आजोबा माझ्या नजरेतून

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 13 May, 2014 - 06:03

आजोबा म्हटल्यावर डोळ्यांसमोर येते ती एखादी पिकल्या केसांची, वाकलेल्या पाठीची, सुरकुतलेल्या हातांची आणि मवाळ चेहर्‍याची व्यक्ती! पण फिस्कारलेल्या मिश्या, भेदक तीक्ष्ण नजर, टवकारलेले कान, सावध दबकी चाल, मखमली वाटावे असे पिवळे - काळे कातडे असलेल्या प्राण्याचे - एका बिबट्याचे नाव 'आजोबा'??

सुजय डहाके दिग्दर्शित 'आजोबा' ह्या मराठी चित्रपटात एका वेगळ्या कथेचा कथानायक म्हणून वावरणारा हा बिबट्या आजोबा नक्की आहे तरी कोण? तो कोठून आला? कोठे चाललाय तो? कशासाठी एवढा प्रवास करतोय तो? स्वतःच्या जीवावर खेळून, मानवी वस्तीतल्या धोक्याला झेलून त्याला नक्की कोणते ध्येय गाठायचे आहे? काय साधायचे आहे?

आजोबा चित्रपटात ह्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतात तर काही प्रश्न अनुत्तरित राहतात. एकंदरच बिबट्याच्या हालचाली, त्याच्या सवयी इत्यादींविषयी आजवर भारतात संशोधकांना खूप काही हाती गवसलेले नाही. ह्याचे एक कारण म्हणजे बिबट्या हा जरी मानवी वस्तीजवळपासच्या जंगलात राहात असला तरी तो एकांतप्रिय प्राणी आहे. तो कळपात राहात नाही. त्याच्या हालचाली टिपणे हे सर्वसामान्यपणे जवळपास अवघड असते. तसेच दिवसेंदिवस रोडावणारी बिबट्यांची संख्या हे काम आणखी बिकट करते. कदाचित जंगलाच्या सीमेवर, राना-वनांत वाढलेले, वावरणारे लोक त्याच्याबद्दल अधिक सांगू शकतात. पण त्यातही वास्तव कोठे संपते व कयास, अंदाज, दंतकथा वा मिथ्यके कोठे सुरू होतात हे ठरविणे हे पुन्हा अवघड काम! परंतु तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बिबट्याच्या हालचाली, सवयी, त्याची जीवनशैली यांचा अभ्यास करणे हे आता संशोधकांना शक्य झाले आहे. अशाच एका तंत्रकुशल प्रणालीद्वारा बिबट्याच्या प्रवासाचा माग घेत त्याच्या जीवनाचाही अभ्यास करणारी एक वन्यजीव अभ्यासक असणारी संशोधिका डॉ. पूर्वा. 

वनखात्याच्या सहकार्याने, डॉ. पूर्वाच्या मार्गदर्शनाखाली विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या शेपटीपाशी मायक्रोचिप बसवून त्याला माळशेज घाटात सोडून दिले जाते. मायक्रोचिप द्वारे बिबट्याच्या हालचाली, त्याचे ठावठिकाण टिपले जाणार असतात. एकीकडे डॉ. पूर्वाने 'आजोबा' असे नामकरण केलेल्या ह्या बिबटे महाशयांचा प्रवास सुरु होतो आणि दुसरीकडे त्याचा माग घेत, त्याने दिलेले सिग्नल्स टिपत, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणार्‍या पूर्वाचा व तिच्या टीमचा, या कामात गुंतलेल्या सर्वांचाही एक प्रवास सुरु झालेला असतो. 

ह्या सर्व प्रवासाचा उत्कंठाजन्य वृत्तांत दृक् श्राव्य माध्यमात, मनोरंजक पद्धतीने सादर करण्याचा, त्यातून मानवी अंधश्रद्धा, बिबट्याबद्दलचे गैरसमज, मीडियाचे तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचे प्रकार, माणसांची आपल्या पर्यावरणाबद्दल आणि वन्यजीवांबद्दल कमी पडत असलेली जाणीव अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्याचा प्रयत्न 'आजोबा' चित्रपटात होतो. उर्मिलाने वठवलेली पूर्वा किंवा हृषिकेश जोशीचा ज्ञानोबा, वनखात्यातील अधिकारी शिंदे, जाधव सर... सर्व पात्रे आपल्या नेहमीच्या बघण्यातली, आजूबाजूला वावरणार्‍यातली वाटतात. त्यांच्या तोंडचे संवाद, त्यांचा अभिनय, सगळेच. दिलीप प्रभावळकरांनी साकारलेली छोटीशीच भूमिकाही मस्त. 

एक-दोन गोष्टी खटकल्या. चित्रपटात सिगरेट पेटवण्याची, धूम्रपानाची बरीच दृश्ये होती व त्याचबरोबर 'स्मोकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ' ची वारंवार झळकणारी कॅप्शन. पर्यावरणाशी संबंधित चित्रपटात हे प्रमाण नक्कीच कमी करता आले असते किंवा इतर काही पर्याय वापरता आले असते असे वाटले! उर्मिलाने वन्यजीवसंशोधिकेच्या भूमिकेला न्याय द्यायचा चांगला प्रयत्न केलाय. पण महिनोन् महिने रानावनांतून, काट्याकुट्यांतून, उन्हातान्हातून पायपीट करणार्‍या व्यक्ती सामान्यतः रापलेल्या किंवा tanned दिसतात तशी उर्मिला दिसत नाही. शेवटचे उर्मिलाचे हुंदके देऊन रडणे फार फिल्मी वाटले.

