आय अ‍ॅन्ड मी: भाग १०

Submitted by चैर on 23 July, 2014 - 04:00

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९

काही वर्षांपूर्वी:

अभिषेक मेरी काकूकडे बसला होता. बारावीची परीक्षा जवळ आली होती आणि सायन्समध्ये इंटरेस्ट नसला तरी अभिषेकला परीक्षेचं नेहमीप्रमाणे टेंशन आलं होतं. रोबोसमध्ये फारशी गर्दी नव्हती म्हणून मेरीकाकू कौंटर सोडून त्याच्याशी बोलायला आली.
"काय रे परीक्षा कधी?"
"आहे अजून महिनाभर"
"अभ्यास करतोयस ना व्यवस्थित?"
"हो गं काकू…म्हणजे प्रयत्न तरी करतोय"
"पुढे काय करणारेस?"
"बहुतेक बी.ए. करेन म्हणतो"
"बी.ए.??अरे सायन्स करतोयस ना तू? मग हे मधूनच बी.ए. कुठून आलं"
"अगं, मला कधी सायन्स करायचंच नव्हतं. अकरावीला घरच्यांनी गळ घातली म्हणून आलो सायन्सला…आता नाही जमायचं यापुढे"
"मग घरचे काय म्हणतील?"
"काय म्हणायचं ते म्हणू दे…आणि घरचे म्हणजे कोण…आमचे व-डी-ल…आईची काही हरकत नसणारे…अकरावीतसुद्धा नव्हतीच पण बाबा म्हणाले म्हणून तिने त्यांना मूक संमती दिली एवढंच काय ते!!"
"मग आता तू बाबांच्या मनाविरुद्ध काही वागलास तर आई काही म्हणणार नाही?"
अभी काही उत्तर देणार इतक्यात एक मुलगी तिथे आली.
"काकू…तू सकाळी घरी येउन जाणार होतीस" ती मुलगी म्हणाली.
"हो गं…पण इथे त्या जगन्नाथला यायला उशीर होणार होता मग मला थोडा बाजारहाट करायला जावं लागलं"
"ओह…असो…मोहम्मद पर्वताकडे नाही गेला म्हणून पर्वतच आला मोहम्मदाकडे…आणि हो जरा घाईतच आलाय सो 'हे' घे. मी निघतेय. मला कॉलेजला जायला उशीर होईल! कळव मला कशा झाल्यात ते…" असं म्हणून तिने एक डबा मेरीकाकुच्या हातात दिला.
"अगं आल्यासारखी बस जरा थोडा वेळ…चहा घे"
"नंतर येईन गं कधीतरी आणि मला तू घरी तुझ्या हातचा चहा करून देतेस ना एरव्ही…मग इथे नकोच आत्ता"
"शहाणी आहेस…सावकाश जा…संध्याकाळी जमलं तर चक्कर मारेन नाहीतर फोन नक्की करेन"
