आय अ‍ॅन्ड मी: भाग ६

Submitted by चैर on 25 June, 2014 - 01:40

टीपः ही कथा मायबोलीवर लिहायला सुरुवात करून खुप महिने उलटून गेलेत. मला कल्पना आहे की तेव्हा पहिले सगळे भाग नियमितपणे वाचलेले एव्हाना गोष्ट विसरून गेले असावेत. पण इतक्या महिन्यात मला खरंच लिखाण शक्य झालं नाही. पुढचा भाग लिहिताना इतकंच म्हणतो की यावेळी नक्की नेटाने कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मायबोलीचे वाचक समजून घेतील याची खात्री आहे! चुभुद्याघ्या....


भाग ५
वरुन पुढे:

काही वर्षांपूर्वी:

अभिषेकने नाखुषीनेच का होईना पण शेवटी अकरावी सायन्सला अ‍ॅडमिशन घेतली. ज्यात मला अजिबात रस नाही ते विज्ञान शिकायचं?आणि ते पण इंग्लिशमधून? त्याला बरंच टेन्शन आलं होतं.कॉलेजचा पहिला दिवस! वर्ग शोधायचा! मग अजिबात ओळख नसणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसायचं. ओळखी करून घ्यायच्या. शाळेत होणारे मित्र, झालेल्या ओळखी, बनलेली नाती आणि एकूणच घडण्याची प्रक्रिया ही समजून-उमजून होण्यापेक्षा नकळत झालेली असते. कॉलेजचं तसं नसतं. इथे मैत्री होणं, नाती बनणं, हे सगळं स्वेच्छेने होतं. अभिषेकच्या बाबतीत काही वेगळं घडणार नव्हतंच! इथे भेटलेली काही माणसं त्याला आयुष्यभर साथ देणार होती.
पहिले दोन-तीन तास काही अनाकलनीय इंग्रजी बोलणारे शिक्षक येउन गेले. मध्येच कॉलेजच्या प्रिन्सिपल येउन वेलकम वगैरे म्हणून गेल्या. शेवटच्या तासाला एक तिशीचा लेक्चरर वर्गात येउन उभा राहिला. त्याची पर्सनॅलीटी आणि त्याचा पेहराव पाहून त्याचं प्रोफेशन चुकलंय की काय अशी शंका यावी! रेग्युलर व्यायाम करत असल्याचं दिसणारं पिळदार शरीर, टी-शर्ट, जीन्स, बूट, कोरीव मिशी, डोळ्यावरून नुकताच काढून टेबलवर ठेवलेला गॉगल आणि त्यामुळे दिसणारे त्याचे घारे डोळे! हा साऊथच्या सिनेमात हिरो म्हणून का नाही गेला असा प्रश्न पडावा सगळ्यांना! त्याने घसा खाकरत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं आणि स्पष्ट कळेल अशा इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली.
"गुड मॉर्निंग फ्रेंड्स! मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे बरोबर वर्गात बसला आहात!" काही मुलं गोंधळून पहायला लागली.
"ही अकरावी सायन्स, डिव्हिजन डी, सेकंड लॅंग्वेज मराठी आहे राईट?" वर्गात बहुतेकांनी मान डोलावल्या. पहिला दिवस जवळपास संपत आल्यावर चुकीच्या वर्गात आल्याचं कळून गोंधळलेला एकजण उभा राहिला. त्याने वर्गाबाहेर जायची परवानगी मागितली. ती मिळाल्यावर तो उठून बाहेर गेला. बाकीच्या मुलांमध्ये हास्याची एक दबकी लहर उठली.
"एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये होतंच असं पहिल्या दिवशी" म्हणून त्याने मुलांना गप्प केलं.
"सो, जर तुम्ही योग्य वर्गात बसला आहात याची तुम्हाला खात्री असेल तर आपण सुरुवात करायला हरकत नाही…मी राजीव कर्वे! अभ्यासाला आपण सुरुवात करुच पण सर्वात आधी काही महत्वाच्या गोष्टी! मला खात्री आहे की कॉलेजमध्ये आल्यावर शाळेपेक्षा तुमचं विश्व कसं बदलतं आणि तुम्ही या बदलांना कसं सामोरं गेलं पाहिजे वगैरे गोष्टी आता तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये खूप वेळा ऐकाल. कधी इतर प्रोफेसर्सकडून, कधी मोठ्या भावंडांकडून, कधी मित्र-मैत्रिणींकडून! मीसुद्धा काही फार वेगळं करणार नाहीये…पण निदान आपण असा विषय बोलूया जो फार कमी वेळा डिस्कस होईल, पण तो तेवढाच महत्वाचा आहे…चालेल?"
