेल त्यांनी नक्कीच एक रुपयाच्या जागी दोनाचे नाणे त्याच्या हाती चिकटवले असणार यात शंका नाही. पण इथे मी मात्र माझे दोन रुपये घालवले नाही यातच काय ते समाधान मानले. अन्यथा त्याच्या नावाने दोन शिव्या हासडूनच काय ते समाधान मानावे लागले असते.

या महानगरीत रोजच्या आयुष्यात भिकारी वा पाचदहा रुपयांच्या आर्थिक मदतीची अपेक्षा असलेले गरजू शेकड्याने भेटतात. प्रत्येकाला मदत करणे वा भीक देणे शक्य नसतेच. तरीही माणुसकी म्हणून वा पुण्य कमवायच्या कल्पनेतून आपण आपल्यापरीने जमेल ते करतोच. पण त्यातही मग अश्या ढोंगी भिकार्‍यांचे अनुभव, म्हणजे इतक्यांपैकी एखाद्याला निवडून त्याला केलेली मदतही फुकटच. आपल्या कोणीतरी फसवून लुबाडल्याची चरफड तर होतेच (भले ती रक्कम दोन-पाच रुपयांची का असेना) पण त्याचबरोबर ते पैसे मग एखाद्या खर्‍याखुर्‍या गरजवंतालाच दिले असते हि हळहळही असतेच.

इतर पर्यटनस्थळी स्थानिक लोक पर्यटकांना गंडवायला बघतात आणि इथे मुंबईत बाहेरचे लोंढे येऊन स्थानिक मुंबईकरांना कसा गंडा घालता येईल या धंद्याला लागतात. त्यामुळे इथे मदत हि नेहमी जपूनच करावी लागते. अर्थात माझे अनुभव मुंबईचे म्हणून मी मुंबईचा उल्लेख केला, पण कमीजास्त प्रमाणात जगभरात हे आढळत असेलच.

तरी याबाबत नेमके काय धोरण ठेवावे, मी अजूनही साशंक आहे. म्हणजे शंभर ढोंग्यांना भीक द्यावी लागली तरी चालेल मात्र एक गरजू उपाशी नाही राहिला पाहिजे, की राहिलाच एखादा गरजू उपाशी तरी चालेल पण कोणाच्या ढोंगाला आपण बळी पडता कामा नये ?? काय करावे ??

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का म्हणून द्यायची भीक्?काम करायला काय प्रॉब्लेम आहे ह्यांना? एवडे भिक मागतात तरी पोरांना जन्म देतात आणि त्यांना भीक मागायला लावतात्.मी कधीच भिक देत नाही त्यांच्या स्थितिकडे पाहुन मोह होतो पैसे द्यायचा पण नाय देत ड्ब्यातली पोळिभाजी देते..एकदा तर एक बाई ड्बा पण मागायला लागली.

मी देते, मला माहीत असतं लबाड आहेत सर्व पण कुणी मागितले पैसे की मला राहवत नाही, एकदा लोकल मधे असताना एक म्हातारा भीक मागत आला त्यावेळेस माझ्याकडे पेरु होते , मी एक पेरु देउ केला तर तो माझ्यावरच चिडला म्हणे दात आहेत का मला पेरु कसा खाउ? आणी सरळ निघुन गेला, माझे मलाच हसु आले.

मी नऊवारी साडीतील कोणी आज्जीबाई मुंबईत भीक मागत असेल तर पैसे देत असे. बाकी कोणाला नाही!

समहाऊ, नऊवारी बघितली की अरे...मराठी आहे..आणि कोणाचीतरी आजी आहे ही..असं काहीतरी ट्रिगर व्हायचं.

समहाऊ, नऊवारी बघितली की अरे...मराठी आहे..आणि कोणाचीतरी आजी आहे ही..असं काहीतरी ट्रिगर व्हायचं.
>>
खरंय, वयस्कर व्यक्ती दिसली की होतेच असे. यांना मुले नसावीत किंवा मुलांनी कसे वार्‍यावर सोडले. त्यात मराठी आजीआजोबा दिसले की आणखीन रिलेट होणे साहजिकच आहे. अश्यावेळी खरेखोटे करायच्या भानगडीत न पडता वा त्याचा विचारही डोक्यात न येता एक-दोन रुपयाच्या जागी पाचदहा रुपये दिले जातात, जेणेकरून आजीआजोबांना भीक न देता काहीतरी मदत करतोय असे वाटते.

