खडे भटे (भरली वांगी, वेगळ्या पध्दतीचे)

Submitted by सायु on 21 May, 2014 - 03:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक पाव हिरवी छोटी वांगी (शक्यतोवर पांढरट आणि जाड देठाची निवडावी, कोवळी आणि बिना बियांची असतात..
जास्त चविष्ठ असतात)
धणे : १ वाटी
तिळ : २ चमचे (चहाचे)
लाल सुक्या मिरच्या : २
लसुण : १०-१२ पाकळ्या
चिंच : लिंबा एवढी
साखर : २ चमचे (चहाचे)
तेल : दिड पळी (पाउण वाटी जवळजवळ)
मीठ : अंदाजे..

क्रमवार पाककृती: 

वरिल सगळे जिन्नस दोन चमचे तेलात खमंग भाजुन मिक्सर मधुन गिरवुन घ्यावे.
आता एका खोलगट ताटलीत / थाळीत काढावे त्यात चिंचेचे कोळं + मीठ + २ चमचे साखर घालुन व्यवस्थीत
कालवावे. आता नेहमी जसे मसाल्याचे वांगी भरतो त्याच प्रमाणे भरावीत.. कढईत दिड पळी तेल घालावे (तेल जास्त लागते, कारण भाजी फक्त तेलातच शिजवायची आहे.) मोहरी घालावी, ती फुटली की अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट घालुन वांगी सोडावीत.. मीठ घालावे.. झाकण ठेवुन मंद आचेवर शिजत ठेवावे.. अधुन मधुन चहाळा दयावा. साधारण २० मिनीटं लागतात पुर्ण शिजायला.. आता बारिक कोथिंबीर चिरुन सर्व्ह करा.

गरम फुलके( हलके तुप लावलेले) साध वरण... आणि खडे भटे... आ हा हा! (मुलांना ही भाजी खुप आवडते)

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन माणसासाठी
अधिक टिपा: 

हया भाजीचा मसाला तयार करुन फ्रिज मधे बंद डब्यात ठेवाता येतो... मसाला तयार असेल तर ही भाजी खुप सोपी जाते..याच प्रमाणे मसाला भेंडी करता येते, मुलांच्या आवडीची आहे शिवाय प्रवासात न्यायला चांगली आहे...

माहितीचा स्रोत: 
सई ची टुयशन टिचर..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धणे : १ वाटी >> खुप जास्त नाही का होणार>>>>
नाही भाजीचा बेस धणेपुडच आहे... वांगी भरल्यावर जर मसाला उरत असेल तर् तोही फोडणीत
घालावा.. (कांदा, टमाटे, आलं हिरवी मिरची, खोबर, खसखस, शेंगदाणे ह्या भाजीला हयातल काहिच लागत नाही.. शिवाय धणे चवीला उग्र नसतात. चिंच, साखरे मुळे आंबट गोड चव छान येत.)

वेगळी कृती आहे. करून पाहेन.
'चहाळा' शब्द पहिल्यांदाच वाचला. 'च' चा उच्चार 'चहातल्या च' सारखा की ' चुणी मधल्या च' सारखा?

वर्षा, चिन्नु, मंजु ताई, जाई, जागु, अरुंधती, सई... धन्यवाद...

खास वर्हाडी शब्द आहे का ' चहाळा'? +++ होय..

उच्चार चुणी मधल्या च' सारखा आहे...

मस्त प्रकार!
फार कटकट नको असेल तर वांग्या-बटाट्याच्या फोडिंची भाजी हाच मसाला वापरून करता येईल. मी आज केला होता तसला प्रकार (अर्थात आपला नेहेमीचा भरल्या वांग्यांचा मसाला वापरून) ... चांगला होतो, फक्त मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या फार बारीक ला चव नाही येत.

भारी झालीये भाजी. येता जाता एकेक पीस करत संपली पण Happy ज्वारीच्या भाकरीशी मस्त लागली.
आता मसाला फ्रीज करून ठेवत जाईन.
धने अर्धेच घातले आणि लसूणही थोड्या पाकळ्या. वाटतांना कोवळा कडीपत्ता पण घालून वाटले. वरून भर्पूर कोथींबीर आणि मग घरभर दरवळ!
थँक यू Happy

धन्यवाद, मनिमोहर, योकु,धनुडी...

झंपी : चहाळा म्हणजे आलु चलाके... हा हा हा... म्हणजे सराटयाने भाजी अरत परत करणे(परतवणे).

चिन्नु : तु करुन पाहिलीस ना... छान वाटले बघ.. मसाला भाजतांनाच इतका दरवळतो... शेजारी येऊन विचारतात
आज काय स्पेशल?

अगदी! ही भाजी पार्टीला हिट्ट होणार Happy
मी साखरेऐवजी गुळाचा लहान खडा घातला चहाळतांना Happy मसाला छान मुरला वांगीत.

Happy Happy Happy

ओह, ही पाकृ आत्ता पाहीली. ही भाजी एकदम भारी लागते !! आम्हाला कुक च्या कृपेने महीन्यातून एकदा तरी मिळायचीच खायला, मूळ गुजराती प्रकार आहे असे तेव्हा कळले होते. भरपूर धनेपूड आणि वर भरपूरच कोथींबीर..आम्बट, गोड, तेलकट.. स्लर्प.. करुन खायला हवी एकदा. :).
हाच मसाला घालून बटाट्याची रस्सा भाजी पण अप्रतिम होते, खूप सारी धनेपूड व कोथींबीर मात्र मस्ट !

मूळ गुजराथी प्रकार आहे का ? मी केनयातल्या एका देवळात प्रसाद म्हणून खाल्ली होती ( लसूण नसणार बहुतेक )
मस्तच लागली. ही भाजी, पुर्‍या, कढी आणि खिचडी असा प्रसाद होता.

धन्यवाद... सामी.

दिनेश दा,गुजराथी, मारवाडी,परदेसीच असावा.. मी ज्यांच्याकडुन शिकले ते परदेसी आहेत.. (तिवारी)