माझ्या जवळपास बसलेल्या छोट्या मुलांनी चित्रपट नक्कीच एन्जॉय केला. एकदा जरूर पाहावा असा सिनेमा आहे.

————————————————————————————————————————————————

प्रीमियर बद्दल:

वेगवेगळ्या कलाकारांची उपस्थिती, आमंत्रित व प्रेक्षकांची उसळलेली गर्दी, 2 - 2 आजोबांबरोबर फोटो काढून घेण्यासाठी लहान - मोठ्यांची उडालेली लगबग, ढोल - ताशा पथकाची सलामी, मायबोलीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती अशा अनेक गोष्टींमुळे हा प्रीमीयर लक्षात राहील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय.
अशा विषयांवर अमेरिकेतच नव्हे तर थायलंडमधेही चांगले चित्रपट तयार झाले आहेत.
धुम्रपानाच्या सूचनेची तर बहुतेक चित्रपटात खिल्लीच उडवली जाते असे मला वाटायला लागले आहे. एखादे पात्र सिगारेट ओढताना दाखवून नेमके काय साधायचे असते ते मला आजतागायत कळलेले नाही.

छान लिहिलं आहेस अरुंधती.
या सिनेमाबद्दल लिहावं असं खूपच दिवस मनात होतं पण नक्की शब्द सापडत नव्हते.
मला अ‍ॅनिमेशन वगैरे तांत्रिक बाबींमधलं काहीही कळत नाही. त्यातून मराठी चित्रपटात हे असले प्रयोग मला वैयक्तिकरित्या अनपेक्षितच होते. त्यामुळे या प्रयोगाचंच एवढं कौतूक वाटलं की ते अ‍ॅनिमेशन नैसर्गिक वाटतंय की कृत्रिम, तांत्रिक दृष्ट्या काही चुकलंय का... याकडे फार लक्षच द्यावंसं वाटलं नाही. मराठीत असे धाडसी प्रयोग होताहेत हेच कौतूकास्पद आहे. हळूहळू पर्फेक्शन जमेलच... पण सुरुवात तर चांगलीच झाली.

पण त्याही पलिकडे जाउन सिनेमासंदर्भात काही गोष्टी खटकल्या तर काही कळल्याच नाहीत.
१. म्हणजे बिबट्याचे नाव 'आजोबा' असे ठेवण्यामागे काही विशेष हेतू होता का? त्यातून काही सूचित करायचे होते का?
२. 'माणसांच्या गर्दीत माणसांसारखा वागणारा हा एकटाच... म्हणून 'आजोबा'' हे सिनेमात उर्मिलाच्या तोंडीअसलेलं वाक्य. या वाक्याचा अर्थ खूप विचार करूनही समजला नाही. कुणी समजावू शकेल का?
३. स्वत:वर आरोप आल्यावर पूर्वा ज्या पोटतिडकीने त्या वनखात्यातल्या सरकारी अधिकार्‍यांशी भांडते ती तिची तडफ मला भावली. पण मग तिच्या लाडक्या बिबट्यावर यशपाल शर्मा 'गोली मार देनी चाहिये' वगैरे शब्दांत हल्ला करतो तेंव्हाची तिची तडफ अगदीच अळणी आणि अपूरी वाटते. प्रत्यक्षात उत्तम संदेश देण्यासाठी सिनेमात ही आदर्श जागा होती. तिचा उपयोग का करून घेतला नाही? यशपाल शर्माच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे देण्यात पूर्वा कमी पडते. आणि पर्यायाने सिनेमाही.

बाकी अरुंधती म्हणते त्याप्रमाणे सिनेमाभर दाखवलेलं अति धुम्रपान टाळता आलं असतं तर अधिक छान वाटलं असतं. त्या सीन्स मधून फारसं काही साध्य झालं असं वाटत नाही. पण पूर्वा गावातल्या बार मध्ये जाऊन एकतीच व्हिस्की पिऊन येते तो सीन आवडला मला. तिचा त्या दिवशी वाढदिवस असतो आणि त्याचवेळेस तिच्या आईचा तिला विश करणारा व्हॉईस मॅसेज येतो. या सीन मधून तिचं 'माणूस' असणं आणि तिच्या भावनिक गरजा वगैरे गोष्टी व्यवस्थित अधोरेखित झाल्या. त्यामानाने तिचा शेवटचा रडण्याचा सीन फारच कृत्रिम वाटला.

एकुणात मला हा सिनेमा आवडला. काही गोष्टी दुर्लक्षित करून एक अभिनव प्रयोग म्हणून या सिनेमाकडे पाहिलं तर मराठी प्रेक्षकाला अभिमान वाटावा असा हा सिनेमा नक्कीच आहे.

धुम्रपानाच्या सूचनेची तर बहुतेक चित्रपटात खिल्लीच उडवली जाते असे मला वाटायला लागले आहे. एखादे पात्र सिगारेट ओढताना दाखवून नेमके काय साधायचे असते ते मला आजतागायत कळलेले नाही.>>+ १०००

त्या सीन्स मधून फारसं काही साध्य झालं असं वाटत नाही.>>+१०००

उलट टेन्शन आले, एकटेपणा आला, कंटाळा आला की धुम्रपान करावे असा संदेश जातो अशा सीन्स मधून - असे मला वाटते.