कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न

Submitted by बोबो निलेश on 21 April, 2014 - 12:20

-------------
कथालेखनाविषयी काही कथाबाह्य (म्हटले तर यक्ष-) प्रश्न
खरं तर हे कुठल्याही लेखनाला लागू पडतील.
-------------
१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)
२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे?
३. तुमची कथा तुम्ही एखाद्या मासिकाला पाठवली. त्यानी ती रिजेक्ट केली नाही, पुढच्या एखाद्या अंकासाठी विचार करू असे म्हणून त्यांच्या फायलीला लावली. पण नंतर जवळजवळ वर्षभर प्रसिद्धच केली नाही. तुम्ही काय करावे?
४. तुम्ही ब्लॉग किंवा एखाद्या संस्थळावर आधीच प्रकाशित केलेली कथा एखाद्या मासिकाला छापण्यासाठी पाठवणे कितपत योग्य आहे?
५. तुम्ही कथा एखाद्या मासिकाला पाठवली. ती बराच काळ झाला तरी प्रकाशित झाली नाही आणि त्या मासिकाचा दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नाही किंवा असलेला क्रमांक लागत नाही.
६. लेखन लोकांना आवडते म्हणून आणि त्यांना आवडते त्या प्रकारातले करावे की केवळ स्वान्तसुखाय(स्वतःच्या समाधानासाठी) करावे, भले मग त्या प्रकाराला फारसा वाचक वर्ग उपलब्ध नसेल.
७. कोणत्या मासिकांमध्ये छापून आले, म्हणजे आपण बऱ्या पैकी लेखक आहोत असे समजावे?
८. आपण लेखक/लेखिका आहोत की स्ट्रगलर हे कसे ओळखावे?
हे जर लेखकांना/लेखिकांना ओळखता आले तर बऱ्याच गिनिपिग वाचकांचे जगणे सुसह्य होईल Wink

जाता जाता शेवटचा प्रश्न - हा लेख गंभीर आहे की विनोदी हे कसे ओळखावे? तसेच तो कोणत्या ग्रुपमध्ये टाकावा हे कसे ओळखावे.
कारण आजकाल दत्तक घेण्याविषयीचे लेखसुद्धा विरंगुळा या ग्रुपमध्ये टाकले जातात म्हणून आपली एक प्रामाणिक शंका…

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. कथालेखनासाठी स्फूर्ती देवतेची वाट पहात बसावी की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" हे प्रमाण मानून रोज काहीतरी लिहावे(च)
>>>>>>>>>>

दिसामाजी, सुचेल तसे, जमेल तेव्हा, चांगले वाईट, लिहित राहावे.
फक्त ते चार चौघात प्रकाशित करताना विचार करून करावे.
द्विधा मनस्थितीत असल्यास टोपणनावाने प्रकाशित करावे. (याला ड्यु आयडी असे सुद्धा काही लोक्स बोलतात)

----------------------------------------------------------------------------------------------

२. खूप मेहनत घेऊन तुम्ही एक कथा लिहिलीत. स्वतःवर प्रचंड खुश झालात आणि अचानक कुणीतरी तुमच्या निदर्शनास आणून दिले की त्या कथेची सुरुवात, शेवट किंवा संपूर्ण कथा कुठल्यातरी अमुकतमुक कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटकाशी मिळती जुळती आहे. तुम्ही ती दुसरी कथा, कादंबरी, चित्रपट किंवा नाटक पाहिलेले नाही. अशा वेळी आपल्या कथेचे काय करावे?
>>>>>>>>>>

आपले आपल्यालाच सुचले आहे हे सत्य आपल्याला माहीत असते ना, तर कोणाला काही पटवून द्यायची गरज नाही. उलट ती कथा कोणी प्रसिद्ध कथाकाराने लिहिली असल्यास आपण सुद्धा थोरामोठ्यांसारखा विचार करू लागलो यात आनंद मानावा.
मध्यंतरी मी फेसबूकवर एक शेर टाकला होता, कोणीतरी याच आशयाचा गालिब (की फराजचा) शेर आहे म्हणत तिथे एक जवळपास तसाच शेर आणून चिकटवला. मला कोण आनंद झाला. मी माझ्या चौथ्या की पाचव्याच शेरोशायरी लिखाणात गालिब की फराजसारखा विचार करू लागलो याचा.

