प्रतिमा-प्रचीती

Submitted by शर्मिला फडके on 14 June, 2014 - 14:06

प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह

छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?
ज्यांना चांगले फोटो पहायला आवडतात, काढता येतातच असे नाही अशा सामान्य वाचकांपासून छायाचित्रणातील तंत्रनिपुण वाचकांपर्यंत प्रत्येकाच्या अपेक्षांचा संच निराळा असणार. वैयक्तिकरित्या मी पहिल्या गटाचं प्रतिनिधित्व करते. एखाद्या उत्तम छायाचित्रातल्या तांत्रिक बाजू स्वत:हून कळण्याची शक्यता शून्य. पण कोणी ती समजावून सांगीतली तर त्यामुळे फोटोचं सौंदर्य अधिक कळतं हे मला मान्य. फोटोला चिकटलेली एखादी कहाणी, तो काढताना छायाचित्रकाराने उपसलेले कष्ट वगैरेही समोर आले तर वाचायला आवडतात. छायाचित्र कसं, कुठे काढलं असावं याचं कुतूहलही मनात असतं. हे कुतूहल मर्यादितच. कारण अनेकदा छायाचित्रांबद्दल लिहिताना तांत्रिक बाबींना फ़ार महत्व देऊन, त्याचा बाऊ करुन लिहिलं जातं. छायाचित्रकाराने काय प्रकाशयोजना केली, ऍपर्चर्स काय, लेन्स कोणत्या, प्रिंटींगचं तंत्र इत्यादीबद्दल वाचताना कंटाळवाणं होतं.

आधुनिक आणि समकालिन चित्रकलेच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना छायाचित्रणकलेच्या शोधानंतर, १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून चित्रकलेवर झालेला परिणाम, पडलेला प्रभाव, चित्रकारांची बदलत गेलेली दृष्टी, त्यांनी आपल्या कामात केलेले बदल अभ्यासणं मनोरंजक ठरलं होतं. छायाचित्रणाचे समाज-संस्कृतीच्या अंगाने महत्व, राजकिय-सामाजिक स्थित्यंतरात छायाचित्रकाराने केलेल्या कामगिरीचे महत्व वादातीत आहे हे मान्य असलं तरीही आजवर एखादं पेंटींग बघताना ते चितारणा-या चित्रकाराबद्दल जाणून घेणं, त्याच्या निर्मितीच्या प्रेरणा, जाणीवा जाणून घेणं जसं अनिवार्य ठरलं होतं तसं छायाचित्रकलेबाबत झालं नव्हतं. अर्थात असं एकही उत्तम पुस्तक निदान मराठीमधे तरी नव्हतच. आजवर. लोकवांग्मयगृहाने काढलेल्या ’प्रतिमा-प्रचिती’ या पुस्तकामुळे ही उणीव दूर झाली.

नितीन दादरावालांनी ’आपले वाङ्मयवृत्त’ मासिकाकरता लिहिलेल्या लेखमालेतील लेख पुस्तकात संकलित आहेत. १९-२०व्या शतकातील अमेरिका-यूरोपमधील ज्या २५ छायाचित्रकारांची दखल घेतली आहे त्यांच्या काम करण्याच्या शैलींत भरपूर विविधता आहे. काही फक्त शहरावर किंवा फक्त निसर्गावर प्रेम करणारे, काही दोन्हींमधील नातेसंबंधाचा शोध घेणारे आहेत. माणसांना टिपणारे आहेत आणि माणसांना नाकारणारे आहेत. बरेच छायाचित्रकार राजकिय, सामाजिक घडामोडी, युद्धाचं, संघर्षाचं, स्थलांतरितांचं चित्रण करणारे आहेत. मानवता टिपणारे आहेत. काहींनी नग्न देहांचं सौंदर्य कलात्मकतेनं टिपलं, फ़ॅशनला ग्लॅमर दिलं, तर काही औद्योगिक जगात रमले. प्रत्येकाचा स्वत:चा खास विषय आहे, त्याकरता विकसित केलेली शैली आहे. तंत्राचा बाऊ न करणारे आहेत, तंत्रावर विसंबणारेही आहेत.

प्रस्तावनेत वसंत आबाजी डहाके यांनी लिहिल्याप्रमाणे हे २५ लेख वाचत असताना अमेरिकेच्या दृश्यकलेचा इतिहास नजरेसमोर उलगडतोच पण त्याच बरोबर त्या कालखंडातील समकालिनांचा परस्परांवरील प्रभाव, त्यांची एकमेकांच्या कामावरील टीका, प्रोत्साहन, समीक्षा, स्पर्धा, त्यांची सामाजिक बांधीलकी, बाह्य वातावरणाला त्यांनी आपल्या कलेद्वारे दिलेला प्रतिसाद याचेही यात एक नकळत दस्तावेजीकरण होत गेले आहे. यातील बहुतेकजण बदलती समाजव्यवस्था, शहरीकरण, स्थापत्य, औद्योगिकीकरण तसेच सांस्कृतिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत आपल्या कॅमे-याच्या सहाय्याने सहभागी आहेत.

शतकभराच्या कालखंडावर आपल्या प्रतिभेची एक कायम इमेज उमटवून गेलेले हे छायाचित्रकार आहेत. कॅमे-यातून काय पाहिलं यापेक्षा त्याक्षणी काय अनुभूती आली ते शोधण्याची धडपड त्यांनी जन्मभर केली.

नितीन दादरावालांनी आपल्या लेखांमधून या प्रत्येक छायाचित्रकाराचं काळाला सुसंगत असं वैशिष्ट्य, ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो ते दाखवण्यावर भर दिला आहे. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, वैयक्तिक आयुष्य, त्यातली वादळे, प्रकरणेही त्यांनी लिहिली आहेत. पण महत्वाची आहे त्यांची कला आणि तिचा त्यांनी केलेला विचार. काळाच्या ओघात तोच फ़क्त मागे उरतो आणि पुढच्या पिढीला पुढे जाण्याकरता मार्गदर्शन करतो. प्रतिमेतून येणारी ही प्रचिती.
--
अमेरिकेच्या दृश्यकलेच्या इतिहासातले महत्वाचं नाव आल्फ़्रेड स्टीग्लिट्स. ते का महत्वाचे आहे हे पहिल्याच लेखातून अचूक कळते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन जीवनात बदलाचे वारे वहात होते, नव्या आशा निर्माण होत होत्या, राजकारण, कला यांना नव्या दिशा मिळत होत्या, जगण्याचा दर्जा बदलत होता, नवे प्रयोग होत होते आणि या सगळ्याला साक्षीदार असणारा स्टिग्लिट्स. तो स्वत: गुणी छायाचित्रकार होता पण जास्त महत्वाची होती त्याची प्रकाशक, संग्राहक ही कामगिरी, त्यातून त्याने इतर कलावंताना दिलेली संधी. यूरोपात राहून आल्यावर स्टीग्लिट्सला न्यूयॉर्क शहर सांस्कृतिक दृष्ट्या बकाल आहे याची जाणीव झाली आणि त्यानंतर तो सातत्याने झटला यूरोपातल्या कलाचळवळींची, कलेची ओळख अमेरिकेला करुन देण्याकरता. त्याकरता त्याने अनेक कलाप्रदर्शनं भरवली. पिकासो, ब्रांकूशी, मातीस, शेजा, लोत्रेक यांची चित्र/शिल्प स्टिग्लिट्समुळे अमेरिकेत पोचली. त्याच्या प्रयत्नांमुळे कला प्रदर्शनात पहिल्यांदा चित्रकलेबरोबरच छायाचित्रणाला समान दर्जा दिला गेला. स्टिग्लिट्सची ही कामगिरी वाचताना लक्षात येतं एखाद्या शहराची, देशाची समृद्ध कलासंस्कृती निर्माण होण्यामागचं रहस्य. ती आपोआप, एका रात्रीत बनत नसते, त्यामागे अशा अनेक स्टिग्लिट्सचे परिश्रम उभे असतात.
Alfred Stieglitz2.jpg
एखादा कलाकार आपल्या मनातल्या विषयाचा किती ध्यास घेऊन पाठपुरावा करतो हेही स्टिग्लिट्सच्याच उदाहरणावरुन लक्षात येते. बारा वर्ष तो सातत्याने ढगांचे फोटो काढत होता. त्याची ढगांच्या सौंदर्यपूर्ण आकारांची अभ्यासचित्र, अमूर्त छायाचित्रणाचा हा ध्यास समजावून घेतल्यावर मग त्याने आपली प्रेयसी ओकिफ़ हिची जी आगळी न्यूड छायाचित्रे काढली त्यांचे अभिजात सौंदर्यमूल्य आपोआप जाणवते. या न्यूड्समुळे त्या काळच्या अमेरिकेन सामाजिक जीवनात खळबळ उडाली. त्यातूनच तीव्र व्यक्तिवादाचा उदय झाला. हे संदर्भही महत्वाचे आहेत. दादरावाला लिहितात- आपलं जिच्यावर प्रेम आहे तिची शेकडो न्यूड्स काढून त्यांची प्रदर्शन भरवणे, त्या प्रतिमांचा संच विकणे ही गोष्ट आज शंभर वर्षांनंतरही भारतात खळबळजनक, अस्वीकारार्ह आहे.

