आय अ‍ॅन्ड मी: भाग ४

Submitted by चैर on 19 July, 2013 - 03:44

भाग ३ वरुन पुढे

काही वर्षांपूर्वी:

अभिषेक मराठीचं पुस्तक घेऊन अभ्यासाला बसला होता. संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा-
'आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही,उरतही नाही'
संदर्भ: ही काव्यपंगती फ़.मु.शिंदे यांच्या 'आई' कवितेतली आहे. कवितेत त्यांनी माया,ममता, प्रेम या सर्व शब्दांचं मूर्तिमंत उदाहरण आईवर-
उत्तर लिहायचा विचार करता करता अभिषेक संदर्भातून भरकटला. त्याच्या डोळ्यासमोर गोष्टींमधून वाचलेली, ऐकलेली आईची रूपं यायला लागली.
'जिजाऊ…जिने शिवराय घडवले'
'राणी लक्ष्मीबाई- तान्ह्या मुलाला पाठीशी घेऊन लढणारी आई! तिचा पराक्रम मोठा की मातृत्व?'
'कुंती: जन्माला आल्यावर मुलाला पाण्यात सोडायला लागलेली आणि नंतर त्याच्या भेटीसाठी, चांगल्यासाठी आयुष्यभर झुरलेली आई'
'कैकेयी: तिच्यामुळे प्रभू रामचंद्राला वनवास घडला खरं पण तिने जे काही केलं ते तिच्या लेकासाठी- भरतसाठीच केलं की'
'फाशीची शिक्षा झाल्यावर मुलाने कान चावलेली आई'
'हॅम्लेट नाटकातली प्रचंड नकारात्मक आई'
'स्वतःचा मुलगा समजून दुसऱ्याच्या मुलाला वाढवणारी,त्याच्या लीला पाहून चकित होणारी आणि शेवटी तो आपल्याला सोडून जाणार हे कळल्यावर त्याच्या रथाच्या मागे धावत सुटलेली यशोदामैय्या'
अभिषेक त्याच्या विचारांमध्ये केव्हाच गुरफटून गेला होता-
I: आपली आई पण ग्रेट आहे नाही का?
Me: जगातली प्रत्येक आई ग्रेटच असते. जगातलं सगळं मांगल्य,पावित्र्य मातृत्वात असतं असं म्हणतात! आईने मुलाला जन्म देणं,नवीन जिवाची निर्मिती होणं या सगळ्यात असतं ते फक्त आणि फक्त वात्सल्य! आणि हे वात्सल्य जगातल्या प्रत्येक आईकडे असतं म्हणून ती ग्रेट!
I: तू पुस्तकी भाषेत बरेच बोजड विचार मांडले आहेस आणि मला माहिती असलेल्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा सांगतो आहेस!
Me: हेतू इतकाच होता की 'मातृत्व' किंबहुना 'स्त्रीत्व' या गोष्टींबद्दल आपलं एकमत असावं.…एकदा ते आहे हे कन्फर्म झालं की स्त्रीत्वाच्या,मातृत्वाच्या दृष्टीने असलेली आपली कर्तव्यं आपल्याला बोलता,ठरवता येतील.
I: तू अजूनही जड शब्दातच बोलतो आहेस! पण मला आता तुझा मुद्दा कळलेला नाही.
Me: मुद्दा सोप्पा आहे. जन्मदात्या आईसाठी, मातृभूमीसाठी, मातृभाषेसाठी आणि आपल्याला वाढवणाऱ्या, घडवणाऱ्या समस्त मातृत्वाच्या दृष्टीने आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे असं मी समजतो.
I: हो मग? आपण काय केलं पाहिजे?
Me: लक्ष दिलं पाहिजे,विचार केला पाहिजे! रोजघडीला अशा कित्येक संधी येत असतात मातृत्वासाठी काहीतरी करण्याच्या! तेव्हा मागे हटता काम नये. जमेल?
I: अलबत! न जमायला काय झालं?
Me: म्हणायला ठीके रे! आचरणात आणायला अवघड आहे.
आईने हाक मारली आणि त्याची तंद्री भंगली.
"काय गं आई?"
"तुला वेळ असेल अभ्यासातून तर ये थोडा वेळ. रव्याचे लाडू करतेय. वळायला मदत करणार होतास ना?"
"हो आलोच" म्हणून अभिषेक स्वैपाकघरात गेला.
"अभि, अभ्यास करतोयस ना रे नीट"
"हो आई"
"आता तू चौथी-पाचवीत राहिला नाहीस! मी तुला म्हणूसुद्धा शकत नाही की मी तुला मदत करते म्हणून!"
"अगं तसं काही नाही! करतोय मी अभ्यास. शाळा,क्लास आहेच की चालू"
"तुझ्या बाबांना तू ओळखतोस. ते वाईट नाहीयेत पण-" अभिषेकला हसू आलं. ती प्रेमळ आईबरोबर कर्तव्यदक्ष पत्नीपण होती.
"आई अगं मी अभ्यास करतोस"
"अभि,तुला एक सांगायचं होतं. तू तुझ्या वडिलांचाच लेक- त्यांचा आणि तुझा हट्टी स्वभाव कधी जायचा नाही! बाबांशी कधी भांडायला जाऊ नकोस बरं का! तुम्ही दोघं भांडलात की माझी कोंडी होते" आई किती चटकन हळवीपण होते नाही का? अभिषेक मनात म्हणाला.
"मी कशाला मुद्दामहून भांडायला जाणारे त्यांच्याशी?"
"ते माहितीय मला, पण चुकून उलट उत्तरं पण द्यायला जाऊ नकोस कधी! तसं प्रोमीस कर मला"
"आई अडकवते आहेस ना?"
"बाळा, मी तुला कशी अडकवेन रे? मी स्वतःच अडकले आहे! तुझ्यात,तुझ्या बाबांच्यात"
"बरं बाई, करतो मी प्रोमीस! नाही भांडणार त्यांच्याशी"
आईचे डोळे चमकले. आईशी भावनिक जवळीक होती. पण ती आज पहिल्यांदाच जाणवली! पुढे काही बोलणंच अभिषेकला शक्य नव्हतं.
"मला नाही जमतेत हे लाडू वळायला…जातो मी अभ्यासाला" म्हणत तो जागचा उठला.
"बरं, तू बाहेर नाही जाणारेस ना?"
"नाही! का गं?"
"थोड्या वेळाने खरवस करणारे मी! सकाळीच दुधवाल्याने 'चीकाचं दुध' आणून दिलंय"
"सहीच…आहेच मी घरात! लौकर कर"

