इटालियन शंकरपाळे - पास्ता चिप्स

Submitted by मामी on 22 July, 2014 - 06:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणिक १ वाटी
दूध पाऊण वाटी
तूप अर्धी वाटी
मीठ चवीपुरते (हे आधी थोडेच घालावे. पास्ता सिझनिंगमध्ये मीठ असते.)
ओरेगानो सिझनिंग ( फोटो बघा)
चिली फ्लेक्स (फोटो बघा)
तळण्याकरता तेल

क्रमवार पाककृती: 

गरज ही शोधाची जननी असते म्हणे. पण जननी ही शोधाची जननी जास्त करून असते.

शाळेकरता खाऊ हा विषय नेहमीच ऐरणीवर असतो. तर या विषयावर मनोमन सखोल चिंतन करून ही एक नाविन्यपूर्ण पाककृती वाचकांसमोर ठेवताना आस्मादिकांस अतिशय आनंद होत आहे. चाणाक्ष वाचक या पाककृतीची जननी सशलचा हा बाफ आहे हे ओळखतीलच. (लब्बाड कुठले! अशानं आम्ही नाही जा!)

तर पावसाळी संध्याकाळची रम्य वेळ होती. धरीत्री हिरवा शालू नेसून मावळत्या सूर्यास निरोप देण्यास तयार होती. अशा वेळी मनस्वी आणि स्वच्छंद अशी मी माझी हलकीशी चार तासांची झोप काढून उठले. नवरा म्हणाला सुद्धा की "तू पटकन फ्रेश हो, मी मस्त वाफाळती कॉफी बनवतो." कॉफीचा कप हातात देता देता तो म्हणाला की "आज एक माणूस रागावलंय हं!" अन त्यानं लेकीकडे इशारा करून सांगितलं की तिला शाळेच्या डब्याकरता काहीतरी वेगळं हवंय. अरेच्चा! म्हणून का आमच्या संसारवेलीवरचं फूल रुसून बसलंय! "वेडाबाई!" मी तिच्या टपलीत मारून गालातल्या गालात हसले आणि म्हटलं "अशा सोनियाच्या दिवशी आमची राणी का बरं रुसली?"

अन अचानक माझं वेडं मन पाककृतींच्या विशाल गगनात भरारी मारू लागलं. सोनिया - इटली - इडली - रवा - गहू - कणिक अशा रंगिबेरंगी फुलांवर विहरत ते सरतेशेवटी शंकरपाळे या फुलावर विसावलं. सोनियापासून सुरू झालेला हा प्रवास शंकरपाळ्यांवर संपला ही सूचकता लक्षात घेऊन आस्मादिकांनी मग एक शक्कल लढवली आणि या पाककृतीचा जन्म झाला.

*********************************************************************************************************

दूधात पाणी घालून एक वाटीभर करावे. हे मिश्रण गरम करावे. तूप गरम करून घ्यावे. आणि दूध तूप एकत्र करावे. त्यातच पास्ता सिझनिंग, चिली फ्लेक्स आणि मीठ घालावे. मग त्यात मावेल इतकी कणिक घालून फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असे मुलायम भिजवून घ्यावे.

सिझनिंग जरा जास्त घालावे लागते कारण तळल्यावर त्याची चव जरा कमी लागते.

नेहमीच्या शंकरपाळ्यांप्रमाणे पोळपाटावर जाडसर पोळी लाटून , सुरीनं शंकरपाळ्यांच्या आकारात कापून गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात. टिश्शूवर काढून मग गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
हे काय विचारणं झालं?
माहितीचा स्रोत: 
आस्मादिक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या नॉर्दन इटालियन :

पण हे मऊ झाले म्हणून बाकीचे जरा पक्क्या रंगावर तळले हो. कित्ती घालून पाडून बोलायचं ते एखाद्याला. अशानं एक माणूस रागावेल हं.

Wow Happy

मामी Lol

Lol
मामी, शंकरपाळे मस्तच. पण तुझ्या पाकृला तोड नाही!
आता इतकी स्तुती ऐकून तुझे गाल आरक्त वगैरे होतील आणि तू लाजून आत पळशील अशी मला भीती वाटत आहे Proud

मामी (35 असेल तर मामी माझ्यापेक्षा 10 वर्षानी लहान!! काय दिवस आले!! Lol ) जबरी पाकृ व प्रक्रि.

नंतरच्या फारच आकर्षित करत आहेत. अर्थात सोनियाचा रंग आणायचा प्रयत्न करता येणारच नाही असे नाही पण संसारवेलीचं फूल मात्र खुश नाही व्हायचं त्या रंगाने!!

Pages