कृतार्थ !

Submitted by मी मधुरा on 3 July, 2014 - 06:48

रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती.
शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ? सगळा आहे-नाही तो धीर एकवटून ती तुटकी चप्पल रेटत-रेटत अंतर कमी करत होती. तसा तिच्या येण्याजाण्याचा हा रोजचा रस्ता.... एरवी सुद्धा इथे वर्दळ नसतेच !

नाही, म्हणायला तिथे आजूबाजूला वस्ती होती. पण सगळ्या घरातले लाईट्स बंद होते. एखाद्या घरात मदत मागायला जावं तर फटकन कोणीतरी अपमान करायची भिती.... “तुमचं घड्याळ बिघडलेलं वगैरे नाही न? कारण काय आहे, कि आत्ता ११ वाजलेत. आणि तेही रात्रीचे...आणि जनरली रात्री सगळे झोपलेले असतात. म्हणजे निदान आम्ही तरी झोपतो.. ह? तर तुम्हाला जे काय काम असेल ते उद्या...सकाळी ९ नंतर.” आणि वर तोंडावर दार लाऊन घेतात. आजकाल कोणीही मदत करत नाही स्वार्थ असल्याशिवाय...

तेव्हड्यात एक टपरी दिसली.... जरा वाफाळलेला चहा घेऊ. मग जरा चालण्याची उर्मी येईल. तिथे ठेवलेल्या बाकड्यावर तिने अंग टेकलं तसं, समोरचा टपरीवाला ओरडला, ”ओ, बाईसाहेब, हॉटील बंद झालंय. बगा कि, सगळी आवराआवरी चालू हाय. दिसत न्हाई का? ”
काय आगाऊ माणूसेय ! या छोट्याश्या टपरीला हॉटेल म्हणतोय आणि वर आपल्यावरच ओरडतोय....पण काय करणार? इतक्या रात्री एखाद हॉटेल शोधत बसण्यापेक्षा हि टपरीच बरी होती आणि हॉटेल्स तरी कुठे १० नंतर सुरु असतात ? मग ‘अडला हरी....’
“हो, तसा उशीर झालाय खर. पण प्लीज एक चहा मिळेल का?” मोठ्ठ्या कष्टाने विनवणीचा सूर लावत रुचिता म्हणाली.
टपरीवाला “अहो, ते.....” अस काही मान नकारार्थी हलवत बोलणार तेव्हड्यात तिने २० रुपये त्याच्या हातात दिले.... म्हणाली, “प्लीज...एक कप चहा..”

रात्रीच्या त्या थंडगार हवेत तो घोटभर चहा किती उबदार आणि छान वाटतो ! पोटाला थोडा आधार मिळाल्या सारखा वाटला. ती तिथून बाहेर पडली.
‘ काय पण नशीब ! स्कुटी बंद पडली तेही आड रस्त्यावर. चिखलात पाय पडून चप्पलदेखील तुटली. रस्त्यावर कुणी लिफ्ट देणार वाहन नाही. त्यात शेजारी एक चांगलं हॉटेलही नसावं?’
‘त्यात आज तो भयानक प्रसंग ! नको...त्या गोष्टीची आठवणही नको...’ कपाळावर आलेला घाम तिने पुसला.

चालता-चालता तिने एकदा सभोवती नजर फिरवली. आणि एका ठिकाणी नजर अडकली........ झाडाखाली कोणीतरी होत..... ते आपल्याकडे बघतंय का?? अगदी निरखून !!!
तिच्यावर तिच्या नकळत कुणीतरी लक्ष ठेऊन होत, या विचारांनीच ती शहारली. कदाचित अंधारात आपल्याला भास होत असावा.... धीर करून ती थोडी पुढे गेली. रस्त्यावरच्या ‘डीम’ लाईट मध्ये झाडाखालच ‘कुणीतरी’ एकदम तिच्या समोर आलं..... दचकून जोरात किंचाळत ती चार पावलं मागे गेली.....

समोरच्या विनयने त्रासून स्वतःच्या कानावर गच्च हात ठेवला. चेहरा वेडावाकडा करत म्हणाला, “अग ए.....किती कर्कश्श ओरडतेस ग?”
तिचं काळीज अजून भितीन जोरजोरात धडधडत होत, “तू?? मूर्ख.... घाबरले न..” ती हळू हळू शांत झाली तस एकमेकांकडे बघून दोघंहि जोरजोरात हसायला लागली.
“तू मला घाबरलीस??? हा..हा..हा..!!! तू?? आणि मला घाबरलीस???” विनय खट्याळपणे म्हणाला..

