आय अ‍ॅन्ड मी: भाग ९

Submitted by चैर on 14 July, 2014 - 01:27

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८

काही वर्षांपूर्वी:

जॉन जरा मोठा झाला तेव्हा जगाकडून त्याला तो अनाथ असल्याचं कळलं. माउंट मेरी चर्चच्या अखत्यारीत येणाऱ्या एका अनाथाश्रमात तो वाढला. अभ्यासातसुद्धा त्याचं डोकं फारसं कधी चाललं नाही. शिक्षण झालं म्हणण्याइतपत ग्रॅजुएट तो कसाबसा झाला. १८ वर्षांचा झाल्यावर त्याला अनाथाश्रम सोडावा लागला. मग शिक्षण पूर्ण करायला म्हणून एका छोट्या कुरियर कंपनीत त्याने नोकरी करायला सुरुवात केली. दोन वर्ष दिवसभर वणवण भटकून तो कुरियर्स पोहोचवायचा. मिळणाऱ्या पैशातून कसाबसा स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा आणि स्टेशनवर बूट पॉलीश वगैरे करणाऱ्या मुलांच्या खोलीत राहायचा. एक दिवस रात्री ती पोरं एका १६-१७ वर्षांच्या मुलीला पैशाचं आमिष दाखवून खोलीवर घेऊन आली. त्यालासुद्धा त्यांनी 'आमंत्रण' दिलं. तो गेला नाहीच उलट त्यांच्याशी भांडण होऊन त्याने रातोरात खोली सोडली. कुरियरच्या नोकरीतून एकट्याने खोली भाड्याने घेऊन राहणं शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं. एक-दोन रात्री रस्त्यावर राहून काढल्यावर त्याला एक जुना मित्र भेटला. त्यानेच जॉनला या फार्मा कंपनीत पाठवलं होतं. मित्र म्हणाला होता-
"अरे तू दारोदारी जाउन कुरियर देतोस हे तसंच आहे! तो पण फिरायचा जॉब आणि हा पण…फक्त डॉक्टर्सकडे फिरायचं! त्यांच्या एसी केबिन्समध्ये बसायचं…बक्कळ पैसे मिळतात बघ"

जॉनला नोकरी लागली. पुढच्याच आठवड्यात नोकरी लागताना मिळालेल्या पैशाने त्याने एक लहान खोली भाड्याने घेतली. पण कामच इतकं असायचं की त्याला खोलीवर जाऊन सुखाने पाठ टेकायचं सुख काही मिळालं नव्हतं. गेल्या महिन्यात टार्गेट जेमतेम पूर्ण झालं होतं. आता त्याच्या कंपनीची औषधं इतर स्पर्धक कंपन्यांइतकी चांगली नव्हती त्याला तो तरी काय करणार? त्यात त्याला खोटं बोलायला, तत्वांना मुरड घालायला आवडत नव्हतं आणि तो मार्केटिंगसारख्या चुकीच्या क्षेत्रात पडला होता.

