अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

Submitted by पुरंदरे शशांक on 5 May, 2014 - 01:42

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)

सूर्य जेव्हा आकाशात अक्षरशः जळत असतो तेव्हा कुठे आमच्या अंगात जगण्याइतकी धुगधुगी निर्माण होते तसे संत जेव्हा मोक्षस्पर्शी वैराग्य बाळगून असतात तेव्हा कुठे आमच्यात संसारतारक वैराग्य निर्माण होऊ शकते - असे आचार्य विनोबांचे एक वचन आहे.

तुकोबांसारखे संत हे आपणा सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे या एकाच हेतूने बोलतात. आपले पांडित्य जगाला दिसावे, आपल्याला खूप मान - सन्मान मिळावा याकरता काही ते लिहित नाहीत.

जे जीवन संत जगून दाखवतात ते कोणालाही तसेच्या तसे जगणे केवळ अशक्यच आहे - संतांची समाजाकडून तशी अज्जिबात अपेक्षाही नसते. पण त्यांचे जीवन आपल्याला काहीबाही मार्गदर्शक ठरते का ?- हे पहाणे जास्त उचित होईल.

तुकोबांसारखे संत हे एकमेकाद्वितीयम् ..... त्यांच्या सारखे तेच असे जरी असले तरी आपण सामान्य जीवन जगत असताना त्यांनी दाखवलेल्या सद्भावाच्या प्रकाशात चालू शकतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. संत-वाङ्मय हे काही स्पिरिच्युअल एंटरटेनमेण्ट नाहीये - की चला, जरा वेळ जात नाहीये तर हे ही वाचून बघूयात ....

जेव्हा कोणी एखादा त्यांचे ग्रंथ वाचून त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच संतांना सगळ्यात जास्त आनंद होतो. त्यांच्या ग्रंथाची पूजा करणारे, वाहवा करणारे बहुसंख्य असतात पण त्या ग्रंथाची पारायणे करणारे त्यामानाने कमी असतात आणि त्यात सांगितलेले आचरणात आणणारे तर फारच कमी, अगदी विरळाच असतात..... आपणही अंतर्मुख होऊन ठरवावे - आपण कुठल्या गटात बसतो ते ....

अगदी संतांच्याच भाषेत सांगायचे तर -
"आपण आयुष्यभर डोक्यात चांगल्या विचारांचा (संतसाहित्याचा) भार वाहिला काय आणि किंवा इतर कुठल्याही विचारांचा भार वाहिला काय - दोन्ही प्रकार लक्षात घेता भारवाही बैलाचेच जीवन जगल्यासारखेच आहे ते .... कारण परमार्थ हा नुसता विचारात ठेवायचा नसून आचरणात आणण्यासाठीच संतांकडून सांगितला जातो ..." (श्री गोंदवलेकर महाराज)

संसार सुखे करावा | परंतु काही परमार्थ वाढवावा | परमार्थ अवघाच बुडवावा | हे विहित नव्हे || - श्रीसमर्थ.

संतसाहित्याचे वाचन-मनन करुन ते नित्याच्या आचरणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा तो साधक - तोच संतांना सर्वात जास्त प्रिय होतो. - आपणही असे होण्याचा मनापासून प्रयत्न करणे हीच तुकोबांप्रति आदर, प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट नाही का ??

(आपल्या ठिकाणी काही-बाही भगवत्प्रेम वाढीला लागावे म्हणून तुकोबांच्याच चरणी मनःपूर्वक प्रार्थना...)

------------------------------------------------------------------------------------------------------------------

१०१] वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान
- जगामध्ये जगमित्र | जिव्हेपाशी आहे सूत्र - श्रीसमर्थ
-परांतरास लागेल ढका | ऐसा शब्द बोलू नका - श्रीसमर्थ
-सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यं अप्रियं ....

