थेंबघुंगरु

Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2014 - 23:58

थेंबघुंगरु

थेंबघुंगरु घनात वाजे घुमड घनानी
चमकत राही अधुनि मधुनि दाही दिशातुनि

थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन

थेंबघुंगरु, चमकत पानी हिरवे होऊन
थेंबघुंगरु, सुंगध होते फुलाफुलातुन

थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्‍यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन

थेंबघुंगरु, स्वैर निनादे कोसळताना
मल्हार घुमतसे, घनगंभीरसा धुंद तराणा

थेंबघुंगरु, तुटून आले सरसर खाली
गुंफून सरींच्या अगणित मिरवित रेशिमशाली

थेंबघुंगरु, सदा झुलतसे मनामनातुन
नाद तयाचा अखंड भुलवी.. कणाकणातुन

थेंबघुंगरु, ओघळती त्या नयनांमधुनी,
सांगून जात ती.. सुखदु:खाची कथा पुराणी
------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, मस्तच Happy

थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन>>>>>:-) Happy

शशान्कजी! ___/\__ कित्ती गोड कविता. आणी 'थेंबघुंगरू' हा सुन्दर नविन शब्द माबो शब्दकोशाला दिलात!
मागे कुणीतरी 'थेंबुटला' असा शब्द माबोला दिला होता.

<<थेंबघुंगरु, अलगद सुटले कृष्णघनातुन
थेंबघुंगरु, बांधित पैंजण सरीसरीतुन
थेंबघुंगरु, थिरकत रानी कधी झर्‍यातुन
थेंबघुंगरु, झळकत राही तृणपात्यातुन<< डोळ्यासमोर चित्र उभे केलत. Happy

थेंबघुंगरू... थेंबघुंगरू...
कसा मस्तं ताल आहे.
छान जमलीये कविता. तो शब्दं एक चोरला जाण्याची दाट शक्यता आहे... आधीच सांगून ठेवतेय, शशांक.

खुप छान

मला पण थेंबघुंगरु हा शब्दच खूप आवडला. >>> + ११११