एक दिवस तो नेहमीसारखा नोकरीला जायला निघाला. दादर स्टेशनबाहेरची नेहमीची तोबा गर्दी. त्यात सकाळी नोकरीसाठी घाईने निघालेले लोक. त्यातच फेरीवाल्यांची गर्दी. ट्राफिकचा कोलाहल. अशातच एक भाजीवाला एका म्हाताऱ्या माणसाशी वाद घालत होता. जॉन जवळून जात असताना त्याने भांडण ऐकलं-
"मी तुला १००ची नोट दिली. मला ७० परत दे"
"अरे क्यू सुबह सुबह तकलीफ दे रहे हो? आपने ५० दिये थे"
"नही मैने तुम्हे १०० रुपये दिये थे"
"क्यू बुढौ सठिया गये हो क्या?" भैय्या एकेरीवर आला.
"का रे बाबा म्हाताऱ्याला त्रास देतोस?"
भैय्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता आणि म्हातारा नेटाने ५० रुपये मागायला थांबला होता.
"अरे भैय्या, दो ना इनका पैसा वापस" जॉनने तोंड घातलंच.
"आप कौन है? पुलिस?"
"क्यू पुलिस नही है तो तुम पैसा वापस नही करेगा?"
"अरे मैने जितना पैसा देना है उतना दे दिया है"
"नही…तुमने मुझे ५० रुपये कम दिये है" म्हातारा पुन्हा मध्ये बोलला.
"ए भैय्या, सुबह सुबह दारू पिके तमाशा मत करो…इन्हे पैसे दे दो वापस"
"तू है कौन बे? अपने आप को बहोत शाणा समजता है?"
"हां समझता हू…साले पैसे वापस दे…नही तो मुझे पुलिस को बुलाना पडेगा"
"गाली किसे दे रहा है बे?"
"तुझे"
"तो मेरा भी जवाब सुन ले"
भैय्याने पुढे येऊन त्याच्या मुस्कटात भडकावली. जॉनच्या तोंडाएवढी ताकद त्याच्या अंगात नव्हतीच. तो काही त्या भैय्याला उलट मारू शकला नाही. सकाळी सकाळी अशा लहान-सहान मारामाऱ्यांमध्ये कुणी पडत नाही. बघे म्हणून दहा-बारा लोकांची गर्दी जमते एवढंच. जॉनने उलट मारलं नाही पाहून भैय्याने त्याला अजून चार-पाच ठेवून दिल्या. लोकांसमोर शोभा झाली. एका फटक्याने तो खाली पडला आणि कपडेसुद्धा खराब झाले. मग त्याच म्हाताऱ्याने त्याला एका जवळच्या हॉटेलात नेलं. त्याला खाऊ-पिऊ घातलं.
"काका, सॉरी पण तुमचे पैसे नाही मिळवून देऊ शकलो मी" जॉन निराश होत त्यांना म्हणाला.
"पोरा, अलीकडे सख्खे नातेवाइक आपल्यासाठी काही करत नाहीत…तू तर एका अनोळखी माणसासाठी उगाच त्रास करून घेतलास"
"काका, मला काही वाईट घडताना दिसलं की राहवत नाही…पण फिसिकली मारामारी करण्याची पाळी आली तर मी--" तो ओशाळून म्हणाला.
"ठीके रे…तुला लोकांसाठी काहीतरी करावसं वाटत वाटतं हेच खूप मोठं आहे"
"नुसतं वाटून काय उपयोग आहे काका? कित्येक वेळा आपल्याला उघड्या डोळ्यांनी काही न करता सगळं सहन करावं लागतं" त्याला महिनाभरापूर्वी खोलीवर झालेला प्रसंग आणि ती अल्पवयीन मुलगी आठवले.
"काय करतोस तू?" त्या म्हाताऱ्याने विचारलं.
"म्हणायला मेडिकल रीप्रेसेंटेटीव्ह….म्हणायला औषधांचा सेल्समन" जॉन म्हणाला.
"पगार बरा मिळतो का?"
'या माणसाने आपल्याला खाऊ-पिऊ घातलंय ते ठीके पण आता हा असले खाजगी प्रश्न का विचारतोय? आता हा या हॉटेलचं बील आपल्याला भरायला लावतो का काय?'
"अ…हां…होते तशी दोन वेळची सोय" तो म्हणाला.
"नाही…मला माहितीय की मी खूप खाजगी प्रश्न विचारलाय पण माझ्याकडे तुझ्यासाठी एक नोकरी होती"
"कसली नोकरी?"
"ती करायला तुला नाव बदलावं लागेल"
"म्हणजे? मी समजलो नाही"
"सांगतो ना…विवेक विचारे हे तुझं नाव असेल"
"काका, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये…कसली नोकरी? आणि माझं नाव जॉन डिसुझा आहे…ते मी विवेक विचारे का करेन?"
त्या म्हाताऱ्याने त्याला डीटेल्स द्यायला सुरुवात केली---