१०२] ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी
- बुवांच्या काळातही हे "ढेकूण" प्रकरण होते तर .... Happy

१०३] ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा
- बुवांचे हे वचन अतिशय सुप्रसिद्ध आहे - बसल्याजागीच भगवंताला आपल्या जवळ आणा

१०४] कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं
- अनेक दैवते, अनेक उपासना यामुळे साधकाचे बहुधा नुकसानच होते. " दहा ठिकाणी वीस वीस फूट खणण्यापेक्षा एकाच जागी दोनशे फूट खणले तर निश्चितच पाणी लागेल" - श्रीरामकृष्ण परमहंस.

१०५] देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती
- प्रत्यक्ष बुवांनाही सज्जन संगतीचे किती महत्व वाटते आहे पहा (इथे सज्जन म्हणजे जंटलमन नाही Happy , सत् मध्ये ज्याचा वास आहे तो सज्जन)

१०६] उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा
-उंबरात कीटक असतात हे बुवांनाही माहित होते तर !!

१०७] उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा
-किती मोलाची गोष्ट सांगितलीये !! परमार्थ ही काय बाजारात सांगण्या-ऐकण्याची गोष्ट आहे काय ??

१०८] दह्यांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये
- सामान्य जन काय आणि आणि संत काय - याइथे जनलोकातच असायचे - पण दोघांचे मोल मात्र किती वेगवेगळे ..

१०९] मोलें घातलें रडाया । नाहीं आसुं आणि माया
-बुवांच्या वेळेसही ही अवस्था होती तर (कोणी मेला तर पैसे देऊन रडायला माणसे बोलवायची...)

११०] तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं
-जो स्वतः निवलेला असतो (पूर्णत्व पावलेला) त्याच्या ठिकाणी शांति-क्षमा-दया असणारच ...

१११] जेणें वाढे अपकीर्ति । सर्वार्थी तें वर्जावें
- समाजहितार्थ सर्वच गोष्टी संतांना महत्वाच्या वाटतात ...

११२] संगतीनें होतो पंगतीचा लाभ
- किती प्रॅक्टिकल सांगितलंय .... पण "संगतीचं महत्व" लक्षात घ्यायलाच हवं ...

११३] आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य
-सगळ्याच संतांचा हा अनुभव असतो - कारण ते देहातीत असतात ...

११४] नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा
- या वचनात ठामपणा आहे, नम्रताही आहे आणि सत्यत्वही ...

११५] भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान
- जिवंत माणसाला भुकेला असताना अन्न देणे हा धर्म आहे - तो मेल्यावर पिंडदान करुन काही उपयोग नसतो..

११६] एक एका साह्य करूं । अवघें धरूं सुपंथ |
-सध्याच्या सहकार चळवळीने बुवांचे हे वचन उचलले खरे पण ते पेलताना मात्र त्यांची पार त्रेधातिरपिट उडलेली दिसते आहे ... Wink

११७] शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल
- बुवा सगळंच्या सगळं (त्यांचे अभंगही) विठ्ठलाचरणीच अर्पण करताना दिसतात ...

११८] त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें
-किती महत्वाचे !! लोक त्याग करतात पण "अहं"पण न सोडता ...

११९] तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं (जंबूक्=कोल्हा, पंचानन= सिंह)
- बुवांच्या पुढे तत्कालिन पंडित, विद्वान, सो-कॉल्ड साधू टिकणे शक्यच नव्हते ....

१२०] लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले
- बुवाबाजीवर कसा मर्मी वार केलाय ... अंतरात क्रोध, द्वेष तसेच आणि जटा वाढवून, संन्यासाची वस्त्रे घालून काय होणारे ??

१२१] ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये
- साधा आणि सरळ उपदेश - आधी मन आवरायला शिका...

१२२] भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी
- संतत्वाची नेमकी खूण - भूतदया

१२३] देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा
- आस्तिक आणि नास्तिकाची बुवांनी केलेली सुरेख डेफिनेशन ...