मुलांनी माना डोलावल्या.
"तर प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने सायन्सला अ‍ॅडमिशन स्वतःच्या मर्जीने घेतलीय ना? की निव्वळ कुणी मित्र-मैत्रीण पण इथे आहे म्हणून, किंवा घरच्यांनी सांगितलं म्हणून, किंवा इतके चांगले मार्क्स मिळाल्यावर आर्ट्स, कॉमर्सला गेलो तर लोक काय म्हणतील हा विचार करून सायन्सला आलेलेसुद्धा काहीजण आहेत?" अभिषेकने मान खाली घातली.
"तुमच्यापैकी काही लोकांच्या मान खाली गेलेल्या, होकारार्थी हललेल्या दिसल्या मला. हे काही फारसं चांगलं नाही! अर्थात, मी तुम्ही घेतलेला निर्णय बदलू शकत नाही. फारतर तुम्हाला दुसरीकडे जाऊन तुमच्या आवडीचा विषय शिका म्हणू शकतो पण तेसुद्धा तुमच्यापैकी कितीजण करतील याची मला कल्पना नाही…मी तुम्हाला विज्ञानात इंटरेस्ट वाटेल यासाठी प्रयत्न करू शकतो. शेवटी विज्ञान म्हणजे तरी काय? कुतूहल, जास्त कुतूहल, अजून जास्त कुतूहल! तुमच्यापैकी काही जणांना जरी वर्षाअखेरीस विज्ञान जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलं तरी मला शिकवायला जमलं असं म्हणायला हरकत नाही"
मुलांनी मान डोलावल्या!
"सायन्स इस क्युरिओसिटी…माणसाच्या उत्क्रांतीपेक्षा विज्ञान जुनं आहे! इतकंच काय- तर विश्वाची उत्पत्ती होणं, जीवसृष्टीची उत्पत्ती होणं हा सगळा विज्ञानाचाच एक भाग! आणि सायन्स शिकणं काही अवघड नाही! तुम्हाला खूप प्रश्न पडतात का?"
त्याने अचानक प्रश्न विचारल्यावर मुलं भांबावली- एक दोघांनी होकारार्थी माना हलवल्या.
"पडत असले तर उत्तम! कारण विज्ञान शिकायचं असेल तर त्यापेक्षा जास्त कशाचीच गरज नाही आणि प्रश्न पडत नसतील तर ते पडायला हवेत- कारण तुम्हाला अजिबातच प्रश्न पडत नसले तर विज्ञानच काय पण तुम्ही आर्ट्स, कॉमर्स काहीच शिकू शकणार नाही…जमेल इतकं करायला?"
पुन्हा वर्गाकडून विशेष प्रतिसाद आला नाही!
"तुम्हाला दोन तासातच कॉलेजचा कंटाळा आलेला दिसतोय!" त्याने नकारार्थी मान डोलवत म्हटलं.
"आणि तुम्हाला प्रश्न तर नक्कीच पडत नाहीत…नाहीतर मी तुम्हाला नेमका कुठला विषय शिकवणार आहे हे तुमच्यापैकी कुणीतरी विचारलं असतं एव्हाना…."
अचानक आपल्यापैकी कुणीच हा प्रश्न विचारलेला नाही हे मुलांच्या लक्षात आलं.
"तुम्ही झूलॉजी शिकवता ना सर?" पुढच्या बाकावरच्या एका मुलीने विचारलं- "माझी एक कसिन लास्ट यिअर तुमच्या क्लासमध्ये होती"
"गुड…म्हणजे कुणालातरी माहित होतं…असो…आता थोडसं झूलॉजीबद्दल बोलु…बेसिक्सपासून सुरुवात करू…सजीव आणि निर्जीव हा फंडामेंटल फरक काही कळायला कठीण नाही…पण मग नुसतं सजीव घटकांचं वर्गीकरण करायचं ठरवलं की गोष्टी कॉम्पलिकेटेड होतात…क्लास अ‍ॅनिमेलीया सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स…तोच आपण शिकणार आहोत…सो येत्या वर्षभर आपण एकत्र असणारोत… तुमची नावं तरी सांगा…अकरावीला कॉलेजला रेग्युलर येत राहिलात तर वर्षाखेरीस सगळ्याची नावं राहतील माझ्या लक्षात"
एक-एक उभं राहून नावं सांगायला लागला.