’द पॉन्ड मूनलाईट’ सारखा अप्रतिम काव्यात्म फोटोग्राफ़ काढणारा स्टायकन. त्यानेच फॅशन ही सुद्धा एक कला आहे हे आपल्या फोटोग्राफ़ीतून सिद्ध करुन दाखवलं. आपले फोटोग्राफ़्स वॉलपेपरमधे परिवर्तित केले. त्याने आपल्या कलेचा वापर श्रीमंत माणसांच्या भिंतीसाठी एक प्रॉडक्ट म्हणून केला त्याकरता त्याच्यावर जबरदस्त टीकाही झाली. व्यावसायिकता शिगेला पोहोचलेल्या आजच्या युगात त्याने यासंदर्भात ठामपणे घेतलेली भूमिका अनेक अर्थांनी महत्वाची ठरते. तो म्हणतो- “जगण्यासाठी प्रत्येकालाच कुठेतरी स्वत:ला गहाण टाकावं लागतं आणि ह्यात काहीही वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. कलेचा असा कुठलाही आविष्कार नाही जिथे पैशाची भाषा महत्वाची नसते.”

स्टायकन मुळातला चित्रकार. पण ती सोडून त्याने फोटोग्राफ़ी सुरु केली कारण त्याच्या माळ्याने त्याचं एक पेंटींग हुबेहूब कॉपी केलं. त्याचा जबरदस्त धक्का बसून त्याने आपली सर्व पेंटींग जाळून टाकली. पेंटींगची कॉपी शक्य आहे, छायाचित्राची नाही कारण ते काढताना वेळ, संधी, कॅमे-यामागचा हात, डोळा, बुद्धी यांचा समन्वय साधावा लागतो, ते पुन्हा करणं अशक्य आहे हे जाणवल्यानेच कदाचित तो फोटोग्राफ़ीकडे वळला.
चित्रकारांची पिढी बदलल्यावर त्यांच्या दृष्टीकोनांमधे पडत गेलेला फ़रक मान रे या बुद्धीमान आणि हटवादी छायाचित्रकाराबद्दल वाचताना जाणवतो. त्याने पेंटींगच्या प्रभावापासून फोटोग्राफ़ीला मुक्त केलं.

"मी निसर्गाची छायाचित्र काढत नाही तर माझी जी निसर्गविषयक दृष्टी आहे तिची छायाचित्रं काढतो.” - मान रेचं हे विधान छायाचित्रणकलेच्या पुढच्या वाटचालीच्या संदर्भात क्रांतिकारी ठरतं.

राजकीय, सामाजिक जाणीवांपासून दूर असणारे, केवळ निसर्ग, शहर, धुकं, ढग यात रमणारे अन्सल ऍडम्स, ब्रासेसारखे छायाचित्रकारही यात आहेत.
ansal adams 2.jpg
पर्यावरणवादी छायाचित्रकार अन्सल ऍडम्स छायाचित्रण कलेला माणूस आणि यंत्र यांचं द्वैत मानत असे. पृथ्वी आणि त्यावरील निसर्गाशी अध्यात्मिक नातं जुळलं असावं अशी प्रचिती देणारी त्याची छायाचित्र आहेत. त्यात मानवी अस्तित्त्व नाही. हेन्री कार्तिअर ब्रेसां त्याच्या छायाचित्रांवर टीका करताना म्हणाला- ही छायाचित्रे पाहून वाटतं की जगाचा शेवट झाला आहे आणि उरली आहेत ती फ़क्त काही झाडं, खडक आणि माती.
ansal adams 1.jpg
डोंगर, दर्‍या, चंद्र यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अन्सल ऍडम्सचा कॅमेरा हे एक माध्यम होतं असं म्हटलं जाई. अत्यंत मेहनती छायाचित्रकार. जवळ जवळ दिवसाला १८ तास तो काम करी. एका फ़्रेमकरता अगणित काळ द-याखो-यांमधून भटके. सहज वाटणा-या छायाचित्रामागचे अपरिमित कष्ट दादरावाला सविस्तर वर्णन करतात. भारतातले आघाडीचे छायाचित्रकार अश्विन मेहता यांच्यावर ऍडम्सचा खूप प्रभाव आहे. अशी पॅरलल्स दादरावाला क्वचित देतात. ती अजून हवी होती
--

२५ छायाचित्रकारांमधे चार स्त्री-छायाचित्रकार आहेत. त्यापैकी महत्वाची मार्गारेट बक-व्हाइट जिने छायाचित्रणाच्या जगातली पुरुषांची मक्तेदारी संपवली. मार्गारेटची आपल्या संदर्भातून अजून एक ओळख म्हणजे तिच्या कॅमे-यातूनच भारतात फ़ाळणीनंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या, कत्तलींच्या, दंगलीच्या कथा संवेदनशीलतेनं जगापर्यंत पोचल्या. फ़ाळणीच्या संपूर्ण काळात तिने केलेल्या कामगिरीला आज दस्तावेजाचे महत्व आहे. फ़ाळणीदरम्यानच्या हिंसाचारात पाच लाख लोक मारले गेले. १ कोटी ४० लाख लोक विस्थापित झाले आणि सत्तर हजार स्त्रियांवर बलात्कार झाले अशी अंदाजे आकडेवारी आहे. फ़ाळणीत दोन्ही बाजूंनी मारल्या गेलेल्या लोकांसाठी कुठलंही स्मारक उभारलं गेलं नाही. मार्गारेट बक-व्हाइटची ही छायाचित्रं म्हणजे त्यांचं स्मारकच आहे. तिने काढलेला फ़ाळणीचाच एक विलक्षण फोटो पुस्तकात आहे. ग्रंथालयातल्या ग्रंथांचीही फ़ाळणी होते आहे. ग्रंथपाल डोक्यावर हात धरुन बसला आहे आणि पकिस्तान आणि इंडिया अशा पाट्यांखाली टेबलावर पुस्तकांची वाटणी झालेली दिसते आहे.
महात्मा गांधींचा खून होण्याआधी काहीच तास त्यांची मुलाखत आणि फोटो घेणारी छायाचित्रकार मार्गारेट बकव्हाइट होती.
मार्गारेटची कामगिरी वाचताना मन थक्क होतं. खांद्यावर कॅमेरा घेऊन पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत आपल्याला करावी लागणार आहे याची जाणीव तिला होती. छायापत्रकारितेच्या स्वातंत्र्याला जपण्याकरता ती कौटुंबिक जबाबदारी पासूनही दूर राहिली.