"ग्रेट…निघते मी" म्हणून ती मुलगी निघुनसुद्धा गेली.
अभिषेकचं कुतूहल वाढलं होतं. तशी दिसायलासुद्धा ती छानच होती. पहिल्यांदाच त्याला कुणीतरी आवडलं होतं. आपण केस बऱ्याच दिवसात कापलेले नाहीत आणि आपण भूत दिसत असू वगैरे जाणीव त्याला अचानकच झाली.
"काकू कोण होती गं? म्हणजे आपल्यला कॉलेजची वाटली नाही आणि तुला काकूपण म्हणत होती"
"अभि, तू मागे जेव्हा मला विचारलंस की मी तुम्हाला काकू हाक मारू का? तेव्हा मी तुला म्हटलं होतं आठवतंय की मला काकू हाक मारणारा तू काही पहिलाच नसणारेस"
"हो आठवतंय"
"तर तू सोडून मला काकू हाक मारणारी ही…रीमा"
अभिला तिच्याबद्दल अजून प्रश्न पडले होते. त्याने कपाळावरच्या आठ्या तशाच राहतील अशा बेताने पुन्हा काकुकडे पाहिलं--
"अरे…मी माझ्या सोसायटीत राहते! तुझ्याच बरोबरीची आहे…अंधेरीच्या कुठल्यातरी कॉलेजमधून कॉमर्स करतेय! ती मला पुरणपोळ्या घेऊन आली होती"
"पुरणपोळ्या?" अभिने मुद्दाम प्रश्न चालू ठेवले.
"अरे तिच्या बाबाचा पन्नासावा वाढदिवस आहे…तिला आई नाही…मग काहीतरी स्पेशल करायचं म्हणून त्याच्या आवडत्या पुरणपोळ्या केल्या तिने! पण पोळ्या बऱ्या झाल्यात की नाही हे मी ठरवायचं आहे"
"ओह…काकू तुला पुरणपोळ्या येतात?"
"अर्थात…अरे मी मुंबईत राहते…एवढं चांगलं मराठी बोलते याचं तुला आश्चर्य नाही वाटलं कधी पण मला पुरणपोळ्या येतात याचं अचानक नवल का वाटलं बुवा?"
"नवल नाही गं! मला स्वैपाकाबद्दल फारसं काही माहित नाही! पण जेवढं माहितीय त्यावरून पुरणपोळ्या हा काही सोप्पा प्रकार नाही म्हणून विचारलं"
"अरे लहान का होईना पण हॉटेल चालवते की मी…पुरणपोळ्याच काय रसगुल्ले, जिलब्या, बर्फी सगळं करते मी"
"वा छान!! तू मला हे सगळं करून खायला दिलंस तर मला कळेल. एवढंच कशाला? मला शिकवच एक-दोन गोष्टी करायला"
"बरं…आत्ता आधी अभ्यास आटप…हे गोडधोड करायला शिकणं नंतर बघू आपण"

