मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यावी – एक स्वानुभवाचा सल्ला

Submitted by प्रमोद् ताम्बे on 17 April, 2014 - 02:59

मधुमेही व्यक्तींनी काय काळजी घ्यावी – एक स्वानुभवाचा सल्ला
मधुमेह काय किंवा रक्तदाब काय , या दोन्हीही आनुवंशिक व्याधी आहेत. एखाद्या घरात जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्याचे पैकी कुणालाही , ही व्याधी असेल तर ती पुढच्या पिढीतील मुला-मुलींपैकी किंवा त्यापुढील पिढीतील नातवंडांपैकी कुणालाही होऊ शकते असे वैद्यक शास्त्र सांगते. तसेच ह्या दोन्ही व्याधींना छुपे रुस्तूम असे म्हणतात.कारण दोन्हीमध्ये तपासणी केल्याखेरीज काही समजत नाही.
माझ्या वडिलांना या दोन्ही व्याधी होत्या त्यामुळे आम्हा मुलांना ही व्याधी होण्याची शक्यता नक्कीच होती.मात्र प्रत्यक्षात माझ्या वयाला ५५ वर्षे उलटून गेली तरीही हा गोड साखरेचा आजार काही माझ्या वाटेला गेला नव्हता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी दर तीन महिन्यांनी तपासण्या करून घेऊ लागलो व वयाच्या साठाव्या वर्षी २००२ मध्ये केलेल्या तपासणीनंतर आलेले रिपोर्ट्स बघितल्यावर डॉक्टरांनी मला सावध केले की तुमच्या साखरेच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून मधुमेह आता तुमच्या दरवाजा बाहेर येऊन उभा राहिला असून वेळीच तुम्ही काळजी घेतली नाहीत तर आता कोणत्याही क्षणी तो तुमच्या शरीरात प्रवेश करेल.मात्र एकदा का त्याने तुमच्या शरीरात प्रवेश केला की तो तुमच्या मृत्यूपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. त्यामुळेच वेळीच याबाबत दक्ष राहून काळजी घेतलीत तर बराच काळ पर्यन्त तुम्ही त्याला दरवाजाबाहेरच थोपवून धरू शकता.
डॉक्टरांच्या सल्ल्याची गंभीर दखल घेऊन मी त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ताबडतोब अतिरिक्त गोड खाणे कमी केले, जिलबी,बासुंदी,श्रीखंड,बर्फी,मिठाईचे पदार्थ,लग्नात दिले जाणारे पेढे असे गोडाचे पदार्थ जरी पूर्ण बंद केले नाहीत तरी मर्यादेत थोडेसेच देवाला नैवेद्य दाखवतात तसे खायला सुरुवात केली.त्याच बरोबर डॉक्टर अभय बंग ह्यांच्या “ माझा साक्षात्कारी ह्रूदयरोग “ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे नियमितपणे बागेत जाऊन चालण्याचा व्यायामही सुरू केला.
इतकी काळजी घेतल्याने या ‘गोड’ व्याधीला मी आणखी चार वर्षे थोपवू शकलो.
मात्र नोव्हेंबर २००५ मध्ये अचानकपणे एके दिवशी माझ्या सर्वात छोट्या (शेवटच्या) मुलीची मुदत पूर्ण होण्याचे आंत सातव्याच महिन्यात अकाली प्रसूती करावी लागली व झालेल्या अपुर्याा दिवसांच्या बाळाला ताबडतोब एका खास लहान मुलांच्या रुग्णालयात हलवण्यात आले व पुढचे १६ दिवस तेथील आय.सी.यू. मध्ये ठेवावे लागले. त्यावेळी मला जो जबरदस्त मानसिक धक्का बसला व त्यावेळी १६ दिवसाच्या रुग्णालयातील कालावधीत झालेली सततची धावपळ व घरी आणल्या नंतरचे बाळाला सहा महिने पूर्ण होऊन डॉक्टरांनी आता काळजी करण्याचे कारण नाही असा दिलासा देईपर्यंत माझ्यावर असलेला सततचा मानसिक तणाव ह्यामुळे अखेर या साखरेच्या गोड व्याधीने माझ्या शरीरात प्रवेश करून माझा ताबा घेतलाच !