अभ्यासाला येउन बसल्यावर त्याला एक जुना प्रसंग आठवला-
"आई आपण नेहमी खरवस का नाही करत? दुध तर रोजच मिळतं आपल्याला"
मग खरवसाला कुठलंही दुध चालत नाही फक्त बाळंतीण गाईचं दुध चालतं असं काहीतरी आईने त्याला सांगितल्याचं त्याला आठवत होतं.
"आई, मग त्या वासराला दुध मिळत असेल ना?" लहानग्या अभिषेकने आईला प्रतिप्रश्न केला होता.
अभिषेकच्या अंगावर सरसरून काटा आला. वात्सल्य, मातृत्व या विषयावर त्याने बराच वेळ काथ्याकुट केली होती. आईशी पहिल्यांदाच एवढं भावुक होऊन बोलला होता. आणि आता खरवस? वासराला मिळणाऱ्या पहिल्या दुधाचा!
I शहारला. Me स्वतःशीच हसला.
'मी म्हटलंच होतं,एवढं सोप्पं नसतं म्हणून"
**
अभिषेक आदल्या दिवशी रात्रीपासून टेन्शनमध्ये होता. आज दहावीचा रिझल्ट होता. अभिषेकने परीक्षेनंतरच्या सुट्टीत एक महत्वाचा निर्णय घेतला होता- सायन्स, कॉमर्सला न जाण्याचा!
I:मला विज्ञान, गणित कधी नीट जमलं नाही! आत्ताही काही मी भास्कराचार्य किंवा रामानुजन वगैरे होणार नाहीये. तुला चुकीचंच वाटत असेल.
Me: तू असा समजच करून घेतला आहेस का की तुझी कुठलीच गोष्ट मला पटणार नाही?
I: इतक्या वर्षांमध्ये काही वेगळं घडलं नाहीये!
Me: तेही खरंच आहे म्हणा! माझा आक्षेप कधीच तुझ्या काहीतरी न करण्याला नसतोच, पण जे काही करायचं त्याची तुझी कारणं मला मुद्देसूद वाटत नाहीत. आत्तासुद्धा तुला आर्ट्स करायचं आहे म्हणून तुला सायन्स,कॉमर्स करायचं नाहीये असं असतं तर मी काही म्हटलं नसतं. तुझं उलटं आहे!
I: हो आहे खरं…म्हणजे ज्यांना एखादी गोष्ट का करायची याची कारणं माहित नसतात त्यांनी ती करूच नये? पुढे काहीतरी चांगलं होऊ शकत असेल तरी?
Me ने काहीच उत्तर दिलं नाही
दत्ताच्या फोटोपुढे हात जोडल्यावर अंतर्मनात एक आवाज उमटला. हा आवाज I किंवा Me चा नव्हता. पण खूप शांत, धीरोदत्त होता. ऐकून मन प्रसन्न होत होतं-
"अभिषेक किती वाद घालशील? तेही स्वतःशीच? जगातली सगळी माणसं त्यांचा मुद्दा पटवून द्यायला जगाशी भांडतात. तू मात्र स्वतःशीच भांडतो आहेस. तुला स्वतःला स्वतःच्याच नजरेत पडून द्यायचं नाही हेसुद्धा कळतंय त्या भांडणांमधून. पण आत्ता पुरे. शांत हो आणि भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे"
त्याने डोळे उघडून फोटोकडे पाहिलं. तिन्ही तोंडं हसत त्याच्याकडे पाहत होती. तो जागचा उठला. त्याने आईला नमस्कार केला. आईने त्याच्या हातावर दही ठेवलं-
"आई, अगं हे काय?"
"अरे रिझल्ट घ्यायला निघाला आहेस तू? महत्वाच्या कामांना जाताना आपल्यात करतात असंच"
"बरं"
दह्याचा हात चाटत अभिषेक घराबाहेर पडला. त्याच्या बरोबर दोघेही होतेच- त्याला घडवणारे I आणि Me!