१२४] तुका म्हणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें
- किती गोड लिहितात बुवा - कायमच विठ्ठलाला आपल्या सोबतच घेऊन फिरणारे बुवाच असे लिहू जाणे ..

१२५] कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥
भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥

- भावबळे आकळे एर्‍हवी नाकळे - माऊली
- शुद्ध भावाला परमार्थात अनन्यसाधारण महत्व आहे.

१२६] प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें
- भक्ताचा देहभाव सहजच गळून गेलेला असतो कारण त्याने देह-मन-बुद्धी सारे ईश्वराला अर्पण केलेले असते, त्यामुळे तो प्रेमस्वरुपच होतो ...

१२७] गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी
- बुवाबाजी स्पष्ट केलीये

१२८] ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी
- पुन्हा एकदा बुवाबाजीवर प्रहार ...

१२९] जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी
- प्रपंचच परमार्थरुप कसा करायचा हे बुवा थोडक्यात पण नेमकेपणाने सांगताहेत ..
- उत्तम व्यवहारानेच धन जोडायचे आणि ते धन खर्च करताना मात्र ममत्व सोडायचे ...

१३०] आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी
- सिंहस्थात अनेकजण स्वतःचे डोके सफाचट करतात, भटजींकडून काही धार्मिक कृत्ये करवून घेतात - त्याला उद्देशून बुवा म्हणतात - असे वरवरच्या गोष्टी करुन काही परमार्थ साधत नसतो - मुख्य देवाविषयी अंतरात निखळ भक्तिभाव हवा.

१३१] जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें
- आपण पूर्णत्व पावलो असे कोणाला वाटत असेल तर त्याने जी पूर्णपुरुषाची लक्षणे गाथेत ठायी ठायी सांगितली आहेत ती स्वतःला लावून पहाणे - म्हणजे आपोआपच कळेल. बुवा तर अशा मंडळींबद्दल केवळ आश्चर्यच व्यक्त करताना दिसतात.

१३२] हे चि थोर भक्ति आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसें चि रहावें । चित्ती असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥

-समाधानाएवढे थोर नाही - श्रीसमर्थ. चित्तात अखंड समाधान रहाणे हे संतांचे मुख्य लक्षण. - संसारातील प्रेम काढून ते आत्म्यात दृढ झाले की हे अखंड समाधान लाभते.
- ठेविले अनंते तैसें चि रहावे - ही ओळ आपणा सर्वांचीच मुखोद्गत आहे - पण समाधान मात्र फार फार दूर आहे ... असे का याचे उत्तर पहिल्या चरणात सांगितले आहे ....

१३३] मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥१॥
वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥

- नम्रतेच्या उंचीला माप नाही - विनोबा.
- नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता -तुकोबा.

१३४] ब्रम्हानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां
-बुवा स्वतः ब्रह्मरुप झाले म्हणून ते सर्वत्र मान्यता पावले ...

१३५] जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा
-त्रिकालातीत व्यवहारी सत्य .. असतील शिते तर जमतील भुते ...

१३६] तुका म्हणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें
- किती वेळा बुवांनी आपल्याला मन मोकळे, प्रसन्न, स्वच्छ करायचा उपदेश केलाय !!
- पुण्य म्हणजे काय याची सरळ साधी व्याख्या..

१३७] आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची - २९४० ||
- बुवांना याची कायमच जाणीव आहे, ती जाणीव आपल्याला करुन देण्यासाठी का ते अधून मधून असे सांगत असावेत !!

१३८] ऐसा घेई कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास
-मी माझे ऐसी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण | पार्था तो संन्यासी जाण | निरंतर ||ज्ञानेश्वरी||

१३९] जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती -२९५०
- धर्माचे वर्म जाणणे महत्वाचे आहे - ते वर्म म्हणजे भगवत्प्रेम ....