इब्लिस,
ओके धन्यवाद चेकतो Happy

म्हातारी बाई बघितली की द्यावेसे वाटते. जंगली महाराज रोडवर हमखास वारकरी "पोशाखात" लोक दिसतात, त्यांनाही दिल्याशिवाय राहवत नाही. मुळात त्यांना देताना भीक देतोय असे वाटतच नाही. त्यांना पंढरपूर ला किंवा परत घरी जायला मदत करतोय असेच वाटते.

सगळ्यात सरकारचा व समाज म्हणून आपला स्वतःचा राग येतो ते सिग्नलवरची लहान मुले बघून. केवळ त्यांचे तेथील फिरणे बंद व्हावे व कोठेतरी त्यांची योग्य सोय व्हावी म्हणून कधीही त्यांना भीक देऊ नये किंवा त्यांच्याकडून काही विकत घेउ नये असे वाटते. चौकात ट्रॅफिक पोलिस असतात, त्यांना या मुलांना असलेला धोका जाणवत नाही की ते दुर्लक्ष करतात की ते जितक्या वेळा हटवतील तितक्या वेळा हे परत येतात?

वारकरी ...
यान्चा वाईट अनुभव आहे मला ..
एक आजी आजोबा जवळ आलेत , माझ्याजवळ चिल्लर पैसे नव्हते तर मी बाजुला झाली नाही म्हनुण ... एवढी वाईट बोलली ती आजी सरळसोट सर्वाना शिव्या घालायला लागली ... अरे एक तर भिक मागताय आणि पैसे नाही अस म्हटल की त्या व्यक्तीवरच खेकसायच याला काय अर्थ आहे ...

टीना,
कदाचित ते कसलेतरी फ्रस्ट्रेशन असावे. नाईलाजाने आलेली परिस्थिती, त्यात म्हातारपणाचे वय जिथे फटकन काहीही विचार न करता वागले बोलले जाते.
अन्यथा मुरलेले भिकारी किंवा ज्यांनी भिक मागणे हा पेशा म्हणूनच निवडले आहे असे या प्रकारे कधी वागणार नाहीत.
अर्थात, हा एक अंदाज !

मलाही एकदा एक आज्जी भेटल्या.. म्हने पंढरपूर ला जायचे आहे.. मदद करा..... मी म्ह्णालो चला तिकिट काढुन देतो... आणि वाटेत खायला घेउन देतो...तर एक खत्रुड लूक देउन पुढे गेल्या....

संभाजी पार्क/ परिहार चौक इथे मला पण एकदा आजी / आजोबा... कधी बाप-लेक असे भेटलेत. खायला पैसे न देता दुकानात जाऊन तयार पदार्थ विकत देऊन दिला तर फार नाही आवडले. स्वारगेटला जायचय तर म्हटलं बाईकवर मागे बसा मी सोडतो आणि पुढच्या एस्टी मध्ये तिकीट काढून बसवून देतो तर काहीतरी कारण सांगून टाळले.
विश्वास ठेवणं कठीण होतं. तरी समोरच्याची गोष्ट न ऐकता पुढे जाणं ही जमत नाही... आणि पैसे काढून देण ही.

का म्हणून द्यायची भीक्?काम करायला काय प्रॉब्लेम आहे ह्यांना? एवडे भिक मागतात तरी पोरांना जन्म देतात आणि त्यांना भीक मागायला लावतात्.मी कधीच भिक देत नाही त्यांच्या स्थितिकडे पाहुन मोह होतो पैसे द्यायचा पण नाय देत ड्ब्यातली पोळिभाजी देते..एकदा तर एक बाई ड्बा पण मागायला लागली. >>>
बरोबर आहे. मी पण लहान मुलांना , तरुण , मध्यमवयीन लोकांना भिक देत नाही. कितीही कीव आली तरी . म्हातारे , पांगळे ज्यांना शारीरिक कष्ट करून कमावता येत नाही अश्यांनाच देते . ते हि पैसे देत नाही. काहीतरी खायला देते .
अनेक वेळा भिकार्यांच निरीक्षण केल्यामुळे त्यांच्या लबाड्या समजायला लागल्या आहेत आता .