'विवेक' म्हणजे सारासार विचार! या नावाची एक संस्था शहरात कार्यरत होती. संस्थेचं अधिकृत कार्यालय नव्हतं. कुठलीही पत्रकं नव्हती. कुठल्याही विशेष किंवा सर्वसाधारण सभा नसायच्या. पण कार्यकर्ते शहरभर पसरलेले होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर्स, रिपोर्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षक इथपासून ते कारकून, पोस्टमन्स, सफाई कामगार असे कित्येकजण होते. 'विवेक'चं काम नेमकं कसं चालायचं याबद्दल त्याच्या कार्यकर्त्यांना फारशी कल्पना नव्हती. कित्येक लोक निव्वळ मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यासाठी काम करायचे. पण शहरात होणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे 'विवेक'चं बारीक लक्ष असायचं. शहरात होणारे कित्येक घातपात विवेकच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सतर्कतेमुळे थांबले होते. यातले कुणीच कार्यकर्ते एकमेकांना वैयक्तिक आयुष्यात ओळखत नव्हते.
प्रत्येकाला कधीतरी एक 'विवेक विचारे' नावाचा माणूस येऊन भेटला होता आणि त्याने कधी पैशाचं आमिष दाखवून तर कधी चांगलं काम करण्याची संधी मिळतेय म्हणून विवेकसाठी काम करायला त्या प्रत्येकाला प्रवृत्त केलं होतं. विवेकचे सिनियर्स नेमके कोण आहेत याची विवेकचं काम खूप वर्षं केलेल्या लोकांनासुद्धा कल्पना नव्हती. प्रत्येकाला कधीतरी स्वतःला मास्तर म्हणवून घेणाऱ्या एका माणसाचा फोन आलेला होता. पण त्या मास्तरांना प्रत्यक्षात कुणीच कधीच पाहिलं नव्हतं.
**
होम मिनिस्टर राव मुंबईत एका महत्वाच्या मिटींगला येणार होते. निवडणुका होऊन सहाच महिने झाले होते पण तेवढ्याच काळात त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना हवालदिल करून टाकलं होतं. कित्येक अधिकाऱ्यांच्या बदल्या तर अनेकांच्या उचलबांगड्या केल्या होत्या.साहजिकच अनेक असंतुष्ट लोक त्यांच्यावर डूख धरून होते. निव्वळ पंतप्रधान आणि पक्षश्रेष्ठींचा त्यांना पाठींबा होता म्हणून नाहीतर त्यांच्याच पक्षातले कित्येक लोक त्यांच्या जीवावर उठले होते. अशातच शार्प शूटर सलीम उर्फ पप्पू राव यांना मारण्याचं कॉनट्रॅक्ट देण्यात आलं. त्यांच्या हॉटेलमधून सकाळी ते मंत्रालयाकडे निघाले की रस्त्यात काहीतरी डायव्हर्जन तयार करायचं आणि योग्य ठिकाणी बसून त्यांना गोळी झाडायची असा पप्पूचा प्लान होता. त्यांना फक्त जखमी करण्यापुरतीच गोळी लागली पाहिजे अशा स्पष्ट सूचना पप्पूला होत्या.
इन्स्पेक्टर साबळे ड्युटीवर पोहोचले आणि त्यांचा मोबाइल वाजला--
"जय हिंद साबळे, मास्तर बोलतोय"
"जयहिंद मास्तर"
"धारावी गाव एरिया तुमच्याच बीटमध्ये येतो ना?"
"नाही मास्तर तो तर धारावी पोलिस स्टेशनच्या अंडर…"
"असो मग तुम्हाला हे काम तुमच्या पद्धतीने हाताळायला लागेल… धारावीतल्या शफी बिल्डींगच्या मागच्या बाजूला जी पाच-सहा बसकी घरं आहेत त्यातल्या एका घरात तुम्हाला सलीम सापडेल…राव त्यांच्या मिटींगला अकरा वाजता निघणारेत. सलीमसुद्धा त्याच मिटींगची तयारी करत असेल…त्याचं करायचं ते पहा…राव मिटींगला सुखरूप पोहोचले पाहिजेत"
"समजलं मास्तर"
"आणि हो, त्याला मुंबई पोलिस जरी ताब्यात घेणार असले तरी त्याला पाठवणाऱ्या लोकांची नावं आपल्याला कळली पाहिजेत…मग मुंबई पोलिसांना तो आज सकाळऐवजी उद्या सकाळी सापडला तरी काय हरकत आहे नाही का?"
"होय मास्तर"
राव त्यांची मीटिंग आटपून दिल्लीला पोहोचले. दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांनी एका शार्प शुटरला अटक केल्याची बातमी त्यांना त्यांच्या सेक्रेटरीकडून कळली.
**
स्मिता तावडे नुकतीच बी.कॉम झाली होती. घरची परिस्थिती बेताचीच. भाऊ अजून लहान होता. बाप कमवायचा त्यात कसबसं घर चालायचं. 'आता आपण नोकरी करायची आणि घर चालवायला हातभार लावायचा' असा निर्णय तिने केव्हाच घेतला होता. बेन्टेक्सचे दागिने करून विकणाऱ्या एका कंपनीत ती नोकरीसाठी मुलाखत द्यायला पोहोचली. कंपनीचा पसारा फार मोठा नव्हता पण दिमाखदार होता.