मार्गारेट म्हणत असे-"लोकांना पारदर्शकपणे जे घडतय ते कळत राहिलं तर लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास उडणार नाही. आणि त्यांना हे सारं कळतं ठेवण्याची जबाबदारी ही छायाचित्रकार आणि पत्रकारांची आहे." पाशवी महत्वाकांक्षेची भयानकता, युद्धात उध्वस्त होणारी मानवी मूल्ये मार्गारेटने आपल्या छायाचित्रांमधून वारंवार दाखवली. मग तो बुखेनवाल्ड छळछावणीतला फोटो असो, नाहीतर भारतातील फ़ाळणीदरम्यानचा हिंसाचार.
मार्गारेट स्त्रीवादी होती, स्त्री स्वातंत्र्याचा निर्भिड पुरस्कार तिने कायम केला. तिच्या छायाचित्रांमधे ’स्त्री’ या विषयाला खास जागा होती. स्त्रीचे श्रम तिची परिस्थितीमुळे होणारी दारुण अवस्था, त्यातूनही चिवटपणे जागी रहाणारी जीवनेच्छा यांचा फ़ार सुंदर वेध तिने घेतला आहे.
Tina modotti 1.jpg
--

पोर्ट्रेट, युद्धछायाचित्रण, निसर्ग-पर्यावरणाचे चित्रण, औद्योगिक-सामाजिक छायाचित्रण अशा विषयांमधे त्या त्या काळात प्रसिद्ध झालेले, आपल्या विषयात पायाभूत भर घालून गेलेल्या या छायाचित्रकारांवरचे लेख असे एकत्रितपणे वाचत असताना गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून जाणवतात. छायाचित्रकारांची विशिष्ट विषयावरची हुकूमत, त्यांनी घडवलेली आपली शैली, एखाद्या संकल्पनेवरचे त्यांचे विचार, मते तुलनात्मकरित्या ताडून पहाणे शक्य होते. उदा. पोर्ट्रेट फोटोग्राफ़ीमधे अनेक शक्यता आणि त्यामागचा प्रत्येक फोटोग्राफ़रचा वेगळा विचार, स्वतंत्र शैली.
yousuf karsh 1.jpg
युसुफ़ कार्श पोर्ट्रेट फोटोग्राफ़ीतला मास्टर. लेखक, कलावंत, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्तींना जेव्हा अमर व्हावसं वाटतं तेव्हा ते कार्शकडून पोर्ट्रेट काढून घेतात असं म्हटलं जाई. तो पोर्ट्रेट काढताना चेह-यावर अशी प्रकाशयोजना करतो की दगडातून बाहेर आलेलं शिल्प जणू आपल्यासमोर उभं रहातं. कार्शचा एक सार्वकालिन महत्वाचा असा विचार दादरावाला नोंदवतात- “ प्रसिद्ध किंवा थोर व्यक्ती/राजकारणी बहुतेक वेळा खूप एकाकी असतात. कारण त्यांनी स्वत:साठी एक उच्च पातळीवरचा निकष निवडलेला असतो आणि तिथे खूप थोडे लोक पोहचू शकतात. हे एकाकीपण त्यांच्या सर्जनशीलतेसाठी आवश्यक असतं. बरेचदा त्यांच्यात पोकळ डौल, वृथाभिमान, ऐट असते. खरी गोष्ट अशी की या गोष्टींशिवाय ते या जागी पोहचूच शकत नाहीत, पण निव्वळ याच गोष्टी स्वत:जवळ आहेत म्हणून कोणी थोर होऊ शकत नाही.”

पिकासोचं अप्रतिम पोर्ट्रेट काढणारा आर्नल्ड न्यूमन. तो कधीच व्यक्तीला स्टुडिओत बसवून पोर्ट्रेट काढत नसे. त्या व्यक्तीच्या ’स्वत:च्या’ जगात डोकवायला त्याला आवडे. न्यूमनचा पिकासो विलक्षण आहे. दादरावाला लिहितात- हे पोर्ट्रेट पिकासोच्या चित्रकलेतील वैचारिक बाजू आणि खोली दाखवतं. चेह-यावर धरलेल्या हातातून, बोटांतून दिसते प्रचंड उर्जा, आणि ती उर्जा पेलण्याची प्रचंड ताकद चेह-यावर दिसते. नजर समोरच्या माणसाचा आरपार वेध घेणारी.

स्टायकन पोर्ट्रेटमधील मॉडेलच्या अवतीभवती प्रकाशाचे स्तंभ टाकत असे. मान रेच्या पोर्ट्रेटमधले चेहरे हे अभिनय करताहेत असं वाटतं.

पॉल स्ट्रॅंड हा छायाचित्रणाकडे जीवनाविषयी थेट भाष्य करणारी कला म्हणून बघणारा कलावंत. पोर्ट्रेटला तो त्या व्यक्तीचं चरित्र मानत असे. त्याच्या कॅमे-यासमोर बसणारे अतिशय विश्वासाने स्वत:बरोबरच स्वत:चं आत्मचरित्र त्याच्या हवाली करतात. फोटोमधे व्यक्ती ज्या वातावरणात रहाते तेच वातावरण मिसळलं जावं, म्हणजे सत्याच्या जवळपास जाणारं असं काहीतरी पकडता येतं हे त्याचं तत्वद्न्यान. जर व्यक्तीला आपला फोटो काढला जातोय हे माहीत नसलं तर चेह-यावर कुठलेही खोटे भाव येत नाहीत, कुठलाही बुरखा चेह-यावर चढवला जात नाही. त्यात कुठेही उसनं अवसान नसतं.

त्या उलट ब्रासेची पोर्ट्रेट्स अत्यंत नाट्यमय. तो पोर्टेटसाठी बसलेल्या व्यक्तीला जाणवून देतो की ती एका फ़ार मोठ्या कलात्मक प्रसंगाला सामोरी जात आहेत.

साम्यवादी विचारसरणीच्या रोचेन्कोच्या मते- "एखाद्याचं एकदाच पोर्ट्रेट काढण्यापेक्षा वेगवेगळ्या काळांत, परिस्थितीत त्याची अनेक पोर्ट्रेट्स काढली पाहिजेत, म्हणजे मग अशा अनेक छायाचित्रांतून त्या व्यक्तीची एक ’प्रतिमा’ तयार होईल." रोचेन्कोने आपल्या आईच्या काढलेल्या पोर्ट्रेटचं दादरावाला संवेदनशीलतेनं निरिक्षण नोंदवतात-“तो एरवी चित्रविषयांपासून एक सुरक्षित अंतर ठेवतो, पण या पोर्ट्रेटमधे तो तिच्या अगदी जवळ गेलेला दिसतो. शटर क्लिक करेपर्यंत तो इतका जवळ गेलाय की तो आता आपल्या आईच्या गालावर ओठ ठेवणार असं वाटतं.”