बारावीच्या परीक्षा झाल्या. रिझल्ट्स लागले. अभिषेकच्या घरात व्हायचा तो गोंधळ झालाच!

"हे काही मला जमणार नाही" अभिषेक निर्धाराने म्हणाला.
"न जमायला झालंय काय?" श्रीनिवासने चिडून विचारलं.
"कारण मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये"
"इंटरेस्ट हा निर्माण करण्यावर असतो…"
"पण माझ्या बाबतीत तेही नाही झालं. तुम्ही म्हणाला होतात म्हणून मी अकरावीला सायन्सला गेलो. मन मारून अभ्यास केला. ७५% मार्क्ससुद्धा मिळाले…पण एवढं सगळं होऊन मला त्यात इंटरेस्ट नाही निर्माण झाला मग आता तुम्ही मला बळजबरीने जे करायचं नाहीये ते का करायला लावताय?"
"हे बघ अभिषेक, तुला ७५% मार्क्स मिळाले आहेत…फार चांगले नसले तरी फार खराबसुद्धा नाहीयेत…मी आजच ऑफिसमधल्या नाईकांशी बोललोय…त्यांची एक दोन इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ओळख आहे…७५% टक्के आहेत म्हणजे लाख-दोन लाखात काम होईल असं म्हणाले ते"
"म्हणजे मी माझ्या मनाविरुद्ध इंजिनिअर व्हायचं…त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार? आणि या सगळ्यात एखाद्या खरंच गरज आणि आवड असणाऱ्या गरीब मुलाची सीट मी वाया घालवणार?" अभिषेकला कर्वे सरांशी झालेली चर्चा आठवली.
"वाया? लाख दोन लाख खर्च केल्यावर मी तुला माझे पैसे वाया बरे घालवू देईन!" श्रीनिवासने थोडं माजुरडेपणाने बोलून दाखवलं.
"हे बघा…मी स्पष्टपणे सांगतोय…मला इंजिनिअर होण्यात काडीचाही रस नाही…"
"बरं…मग आर्ट्सला जाउन काय करणारेस तू? कारकून होणार? की इन्शुरन्स एजंट?" श्रीनिवासने विचारलं.
"काय वाट्टेल ते होईन…पण जे मला आवडेल, जे माझ्या मनाला पटेल तेच आणि तसंच करेन"
"म्हणजे आमच्या आवडी-निवडी, इच्छा-अपेक्षांना काहीच किंमत नाही?"
"आमच्या? नेहमी हे तुम्ही 'आम्ही', 'आमच्या' म्हणत असता हे आम्ही म्हणजे कोण नेमकं?"
"आम्ही म्हणजे मी आणि तुझी आई"
"छान म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल करायला तिला मध्ये ओढताय? मला नाही वाटत की तिला माझ्या आर्ट्सला जाण्याने काही फरक पडणारे"
"बघा…काय म्हणतायत सुपुत्र…या बोला त्याच्याशी" श्रीनिवासने स्वैपाकघरात काम करणाऱ्या सीमाताईंना हाक मारली. त्या पदराला हात पुसत तिथे येउन उभ्या राहिल्या.
"आई तुला मी आर्टसला गेलो तर काही हरकत आहे?"
आईने काहीच उत्तर दिलं नाही!
"अगं, तो काहीतरी मुर्खासारखा प्रश्न विचारतोय…त्याला बरोबर ते उत्तर देऊन टाक म्हणजे त्याची खात्री पटेल…नाहीतर फक्त बापच व्हिलन आहे असं वाटत राहील त्याला"
"हे बघा मला तुमच्या भांडणात ओढू नका! मला काही यातलं कळत नाही! त्याचं भलं कशात आहे हे तुम्ही आणि तो बरोबर मिळून ठरवू शकता"
"म्हणजे तू काही बोलणार नाहीस?"
"तसं समजा"
"बरं…मग अभिषेक 'आम्हांला' नाही, 'मला' असं वाटतं की तू इंजिनिअरिंग करावंस"
"आणि मला ते जमणार नाही"
"हे मी तुझं शेवटचं मत समजायचं?"
"हो"
"ठीके…माग आता जे काही शिकशील, शिकणार नाहीस…कुठेही फॉर्म भरायला वेळी फादर्स नेम अ‍ॅन्ड सिग्नेचर कॉलममध्ये माझी सही घ्यायला येऊ नकोस…बारावी सायन्स करून माझा मुलगा आता आर्ट्स करतोय हे लोकांना सांगताना होणारी बदनामी मला पुष्कळ आहे…त्यात त्याच्या प्रवेशाच्या अर्जांवर सह्या करून मी त्याला मदत केली हे गिल्टी फिलिंग मला नको" श्रीनिवास उठून निघून गेला.