"मिस तावडे, तुम्ही बी.कॉम कुठून केलं?" नितेश शाह-- त्या कंपनीच्या मालकाचा मुलगा तिची मुलाखत घेत होता. तो तिच्यापेक्षा वयाने फार मोठा नव्हताच पण शेवटी त्याच्या बापाची एक मोठी कंपनी होती आणि बापाने कौतुकाने नवीन लोकांना मुलाखती घेऊन निवडायची संधी आपल्या पोराला दिली होती.
"सर, सिद्धार्थमधून…मला फर्स्ट आणि सेकंड यीअरला फर्स्ट क्लास होता सर" तिने स्वतःहून कौतुकाने सांगितलं.
"गुड…मग लास्ट यिअरला काय झालं?" त्याने तिची सर्टिफिकेटस बघत विचारलं.
"अ…,माझी आई खूप आजारी होती! घरात सगळं करायला लागत होतं. अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष झालं"
"अच्छा…मग तर तुम्हाला मी नोकरी का देऊ? तुमच्या घरी तुमचे आई-वडील आजारी असले की तुमचं इथे कामाकडे दुर्लक्ष होणार असंच ना?"
"नाही…असं नाही होणार! मी पूर्ण मन लावून काम करेन"
"हे पहा…या पोसिशनसाठी माझ्याकडे तीन अजून अर्ज आहेत…मग मी तुम्हांलाच का नोकरी देऊ?"
"अ…कारण…अ…सर---मला--मला सगळ्यात जास्त गरज आहे! आणि मी हे काम सगळ्यात चांगलं करू शकेन"
"ते तर सगळेच म्हणतात मिस तावडे…शिक्षण पूर्ण करून घरी रिकामटेक बसलं की घरचे ओरडतातच…त्यामुळे गरज ही प्रत्येकालाच असते"
"सर, पण मला खरंच खूप जास्त गरज आहे"
"ठीके…मी तुम्हाला सध्या टेम्पररी नोकरी देतो…कान्सिडर इट लाइक एन इंटर्नशिप…आपण हा आठवडा तुमचं काम पाहू मग पुढच्या आठवड्यात फायनल ठरवू…या आठवड्यात तुम्हाला मिनिमम सलरी आणि ट्रॅवल अलावंस मिळेल…चालेल?"
"चालेल सर…मी खूप व्यवस्थित काम करेन"
"ते बघूच आपण"
"मग मी आजच सुरुवात करू?"
"ओह या…व्हाय नॉट?"
स्मिता तावडे तिथे कामाला लागली. विकेंडला घरी निघताना कंपनीच्या गेटपाशी नितेशने गाडी थांबवली.
"स्मिता, तुला लिफ्ट हवीय?"
"नो सर…जाईन मी"
"अगं हरकत नाही…चेम्बुरला राहतेस ना तू? मी त्याच बाजूला जाणारे…मी सोडेन तुला"
एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसायला मिळतंय म्हंटल्यावर स्मितालासुद्धा मोह आवरला नाही. त्यात नितेशला नाही कसं म्हणायचं? त्याने अजून तिची नोकरी नक्की केलीच नव्हती. ती बसली.
दुसऱ्या दिवशी पहाटे ती घरी पोहोचली तेव्हा काळजीने घरच्यांचा जीव आधीच अर्धा झाला होता. त्यात तिला कोणत्या प्रसंगातून जावं लागलं हे कळल्यावर तिच्या आईने टाहोच फोडला. बापाला काय करायचं ते सुचत नव्हतं. रात्री नितेश घेऊन गेलेल्या बंगल्यातून स्मिता बाहेर पडली तेव्हा तिला आत्महत्या करायची इच्छा झाली होती पण निव्वळ आई वडलांचा विचार करून ती घरी परतली होती. पण आई-बापाचे चेहरे बघून आपण आत्महत्या केली असती तर बरं झालं असतं असं तिला वाटायला लागलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शेजारची सुशीला 'स्मिता घरी आली का?' म्हणून चौकशी करायला आली. स्मिता घरी आलेली असूनही घरातल्यांचे पडलेले चेहरे पाहून काय समजायचं ते समजली.
"सुशीला…पोलिसांकडे जायची पण भीती वाटते बघ…तुमची पोर स्वतःच्या मर्जीने त्याच्याबरोबर गेलीच कशी हे त्यांनी विचारलं तर काय सांगायचं गं?"
"खरय गं सुनंदा…पण आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे"
"काय करणार आपण? आणि बाई मला माहितीय तू बोलणार नाहीस कुठे पण तरी तुला पुन्हा पुन्हा विनंती करते की बाहेर या प्रकाराबद्दल बोलू नको"
"आपला वीस वर्षांचा शेजार आहे गं…स्मिता मलाही मुलीसारखीच आहे…मी कसं बोलेन कुठे?"
सुशीला सांत्वन करून निघून गेली. पुढे काय करायचं हा प्रश्न होताच पण तिच्या येण्याने दुःख कणभर का होईना पण हलकं झाल्यासारखं वाटलं. सुशीलाने हा प्रकार नवऱ्याच्या कानावर घातला. तो महानगरपालिकेत सफाई कामगार होता आणि हां, 'विवेक'चा कार्यकर्ता होता.