१४०] जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी
- देणे-घेणे यातच लोकांना मतलब असतो - अंतकाळी काही हे लोक उपयोगाचे नाहीत -"तो"च तेव्हा हात देईल

१४१] जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां
- फारच गोड लिहिलंय बुवांनी - मी तुला जाणले आहे खरे .... पण माझ्याठिकाणी ("मी" जाणले आहे परमेश्वराला ) हा देखील एक अहंकार न व्हावा रे - त्याकरता तू मला परत नेणता कर बरं - ती तुझी प्रेमखूणच समजेन मी.... (तुझा एक नम्र भक्तच होऊन र्‍हाउदे मला - ज्ञानोत्तर भक्तिचे सर्वोत्तम उदाहरण ....)

१४२] ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण
- आपल्यापाशी एकच मन आहे - ते एकतर विषयात ठेवता येईल किंवा भगवत्चरणी, सहाजिकच ज्याला विषयांचेच ध्यान असेल त्याला नारायण कसा मिळेल ???

१४३] वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना
- उगाचच मोठ- मोठ्याने देवाला हाका मारुन काय उपयोग ? आत खरी तळमळ, खरा भाव पाहिजे ना !!

१४४] प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो
- प्रपंच हा अशाश्वत आहे - तो चित्तात ठेवण्याची गोष्टच नाही - चित्तात एक विठ्ठलच रहावो ...

१४५] कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥
तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य

- भगवंताचे प्रेम ज्याला लागलेले असते तो कुठल्याही जातीचा असो, तो धन्यच होय ....

१४६] गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका
- सर्व मंडळींना (सज्जन काय नि भोंदू काय) बुवा पुरेपूर ओळखून होते ...

१४७] नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम
- शुद्धभावाला परमार्थात अनन्यसाधारण महत्व आहे

१४८] कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता
- विचित्र रुढींच्या (हुंडा) विरोधात बुवा कायमच बोलताना दिसतात

१४९] व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥

- अनेकजण परमार्थ बोलू शकतात पण त्यामुळे काही ते परमार्थी होत नाहीत. परमार्थात शुद्ध म्हणजेच पवित्र अंतःकरणाची नितांत आवश्यकता असते.

१५०] जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें
- हे असे खडतर व्रत बुवा स्वतः पाळत होते आणि मग सांगत होते .. (आधी केले मग सांगितले..) - त्यामुळेच त्यांची वचने आपल्या अंत:करणाला अजूनही स्पर्श करतात ....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48332 गाथा - परम अर्थ एक वाक्यता - भाग १
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/48421 गाथा -परम अर्थ एक वाक्यता - भाग २
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ग्रेट ग्रेट तुकाराम महाराज, कित्ती सुंदर, अर्थपुर्ण. शशांकजी धन्यवाद तुमच्या मांडणीसाठी.

संतवांग्मय (इथे नीट लिहिता येत नाहीये हा शब्द) हे काही स्पिरिचुअल एन्टरटेनमेंट नाही, छान वाक्य शशांकजी, बरोबर आहे.

खूप छान वाटलं वाचून. पण माझं म्हणजे कसं तेवढ्यापुरत पटतं, आवडतं पण लगेच विसरायला होत. आचरणात आणायला एक शतांश सुद्धा जमतं नाही

इथले सारेच विलक्षण .शब्द,प्रतिभा,भाव,भक्ती,अनुभूती ...अनंत दंडवत

मनीमोहोर, अन्जू, संतवचन आचरणात आणणं म्हणजे साधना करणं. हव असल्यास तुम्ही सनातन संस्थेशी संपर्क करू शकता. साधना कशी करायची ते त्यांना ठाऊक आहे.
आ.न.,
-गा.पै.

पु श,

तुम्ही केवढा मोठा ठेवा आमच्यापुढे उलगडून ठेवला आहेत! शतशः धन्यवाद !

प्रत्येक एकोळीच्या खाली टीप घातल्यामुळे दुधात साखरच !