"अभिषेक कुरतडकर…न्यु इंग्लिश स्कूल दादर"
"अभिषेक कुरतडकर…यंदा राम गणेश गडकरी प्राईज मिळालं तो तूच का?"
"येस सर…"
"ग्रेट…१५ वर्षांपूर्वी मलासुद्धा मिळालं होतं…पण इतक्या वर्षात कधी दुसऱ्या विनरला भेटायची वेळच नाही आली…गुड टू मीट समवन फायनली"
अभिचं कौतुक झाल्यावर एव्हाना सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. अभी मनोमन सुखावला होता.
तासाची आणि पहिलाच दिवस असल्याने कॉलेजची वेळ संपत आलीच होती. राजीव कर्वेंनी सगळ्यांना जाण्याची परवानगी दिली.
अभिषेक बाहेर पडत असताना त्याची आणि कर्वेंची नजरानजर झाली. तो आपसूकच त्यांच्याकडे गेला-
"सर, मलापण तुम्हाला भेटून छान वाटलं…"
"गुड…मगाशी 'सायन्सला आवड म्हणून आलात का?' या प्रश्नाला नकारार्थी मान डोलावलेल्यांमध्ये तू होतास हे पाहिलं होतं मी…इतरांचं अजून माहित नाही पण तुझं कारण काय होतं ते लक्षात आलंय माझ्या!!'
"सर…मला खरंच भाषा शिकायची होती…इतिहास, साहित्य, राजकारण, समाजकारण यात मला रस होता…पण घरच्यांनी--"
"हं…'बारावी सायन्स कर' मग तुला हवं ते करता येईल असंही सांगितलं असेल---"
अभिषेकने होकारार्थी मान हलवत खिन्नपणे सरांची नजर चुकवली. कर्वेंच्या ते लक्षात आलं-
"ठीके रे…या वयात ऐकायचं घरच्यांचं…ते म्हणतात ते अगदीच काही खोटं नसतं…आणि एक गोष्ट लक्षात ठेव…तुझ्या मर्जीने असो किंवा मर्जीविरुद्ध--पण सायन्सला येण्याचा निर्णय तू घेतला आहेस…त्या निर्णयाकडे सकारात्मकपणे बघ….अभ्यास तुलाच करावा लागणारे…'घरच्यांनी सांगितलं म्हणून सायन्सला आलो होतो, तेव्हा तेवढं समजून घ्या' असं पत्र बोर्डाला पाठवता येणार नाहीये…कळतंय का?" सर हसत म्हणाले.
"हो सर"
"आणि तुला वाटेल की हा मास्तर पहिल्याच दिवशी आपल्याबद्दल काहीच माहित नसताना 'आयुष्यात कसं वागावं' याचे धडे का देतोय…पण शेवटी तू आणि मी गडकऱ्यांच्या नावाने जोडलो आहोत काय?"
"हो सर…" अभिषेकचा चेहरा थोडासा खुलला.
"झूलॉजी तर मी शिकवेनच पण इतर काही अडचण असेल तरी विचार मला…ओके?"
"नक्की सर…थंक्स"
कर्वे निघून गेले.
अभिच्या अंतर्मनांचा संवाद सुरु झाला-
I: आपल्याला तर बुवा पर्सनॅलीटी आवडली. अशी माणसं भेटत राहिली तर आपलं भलं होणार हे नक्की!
Me: हं…खरंय…त्यांनी सांगितलेला सकारात्मक विचार करण्याचा मुद्दा महत्वाचा आहे असं मला वाटतं…
I: उलट तेवढा एकच मुद्दा नाही पटला मला…मनाला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सकारात्मक म्हणून घ्यायच्या कशा?
Me: काहीवेळी तेच योग्य असतं रे…म्हणजे परिस्थितीला सायलेंटली सरेंडर करण्यापेक्षा तीच परिस्थिती कबूल करून त्यातून चांगलं काहीतरी बाहेर पडेल यासाठी प्रयत्न करणं म्हणजे सकारात्मकपणा….
I: म्हणजे जे चाललंय ते कितीही प्रतिकूल का असेना…कितीही मर्जीविरुद्ध का असेना…एकूणच चुकीचं का असेना…पण ते बरोबर कसं आहे हे जगाला आणि स्वतःला पटवत राहायचं….
Me: असं नाही म्हणते कुणी…तु म्हणतोयस तो काही अंशी दैववाद झाला…आपण प्रयत्नवाद, वास्तववाद सोडायचा नाही…आणि हां दरवेळीच आहे ती परिस्थिती मान्य करत रहायची गरज नसतेच रे…कधी कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची वेळ येतेच की…येईल तेव्हा बघू की!