दुसऱ्या दिवशी रात्रीची गोष्ट! नितेश शहा त्याच्या चार-पाच मित्रांसकट त्याच्या आवडत्या क्लबमध्ये शिरला. मध्येच तो बाथरूमला म्हणून गेला आणि परत आलाच नाही! त्याचे अर्धवट झिंगलेले मित्र त्याला शोधत राहिले.

डॉक्टर चित्रेंना मास्तरांचा फोन आला.
"जय हिंद डॉक्टर"
"जय हिंद मास्तर"
"डॉक्टर एक काम करायचंय…थोडं विचित्र आहे पण करायला हवंय"
"काय काम आहे मास्तर?"
"डॉक्टर…विवेक संस्थेचं एक चिन्ह आहे हे माहितीय तुम्हांला?"
"अ…नाही मास्तर"
"गुलाबाचं फुल आणि त्याखाली काढलेली एक तलवार! द रोज एन्ड द स्वोर्ड. काही सिग्निफिकंस वाटतोय?"
"अ…तलवार म्हणजे फॉर प्रोटेक्शन असणार आणि गुलाब म्हणजे--"
"स्त्रीत्व…फेमिनिझम…आणि हो ती तलवार त्याच्याच रक्षणाला आहे"
"आज काम सांगण्यापूर्वी अचानक विवेकच्या चिन्हाबद्दल का बोलताय मास्तर?" चित्रेंनी स्पष्टपणे विचारलंच.
"कारण आज कामच तसं आहे…तलवार चालवायची आहे पण ती का याची तुम्हाला कल्पना असावी म्हणून"
"मी अजूनही समजलो नाही मास्तर"
"डॉक्टर चित्रे….काही वेळी विवेकचं एखादं काम करतानासुद्धा आपण करतोय ते चूक का बरोबर असा विचार क्षणभर का होईना मनात येतोच ना? त्यातलं एक काम आहे"
"काम सांगा मास्तर…मला पटलं नाही तर मी स्पष्टपणे सांगेन तसं"
"उत्तम--"
मास्तरांनी त्यांना डीटेल्स दिले.