डिसेंबर २००५ मध्ये केलेल्या नियमित तपासणीच्या रिपोर्ट्समध्ये माझी रक्त शारकरेची पातळी २०० च्यापुढे गेल्याचे पाहून डॉक्टरांनी जरी मला आता तुम्ही कायमचे डायबेटिक पेशंट झाल्याचे घोषित केले तरी असेही सांगितले की तुम्ही जर “ नियमित पथ्याचा आहार ,नियमित व्यायाम व वेळचेवेळी औषधे “ ह्याबाबत काळजी घेतलीत तर तुमच्या मनावरील तणाव जसा कमी होईल तसा हा मधुमेहसुद्धा आटोक्यात येईल. आता यापुढे तुम्ही या मधुमेहाला सांगा,की बाबा आता एवितेवी तू माझ्या शरीरात आलाच आहेस व जन्मभर रहाणारच आहेस तर निदान एखाद्या जिवलग मित्रासारखा रहा. म्हणजेच ( कुपथ्य करून,व्यायान सोडून देऊन,किंवा औषधांची आबाळ करून) मी तुझ्या वाटेला जाणार नाही व तूही माझ्या वाटेला जाऊ नकोस ,गुण्यागोविंदाने रहा.
त्यानंतर गेली नऊ वर्षे मी ह्या साखरेच्या गोड व्याधीला एखाद्या जिवलग मित्रासारखे वागवत आहे व त्यानेही मला कुठलाही त्रास दिला नाही. मी एखाद्या सर्वसामान्य निरोगी माणसासारखा रहातो.माझी रोजची दिनचर्या अशी असते :
मी रोज पहाटे ४.४५ ळा उठतो. आन्हिके आटोपल्यावर पहिला चहा व सोबत दोन बिस्किटे घेतो.
५.४५ ला घरातून बाहेर पडून ६.०० वाजता विजयानगरच्या बागेत जाऊन व्यायामाला सुरवात
६.४५ पर्यन्त (४५ मिनिटे) चालवयाचा व्यायाम व पुढे ६.५५ पर्यन्त (१० मिनिटे) स्ट्रेचिंगचे व्यायाम
सुमारे ७.२० ते ७.३० घरी परतल्यावर एक चमचा च्यवनप्राश, दोन खजुराच्या बिया किंवा एखादा राजगिरा लाडू, अर्धा कप चहा व वर्तमापत्रांचे वाचन,सुडोकू,शब्दकोडे सोडवणे,मित्रांशी फोनवर गप्पा इ.
९.३० वाजता आंघोळ झाल्यावर नाश्ता. नाश्त्यात एखादा पराठा (मुळा,मेथी,पालक,बटाटा ह्यांचा) , ५-६ इडल्या,दोन धिरडी,एखादे टोमॅटो आमलेट,फोडणीचा भात,पोळीचा चिवडा किंवा दोन ब्रेडचे स्लाइस या पैकी काहीतरी एक व अर्धा कप चहा.
१.३० वाजता दुपारचे जेवणात भुकेनुसार १-१.५ पोळी,भाजी ,आमटी,चटणी,कोशिंबीर व मूठभर भात.
जेवणानंतर अर्धा-पाऊण तासाने एखादे फळ (चिक्कू,सफरचंद ,संत्रे,अंजीर,द्राक्षे,कलिंगड,आंबा इ.) किंवा फळ नसेल तर ( देवाला नैवेद्य दाखवतो ती भरून )खीर,शिकरण,दुधी किंवा गाजर हलवा अशी एखादी स्वीट डिश.
४.३० वाजता दुपारचा चहा सोबत थोडेसे चिवडा,फरसाण,मेथी मठरी,शंकरपाळी असे काहीतरी च्याऊ-म्याऊ
८.३० ते ९ पर्यन्त रात्रीचे जेवण ह्यात एखादी पोळी व थोडासा भात किंवा खिचडी.