Alexander Rodchenko.jpg

डोरोथी लॅंग साध्यासुध्या माणसांची पोर्ट्रेट्स काढत असे. तिची पोर्ट्रेट्स म्हणजे तिचे रिपोर्ताज. लॅंग म्हणते- “साध्या चेह-यांवर खूप सशक्त भावना दाखवण्याचं किंवा दाबून टाकण्याचं बळ असतं. त्यांची दु:ख फोटोंद्वारे समजून घेणं मला महत्वाचं वाटतं.”
पोर्ट्रेट फोटोग्राफ़ीबद्दल दादरावाला लिहितात- पोर्ट्रेट हा हिशेब असतो गोठवून ठेवलेल्या एका क्षणाचा. त्यातून वर्तमानात माहिती दिली जाते. इतिहासात नोंद ठेवली जाते.
--

छायाचित्रे चकित करतात, आनंदी करतात, भारावून टाकतात, खिळवून ठेवतात. आणि काही छायाचित्रे असतात जी संवेदनशील मनाला हादरवून टाकतात. या छायाचित्रांमधून सामोरं येणारं सत्य विदारक असतं. संपूर्ण समाजमनावर दीर्घकालीन परिणाम घडवून आणण्याची ताकद असणारी ही छायाचित्र असतात.
जगभरात कुठे ना कुठे सतत युद्ध चालू असतात, नरसंहार होत असतो, वांशिक हत्या होत असतात, उपासमारी, विस्थापन, दुष्काळ, भूकबळी, आयुष्य उध्वस्त होण्याच्या घटना कालमानकावर रोज नोंदवल्या जात असतात. आपण जगत असतो त्या समाजापासून कुठेतरी दूरवर हे सारं घडत असतं त्यामुळे त्यांना नजरेआड करुन आपण सुखाने जगत असतो. आणि मग कोण्या अनामिक छायाचित्रकाराने टिपलेलं एखादं छायाचित्र दु:स्वप्नासारखं आपल्या नजरेच्या समोर येऊन आदळतं. अशी छायाचित्रं आपल्याला जहाल वास्तवाकडे डोळे उघडे ठेवून पहायला भाग पाडतात. मग काही वेळा नैतिकतेच्या चर्चा होतात. ज्यांना हे क्रूर वास्तव, ही भीषणता झेपू शकलेली नसते असे या छायाचित्रांच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करतात. हे टिपताना छायाचित्रकारांची संवेदनशिलता कुठे गेली होती असे सवाल विचारले जातात.

या अशा मानवी मनाला विछिन्न करण्याची ताकद असणा-या घटना प्रत्यक्ष घडत होत्या, नुकत्याच घडून गेल्या होत्या तेव्हा हे छायाचित्रकार प्रत्यक्ष तिथे असतात. हे क्षण टिपताना त्याच्या मनात नेमक्या काय भावना होत्या, नंतर त्याच्या मनाची काय अवस्था होती याचे एक अतर्क्य कुतूहल मनाला छळत रहाते. छायाचित्रकाराचं मन कलावंताचं असतं तर मग त्याच्या संवेदनशीलतेचं काय असा प्रश्न मनात येतो.

बाकी कोणत्याही कलेत असा नैतिकतेचा पेच कलाकारापुढे थेट उभा रहात नाही. पण छायाचित्रकाराला वेळोवेळी याचा सामना करायला लागतो. समोर जे दिसत आहे ते तसंच्या तसं टिपून लोकांसमोर मांडताना नैतिकता, वादग्रस्ततेचा सामना छायाचित्रकाराला करावाच लागतो. यु्द्धछायाचित्रकाराला तर वेळोवेळी.

जेव्हा बॉम्बस्फ़ोटात घरं उध्वस्त होत असतात, नात्याची, जवळची माणसं हकनाक डोळ्यांदेखत मृत्यूमुखी पडत असतात तेव्हाही फोटो काढले जातात, ते प्रसिद्ध होतात, त्यांना पारितोषिके मिळतात तेव्हा या सगळ्यामागे काय नेमकी नैतिक भूमिका असते त्या छायाचित्रकाराची? त्या इमेजेस टिपताना त्याच्या मनात नेमक्या काय भावना उमटत असतील? किंवा नंतर या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया असते त्याची?
DON MCCULLIN 3.jpg
आपण हे का करतो आहोत याचं उत्तर देणं छायाचित्रकारांना सोपं नसतं. प्रत्येक छायाचित्रकार, जो अशा प्रकारच्या हिंसेला सामोरा जातो, त्याचं सारं जीवन ढवळून जात असतं. अनेकजण अशा प्रश्नांचा भार सहन करु शकत नाहीत. अनेक युद्ध-छायाचित्रकार भयानक दृश्य, मृत्यू चित्रित करताना आपल्या डोळ्यातले अश्रू कॅमे-यामागे लपवतात. कधीतरी एखादा छायाचित्रकार आत्महत्या करतो, पूर्वायुष्यात टिपलेल्या युद्धछायाचित्रांच्या भयानक सावल्या काहींच्या आयुष्यात मरेपर्यंत साथ सोडत नाहीत.

’प्रतिमा-प्रचीती’ द्वारे अशी वादग्रस्त चित्रणे करणा-या छायाचित्रकारांची भूमिका जाणून घेता येऊ शकते. अनेक युद्धछायाचित्रकार, दारिद्र्य-दुष्काळ चित्रित करणारे छायाचित्रकार जे हिमतीने अशा प्रश्नांना सामोरे गेले आहेत, त्यांची उत्तरे जाणून घेताना एक विचार, तार्किकता सामोरी येते. नैतिकता, संवेदनशिलतेच्या पलिकडे जाऊन अशी छायाचित्रे असण्याची, जगासमोर आणण्याची अपरिहार्यता, गरज आणि महत्व जाणवून आपला जीव, नैसर्गिक मानवी संवेदनशीलता पणाला लावून अशी छायाचित्रं टिपणा-या त्या सर्व छायाचित्रकारांबद्दल कौतुक, आदर आणि कणवही मनात दाटते. दादरावालांनी या प्रश्नांपर्यंत पोचण्याची निकड दाखवली त्यामुळेच हे शक्य झाले.

दोन्ही जागतिक महायुद्धांमधे छायाचित्रण केलेला स्टायकन सांगतो, "अतिशय भयावह असा आकांत/कहर/अनर्थ विसरण्याचा प्रयत्न लोक सतत करत असतात, पण छायाचित्रकाराला त्या नोंदी कराव्याच लागतात आणि ह्या नोंदी ’इतिहास’ झाल्यावर त्यातून पुढच्या समाजाला काही धडे घेता येतात. एका काळाचा भाग झालेला समाज पुढच्या काळातील समाजाला काही स्पष्टीकरणं देऊ लागतो.”