दुसऱ्या दिवशी नितेश शहाला त्याच्याच कंपनीच्या गेटबाहेरच्या रस्त्यावर जाग आली. आपण नपुंसक झाल्याचं त्याला जाणवेपर्यंत बराच उशीर झाला होता. त्याच्या खिशात एक चिट्ठी होती जी त्याने वाचली नव्हती. त्यात लिहिलं होतं--
'यापुढे कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पहायची, तिच्याशी असभ्य वागायची तुला हिम्मत होणार नाही याची खात्री आहे-- विवेक विचारे'

**
त्या म्हाताऱ्याने सगळे डीटेल्स दिल्यावर जॉन डिसुझाचा 'विवेक विचारे' झाला. त्याची फार्मा कंपनीतली नोकरी नंतरही चालू राहिली. पण त्याच्याकडे मुख्य काम होतं 'विवेक'च्या मार्केटींगचं. लोकांना भेटायचं, कधी त्यांच्याकडून माहिती घ्यायची तर कधी त्यांना माहिती द्यायची. कधी कुठली कागदपत्रं इकडे तिकडे पोहोचवायची. एक दोनदा विवेकच्या लहानमोठ्या 'ऑपरेशन्स' मध्ये तो सहभागीसुद्धा झाला. विवेकच्या कामाने त्याला समाधान मिळत होतं आणि पैसासुद्धा. त्या म्हाताऱ्याने स्वतःचं नावसुद्धा अर्थात 'विवेक विचारे' असंच सांगितलं होतं. पण आपल्याला मास्तर म्हणून फोन करणारी व्यक्ती आणि भेटलेले ते म्हातारे काका एकच आहेत अशी त्याला दाट शंका होती. एकूणच त्याचं आता बरं चाललं होतं. त्याला आयुष्यात पुढे भेटणाऱ्या अनंत लोकांमध्ये एक अभिषेक कुरतडकर असणार होता. पण त्या क्षणाला त्याला आणि अभिषेकला या गोष्टीची अर्थातच अजिबात कल्पना नव्हती.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान चैर - कहानीमे ट्विस्ट छान चाललीये कथा आता खंड नको आणि इथे खालून दुसर्या Paragraph मध्ये चुकून नितेशच जितेन झालय. - पु.ले.शु Happy

नितेश चे जितेन झाले असावे.
कथा सुरस चालली आहे. पझलमधल्या एकेका तुकड्यासारखा भाग वाटतोय.

धन्यवाद मंडळी!!
@प्राजक्ता_शिरीनः अनघा आणि प्रिती म्हणाल्या तेच बरोबर- जितेन टायपो होता....दुरुस्त केलाय! Happy
@साती: तुम्ही फॅंटसी म्हणालात तो 'मोड' येणारच होता....मी आधीच्या भागांमध्ये त्याची हिंट ठेवली होतीच!! तुमची खुपच निराशा झाली नसेल ही अपेक्षा आहे! Happy Happy