आय अ‍ॅन्ड मी: भाग ५

Submitted by चैर on 23 July, 2013 - 04:55

भाग ४ वरुन पुढे:

काही वर्षांपूर्वी अभिषेकच्या घरात:

रात्री जेवण झाल्यावर श्रीनिवास आईस्क्रीम घेऊन आला. आईस्क्रीम खाता खाता त्याने विषय काढला.
"तर अभि, तू आम्हांला अभिमान वाटेल असं यश मिळवलं आहेस! म्हणजे मातृभाषा वगैरे म्हणायला ठीके पण वास्तविक मराठी हा काही माझा आवडता विषय नाही. पण तुला साहित्याची, भाषेची आवड आहे आणि तू यश मिळवलंस. गुड. पण तुला आता त्या यशाने हुरळून जाउन चालणार नाही! कारण आता तुला सायन्स करायचंय! तिथे मराठीला काहीच महत्व नाही, पण विज्ञान आणि गणित अतिशय महत्वाचं. पुढे इंजिनिअरिंग करायचं तर आता तुला जास्त जोमाने अभ्यास करावा लागेल. अलीकडे मुलं बारावीच्या अभ्यासाला खूप लौकर लागतात म्हणे. काय ते क्लासेसची वगैरे चौकशी करून घे. एडमिशन मिळणं काही फार मोठं काम नाही. असंच यश मिळवत रहा"
माणसाच्या अपेक्षा कधी संपत नाहीत हेच खरं! श्रीनिवासचा प्रत्येक शब्द अभिचा कॉन्फिडंस कमी करत होता. त्याला मनापासून सायन्सला जायची इच्छा नव्हती.
"मला आर्ट्सला जायचंय" असं तो तावातावाने उलट बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष आईकडे गेलं.
'अभि, बाबांशी वाद घालणार नाहीस असं प्रोमीस कर मला' त्याला आईचं वाक्य आठवलं आणि तो गप्प राहिला.
रात्री तो एकटाच बाल्कनीत उभा होता. निर्विकार! मागून त्याला कुणाचीतरी चाहूल लागली. आईच होती!
"अभि, अरे झोप येत नाहीये का?"
"हं…आज लौकर झोप नाही यायची! आई दुपारी तू असायला हवं होतंस. करमरकर बाईंनी खूप कौतुक केलं माझं. प्रिन्सिपल राठोडना तर माझं नावसुद्धा माहित नव्हतं आत्तापर्यंत. पण आज त्यांनी मला खास भेटायला बोलवलं होतं. मला म्हणाले की मेरीटमध्ये आलेल्या लोकांबरोबर तुझाही सत्कार करायचाय! तेव्हा चांगलं भाषण लिही म्हणाले"
"वा, छान" आईचे डोळे चमकले. तिने अभिषेकच्या डोक्यावरून हात फिरवला.
"आई-"
"काय रे बाळा?"
"मला सायन्सला नाही जायचं गं" अभिषेक आलेला हुंदका आवरत म्हणाला. आईच्या चेहऱ्यावर एक विषण्ण छटा आली. आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिच्याकडे नाही हे त्याला जाणवलं. मघाशी तो फक्त आईला दिलेल्या शब्दाखातर गप्प होता. आणि आता आई गप्प होती.
I चिडला. स्वतःवरच!
"माझ्या अपेक्षा कधी पूर्ण होणारेत? आयुष्य माझं! करिअर माझं! सुरु होण्याआधीच शेवट होणारे बहुतेक सगळ्याचा. आईसाठी मी आत्ता गप्प राहिलो हे खरंय. पण असं कधीपर्यंत चालणार? कधी तरी मला तिला दिलेलं प्रोमीस मोडावं लागेल"
शेवटी त्याने आईला ऐकवलंच-
"आई, मी निव्वळ तुला शब्द दिलाय म्हणून अकरावीला सायन्सला एडमिशन घेईन! पण अजून दोन वर्षांनी पुन्हा करिअर ठरवण्याची वेळ येईल तेव्हा तो निर्णय माझा असेल. बाबांच्या विरोधात असेल तरी"
तो तिच्या उत्तराची वाट न बघता वळून निघून गेला. आई खूप वेळ एकटीच बाल्कनीत उभी होती.