----------------------------------------------------------------------------------------------

३. ४. ५.
>>>>>>>>>>

कथा मासिकात पाठवायचा काही अनुभव नाही. ब्लॉगही नुकतेच दोनतीन महिन्यांपूर्वी काढलाय. तो देखील सर्व लिखाण एका जागी सुरक्षित जमा राहावे या हेतूने.

----------------------------------------------------------------------------------------------

६. लेखन लोकांना आवडते म्हणून आणि त्यांना आवडते त्या प्रकारातले करावे की केवळ स्वान्तसुखाय(स्वतःच्या समाधानासाठी) करावे, भले मग त्या प्रकाराला फारसा वाचक वर्ग उपलब्ध नसेल.
>>>>>>>>>>

अर्थात, आपल्याला आवडेल तेच लिहावे.
त्याच दिवशी मी कुठेतरी यालाच अनुसरून एक डायलॉग चिपकवला होता, "लोकांना वाचायला आवडेल तेच लिहायचे असते तर पॉर्नसाहित्यच लिहिले नसते." Wink

जरी लिखाण हा आपला व्यवसाय असेल आणि वाचक आपल्यासाठी ग्राहक असतील, तरीही, त्या परिस्थितीतही, तुम्हाला आवडेल तेच लिहिल्याने तुम्हाला स्वताला आनंद मिळेल. लोकांना आपण लिहिलेले आवडणे हे तो आनंद द्विगुणित करतो. मात्र मुळातच आनंद नसल्यास शून्याची कितीही पट शून्यच.

----------------------------------------------------------------------------------------------

७. कोणत्या मासिकांमध्ये छापून आले, म्हणजे आपण बऱ्या पैकी लेखक आहोत असे समजावे?
८. आपण लेखक/लेखिका आहोत की स्ट्रगलर हे कसे ओळखावे?
>>>>>>>>>>

तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रिय व्यक्तींना तुमचे लिखाण आवडू लागले की आपण बर्‍यापैकी लेखक आहोत असे समजायला हरकत नसते.
तरी हे प्रश्न शक्य असल्यास डोक्यातून काढून टाका.

----------------------------------------------------------------------------------------------

जाता जाता शेवटचा प्रश्न - हा लेख गंभीर आहे की विनोदी हे कसे ओळखावे? तसेच तो कोणत्या ग्रुपमध्ये टाकावा हे कसे ओळखावे.
>>>>>>>>>>

हे शक्यतो लिहिण्याच्या आधीच ठरवावे नाहीतर लिहिताना स्वता अनुभवावे.
जर लिहून पुर्ण झाल्यावर वा इथे प्रकाशित करायच्या वेळी आपल्याला असा प्रश्न पडला की हे कुठल्या प्रकारचे तर लिखाण गंडलेय असे समजावे.

----------------------------------------------------------------------------------------------

आता या उत्तरांना गुण द्या चला Happy

१. वाट बघत बसावे. ते लेखन आहे, आन्हिक नाही.
२. दुसरी कलाकृती बघावी. आपल्या कलाकृतीत त्यापेक्षा काही निराळं/नवीन/अधिक चांगलं/अधिक चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे का याचा प्रामाणिक विचार करावा. उत्तर 'होय' आलं तर आपली कलाकृती प्रकाशित करावी नाहीतर चक्क टाकून द्यावी. कशाला भुईला भार?
३. पाठपुरावा
४. मासिकाच्या नियमांवर अवलंबून आहे. त्यांना पूर्वप्रकाशित लिखाण चालणार असेल तर द्यावं. लबाडी करू नये इतकंच.
५. कल्पना नाही. कदाचित प्रकाशकांचा पत्ता शोधून त्यांना पत्राने विचारणा करता येईल. तेही नाही झालं तर अन्य ठिकाणी छापावं.
६. स्वान्तःसुखाय
७. छापून नाही आलं तरी आपण तसं समजावंच. Proud
८. तुमचं लिखाण छापायचा खर्च कोणाला करावा लागतो त्यावरून. तुम्हालाच लागला तर तुम्ही स्ट्रगलर. प्रकाशक छापायचे पैसे ऑफर करायला लागले की प्रथितयश.

---वाट बघत बसावे. ते लेखन आहे, आन्हिक नाही. >> काय इब आज फट्टे मारू राहिले? एक वेळ आन्हीक नाही जमले तरी चालेल पण लेखक व्हायचे असेल (प्रोफेशनल) तर रोज लिहिण्यावचुन (गार्बेज का असेना) पर्याय नाही...