विनय.....रुचिताचा मित्र. दिसायला देखणा, डोक्यानं तसा हुशार. घरची परिस्थिती बेताचीच. कॉलेजमध्ये असताना एकत्र तास बुडवून कॅन्टीनमध्ये जाऊन बसणाऱ्या मुलांच्या ग्रुपमधले हे दोघे. बाहेरच्या हिरवळीवर जाऊन जगभरच्या गप्पा मारत बसणे, हा तर त्यांच्या दिनक्रमाचा रोजचा भाग.
कॉलेजमध्ये एकदा या विनयने टीचरच्या पर्स मध्ये प्लास्टिकच झुरळ टाकलं होत. बिचाऱ्या लिपस्टिक काढायला म्हणून पर्समध्ये हात टाकायला गेल्या आणि जोरात किंचाळल्या.... काय झालं बघायला सगळे धावत आले.... आणि सगळ पाहून एकंदर सगळ समजल्यावर इतर टीचर्स सुद्धा खो-खो हसायला लागले.... अश्या अनेक टवाळक्या करून करून या ग्रुपने कॉलेजच्या स्टाफच ब्लड-प्रेशर चांगलच वाढवलं होत.

पण कॉलेज संपल्यावर जास्त कोणीच एकमेकांच्या संपर्कात राहू शकले नाहीत..... कॉलेजची मैत्री अशीच असते.... तेव्हड्या पुरती.... मर्यादित.

“इथे कुठे??” हसू ओसरल्यावर रुचितान विचारलं, ”आणि इतक्या रात्री असा?”

“खरतर हा प्रश्न मीच तुला विचारायला हवा नै??”
विनय कधीतरी सरळ उत्तर देतो का? मुद्द्याचा प्रश्न आला कि हा टाळतो. फार आतल्या कळीचा माणूस.... चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय आहे, हे कोणी बरोब्बर सांगू शकत नाही. मस्ती, खोड्या करून त्याने त्याची एक छबीच बनवलेली आहे. मजा सोडून बाकीच्या भावना याला माहित आहेत कि नाहीत, असा प्रश्नच पडावा बघणाऱ्याला.

प्रश्नाचं उत्तर म्हणून रुचितासुद्धा नुसतीच हसली. “काय मग कसं चालू आहे? नोकरी बरोबर एखादी मुलगी पटवलीस का नाही?”

जबरदस्तीन ओठ ताणून हसल्यासारख करत विनय बोलू लागला...

“नोकरी नाही मिळाली अग...” रुचिताच हास्य मावळल... विनयबद्दल सहानभूती तर तिला वाटलीच, पण थोडं आश्चर्यहि वाटलं. तसा विनय ‘ढ’ नव्हता.... वर्गात मस्ती करणाऱ्या मुलांच्या यादीत तो जसा तो होता, तसाच हुशार मुलांच्या यातीत सुद्धा ६-७ वा होता... “काय बोलतोस? खरंच?”

आता मात्र विनयच्याही चेहऱ्यावरच्या दुखा:च्या छटा लपू शकल्या नाहीत. त्याने मान होकारार्थी हलवली. “खूप प्रयत्न केले पण.... !! जाऊ दे.... !! मग मी बिझनेस सुरु केला.... म्हणजे जास्त मोठ्ठा नाहीये.... छोटाच आपला !! ” परत एकदा उसन हसू त्याने चेहऱ्यावर आणलं. “ आणि तू? तू काय करतेस सध्या? ”

“नोकरी.... ‘पर्ल इंटरनॅशनल’ मध्ये. छान आहे कंपनी....” काहीतरी अजून निरोपाच बोलायचं म्हणून ती विचार करत करत म्हणाली, “घरी मिता, आई आणि मी असतो.... माझा चिमणगावातच बंगला आहे.... ये न तू कधीतरी.... ” बोलायला जास्त काही नसल्यामुळे ती गप्प बसली.... खरतर तिला घरी निघायला हवं होत.