अभिषेकच्या अंतर्मनांचा संवाद सुरु झाला-
I: आपण योग्य केलं ना?
ME: आपण? हे जे तू आपण म्हणतोस तेव्हा तुला आपण दोघे अपेक्षित असतो का?
I: अ…आपण नाही…'मी'. मी योग्य केलं ना?
ME: अ…हो!
I: यु डोंट साऊंड कॉन्फिडंट!
ME: बिकॉज आय एम नॉट! बिसाइडस…कॉन्फिडंट असणं हे तुझं खातं आहे! मी नेहमी नॉर्मल असतो.
I: अच्छा म्हणजे असलं काहीतरी बोलून तू मला खोटं ठरवणार आहेस? डीमोरलाइझ करणार आहेस??
ME: छे छे! उलट हे असलं काहीतरी होणार याची मला कल्पना होतीच…मागे होईल असं वाटलं होतं! ते आत्ता झालं एवढंच.
I: मग हे जे काही झालं ते थांबवता आलं असतं असं वाटतं का तुला?
ME: हा विचार तू करतोयस? तू कधीपासून मागचा-पुढचा सारासार विचार करायला लागलास? आणि तुला विश्वास आहे ना स्वतःवर? मग जे बोललास ते खरं करून दाखव!
I: अ…मला थोडी भीती वाटतेय!
ME: भीती? ती आणि कसली?
I: बाबा फारच चिडले…आपण इंजिनिअरिंग नाही केलं तर खरंच त्यांच्याशी पुन्हा आपलं जुळणं अवघड आहे. या सगळ्यामुळे मला अचानक जाणवलंय की…की-- माझ्यामुळे आपला आयुष्यात 'राजीव' कर्वे नाही ना होणार?
ME: आता तू मला कन्फ्युस करतो आहेस!! आयुष्यात ज्या माणसाला आपण गुरु मानतो, तू ज्याला आयडॉल मानतोस…त्याच्यासारखं व्हायची तुला भीती वाटायला लागली? हे म्हणजे एखाद्या नवीन छोट्या बिझनेसमनने त्याला अंबानी किंवा बिल गेट्स व्हायची भीती वाटतेय म्हणण्यासारखं आहे!
I: तुला थट्टा सुचतेय?
ME: अरे मग काय करू? ज्याला आपण आपला आदर्श मानतो त्याच्यासारखं आपलं आयुष्य असावं असं नाही वाटलं तुला कधी?
I: हो पण ते होण्याची सुरुवात इतकी वाईट होईल असं वाटलं नव्हतं.…पुढेही सगळं अवघडच वाटतंय!
ME: पुढे सगळं सोप्पं असेल असं आपल्याला कुणी सांगितलं तरी होतं का? असो! आता येणाऱ्या सगळ्या आव्हानांसाठी, संकटांसाठी तयार व्हायला हवं…वडीलच विरोधात आहेत…जग नाही! सो बक अप
I: आईचं काय?
ME: हे बघ…बाप त्याच बाप असणं नाकारू शकतो! मुलं स्वतःच्या जबाबदाऱ्या नाकारू शकतात…पण आई तिची ममता, वात्सल्य विसरू शकत नाही! जगाचं सुदैव आहे की तिला तो ऑप्शनच नाहीये! तिचा कायम आशीर्वाद असेलच आपल्याबरोबर! देवसुद्धा नक्की उभा राहील पाठीशी! चित्त एकाग्र करायला हवं…मन शांत ठेवायला हवं…जगात काहीच कठीण नसेल!
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवां
भद्रंपश्चेमाक्षभिर्यजत्रा
स्थिरैरंगेस्तूष्टुवांस्तनुदेवहितंयदायुः ।
ओम स्वस्ति नः इंद्रौ वृद्धश्रवाः
स्वस्तिनपूषा विश्ववेदाः
स्वस्तिर्नस्तर्क्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु।
ओम शांतिः शांतिः शांतिः ।।

दुसऱ्या दिवशी अभिषेक पेढे घेऊन काकुकडे गेला.
"काकू, झालो बुवा एकदाचा बारावी पास…घे पेढे खा"
"घेणारच आहे…तू दिले नसतेस तर तुझ्या नावाने माझे मीच घेतले असते" काकू हसत म्हणाली.
"बरं मग मी तुला पेढे दिलेत….मग माझ्या खाण्याचं काय? मागे तू म्हणाली होतीस…पुरणपोळ्या, रसगुल्ले, जिलब्या वगैरे--"
"पुरे पुरे…आता तुला काहीतरी करून दिलंच पाहिजे…एक काम कर…उद्या संध्याकाळी घरी ये…जेवायला"
"घरी?"
"हो घरी!! तू आला नाहीचेस कधी…तेवढीच तुझी चक्कर होईल"
"बरं मला पत्ता सांग! येतोच मी!! तू तुझ्या हातचं जेवण वाढणार म्हणजे मला आलंच पाहिजे"
"बरं…आता एक वाईट प्रश्न…पुढे काय करणार आहेस?"
"अर्थात सध्या तरी बी.ए."
"घरून परवानगी मिळाली?"
त्यावर तो काहीच बोलला नाही!
"भांडलास ना?"
त्याने मान डोलावली.
"वेडा मुलगा आहेस! ये घरी उद्या संध्याकाळी मग बोलू सावकाश"
अभिषेक तिच्याकडून पत्ता घेऊन निघाला.