युद्धछायाचित्रकार जॉर्ज रॉजर- १९४५ साली जर्मनीमधील बर्गन बेल्सन येथील छळछावणीत शिरकाव करुन छायाचित्रण करणारा हा पहिला युद्धचित्रकार. छळछावणीतील मृत्यूचं थैमान त्याच्या फोटोंमुळे जगभर माहित झालं. या बेल्सन कॅम्पमधे किमान चार हजार प्रेतं सडलेल्या अवस्थेत उघड्यावर होती. रॉजर म्हणतो, "हातात कॅमेरा घेऊन मी कितीतरी तास ते फोटो काढत होतो. जणू काही माझं मन मरुन गेलं होतं.”

प्रेतांचा सभोवार खच पडलेला असताना त्याच्या मनात कुठल्या ऍंगलने हे फोटो काढले असता ती रचना चांगली दिसेल असे विचार येत होते. आपण इतके बधीर कसे झालो याचा त्याला नंतर जबर मानसिक धक्का बसला. त्या विचारांचा अपराधगंड त्याच्या मनात जन्मभर राहिला. हे फोटो रॉजरने आपल्या उत्तरायुष्यात कधीही परत पाहिले नाहीत. त्या आठवणींनीही तो तीव्र नैराश्याच्या मन:स्थितीत जात असे.

या अनुभवानंतर युद्धाचा वीट येऊन रॉजर समाज आणि वन्यजीवन यांच्या छायाचित्रणाकडे वळला. सुदान, युगांडा, द. आफ़्रिका येथील वन्य जमाती, चालिरिती, संस्कृती या विषयांच्या नोंदी त्याने घेतल्या. युद्धाच्या भयानकतेला सामोर गेल्यामुळे तो अतिशय हळवा झाला होता, आदिवासींची जीवनपद्धती आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते हा त्याच्या जीवनभराच्या अभ्यासाचा विषय झाला. मानवी संस्कृतीचे नवे संदर्भ त्याने आदिम संस्कृतीच्या अभ्यासातून शोधले.

रॉबर्ट कापाच्या युद्धाच्या फोटोंमधून युद्धाची दहशत, भयानकता दिसते आणि कंटाळाही दिसतो. विलक्षण मानवी चेहरा त्याच्या या छायाचित्रांमधून्स समोर येतो. तो युद्धाचा द्वेष करत असे. त्यामुळे त्याने युद्धाचं कधीही उदात्तीकरण केलं नाही. तो म्हणत असे- लोकांच्या वेदना, दु:ख पाहून ते कॅमे-यात नोंदवताना जाणवते ती हतबलता आणि तरीही त्या नोंदी घेणं आवश्यक असतं, सोपं मात्र नसतं.
Robert capa1.jpg
डॉन मॅक्लिन लिहितो- इतिहास असं सांगतो की प्रत्येक युद्धाला एका साक्षीदाराची गरज असते.
ज्या प्रतिमा लोकांना युद्धाविषयी घृणा आणतील, त्यांच्या जगण्याच्या विचारात बदल घडवून आणतील त्या प्रतीकांच्या शोधात आपण रहायला हवं. एकदा एका पॅलेस्टाइन बाईने माझ्या मुस्कटात भडकावून दिली. नुकतंच तिचं घर उध्वस्त झालं होतं आणि नवरा मरुन पडला होता आणि मी आत फोटो घेण्यास धावलो. असे अनुभव खूप शिकवून जातात. युद्धसुद्धा एखाद्या व्यसनासारखं असतं. युद्धपरिस्थितीतील घटना तुम्हाला उत्तेजित करु शकतात.”

भारतातील कॉलर्‍याच्या साथीत बळी पडणा-या आधीच दारिद्र्यात पिचणा-या कुटुंबांचे फोटो काढतानाची मनस्थिती तो वर्णन करतो- फोटो घेत असताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. फोटो काढून झाल्यावर मी खिशातले होते तितके भारतीय पैसे त्यांच्या पुढ्यात टाकून बाहेर आलो, पण मला आत कुठेतरी स्वत:बद्दल अतिशय घृणा वाटली. असं वाटलं माझी सर्जनशीलता त्यांच्या शोषणावर आधारीत आहे. पण मी स्वत:ची समजूत काढतो की त्यांच्या परिस्थितीला मी जबाबदार नाही.”

मार्गारेट बक-व्हाईटने कोरियन युद्धाच्या वेळी काढलेला एक फोटो अंगावर शहारा उमटवून जातो. युद्ध मानवी मनाला कोणत्या उन्मनी अवस्थेत घेऊन जाते याचं हा फोटो उदाहरण आहे. एका युद्धकैद्याचं कापलेलं मुंडक हातात नाचवणारा एक हात आणि त्याकडे विजयी मुद्रीने, कुचेष्टेने बघत हसणारा दुसरा एक सैनिक.
donmccullin 1.jpg
व्हिएतनाम युद्धातल्या अनेक फोटोंनी समाजमनावर परिणाम केला. पण निक यूटच्या नापाम गर्लची प्रतिमा पुसली जाणं अशक्य आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर वापरलेल्या नापाम बॉम्बने अपरिमित विध्वंस उडवला, यूटने काढलेल्या संपूर्ण होरपळलेल्या उघड्या अंगाने रस्त्यावरुन धावणा-या नापाम गर्लच्या फोटोमुळे संपूर्ण जगात अमेरिकेची लाज गेली. या फोटोतून त्या मुलीची युद्धविरोधी किंकाळी सा-या जगाने ऐकली.

निकला पुलित्झर मिळालं. असंख्य बक्षिसं मिळाली. पण त्या नऊ वर्षाच्या होरपळलेल्या अंगाने नागड्या अवस्थेत रस्त्यावर धावणा-या किम फ़ुक या व्हिएतनामी मुलीचं काय झालं नंतर, निक युटने त्या मुलीला मदत केली होती का? तिच्या वेदना अशाप्रकारे जगासमोर मांडणे बरोबर होते का असे अनेक नैतिक, सामाजिक प्रश्न अनेकांच्या मनात आले, येत राहीले.

नापाम गर्लच्या याच फोटोमुळे अमेरिकन जनतेचं मत व्हिएतनाम युद्धाविरुद्ध गेलं. किम फ़ूकवर उपचार झाले, जगभरातून तिच्याकडे मदतीचा ओघ वळला. ती बरी होऊन कॅनडाला स्थायिक झाली, तिने लग्न केलं, तिच्या आयुष्यावर पुस्तकं लिहिली गेली, सिनेमा निघाला. निक यूटशी तिचे अजूनही मित्रत्वाचे संबंध आहेत.

आणि मग शेवटी येते सुदानमधील दुष्काळात मरणोन्मुख मुलीचा आणि तिच्या आसपास दबा धरुन बसलेल्या गिधाडाचा तो कातडीच्या आतवर शहारा पोचवणारा फोटो काढणा-या केविन कार्टरची दुर्दैवी गोष्ट.

छायाचित्रं जग बदलू शकतात यावर केविनचा विश्वास. आपल्या कामाविषयी प्रचंड आत्मीयता आणि निष्ठा असलेला केविन हिंसा आणि दु:ख भरलेल्या वातावरणात काम करत होता. आफ़्रिकेतील आपण काढत असलेल्या छायाचित्रांमुळे जगाचं लक्ष इथे वेधलं जाईल अशी त्याची अपेक्षा होती. आफ़्रिकन जमावाची गुन्हेगार माणसाला जाहीर शिक्षा देण्याची एक भयंकर पद्धत होती. रबर टायरच्या ट्यूबमधे पेट्रोल भरुन ती त्या माणसाच्या गळ्यात घातली जाई आणि मग तिला आग लावून देण्यात येई. हात बांधलेल्या माणसाच्या अंगावर ट्यूबमधलं पेट्रोल लगेच पसरायचं आणि काही क्षणात आगीचा प्रचंड भडका उडून माणूस भाजून मारला जात असे.