ते कदाचित त्यालाही जाणवलं असाव !!! पण तरीही तो बोलतच राहिला.... “तुझी नोकरी फारच उशिरा पर्यंत असते वाटत ! ”

“नाही.... का रे?”

“आत्ता घरी परत जातीयेस न....म्हणून !!”

“ओह.... नाही अरे... एरवी ९ वाजताच घरी पोचते... आज येत असताना...” ती बोलता-बोलता अडकली....तिने एकदम त्याच्या कडे नजर टाकली.
“काय ग? येत असताना काय?” खोडकरपणे विनयने विचारलं....”बॉयफ्रेंड भेटला कि काय?”

“ए.... गप रे...” जरा गंभीरपणेच ती म्हणाली, “अस काही नाहीये अजून तरी.... मला असाच.... म्हणजे उगाच.... उशीर झाला.” तिने विषय बदलला...”चल, मला घरी जायला हवं आता..... आणि तू हि निघ आता.. इतक्या रात्री अस उगाच फिरू नये.” तिने घड्याळाकडे नजर टाकली.... ११.१५ झाले होते....

घरी गेल्यावर आई आणि मिताला काय सांगायचे याचा विचार करत काही पावलं पुढ टाकताना तिला विनयने परत हाक मारली.... “काय ग? हे चपलांचे काय हाल केलेस?”

तिने चपलांकडे पाहिलं.... “अरे ते, मी चालत असताना चुकून चिखलात पाय पडला आणि बाहेर काढण्याच्या प्रयत्नात चुकून त्याचा बंद तुटला.... पण असू देत.... मी चालू शकते अस पण. ”

तिच्या जवळ येत विनय बोलू लागला.... “ऐक न, माझी बहिण आहे न, रेश्मा, ती आता हॉस्टेलमध्ये आहे M.K. कॉलेजच्या... १० वी पास झाली. चांगले मार्क पडले. आता नंतर आर्ट्स करणार म्हणतेय.... फार समजूतदार आहे ती..... कधी मैत्रिणींबरोबर त्यांच्यासारखी हौस-मौज करायला तिने पैसे मागितले नाहीत माझ्याकडे....तिच्या दादुड्याची परिस्थिती माहित होती न तिला ! ”

‘इतक्या रात्री आपल्याशी त्याच्या बहिणीबद्दल गप्पा काय मारत बसलाय हा ? विनयला मानसोपचारतज्ञाची नितांत गरज आहे, असं रुचिताला वाटून गेल. घरी जायला आधीच उशीर झालाय. त्यात हा डोकं खातोय !! नशीब !! नशीब आपलं !! आत्ता बहिणीबद्दल सांगत बसण महत्त्वाच आहे का? याला काही कळतच नाही. आत्ता माझं घरी पोचण, किती महत्त्वपूर्ण आहे !! बस कर रे बाबा तुझी बकबक....’

आतून भयंकर संतापून सुद्धा आत्ता रुचिता कमालीचा शांतपणा चेहऱ्यावर दाखवत होती. हाताची घडी घालून विनयला म्हणाली, “विनय, तिलाही तू बरोबर घेऊन ये न माझ्या घरी उद्या. मग प्रत्यक्षच भेटेन तिला. पण आत्ता मी घाईत आहे जरा. ह?”

ती चालायला सुरवात करणार त्या आधीच तो म्हणाला, “ जरा वेळ काढ कि या तुझ्या बेरोजगार मित्राकरिता....”

ती थांबली. वळली, त्रासिक मुद्रेने म्हणाली, ”बोल.....”

विनय क्षणभर शांत बसला.....

विनय गंभीर दिसत होता. विनय भावनिक होऊ शकतो, यावर रुचिताचा काही वेळ विश्वासच बसला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी होत, कि आपल्याला भास झाला? आता मात्र रुचिता त्याच बोलण नीट ऐकत होती. कारण तो मजेच्या मूड मध्ये नक्कीच नव्हता....

“रुचिता, जर आपल्या बाबांना काही झालं तर आई असते, नातेवाईक असतात, आपल्याला सांभाळायला.... पण ज्यांना यांपैकी कोणीच नसत, त्यांच जीवन खूप..... खूप वाईट असत.....अवघड असत. मी असं जीवन जगलो. पण माझ्या रेश्माच तस होऊ नये, अस वाटत ग मला.”