शाळेत अभिषेकचं स्वागत झालं ते हसऱ्या चेहऱ्यांनीच! अभिषेकला बोर्डाचं राम गणेश गडकरी पारितोषिक मिळालं होतं. मराठीमध्ये तो बोर्डात पहिला आला होता. त्याला एकूण ८०% मार्क मिळाले होते. पण तरीही तो पूर्णतः समाधानी होता. राम गणेश गडकरींच्या नावाने मिळणारं पारितोषिक तो शुभशकून समजून घेणार होता.माणसांची गर्दी त्याला सोडत नव्हती. अभिषेकसाठी हा अनुभव नवीन होता. खूप वर्षांनी लोकांना, मुलांना तो हवा होता. सगळ्यांना त्याच्याशी बोलायचं होतं. त्याचं कौतुक करायचं होतं. I प्रचंड सुखावला होता.
Me त्याला म्हणाला- 'जमलं बुवा तुला'
त्यावर I ने उत्तर दिलं- 'अहं…आपल्याला जमलं'
अभिषेकला सारखं वाटत होतं, असंच तडक घरी जावं आणि आईला घट्ट मिठी मारावी. प्रियाला आपला पराक्रम सांगावा आणि तिच्या चेहऱ्यावर आपल्याबद्दल वाटणारा अभिमान बघून अजून खुश व्हावं. बाबांच्या समोर ताठ मानेने उभं राहावं आणि, आणि त्यांनाही घट्ट मिठी मारावी.
"अभि, तुझे पप्पा आलेत" त्याला कुणीतरी सांगितलं.
"बाबा, आत्ता? इथे?" त्याच्या डोक्यातले सगळे विचार विरघळले. "आता ते आधी गणित आणि विज्ञानातले मार्क बघणार"
"अभिषेक, मला तुझा अभिमान वाटतो" श्रीनिवास त्याच्या पुढ्यात येउन म्हणाला. खरंच समाधानाने की जनरीत म्हणून ते काही अभिषेकला समजलं नाही. तो वाकून श्रीनिवासच्या पाय पडला.
"बाबा, आई आणि प्रिया?"
"घरी थांबल्यात. तुझी वात बघतायत"
बाबा बरोबर होते म्हणून त्याला गोतावळ्यातून लौकर बाहेर पडावं लागलं.
घरी पोहोचल्यावर प्रियाने दार उघडलं.
'प्रिया, मी बोर्डात मराठीत पहिला आलो" त्याने आनंदाने तिला सांगितलं. प्रियासाठी तर तिचा भाऊ एकूण बोर्डातच पहिला आला होता. ती अभिमानाने ही बातमी मैत्रिणींना जाउन सांगणार होती.
"आई, मी आलो गं" म्हणत तो स्वैपाकघरात गेला. आईला त्याने वाकून नमस्कार केला. आईने त्याला अडवलं-
"अरे अभि, देवाला नमस्कार कर आधी"
"अरेच्या होच"
तो पुन्हा त्या दत्ताच्या फोटोपुढे जाउन उभा राहिला.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।
गुरुर्साक्षात परब्रह्मः तस्मै श्री गुरवे नमः ।।
'असाच पुढे हो…स्वतःवर विश्वास ठेव! अजून खूप जबाबदाऱ्या आहेत. माहित आहे ना?' मघाचाच आवाज.
'जबाबदाऱ्या?' तो स्वतःशीच पुटपुटला.
तेवढ्यात आईने हाक मारली म्हणून तो जागचा उठला. पण जबाबदाऱ्या कसल्या? हे त्याला उमगलं नव्हतं!