याचे फोटो काढताना त्याच्या मनात विचार येत, मी हे सारं पहाताना बधिर का होत नाही? पण तो फोटो काढत राहीला आणि वर्तमानपत्र ते छापत राहिली, फोटो गाजत होते.

मग त्याला सुदानमधील यादवी युद्ध आणि दुष्काळग्रस्त वातावरणात काम करण्याची संधी मिळाली. युनायटेड नेशनच्या सुदानमधे मदत कार्य करणा-या विमानातून केविन आयोद या गावी उतरला, तिथे विमान फ़क्त तीस मिनिटं थांबणार होतं. आसपास काही फ़ोटो काढण्यालायक दिसत आहे का हे पहाताना केविनला वीसेक मीटर अंतरावर एक खुरडत पुढे सरकणारी मुलगी दिसली. ती अन्नवाटप केंद्राकडे हळूहळू सरकत होती आणि एक गिधाड तिच्यापासून काही अंतरावर उतरलं. केविनने कॅमेरा सज्ज केला आणि खाली वाकून काही मिनिटं वाट पाहिली. मुलीमधील त्राण हळूहळू संपत होतं. गिधाड पंख पसरेल याची त्याने वाट पाहिली पण तसं घडलं नाही. गिधाड वाट पहात होतं की या खुरडणा-या भक्ष्याच्या कुडीतूण जीव निघून जावा. शेवटी केविनने क्लिक केलं. फोटो काढून झाल्यावर तो एका झाडाखाली बसून सिगरेट पीत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला स्वत:च्या मुलीची आठवण येत होती.

मार्च १९९३ च्या ’न्यूयॉर्क टाइम्स’ मधे फोटो प्रसिद्ध झाला. त्यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या. या फोटोतल्या मुलीचं पुढे काय झालं, केविन कार्टरने त्या मुलीला काही मदत केली का असे प्रश्न विचारले गेले. त्या मुलीचा फोटोकरता व्यावसायिक ’वापर’ केला गेला, हा छायाचित्रकारच गिधाड आहे असा आरोप झाला. काहींच्या मते केविन त्या मुलीला गिधाड उचलेल या ’फोटोग्राफ़िक’ क्षणाची वाट पहात आशेने थांबला.

पण खरं तर केविन सुदानमधे उतरला त्या वेळेस तासाला वीस जण उपासमारीने मरत होते. इतकी रोगराई पसरली होती की छायाचित्रकार किंवा कुणाही मदतकार्य करणा-यांनाही दुष्काळात पिचलेल्या त्या शरिरांना कुणीही स्पर्श करु नये अशा युनायटेड नेशन्सने सूचना दिलेल्या होत्या. केविनने स्वत: त्या मुलीला मदत करण्यापेक्षा जास्त मदत त्याच्या या फोटोमुळे जगभरातून सुदानला मिळाली. ती मुलगी नंतर जिवंत राहिली असती तरी कोणत्या अवस्थेत, ज्या भुकेकंगाल अवस्थेत ती दिसते त्यावरुन पुढेही ती खुरटलेल्या अवस्थेतच राहिली असती.

या फोटोचा भार केविनच्या छातीवरुन कधीच उतरु शकला नाही. टीकेला उत्तर देणं त्याला शक्य झालं नाही. लोकांच्या प्रश्नांनी त्याच्या संवेदनशील मनाला विद्ध केलं, फोटोमुळे त्याला यश, प्रसिद्धी मिळाली, पुलित्झर पारितोषिकही मिळालं पण दोनच महिन्यांनी, २७ जुलै १९९४ रोजी त्याने वयाच्या ३३व्या वर्षी भीषण आत्महत्या केली.

दादरावाला लिहितात, हा आपल्यापर्यंत जगातील प्रतिमा पोहचवणा-या दूताचा मृत्यू आहे. जगभरातील अन्याय, दुंख, वेदना यांचा दस्तावेज अशा अनेक दूतांनी धोक्याचं आयुष्य जगत आपल्यापर्यंत पोहचवलं आहे. त्या छायाचित्रांमधून ज्या भावना आपणापर्यंत पोचतात त्यातून त्या परिस्थितीतलं सत्य आपल्यापर्यंत पोचतं. त्या घटनेमागे इतरही अनेक सत्य असतात. शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीचं अर्थशास्त्र, राजकीय आकांक्षा आणि सैनिकी शासनाच्या मुजोर महत्वाकांक्षा. केविनच्या या फोटोमुळे संपूर्ण जगासाठी भूक, उपासमारी आणि दारिद्र्य याचं रुपक बदलून गेलं. पुढे नवा दक्षिण आफ़्रिका जन्माला आला. तो बघायला हा छायाचित्रकार नव्हता. पण घडलेल्या इतिहासात त्याचा एक वाटा निश्चित होता. जगभरात आजवर घडून गेलेल्या अशा अनेक उलथापालथींमधे छायाचित्रकारांचा महत्वाचा वाटा कायमच राहीलेला आहे.
--

छायाचित्रांच्या इतर कोणत्याही महागड्या कॉफ़ीटेबल पुस्तकातही नसणारी एक गोष्ट या पुस्तकात आहे, ती म्हणजे दादरावालांची छायाचित्रणकलेवरील संवेदनशील भाष्य. त्यांच्या लिखाणाची इतरही काही महत्वाची वैशिष्ट्य, जी या पुस्तकाच्या निमित्ताने सापडली त्यांची दखल घेणे आवश्यक आहे.

छायाचित्रांचं विशुद्ध सौंदर्यवादी दृष्टीने केलेलं रसग्रहण, निर्मितीमागच्या प्रेरणांचा, छायाचित्रकाराच्या जाणीवा-नेणिवांचा खोलवर शिरुन घेतलेला शोध, आसपासच्या परिस्थितीचा- ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणाचा छायचित्रकाराच्या कलेवर होत असलेला परिणाम आणि त्याबरोबरच या कलेतली अपरिहार्य तांत्रिकता या सगळ्याचं अत्यंत सहज, ओघवत्या, माहितीपूर्ण, आणि सोप्या भाषेतलं वर्णन हे या पुस्तकाचं बलस्थानं. पेंटींगसारखा जे दिसतं त्या पलिकडचं पहाण्याचा प्रयत्न छायाचित्रांच्या बाबतीत क्वचितच होतो, कारण अनेकदा छायाचित्राची कथा त्या क्षणापुरतीच सिमीत असते जेव्हा ते घेतलं जातं. अधिक काही जाणून घेणं म्हणजे छायाचित्र काढण्यामागचं तंत्र समजावून घेणे, जे सामान्य माणसाला कंटाळवाणे वाटू शकते. दादरावाला या तांत्रिक बाजू अजिबात क्लिष्टपणा न आणता समजावून देतात.

रॉचेन्कोच्या छायाचित्रणातलं ठसठशीत रेषेचं महत्व सांगताना ते छायाचित्रातले रेषांच्या जाळ्याचे आकार आपल्याला दाखवतात. आपल्याला मग वायर, पाय-या, जाळ्यांमधून येणारा प्रकाश अशा गोष्टींमधून रेषेची रचना तयार होत जाताना दिसते. असे तपशिल आपल्याला छायाचित्रांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेकडे अचूक नेऊन पोचवतात.