“विनय, काय झालं एकदम अस?” रुचिताला काळजी वाटली.... ती हळुवारपणे समजावण्याच्या स्वरात म्हणाली,
“अरे तू आहेस ना, तिच्यासाठी..... आणि मला माहितीये, कि तू तिला कधीच एकट पडू देणार नाहीस....”
दिलासा म्हणून ती त्याच्या हातावर हात ठेवणार, तेव्हड्यात तो मान खाली घालून वळून तसाच निघून गेला....

जाता-जाता एकदा त्याने तिच्याकडे वळून पाहिलं..... त्याच्या नजरेत विलक्षण असहायतेची भावना होती....
‘हे तो आपल्याला का सांगत असावा? यात आपण मदत करावी, अस काही वाटत असेल का त्याला???’
ती सुद्धा तशीच स्तब्ध उभी होती त्याच्याकडे बघत... त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी रुचिता तिच्या बंगल्याच्या हॉलमधल्या अलिशान सोफ्यावर चहा पीत होती....तेव्हड्यात मिता बाहेर आली, ”काय ग, ताई, आता बरे आहेत न पाय? काल पार दुखून आले होते न?”
“हो.... आता बरे आहेत जरा...”
“बर. तू काल कुठल्या सर्विस सेंटरमध्ये स्कुटी टाकून आली होतीस ? तू सांगितलस काल.... पण मी विसरले....”
रुचिताला कालच्या गोष्टींची आठवण झाली. तिने चहाचा कप बाजूला ठेवला...डोक्यात पुन्हा वादळ उठल....पुन्हा अस्वस्थतेने पछाडलं.

‘खरही सांगू शकत नाही..... आणि नीट थापाहि मारू शकत नाही.... कस सावरणार आहे सगळ ?’
ती स्वतःशीच विचार करत होती......‘का ? का रुचिता? का खोट बोललीस? It was an accident !! Just an accident !! त्यात तुझी चूक नव्हती... कोणाचीच नव्हती.... मग आपण का लपवतोय? आता एक खोट बोललीस...ते झाकायला अजून एक... मग परत ते झाकायला अजून एक.... किती खोट बोलणार आहोत आपण?’

तिने मनाशी निर्धार पक्का केला.

“मिता,......”

“ह?”

“मिता, स्कुटी सर्विस सेंटरमध्ये नाही, रस्त्याकडेच्या एका कोपऱ्यात लाऊन ठेवलेली आहे.”

“का?”

“काल जरा अपघात झाला....”

“काय? अपघात? तुला लागलं नाही न ताई?” काळजीन मितानी रुचिताचे हात-पाय, चेहरा निरखून बघितला...

“नाही ग....” थोडं चिडून रुचिता म्हणाली, ”तू नीट ऐकून घेणार आहेस का नाही?”
मिता शांत बसली.

“तर काल एक बाईक वाला रॉंगसाईडन आला.....त्या बाईकचा स्पीड सत्तरच्या वर असावा..... मी खूप वेळा हॉर्न वाजवला..... पण ती बाईक पुढे येतच राहिली आणि तेही त्याच वेगाने.... जशी जशी ती बाईक जवळ आली, तस मला कळल, कि बाईक थेट माझ्याच स्कुटीवर येऊन आदळण्याच्या मार्गावर होती...... मिता, मी खूप घाबरले आणि मी स्कुटी एकदम डावीकडे वळवली हा अपघात टाळण्यासाठी.....”

“हो?? अग मग छानच झालं कि.... टळला ना अपघात !!!” मिता सुस्कारा सोडत म्हणाली.