घराकडे व़ळताना एक वाक्य ऐकू येते...मराठी भाषा येते का? मी वळून बघते तर अंधारात एक जोडपे उभे असते. मुलगा पोरसवदा, काळा सावळा तरतरीत. मुलगी पण काळी सावळी, नउ महिन्यांचे पोट, सुस्वरुप. दोघांच्या चेहर्‍यावर भिती. मराठी शब्द ऐकून आणि त्यांना पाहून मी थांबते. मग मुलगा बोलायला लागतो. बाप बाजूच्या वस्तीत रहातो. आम्ही लग्न केलेले आवडले नव्हते त्यांना. पण काल फोनवर म्हणाला की बाळंतपणाला बायकोला घेऊन इथे ये म्हणून लातूरपासून आलोय्..आत्ता पहातोय तर घराला कुलूप. तो तिथे कुठेच नाही. बाकी आजूबाजूला कोणाला काहीच माहीत नाही. हिला ह्या अवस्थेत कुठे नेउ मी आता ? (दोघांच्या डोळ्यात पाणी चमकते) खायला नाही काही आणि आता परत जायचे म्हटले तरी प्रवासासाठी पैसे नाहीत. थोडी मदत कराल का? इथे मराठी समजणारे पण कोणी नाहीये. मी विचारात. प्रवासखरचासाठी ७०० रु. कसे देणार? आणि हे सगळे खोटे असेल तर?
तरी मनाला खंत वाटू नये म्हणून परत एक उपविचार केला. १०० रु आपण चैनीसाठी काहीच पुढेमागे न बघता खर्च करू शकतो ना..मग ते देऊन टाकू. तो मुलगा घेईल अजून कोणाकडून. मदत झाली तर झाली. आणि खोटे असेल तर १०० च गेलेत ना...जाउ दे. एखादी चैन नाही केली समजू. १०० रु दिले. दोघांनी नारजीनेच घेतले. पण मी पटकन तिथून निघून आले. उगीच मोह नको व्हायला जास्त पैसे देण्याचा. घरी आले विषय संपला.

अजून एक सहा महिने उलटले, त्याच घराच्या आजूबाजूची कोणतीतरी गल्ली. जोडपे वेगळे, अंधारातून परत तोच प्रश्न ऐकू येतो. मराठी भाषा येते का? बायको गरोदर तशीच. नवराही तसाच...
मी मान खाली घालून पुढे निघते. जगातली माणूसकी आता ह्यापुढे कशी शिल्लक राहील ह्याचा विचार करत.

सुमेधाव्ही, अगदी सेम अनुभव. बेन्गलोर मधे. तशीच सुरूवात "मराठी येते का ?" फरक इतकाच की नवरा, बायको आणि लहान मूल. घरी महाराष्ट्रात जायला पैसे नाहीत. मीही १००/२०० रु दिले. काही दिवसानी परत तोच प्रकार थोड्या दूरच्या भागात. हा बहुतेक स्टँडर्ड पॅटर्न आहे.

इथून पुढे मराठी येते का असा प्रश्न विचारल्यास, होय, मराठी शिव्या देता येतात असे उत्तर देने भाग आहे !

हा बहुतेक स्टँडर्ड पॅटर्न आहे.
>>>>>
माझ्या अनुभवाप्रमाणे हा पॅटर्न मी ७-८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अनुभवलाय, आणि अनुभवतोच आहे.
अर्थात मी तेव्हा कॉलेज स्टुडंट असल्याने फक्त १० रुपये वडा-समोसा खाण्यासाठी काय ते दिले होते बस्स. पुन्हा नाही फसलो मग.

असो, अश्यांना तुम्हाला पोलिस स्टेशनला नेतो आणि ते तुमची मदत करतील असे म्हणताक्षणीच काय ते खरे समजते. पोलिसांचे नाव घ्यायचे नसेल तर एखाद्या संस्थेचेच घ्या. काल्पनिक सुद्धा चालेल.
याचा एक फायदा म्हणजे, ते खरे तर बोलत नसतील, अशी टाचणी पाठीमागून लागत नाही.