क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आई आपण नेहमी खरवस का नाही करत? दुध तर रोजच मिळतं आपल्याला"
मग खरवसाला कुठलंही दुध चालत नाही फक्त बाळंतीण गाईचं दुध चालतं असं काहीतरी आईने त्याला सांगितल्याचं त्याला आठवत होतं.
"आई, मग त्या वासराला दुध मिळत असेल ना?" लहानग्या अभिषेकने आईला प्रतिप्रश्न केला होता.
अभिषेकच्या अंगावर सरसरून काटा आला. वात्सल्य, मातृत्व या विषयावर त्याने बराच वेळ काथ्याकुट केली होती. आईशी पहिल्यांदाच एवढं भावुक होऊन बोलला होता. आणि आता खरवस? वासराला मिळणाऱ्या पहिल्या दुधाचा!>>> हे अगदी माझ्या मनातलं.. मिटक्या मारत खरवस खाणार्‍या कुणाच्याच हे मनात येत नसेल का? अर्थात, ज्या गायीचे दूधच तिच्या वासरासाठी बनलेले आहे, तेच आपण ओढून घेतो. तर चीकाविषयी बोलण्याचा आपल्याला काय नैतिक अधिकार आहे म्हणा! माणसाची जात स्वार्थीच.. स्वतःच्या बाळाला जीवाचा आटापिटा करुन पहिल्या चीकाचे दूध देणार आणि गायीचा चीक मात्र तिच्या लेकरासाठी नाही ठेवणार.. तोही स्वतःच ओरपणार खरवशीची स्वप्न पाहात...

दूधच तिच्या वासरासाठी बनलेले आहे, तेच आपण ओढून घेतो. तर चीकाविषयी बोलण्याचा आपल्याला काय नैतिक अधिकार आहे म्हणा!>>>> +१

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद लोक्स!