नकारार्थी मान हलवत रुचितानी डोक्याला हात लावला.....”नाही... अपघात टळला नाही....”
मिताच्या भुवया ताणल्या गेल्या....तिच्याकडे न बघताच रुचिता पुढ बोलत राहिली....”कारण डाव्याबाजूने एक जात व्यक्ती होती..... आणि माझी स्कुटी त्या व्यक्तीवर जाऊन आदळली....... ती व्यक्ती फेकली गेली पुलाच्या कठड्यांवर आणि कठड्यावरून तोल जाऊन ती व्यक्ती पुलावरुन खाली पडली..... मी खूप घाबरले.... त्या माणसाचा चेहरासुद्धा नाही पाहता आला मला.....बाकी अंधारात काही जास्त दिसतही नव्हतेच म्हणा.....मी स्कुटीवरून खाली न उतरता तशीच घरी यायला निघाले.... झालेल्या धडकेत स्कुटीच इंजिन देखील बिघडलं असाव..... स्कुटी मध्येच बंद पडली....एका आडोश्याला मी ती स्कुटी लावून ठेवली आणि मग घरी आले....”
मिता पुरती भांबावली होती.....
रुचिता म्हणाली, “काल मी हे सांगितलं असत, तर आईला आणि तुला टेन्शन आलं असत. म्हणून नाही सांगितलं.... ”
थोड्या वेळाने कसबस स्वतःला सावरून मिता दुसऱ्या खोलीत गेली, काहीच न बोलता.

तस खरतर यावर बोलण्यासारख काहीच नव्हत. तो माणूस कोण होता, कसा दिसत होता, हे हि माहित नव्हत. मग बाकी काही उरतच नाही. कालच्या त्या बाईकवाल्यामुळे नक्की कोणाचा जीव गेला, हे हि कळायला मार्ग नाही. पुलाखालच्या वेगाने वाहणाऱ्या श्वेता नदीतून ती व्यक्ती कुठवर वाहत गेली असेल, ती जिवंत असेल का, असे अनेक प्रश्न होते. पण विचारणार कोणाला? आणि कसे?

‘खरतर आपलं मरण आपण त्या व्यक्तीवर ढकललं..... तो बाईकवाला आपल्या स्कूटीवर धडकला असता तर आपण मेलो असतो.....ती तिसरी व्यक्ती नाही. म्हंजे आपण आपला जीव वाचवण्यासाठी आपण..... नाही.... नाही.... आपल्याला माहित असत कि तिथे कोणीतरी आहे तर? हे काही आपण मुद्दामून केलेलं नाही.’

मनातले विचार बदलावेत म्हणून समोर पडलेलं वृत्तपत्र चाळायला तिने सुरवात केली. तिसऱ्या पानावरच्या बातमीने तिचं लक्ष वेधून घेतलं.....

‘वलगड भागात श्वेता नदी किनारी एका तरुणाच प्रेत सापडलं....
पहाटे ६ वाजता नदीवर आलेल्या वलगडमधल्या काही लोकांना नदी किनारी तरुणाच एक बेवारस प्रेत सापडलं असून त्याचं वय २२ ते २५ वर्षे असल्याचं सूत्रांच म्हणण आहे.............’

‘श्वेतानदी.....त्यात सापडलेलं प्रेत.....त्याच नदीवरच्या पुलावर काल....’

शेजारी त्या मृत व्यक्तीचा फोटो दिला होता. धीर एकवटून तिने पेपर मधल्या त्या फोटोकडे पाहिलं..... आणि कोणीतरी जोरात कानाखाली मारल्यासारखं क्षणभर ती बधीर झाली....तिच्या डोळ्यांपुढे काजवे चमकायला लागले..... सुन्न होऊन ती त्या फोटोकडे पाहत होती...... डोळे चोळून-चोळून पुन्हा ती त्या फोटोकडे पाहत होती.....

‘सत्य आहे कि भास होतायत? डोळे नीट आहेत न आपले??? हे अस, कस असू शकत???’
पण तिच्या दुर्दैवाने.... ते सत्य होत..... हो.... तो फोटो विनायचाच होता......

‘विनय? तो विनय होता? मग काल रात्री अपघातानंतर आपण ज्याच्याशी बोललो, तो.... तो कोण होता??’
विचारांच्या गर्दीत कधी रुचिताची शुद्ध हरपली तिलाही कळल नाही.....
दुपारी कधीतरी तिला शुद्ध आली, तेव्हा तिच्या शेजारी आई बसली होती तिचा हात पकडून..... आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर तिला इंजेक्शन देण्याच्या तयारीत होते.... ती शुद्धीवर आलीये असं पाहताच म्हणले, “अरे, झालीस का जागी? हे इंजेक्शन घेतल्यावर तुझा थकवा निघून जाईल बघ.”