आज दुपारी:

हिंदुजाच्या रिसेप्शन डेस्कजवळ बसलेल्या बाईने वर पाहिलं-
"येस??"
"पेशंटचं नाव अभिषेक कुरतडकर….कुठल्या रूममध्ये आहे तो?"
रिसेप्शनिस्टने समोरच्या कॉम्प्युटरकडे बघत कीबोर्डवर बोटं आपटली--
"अ…आयसीयुमध्ये आहे तो…आठव्या फ्लोरला…भेटायची वेळ नाहीये आता…आणि भेटता येत नाही आयसीयुच्या पेशंटला असं…"
"ओह…कसा आहे तो?"
"आयसीयुचा पेशंट कधी बरा असतो का? पण काल रात्री अ‍ॅडमिट केलंय.सो स्टेबल असावा!"
"आणि त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च? आय मीन काही पैसे भरायचे असले तर---"
"इथे काही एन्ट्री दिसत नाहीये पेमेंटची….तुम्ही करणार आहात का?"
"अ हो…मला अमाउंट सांगा…मी भरतो!"
"तुमचं नाव काय?"
"प्रशांत राणे"
"तुम्ही कोण त्याचे??"
"मित्र आहे मी त्याचा…त्याच्या घरचे आलेत का?"
"हो…आठव्या फ्लोरवरच असतील वेटिंग एरीयामध्ये"
"उत्तम…हे काम झालं की जाउन त्यांनाही भेटतो…"
'हा अभिषेक कुरतडकर कोण? मास्तरांनी पर्सनली यात लक्ष घालायला सांगितलं आहे म्हणजे कुणीतरी महत्वाचा माणूस असला पाहिजे. वर जाऊन बघुयात तरी काय सिचुएशन आहे ते' प्रशांत मनात पुटपुटला.
वर जाण्यापूर्वी मास्तरांच्या नंबरला एसेमेस करायला तो विसरला नाही-
'पेशंट इन आयसीयु. क्रिटीकल बट स्टेबल फोर नाऊ. पेमेंट मेड. विल कीप यु पोस्टेड'


क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स मंडळी!!
पेरु: पुढचा भाग टाकलाय त्यात सगळ्या जुन्या भागांच्या लिंक्स आहेत! आतापासून तसं करण्याची सवय ठेवेन! Happy