"सर, पेढे" तो कर्वे सरांकडे आला.
"अभिनंदन अभिषेक….आवड नसूनही बराच अभ्यास केलास म्हणजे तू…" सर पेढा घेत म्हणाले.
"सर तुम्हीच म्हणाला होतात ना, इच्छा असो वा नसो, पदरात पडलंय तर निभावायला लागेल म्हणून"
"मी असं म्हणालो होतो?" सर त्यांच्या नेहमीच्या थट्टेच्या मूडमध्ये होते. अभी खजील होऊन गप्प राहिला.
"बरं….मग आता काय पुढे?"
"सर, मी सगळ्यांना सांगत सुटलोय, बी. ए. करायचं आहे म्हणून! पण खरंतर मलाच नक्की नाही माहित"
"अरे बापरे…अरे मग ठरवायला नको का आता?"
"सर, तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे म्हणून सांगतो…दोन वर्षांपूर्वी मला आर्ट्स करायचं होतं तेव्हा माझ्या काही रम्य कल्पना होत्या…गेल्या दोन वर्षात कॉलेजचं विश्व पाहिलं, शाळेच्या, घराच्या कोशातून बाहेर पडून थोडंफार जगाकडे पाहिलं. सुदैवाने काही चांगली माणसं भेटली, काही चांगले अनुभव आले…आता वाटतं की या लोकांसाठीच काहीतरी करावं. पण काय ते नेमकं माहित नाही! आर्ट्स घ्यायचंय म्हणजे मराठीची आवड, साहित्याची आवड खुणावतेय म्हणून…करीअर म्हणून नव्हे"
"बरं…मग प्रॉब्लेम काये?"
"सर, इथे मलाच नेमकं काय करायचं हे कळत नाहीये आणि आपली ध्येयं, आकांक्षा मोठया की माणसं हा प्रश्न यक्ष म्हणून उभा आहेच"
"आणि हे सगळं तू माझ्याशी येउन बोलतोयस कारण?"
"कारण ध्येयं मोठी की माणसं या प्रश्नाचं ठाम उत्तर मला तुमच्याकडूनच मिळेल असं वाटतं म्हणून"
"मी मागे उत्तर दिलं तुला बहुतेक"
"ते फार सब्जेक्टीव्ह होतं सर…मला वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टीव्ह उत्तर हवंय…पुढे कुठलंही पाउल उचलण्यापूर्वी"
"ते काही मी तुला देऊ शकेन असं नाही वाटत! मी तुझ्यासाठी अजून काही करू शकत असेन तर सांग"
"सर, माझ्या अ‍ॅडमिशन फॉर्म्सवर गार्डियन म्हणून सही कराल?" अभिषेकने एकदम विचारलं.
सर क्षणभर गप्प झाले.
"अ…तू मला का विचारतो आहेस?"
"सर माझ्या बाबांना मी आर्ट्स करणं मान्य नाही…त्यांनी सही करायला नकार दिलाय. तुम्ही भले माझ्या प्रश्नाचं ठाम उत्तर देत नसाल पण माझी परिस्थिती समजून घ्याल ही खात्री आहे म्हणून विचारतोय"
"बरं…करेन मी सही"
"ठीके सर मी फॉर्म्स आणतो उद्या…चालेल?"
"आणतो? अरे तू आता माझा ऑफिशियल पाल्य असणारेस…सो आपण एकत्रच जाउन फॉर्म्स भरू! काय?"
"ओके सर"

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेकने वडिलांचा विरोध असताना सरांबरोबर जाऊन बी.ए. एडमिशनसाठी फॉर्म भरला.


क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users