बोलता बोलता हातावरची योग्य शीर शोधून त्यावर निळ्या रंगाचा कापसाचा गार बोळा फिरवून त्यांनी सुई खुपसली देखील.... थोडी वेदनेची जाणीव झाली, तस रुचीताच्या तोंडून ‘आह.....’ बाहेर पडलं... आणि तिच्या आईन तिला गोंजारलं...... “सगळ नीट होईल ह बाळा.... बस... एव्हडच... एव्हडच !!!”

‘कित्ती आधार वाटतो या प्रेमाचा ! या जगात कुणाला तरी आपली इतकी पर्वा आहे, हि भावनाच खूप सुखदायक असते...... मग आपण कुठलही दुख: सोसू शकू अस वाटायला लागतं.... विनय म्हणाला होता तसं, कुणीतरी असायला हव या जगात आपलं. कुणीच नसलं तर जगण अवघड होऊन बसतं.

तो शेवटपर्यंत रेश्माकरता तळमळत होता !!! आधी रेश्माला सोबत तिचा भाऊ विनय होता.....त्याच्यासाठी रेश्मा होती. पण आता? आता ती एकटीच आहे. कदाचित तिला बातमी कळलीहि असेल..... तिचं पुढंच सगळ जीवन आता काळोखात जाईल? एकटेपणाच्या, भकास, उदास काळोखात??? नाही.... मी अस होऊ द्यायची नाही..... तू एकटी नाहीस, रेश्मा. कधीच नसशील.’

एका न पाहिलेल्या मुलीबद्दल तिच्या मनात आपुलकी निर्माण झाली होती.
निर्णय पक्का करून रुचिता उठली....

डॉक्टर आणि आई दोघही तिला थांबवू लागले.....
“अग कुठ चाललीस आत्ता? डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलाय.... आणि आत्ता तो जास्त महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी !!! आत्ता काही काम-बीम करायचं नाहीये.” आई जरा चिडूनच म्हणाली.
“आई, कधी कधी एखाद्या गोष्टीचं महत्त्व दुसऱ्याला आपण पटवून देऊ शकत नाही....” रुचिता ठामपणे म्हणाली खरी..... पण स्वमग्न होत स्वतःच्याच वाक्याच्या अर्थाचा विचार करत होती.... संदर्भ जुळवत होती.....

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

M.K. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रेक्टरच्या केबिनमध्ये रुचिता बसली होती. रेक्टर मिसेस शिरसाट समोर बसल्या होत्या.
मिसेस शिरसाट म्हणाल्या, “तसं, नातेवाईक घ्यायला येतात पोरांना.”
“हो.... मी हि तशी नातेवाईकच आहे तिची.” रुचिता ठामपणे म्हणाली.
“हो? अच्छा ! नई, काय झालं, कि आत्ता पर्यंत तिचा दादाच यायचा तिला भेटायला..... म्हणून आपलं विचारलं. आज नाही आले का ते ?”

रुचिता विचारात पडली.... ‘अस का विचारल असाव यांनी? त्यांनी पेपर वाचला नसावा... किव्हा लक्षात आलं नसावं. म्हणजे हि बातमी रेश्माला माहित नसावी.’ रेश्माला हि बातमी सांगण तिला अवघड वाटू लागलं....

थोडावेळ शांत राहून रुचिता म्हणाली, “दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आजच येताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून येतीये मी. ”

“ओह.....फार वाईट झालं.” मिसेस. शिरसाट चेहऱ्यावर दु:खी भाव आणत म्हणाल्या....
शिपायाला सांगून रेश्माला त्यांनी बोलवून घेतलं. रुचिता रेशमाची वाट पाहत हॉस्टेलच्या गेट जवळ थांबली.

थोड्याच वेळात एक गोड, सुंदर मुलगी सामानासकट खाली आली. तिचे डोळे तिच्या दादाला शोधात होते. दादा येईल, मग आपण दादाबरोबर घरी जाणार, या विचारांनी तिला आभाळ ठेंगण झालं होत. रुचिता काही क्षण तिच्याकडे नुसतीच पाहत थांबली. मग रेश्मा कडे पाहत म्हणाली, “रेश्मा?”

रेश्माने दचकून रुचीताकडे पहिले..... “ओ?”

“रेश्मा, चल. आपण घरी जाऊया...”

रेश्मा आश्चर्याने म्हणाली, “तुमच्या बरोबर? तुमच्या घरी? का?”

“हो.... मी तुझ्या ताई सारखीच नाही का?”