शाळेत सत्कारसमारंभ होता. श्रीनिवासला काहीतरी जरुरीचं काम आल्याने त्याला सत्काराला यायला मिळालं नव्हतं पण आई आणि प्रिया अभिषेकचं कौतुक होताना पहायला आवर्जून हजर होत्या. 'राम गणेश गडकरी' सारखं मोठ्ठ पारितोषिक असल्याने सत्कार समारंभाला बोर्डाचे गोखले नावाचे कुणी पदाधिकारीसुद्धा आले होते.
"आता मी राम गणेश गडकरी पारितोषिक विजेत्या अभिषेक कुरतडकरला दोन शब्द बोलण्याची विनंती करतो" सूत्रसंचालन करणाऱ्या निकम सरांनी अनाउन्स केलं. अभिषेक आत्मविश्वासाने माइकपुढे उभा रहिला. त्याने स्वतःच भाषण लिहिलं होतं. करमरकर बाईंना एकदा भाषण डोळ्याखाली घालायला म्हणून दिलं तर त्यांनी ते वरवर वाचून नुसतं हसून ते परत केलं होतं.
"आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या मित्रांनो, मला मिळालेल्या या यशात सगळ्यात महत्वाचा वाटा माझ्या घरच्यांचा मुख्य म्हणजे माझ्या आईचा, करमरकर बाई, बाकी सगळे शिक्षक, आणि अर्थातच मराठीतल्या त्या थोर साहित्यिकांचा आहे. त्यांचं मराठीला देणं इतकं मोठं आहे की माझ्यासारख्या एका यःकिश्चित विद्यार्थ्याने त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे वेडेपणा होईल. पण तरी राम गणेश गडकरी पारितोषिक विजेता म्हणून मी काहीतरी बोलणं अपेक्षित आहे! काय बोलू? एक प्रश्न विचारू तुम्हा सगळ्यांना?" त्याने समोर बसलेल्या मुलांकडे पाहिलं. पहिल्या काही रांगेतल्या मुलांनी मान डोलावल्या होत्या. अभिषेकने वळून स्टेजकडे पाहिलं. राठोड सर, गोखले सर सगळेच शांतपणे त्याच्याकडे बघत होते.
"तर- तुमच्यापैकी किती जणांना राम गणेश गडकरींचं टोपणनाव माहितीय?" दोनशे मुलांमधून दोन-तीन हात वर गेले.
"काय बोलू आता? इथे तीन लोकांना गडकरी कोण ते माहिती आहेत. बाकीच्यांना त्यांचं मोठेपण काय माहित? मित्रांनो दिल्ली बोर्डातली आपल्याच वयाची मुलं सहावीत असताना शेक्सपियर वगैरे शिकतात इंग्रजीमधून. आपल्यालापण त्याच उद्देशाने सावरकरांची 'सागरास' अभ्यासाला मिळते. आपल्याला त्यातला मतितार्थ कळतच नाही.मलाही सहावीत असताना कळलाच नव्हता. जर भारतात मोठं होणाऱ्या आपल्या वयाच्या मुलांना शेक्सपियर समजतो तर आपल्याला सावरकर का जड जातात? इथे दोन मुद्दे निर्माण होतात-
सावरकर व्यक्ती म्हणून,कवी म्हणून आपल्यापुढे उभे राहतात का? आणि मग त्या कवी सावरकरांची कविता आपल्यापर्यंत पोहोचतेय का?
-इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मराठी ही समृद्ध शब्दसंपदा असणारी आणि काळानुसार प्रगत झालेली एक महत्वाची भाषा आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातल्या मराठीपासून 'आजची' 'शुद्ध' मराठी कित्येक कोस दूर आहे. ग्रामीण मराठीसुद्धा तिच्या वेगाने घडतेय, बदलतेय. पण मराठी शिक्षणाचा किमान दर्जा राखायला शुद्ध भाषा शिकणं खूप महत्वाचं. 'आनी म्हनून धर्माने कर्नाला तर्पन अर्पन केलं' असं वाचून जर का मराठीचा आपण भाषा म्हणून अभ्यास करणार असू तर तो योग्य नाही असं मला वाटतं. मग सावरकरांचं 'तै जननीहृद विरहशंकितहि झाले' हे वाक्य कळलं नाही तर आमची काय चूक? मला फक्त सावरकरांबद्दल बोलायचं नाही. असे कित्येक कवी,लेखक, निबंधकार, नाटककार आहेत ज्यांनी मराठीत समृद्ध साहित्य निर्माण करून ठेवलंय! जगातल्या अनेकविध भाषेतल्या साहित्यातले अप्रतिम अनुवाद केलेले अनुवादकर आहेत. कुठलीही चरित्रं, संस्कृती, सभ्यतेचा परिचय करून घ्यायला मातृभाषेसारखं माध्यम नाही. पण आम्हाला भाषाच जड वाटते. साहित्य,काव्य समजायला अवघड वाटतं. का?
बहुतेक आपला दृष्टीकोण चुकतोय! भाषेकडे अभ्यासाचा विषय म्हणून बघण्याचा!