स्टायकनच्या बाबतीत जुन्या चित्रकारांच्या चित्रकृतींचा प्रभाव त्याच्या छायाचित्रणात कसा दिसून येतो हे सांगताना ते डच आणि इतालियन कलावंतांच्या चित्रातल्या किरास्क्यूरा तंत्राबद्दल, त्यातल्या प्रकाश आणि सावली किंवा अंधाराच्या नाट्यमय पखरणीविषयी सांगतात. स्टायकनची सुरुवातीची निसर्ग- छायाचित्रं ही मोनेच्या चित्रांसारखी आहेत, न्यूड्समधे रेन्वाच्या खूणा दिसतात. पोर्ट्रेट्समधून माने दिसतो हे सांगताना ते त्याने आपल्या छायाचित्रांमधे गमिंग वॉश तंत्राच्या मदतीने आणलेली तरलता, गुळगुळीतपणा, स्वप्निलता याविषयी सांगतात. इम्प्रेशनिस्ट चित्रकलेप्रमाणे स्वत:ची शैली तयार व्हावी म्हणून त्याने लेन्सला पेट्रोलियम जेली किंवा ग्लिसरिन लावून प्रयोग केले. म्हणूनच स्टायकनच्या न्यूड्समधे धूसरता, न दिसणारा चेहरा आणि मृदू होत जाणारी शरीराची वळणं आणि काळ्या-पांढ-या किना-यावर हिंदोळणा-या रेषा, मृदू-मऊशार पांढरा रंग आणि त्याच्या विरोधात ग्रेकडून काळ्या रंगाकडे प्रवास करणा-या सावल्या व त्यातून निर्माण होणा-या विविध छटा दिसतात.

छायाचित्रांवर लिहित असताना दादरावाला महत्वाच्या कला-चळवळी, संकल्पना ज्यांचा त्या टप्प्यावरील काही छायाचित्रकारांवर प्रभाव पडला त्याबद्दल सांगतात. मान रेच्या न्यूड्समधे दिसणारी अतिवास्तव रुपबंध कशातून आला हे स्पष्ट करताना ते मार्क्विस द साद या लेखकाच्या लेखनाचा मान रेवर असलेला प्रभाव आणि त्यातून सॅडिझम शब्दाच्या उत्पत्तीबद्दल सांगतात. त्याच्या छायाचित्रांमधून दिसणारी डाडाइझमची वैशिष्ट्ये सांगताना ते त्या चळवळीबद्दल लिहितात. डाडाइझमचा विशेष गुण हा होता की तुमचं एखाद्या वस्तूचं आकलन उलटपालटं करुन टाकणं. पारंपरिक चिन्हांमुळे तुमच्या मनात विशिष्ट भावना निर्माण होतात, त्याच भावना जागवून त्यांना धक्का देणं. मान रेनी लोखंडी इस्त्रीच्या पृष्ठभागावर खिळ्यांची एक रांग चिकटवली आणि त्याला भेटवस्तू नाव दिलं. उच्चभ्रू व्यक्तींच्या कपड्यांना इस्त्री करण्याची या वस्तूतली क्षमताच नष्ट करुन तिचं एका भयावह वस्तूमधे परिवर्तन केलं.
--

दादरावाला स्वत: उत्कृष्ट पेंटर, फोटोग्राफ़र आणि कवी-लेखक असल्याने छायाचित्रांच्या संदर्भातले त्यांचे लिहिणे आगळे पर्स्पेक्टीव घेऊन येते.
त्यांच्या वर्णनांमधे सातत्याने, कोणत्याही अभिनिवेशाशिवाय चित्रकलेचे, साहित्याचे, कवितांचे संदर्भ येत रहातात. रुचकर, गोड पदार्थ खात असताना दाताखाली अचानक आलेल्या केशराच्या काडीसारखे हे संदर्भ.
अर्विंग पेनने काढलेल्या न्यूड्स बद्दल बोलत असताना दादरावाला पु.शि.रेगेंच्या पुष्कळामधल्या ओळी उधृत करतात. एखाद्या कवितेप्रमाणे ते फोटोमधून आशयाच्या अनेक शक्यता शोधत जातात. किम आणि निकची ही छायाचित्रामागची कहाणी सांगतानाच या छायाचित्रावर लिहिलेल्या "किम- महामार्गावरील नग्निका” ही अरुण कोलटकरांनी लिहिलेली कविता ते पूर्ण लिहितात. असे संदर्भ पुस्तकाला फ़ार वेगळ्या उंचीवर पोचवतात.
--

पुस्तकाचे बाह्य रुप देखणे आहे यात वादच नाही. प्रथमदर्शनी पुस्तकाचा छोटेखानी आकार छायाचित्रणाच्या पुस्तकाकरता योग्य नाही असं वाटून जातं परंतु आतील उत्कृष्ट छपाईमुळे रसभंग होत नाही. मात्र काहीवेळा दादरावाला जे वर्णन करतात त्याचा प्रत्यय पुस्तकातील लहान आकाराच्या छायाचित्रामुळे निसटून जातो असं वाटतं. उदा. अन्सल ऍडम्सच्या ’मूनराइझ ओव्हर अर्नादेझ, न्यू मेक्सिको’ या छायाचित्राचं ते वर्णन करतात- “ हे छायाचित्र म्हणजे छायाचित्रणकलेच्या इतिहासातलं एक महाकाव्य होय. एका छोट्याशा गावातील लांबून दिसणारं चर्च आणि त्या शेजारच्या शेतामधून इतस्तत: विखुरलेले, मृतांच्या कबरीवरील क्रॉस हीच फक्त मानवी अस्तित्वाची खूण, क्षितिजरेषेवर दिसणारी बर्फ़ाने न्हालेल्या पर्वतांची रांग, त्यावर रेंगाळणारा सूर्यास्ताचा प्रकाश आणि त्यावर गडद होत चाललेल्या आकाशात नुकताच उगवलेला चंद्र. जणू हा क्षण पकडण्यासाठी देवाने ऍडम्सचं बोट धरुन शटर क्लिक केलं असावं.” ही दैवी अनुभूती पुस्तकात दिलेल्या चतकोर आकाराच्या छायाचित्रातून मिळत नाही. ना विखुरलेले क्रॉस दिसतात ना रेंगाळणारा सूर्यप्रकाश.
काहीवेळा ते वर्णन करीत असलेली छायाचित्रंच पुस्तकात समाविष्ट नसतात. अशावेळी तपशिल समजत नाहीत. मग आपल्याला गुगलला शरण जावे लागते.