मलाही एकदा एक आज्जी भेटल्या.. म्हने पंढरपूर ला जायचे आहे.. मदद करा..... मी म्ह्णालो चला तिकिट काढुन देतो... आणि वाटेत खायला घेउन देतो...तर एक खत्रुड लूक देउन पुढे गेल्या.... Lol Lol Lol

हा बहुतेक स्टँडर्ड पॅटर्न आहे.
>>>>>
हा प्रकार आम्ही डायरेक्ट दिल्लीत अनुभवला आहे.. आम्ही एकमेकांशी मराठीतुन बोलताना बघुन दोघजण मदत मागायला आले होते प्रवासखर्चासाठी.. सबब अशी की त्यांच्याजवळील पैसे चोरीला गेले किंवा हरवलेत

सुमेधाव्ही,

मलाही १९९६ साली नागदा स्थानकात असा काहीसा अनुभव आला होता. दिल्लीहून येत होतो. शयनयान आरक्षण नव्हतं म्हणून संध्याकाळी सातच्या सुमारास नागद्यात उतरलो. पाठून येणारी अवंतिका पकडून बोरीवली गाठायचा बेत होता. हमालाला जागा पकडायला सांगितलं. गाडी आल्यासरशी रिकामी दिसली म्हणून वीस रूपये फुकट गेल्याने तोंडातून आयला असा आपसूक उद्गार निघाला.

तेव्हढ्यात एका बाईने 'आर यू मराठी' असा प्रश्न विचारला. सोबत पंधरासोळा वर्षांचा मुलगा होता. त्यांचं समान चोरीला गेलं होतं. तक्रार नोंदवली होती. पण सगळे पैसेही चोरीला गेलेले. खायला फक्त दहा रुपये उरले होते. मुलगी कुठे आहे असं विचारलं, तर म्हणाल्या की ती प्रतीक्षालयात आहे. तेव्हढ्यात माझ्या गाडीचा दिवा पिवळा झाला.

त्यामुळे शहानिशा राहिली. बाई व मुलगा सभ्य वाटत होते. किती हवेत विचारलं तर तिकिटाचे २९० म्हणाल्या. मग म्हंटलं की ही गाडी तर सुटली, आता काय करणार! त्यावर म्हणाल्या की मागाहून जयपूर येतेय ती पकडीन. माझ्या खिशात वर ठेवलेले ३०० निघाले. बाईंनी माझं नावगावफोन लिहून घेतलं. आणि माझी गाडी सुटली.

बाईंचा फोन वा मनीऑर्डर आजतागायत आली नाही. दहिसरला राहणाऱ्या आणि एलायसीत कामाला होत्या म्हणून सांगितलेलं.

ही फसवणूक म्हणावी का? माझं मन आजही नाही म्हणतंय. खरंखोटं देव जाणे.

आ.न.,
-गा.पै.

जगातला चांगुलपणा किंवा माणूसकी कमी होउ नये ह्या भावनेने, व दहा गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एक निर्दोष फासावर जाऊ नये ह्या वचनाला जागून, कधीही असे काही संशयास्पद वाटले तरी अजूनतरी मी थोडीफार तरी मदत करणे सोडले नाहीये. पण ह्यात नागाला दूध पाजले जाते आहे असेही जाणवते. एकंदरीतच अवघड तारेवरची कसरत आहे. स्वयंसेवी संस्थेचा # देण्याची आईडिया चांगली आहे. तुमची रहाण्याची सोय नक्की होईल असे सांगितले तर त्यांची प्रतिक्रीया बघून मग पुढचे काय ते ठरवता येउ शकेल.

मराठी येते का?>> बापरे हा असला प्रकार हाय व्हय...
मी हैद्राबादला लकडीका पूल जवळ एका जोडप्याला ४५० रुपये दिले होते.
पण मला नाही वाटत त्यानी मला फसवले असेल...!!!

वरवर पाहता मी त्याना मदत करतो असे दिसले तरी यातून मी स्वतःला शांत करत असतो. म्हणजे स्वतःची मदत करत असतो. त्यामुळे...

मी अजुन १०० वेळा फसायला तयार आहे. कारण हा सस्टेनेबल नुकसान असल्यामुळे काळजी नाही.