--दुसरी कलाकृती बघावी. आपल्या कलाकृतीत त्यापेक्षा काही निराळं/नवीन/अधिक चांगलं/अधिक चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे का याचा प्रामाणिक विचार करावा. उत्तर 'होय' आलं तर आपली कलाकृती प्रकाशित करावी नाहीतर चक्क टाकून द्यावी. कशाला भुईला भार? >>> हे पण काहीही ... एकच गोष्ट वेगवेगळ्या शैलीत वाचायला मजा येत नाही का?

ओ, ती माझी मतं आहेत. तुमची तुम्ही लिहा.

>> एकच गोष्ट वेगवेगळ्या शैलीत वाचायला मजा येत नाही का?
मला नाही येत.

गुड. Proud

जाई, पेट थेरपी (आ मामी?)
बघितला होता मी नंदिनीचा बाफ. पण तिथे लेखनाच्या तंत्राबद्दल चांगली चर्चा चालली आहे.
पण या बाफमधले प्रश्न लेखनाच्या तंत्राशी संबंधीत नाहीत. हे प्रश्न तिथे टाकल्यास त्या बाफचा फोकस जाईल असे वाटले, म्हणून हा नवा बाफ.
उदाहरणच द्यायचं झालं तर तो पूर्ण पारमार्थिक बाफ आहे, तर हा पूर्ण इहवादी (मटेरियलीस्टिक ) बाफ आहे असं मला वाटतं.
पण साऱ्यांनाच वाटत असेल की हे प्रश्न त्या बाफवर चालतील, तर हे प्रश्न तिथे टाकायला माझी काहीच हरकत नाही.

अभिषेक - १०पैकी १० गुण. भारीच गुणी बाळ निघालास तू बरं.

स्वाती - तुमची उत्तरं आवडली. पेशव्यांनी दोनच उत्तरं दिली. पण त्यांच्या त्या उत्तरांमध्ये दम आहे.

मला कोण आनंद झाला. मी माझ्या चौथ्या की पाचव्याच शेरोशायरी लिखाणात गालिब की फराजसारखा विचार करू लागलो याचा.>>> माफ करा पण असं नसतं हो! कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.

माफ करा पण असं नसतं हो! कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे. <<
सोड ना आगावा. तू कशाला त्यांच्या फुग्याला टाचणी मारतोयस?

आगाऊ,

>> कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.

सहमत. मात्र प्रवास योग्य दिशेने चाललाय हे कळणेही महत्त्वाचे! Happy

आ.न.,
-गा.पै.

माफ करा पण असं नसतं हो! कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचणे आणि आपण त्यांच्याच पातळीचे होणे यात फरक आहे.
>>>>>>
अर्थातच असतोच हा फरक. पण इथे मुद्दा वेगळा आहे. स्वताकडे बघण्याचा द्रुष्टीकोन सकारात्मक असावा हे मी इथे सुचित करतोय.

नीरजा आणि आगाऊ यांच्या कमेंट्सचा मला लागलेला अर्थ -
कधीतरी खर्‍याखुर्‍या थोरांसारखा एखादा विचार सुचला म्हणून, नवोदित लेखक, लेखिकांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये.
क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर, पदार्पणातच सेन्च्युरी ठोकली म्हणून लगेचच स्वतःला 'सचिन तेंडूलकर ' समजू नका, तुमचा 'नरेंद्र हिरवाणी' सुद्धा होऊ शकतो. शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर 'वन टाइम वंडर'. (माफ करा, नरेंद्र हिरवाणीच्या जागी फलंदाजाचं नाव नाही आठवलं. माबोवरील क्रिकेटतज्ञांनी मदत करावी..)
तस्मात, लिखाणात दर्जामध्ये कंसीस्टन्सी/सातत्य महत्वाचे….

अभिषेक - स्वताकडे बघण्याचा द्रुष्टीकोन सकारात्मक असावा? >>>> खरंय… ये सफर बहोत है कठीन मगर ….

गा.पै. - मात्र प्रवास योग्य दिशेने चाललाय हे कळणेही महत्त्वाचे! Happy >>>> मनातलं बोललात. याचसाठी हा सारा खटाटोप Happy
जाणत्यांकडून, अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल या विश्वासावर….