मनोगतात त्यांनी पुस्तकाच्या वाचनानंतर छायाचित्रांकडे बघण्याची, त्यातील कलारुपे समजून घेण्याची क्षमता आणि दृश्यकलेसंबंधीची सजगता वाचकांमधे जागी होईल अशी जी आशा व्यक्त केली आहे ती मात्र (यामुळेही) नक्कीच आपोआप पुरी होते.
--

१८६४ साली जन्मलेला स्टिग्लिट्स आणि १९६० साली जन्मलेला केविन. मधल्या शतकभराच्या कालखंडा दरम्यान असंख्य उलथापालथी झाल्या. जगापुढचे प्रश्न बदलले, नैतिकतेच्या व्याख्या बदलल्या, कलांच्या नुसत्या तंत्रातच नाही, मनोवृत्तीतही आमुलाग्र बदल झाले. संवेदनशिलता तीच राहिली मात्र तिचा वापर करुन घेण्यामागचा विचार बदलत गेला. व्यावसायिकता शिगेला पोहोचली, छायाचित्रांमधे काय असू नये, काय असावे याबद्दलच्या व्याख्या, नियम बदलले, अनेक नव्याने लिहिले गेले (कॉपीराईटसारख्या प्रश्नांमधे होत गेलेल्या बदलांचा संदर्भ पुस्तकामधे कुठेही नाही.). टप्प्या टप्प्यातून छायाचित्रणकलेतला हा बदल आपल्यासमोर येतो.
एकविसाव्या शतकात छायाचित्रकारांवरचे वाढते तणाव, जबाबदा-या, स्पर्धांचे स्वरुपच अत्यंत वेगळे आहे. जीवघेण्या माध्यमस्पर्धेमुळे छायाचित्रकारावरील अवास्तव अपेक्षांचे ओझे त्यांनी स्वत: आणि आपणही वाढवत नेले आहे. शिवाय तांत्रिकतेचा विस्फ़ोट. कॅमेर्‍याला कोणी फ़सवू शकत नाही असं एकेकाळी म्हणत असत. छायाचित्रकारांनी आपल्याला सत्य दाखवावे अशी एक मुलभूत अपेक्षा असते. मात्र आताच्या फ़ोटोशॉप आणि डिजिटल यु्गात या म्हणण्यात फ़ारसे तथ्य उरले नाही., लोकांचा छायाचित्रकार आणि छायाचित्रांकडे बघण्याची दृष्टी बदलली. छायाचित्रांचा वाढता गैरवापर, तांत्रिकतेवर जास्तीतजास्त विसंबण्याची वृत्ती, व्यावसायीकतेचं भयावह रुप, एकंदरीतच गढुळलेले समाजमन या सगळ्यातून आता छायाचित्रणाची कला आपल्यातील विशुद्धता, संवेदनशिलता, सौंदर्य, सत्य दाखवण्याची क्षमता किती प्रमाणात अबाधित राखू शकते हे पहाणं महत्वाचं ठरेल. त्याकरता कदाचित दादरा्वालांना प्रतिमा आणि प्रचितीचा दुसरा भाग लिहिण्याची विनंती करणं भाग पडेल.
--
*मूळ लेख 'मुक्त-शब्द' मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख परिचय दिला आहेस, शर्मिला. मनापासून धन्यवाद. अगदी आसुसून वाचायलाच हवे असे वाटायला लावले आहे तुझ्या लेखाने Happy

वरदा +१
अतिशय सुरेख !

कॉफी टेबल बुक्स बाब्तीत माझे अगदी वाईट होते, ते तुझ्या लेखाने मतपरिवर्तन झाले. आभारी आहे.

वा !! सुरेख लिहिलं आहेस शर्मिला.. अगदी नक्की मिळवून वाचायला हवं असं पुस्तक वाटतं आहे.

रुचकर, गोड पदार्थ खात असताना दाताखाली अचानक आलेल्या केशराच्या काडीसारखे हे संदर्भ. >>> खूप आवडले हे वाक्य.

सुंदर परिचय करून दिला आहेत. संग्रही हवेच असे पुस्तक.

पुस्तकाच्या आशय-प्रत्ययाची यथार्थ प्रचीती देणारा लेख. नितीन दादरावाला यांचे काही परिचय-लेख 'आपले वाङ्मयवृत्त' मध्ये वाचले होते तेव्हाच त्यांची ताकद , त्यामागली तळमळ जाणवली होती ..

पुस्तकपरिचय अतिशय आवडला. दृश्यकलांबद्दल अलीकडच्या काही वर्षांत मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत ही नक्कीच मोलाची भर आहे.

थोडे अवांतर -

१. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फोटोग्राफीच्या क्षेत्रात लागलेले शोध (जॉर्ज इस्टमनने शोधलेली फोटोग्राफिक फिल्म, कोडॅक कंपनीची स्थापना) + पोर्ट्रेट्सना आश्रय देणार्‍या राजघराण्यांच्या अस्त + अभिजन वर्गाचे अनुकरण म्हणून स्वतःची छबी टिपण्याची नवीन मध्यमवर्गात आलेली फॅशन ही एकत्रित कारणं निदान काही अंशी तरी चित्रकलेला पोर्ट्रेट्सच्या साच्यातून बाहेर काढून आधी इम्प्रेशनिझमकडे आणि मग अमूर्ततेकडे वळवण्यास कारणीभूत ठरली, असं म्हटलं जातं.

नेमक्या याच काळात उमेदीत असलेल्या अल्फ्रेड स्टिगलिझ (फोटोग्राफर) आणि जॉर्जिया ओ'कीफ (चित्रकार) या कलाकार पती-पत्नींचं काम या दोन क्षेत्रांच्या 'ट्रान्झिशन पिरिएड'मध्ये परस्परांवर प्रभाव टाकणारं आणि पूरक कसं ठरलं - आणि त्या अनुषंगाने फोटोग्राफी आणि चित्रकला या दोन क्षेत्रांचा परस्परसंबंध तपासून पाहणारं एक प्रदर्शन काही वर्षांपूर्वी सँटा फे शहरात पाहण्यात आलं होतं. त्यावर निघालेल्या या पुस्तकाची हा लेख वाचून आठवण झाली.

२. केव्हिन कार्टरच्या दुर्दैवी अंताबद्दल वाचून अलीकडेच पाहिलेली एक डॉक्युमेंटरी आठवली. प्रसिद्धी आणि काळ यांच्या दृष्टीने पूर्ण विरुद्ध टोकाची. व्हिव्हियन मायरने १९५०-६०च्या दशकात शिकागो आणि न्यू यॉर्कमध्ये अगदी जवळून टिपलेली रोजच्या आयुष्यातली लाखाहून अधिक छायाचित्रं कधीच प्रसिद्ध केली नाहीत. तिच्या पश्चात हा खजिना कसा सापडला त्याबद्दलची ही डॉक्युमेंटरी - http://www.findingvivianmaier.com/

वा! मस्तच लिहिलं आहेस, शर्मिला! Happy
युद्ध, नरसंहार, दुष्काळ यांचे फोटो काढणार्‍या छायाचित्रकारांबद्दलचा भाग फार कळवळ्यानं वाचला मी...

नंदन, तुझे दोन्ही संदर्भ अप्रतिम आहेत. व्हिव्हियन मायरने कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे मनात. ती डॉक्युमेन्टरी बघायलाच हवी.

स्टिग्लिज आणि ओ'किफच्या या पुस्तकाबद्दलही ऐकलं आहे. विशलिस्टमधे टाकून ठेवलं.

धन्यवाद पुन्हा एकदा, सर्वांनाच. पुस्तक जरुर वाचा.

धावते वाचण केले पण तरिही खूपच आवडले. सुंदर लेखन!!

असे फोटो पाहण्याची मला खूप आवड आहे पण पुण्यातली काही प्रदर्शनं, इंग्रजी मासिके आणि नेट सोडता विशेष काही पाहिलेले नाही.

शर्मिला, फार सुंदर पुस्तक परिचय. पुस्तक वाचायलाच हवे.

अ‍ॅडमिन.
हे पुस्तक मायबोलीवर खरेदीसाठी उपलब्ध आहे का? नसल्यास उपलब्ध करुन देता येईल का?