आणि मग मराठी माध्यमातले विद्यार्थी इंग्रजीमध्ये शिकलेल्या मुलांच्या कायम मागे राहतात, मराठी माध्यमाच्या शाळांच्या तुकड्या कमी होतायत असा प्रचार होतो. माझ्या आजूबाजूचे कित्येक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतायत. आणि त्यांचं तरी काय चुकलं? या सगळ्या प्रश्नांची विद्यार्थी म्हणून आम्हीच उत्तरं शोधणं अपेक्षित नाहीये तर शिक्षकांची, बोर्डाची जबाबदारीसुद्धा महत्वाची आहे." हे वाक्य म्हणताना त्याने सहेतुक गोखलेंकडे पाहिलं.
"सरतेशेवटी, मी मुख्याध्यापक राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी राम गणेश गडकरी पारितोषिकाची रक्कम जमा करून घ्यावी. मराठी लेखकांशी, साहित्याशी संबधित वक्तृत्व स्पर्धा घ्यावी. स्पर्धेचं नाव माझ्या मते मायबोली मराठी असावं. मी माझ्या वयापेक्षा,अधिकारापेक्षा खूप जास्त बोलून गेलोय. त्यात शाळेच्या कुणाचा, गोखले सरांचा काही उपमर्द झाला असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण माझ्याकडे बघून माझ्या पालकांबद्दल, शाळेबद्दल कोणत्याही शंका घेऊ नयेत! शेवटी इतकंच- मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्रधर्म वाढवावा।।"
अभिषेक बोलायचा थांबला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काही लहानमोठी भाषणं होत शेवटी गोखले सर बोलायला उभे राहिले.
"नमस्कार, आज तुमच्या शाळेत आल्यावर खूप छान वाटलं. विशेष उल्लेख अर्थात अभिषेकच्या भाषणाचा! सत्कारसमारंभ म्हटलं म्हणून मी साधारणपणे काही आभारप्रदर्शन, अभ्यासाच्या पद्धती वगैरे ऐकायला मिळतील या उद्देशाने आलो होतो. पण अभिषेकने मला सपशेल खोटं ठरवलं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर माझा दृष्टीकोण चुकला. खूप दिवसांनी काहीतरी सडेतोड ऐकवल्याबद्दल मी अभिषेकचे आभार मानतो. त्याच्या सूचनांचा आम्ही नक्की विचार करू! आणि शेवटी राहता राहिला प्रश्न- अभिषेकचं वय आणि त्याचा आगाऊपणा! पण मला अजिबात शंका घ्यावीशी वाटत नाही. उलट माझा त्याच्या पालकांबद्दलचा आणि तुमच्या शाळेबद्दलचा माझा आदर अजूनच वाढला. खूप शिक! मोठा हो! तुझं भविष्य उज्वल आहे. मीसुद्धा जास्त काही बोलून तुमचा वेळ घेणार नाही! जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद म्हणतो आणि थांबतो"
या भाषणावरसुद्धा खूप टाळ्या झाल्या. शाळेच्या रूढार्थाने शेवटच्या दिवशी अभिषेक तिथल्या प्रत्येक मुलाचा हिरो होता. प्रत्येक मुलामध्ये त्या दिवसापुरता का होईना त्याने त्यांच्या मातृभाषेचा अभिमान निर्माण केला होता.
शाळेचे दिवस संपले होते. इथून पुढे बरंच काही घडणार होतं. खरं आयुष्य आता सुरू होणार होतं. I आणि Me या नव्या आयुष्यासाठी, त्यातल्या अडचणींना सामोरं जाण्यास तयार होत होते. अभिषेक त्या दिवशी खूप खूप आनंदात होता. अजून काही वर्षांनी आपण हिंदुजाच्या स्पेशल वॉर्डमध्ये जीवन-मरणाच्या दारात उभे असणारोत याची ना त्याला कल्पना होती न त्याच्या कायम वाद घालणाऱ्या I आणि Me या अंतर्मनांना!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय..
तुमचा सत्कार्समारंभामधे सडेतोड बोलणारा अभिषेक असा द्विधा असेल असे पटत नाही. पण तरीही पुढील भाग आपुलकीने वाचेनच. धन्यवाद.

प्रति़क्रियांबद्दल धन्यवाद मंडळी!

सत्कार्समारंभामधे सडेतोड बोलणारा अभिषेक असा द्विधा असेल असे पटत नाही>>> मुद्दा बरोबर आहे,पण 'जे पिंडी ते ब्रम्हांडी' हे समजायला वेळ लागतोय त्याला! मी असे खुप लोक पाहिले आहेत ज्यांना लोकांना काही सांगायची वेळ आली की बोलायला बरंच काही असतं पण स्वत:बद्दल बोलायचं, ठरवायचं तर ते कन्फ्युस असतात! अभिषेक अशाच लोकांचा एक प्रतिनिधी!

तुम्ही प्रश्न विचारुन मलाच थोडा विचार करायला लावलात त्याबद्दल विशेष आभार!