असे बरेच पॅटर्न असावेत. खूप काहीतरी अडचणी सांगायच्या असेच भरपूर प्रोब्लेम्स सांगायचे आणि प्रवास खर्च/गाडी भाड्याला पैसे द्या म्हणायचे. फार पूर्वी असे मी एका म्हातार्या बाईला दिले पण होते. सगळ्यात पहिल्यादी जेव्हा असे ऐकतो तेव्हा आपण देतो पण नंतर त्यांची ती भिक मागण्याची पद्धत आहे हे लक्षात येते .

तरी सुद्धा काही काही वेळा मदत करतेच माफक पैशांची ( मुंबईत नोकरी करते त्यामुळे ट्रेन प्लाटफॉर्म च्या आजूबाजूला असे बरेच गरजू ( भिकारी) उभे असतात )

आजचा ताजा किस्सा

स्टेशनला ट्रेनची वाट बघत उभा होतो. एक ठिकठाक कपड्यातील धडधाकट भिकारी(?) तिथे आला. म्हणजे आधी माझ्यापासून काही अंतरावर एका माणसाकडे जाऊन पैसे मागू लागला. मला त्यांचे बोलणे ऐकू येत नव्हते मात्र त्याच्या मुठीत खुळखुळणार्‍या दोनचार नाण्यांवरून ते समजले. त्या माणसाने हात दाखवला तसे तो पुढे माझ्या दिशेने सरकला. मी सावध झालो. सरसावलो. तो काही बोलायच्या आधीच त्याला `आगे जाओ' म्हणायची मनाची तयारी केली. पण इतक्यात हा ~~~~ आठवला. काय बोलतोय ते ऐकूया म्हटले, तेवढेच इथे टाकायला एक किस्सा होईल. Happy

तर, हा मराठी येते का वगैरे न विचारता हिंदीतच सुरू झाला. त्याला बसचे तिकीट काढायला पैसे हवे होते. ते ही रेल्वेस्टेशनवर Uhoh .. असो, मी कुठे जायचेय म्हणत चांभारचौकशी केली. हो, चांभारचौकशीच, कारण पैसे न देण्याचा माझा निर्धार ठाम होता, आणि त्याच्या बससाठी पैसे मागण्यावरून आणखी ठाम झाला होता.

तर, त्याला दादरला जायचे होते. मी आणखीनच चक्रावलो. ट्रेन पकड आणि विदाऊट तिकीट जा म्हणालो. बिनधास्त. हाय काय आणि नाय काय. पण माझा सल्ला धुडकावत तो तसाच पुढे निघून गेला. अ‍ॅटीट्यूड हं, जाईन तर बसनेच नाहीतर.. ट्रेनला लटकणारी गर्दी केवळ तुम्हा मध्यमवर्गीय मुंबईकरांसाठीच. पुढे काही अंतरातच प्लॅटफॉर्म संपत होता, आणि तिथे कोणीही नव्हते, तरीही तो त्या प्लॅटफॉर्मच्या टोकाला जाऊन परत आला. का ते माहीत नाही. कदाचित त्याची दूरची नजर कमजोर असावी. पण थोड्याच वेळात मला समजले की त्याची जवळची नजर देखील कमजोर होती. पुन्हा मागे परतताना त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे ट्राय मारली. मी नाही म्हणताच पुढे जाऊन परत त्या मगाच्या माणसाकडे मदत मागितली. आणि काय आश्चर्य, यावेळी त्या माणसाने मदत केली. बहुतेक मधल्या वेळेत त्याचे हृदय द्रवले असावे वा पापपुण्याचा हिशोब केला असावा, वा पुढपर्यंत त्याला कुठून मदत मिळाली नसल्याने आता आपलेच हे कर्तव्य असे वाटले असावे. जे काही असेल, भगवान के घर देर है पर अंधेर नही.

मला असा मदत मागण्याचा अनुभव ई ग्रो च्या पार्किंग लॉट मधे आला. इन्टरव्ह्यु साठी ईस्ट कोस्टवरुन आलेला आणि आता आठवत नाही, पण पाकीट हरवले की कंपनीच्या माणसाने फसवले असे काहीतरी कारण होते. परत जाण्यासाठी पैसे हवे होते. मी मागितलेल्या पैश्याच्या १०% पैसे दिले होते.

Pages