“पण दादा..... दादा का नाही आला?” तिच्या डोळ्यात संशय होता... काहीतरी घडलंय....चुकीच घडलंय...तिला माहित होत.... तिचा दादा दुसऱ्या कुठल्या कामासाठी इथ येण टाळणार नाही. कदाचित तिला अनिष्ट घटनेची चाहूल लागली असावी....

रुचिता थोडी वाकून तिच्या उंचीची झाली....“तो नाहीये अग....” क्षणभर थांबून शब्द बदलत म्हणाली, “म्हणजे तुझा दादा खूप लांब गेलाय अग राहायला. खूप लांब.... आणि म्हणून मी आलेय तुला न्यायला माझ्या घरी.”

रेश्माच्या डोळ्यातून पाणी आलं..... तिला रुचिताच्या बोलण्याचा अर्थ कळत होता..... म्हणाली, “म्हणजे आता नाहीये का तो या जगात?” रुचिताच्याही डोळ्यात पाणी आलं. रेश्माला मिठी मारून तिनेसुद्धा आसवांना जागा करून दिली.....

रेश्माचा काहीवेळ यावर विश्वास बसतं नव्हता.... खरतर तिला विश्वास ठेवायचा नव्हता. “अस कसं होऊ शकत? कस झालं हे? कसं काय???....” असंख्य प्रश्न होते तिच्यापुढे. पण रेश्माला काय उत्तर देणार होती रुचिता?
“रेश्मा, काही गोष्टी पडद्याआड राहणच चांगलं असत..... सगळ्यांसाठी !! नको विचारूस काही....”

कितीतरी वेळ रुचिताच्या मिठीत मनसोक्तपणे अश्रू ढाळत होती ती. रुचितानेहि तिला रडू दिल.... आपल्या एकुलत्या एक दादाला गमावून बसलं होत लेकरू..... रडून-रडून रेश्माचे डोळे सुजून आले होते. आता तिला दादा नव्हता.... पण अजून कोणीतरी होत तिच्यासाठी..... रक्ताचं नात नसतानाही.... तिला आधार द्यायला... तिला सांभाळायला....

रुचिताच्या स्पर्शातली मायेची उब, बोलण्यातला जिव्हाळा, आपुलकी.... आज रेश्माला रडायला एक हक्काचा खांदा मिळाला होता... तिच्या रुचिता ताईचा !
रेश्माला मोठ्ठ्या कष्टाने सावरलं रुचिताने.... रेश्मा शांत झाली.

रुचिताने मागवलेल्या टॅक्सीमध्ये रेश्माने समान भरलं आणि आत जाऊन बसली. ती आता याच टॅक्सीतून तिच्या नव्या घरात जाणार होती. खिडकीतल्या काचेतून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे सुन्नपणे बघत होती....

रुचिता हॉस्टेलच्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून बाहेर गेटजवळ आली. टॅक्सीमध्ये बसलेल्या रेश्मावर तिने मायेने नजर फिरवली. आता रुचिताच्या मनात अस्वस्थता नव्हती.... एक विलक्षण समाधान होत.... तिचा लक्ष डोक्यावर पसरलेल्या निराकार आभाळाकडे गेल.

मावळतीला गुलाबी-आरक्त झालेलं आभाळ. गार वारा वाहू लागला.... आभाळ ढगांनी हळू-हळू भरून गेलं....... पावसाचे टप्पोरे थेंब ढगांतून अलगद काही येऊ लागले. रुचिता तशीच त्या पावसात उभी होती..... अगदी स्तब्ध !

पावसात एक पुसट आकृती तयार झाली..... ती विनयची आकृती असावी..... रुचिता बघत राहिली. तिला स्पष्टपणे दिसल...... त्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित होत. डोळ्यात समाधान होत.... आणि होती कृतार्थपणाची भावना!

© मधुरा कुलकर्णी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कै च्या कै

भाय्काठेत्ला भ पण वाटला नाही

इथल्या विशाल भाऊ , प्रसन्न अ भाऊ, कवठी चाफा भाव ह्यांच्या कथा वाचा

छान आहे, पण ते शब्दखुणात 'भयकथा' नसतं टाकलं तरी चाललं असतं, (हेमाआवैम, हे माझं आगाउ वैयक्तिक मत)