९.३० वाजता (जेवणानंतर अर्ध्या तासाने) दुपारप्रमाणेच एखादे फळ (चिक्कू,सफरचंद ,संत्रे,अंजीर,द्राक्षे, कलिंगड, आंबा इ.) किंवा फळ नसेल तर ( देवाला नैवेद्य दाखवतो ती भरून )खीर,शिकरण,दुधी किंवा गाजर हलवा अशी एखादी स्वीट डिश.
११.०० पर्यन्त टी.व्ही.वरील मालिका बघतो किंवा वाचन आणि नंतर झोप.
म्हणजेच मी इतरांसारखाच तीन वेळा दोन चमचे साखरेचा चहा घेतो, जेवणात भाकरी / पोळी ,भात,बटाटा किंवा इतर कोणाचीही भाजी, दाण्याचे कूट घालून कोशिंबीर, लोणचे,खरडा,पापड,भाजी असे चालते.एखाद्या लग्नाला किंवा कार्याला गेलोच तर जेवणात दोन जिलब्या,गुलाबजाम,वाटीभर फ्रूट सॅलड,रसमलाई,रबडी असे काही गोड असेल तर ते चालते.थोडक्यात म्हणजे सर्वसामान्य निरोगी व्यक्ती जो आहार घेतात तोच मीही घेतो,फक्त मोजकाच व प्रमाणात घेतो इतकेच. शक्यतो मी कटाक्षपूर्वक हे वेळापत्रक पाळतो. व्यायामात नियमितपणा पाळतो ( टंगळ-मंगळ करत नाही) व औषधेही वेळच्यावेळी घेतो,तसेच रक्त शर्करा , रक्तदाब व ई.सी.जी. आणि लिपीड अशा सर्व आवश्यक तपासण्याही नियमितपणे करून घेत असतो.
असो. एकूण काय तरही ही व्याधी सुरू होऊन नऊ वर्षे झाली तरी मी अजून तरी मधुमेहाला ठराविक अंतरावर रोखून धरण्यात यशस्वी ठरलो आहे.
आता माझ्या ९ वर्षांच्या अनुभवावरून मी इतर मधुमेहींना काही उपयुक्त सूचना करत आहे.
१. प्रथम तुम्ही दिवसभराचा तुमचा मित-आहार ठरवा व तो दोन वेळा घेण्या ऐवजी पांच-सहा वेळा व थोडा थोडा विभागून घा. ( बकरी सारखे , म्हणजे बकरी जसे दिवसभर थोडा थोडा पाला खाते तसे)
२. सकाळचा नाश्ता भरपेट असू द्या,दुपारचे जेवण मध्यम असू द्या व रात्रीचे जेवण हलके असू द्या.
(थोडक्यात काय तर सकाळी राजासारखे रहा व रात्री भिकार्या सारखे रहा)
३. आहार चौरस असू द्या. त्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर खा,मोड आलेली कडधान्यांचा वापर करा ,सॅलड्स कोशिंबीरी भरपूर खा, फळांवर भर द्या,तंतुमय (fibre) पदार्थ जास्त खा.
४. लक्षात ठेवा की रक्तदाब व रक्त शर्करा (Blood pressure & Diabetes) ह्या व्याधींना साखर,तेल, मैदा,तूप व मीठ या पाच पांढर्या रंगाच्या वस्तु वर्ज्य आहेत.
५. तेलात अपायकारक मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात त्यामुळे स्वयंपाकात तेलाचा शक्य तेव्हढा कमी वापर करा.एकाच प्रकारचे तेल न वापरता शेंगदाणा , सूर्यफूल , सोयाबीन , म्होरीचे तेल , ऑलिव्ह तेल व राईस ब्रान तेल ह्यांचे मिश्र तेलाचा वापर करा
६. ब्रेड,बिस्किटे अशा मैद्यापासून बेकरीत बनणार्याू वस्तूंचा वापर टाळा.आईस्कीम , कॅडबरी चॉकलेट्स , कुल्फी आशा वस्तु खाणे टाळा.
७. पिझ्झा,नूडल्स,पाष्टा असे जंक व फास्ट फूड खाणे कटाक्षाने टाळा.\
८. कॉमिक्स वाचन ,टी.व्ही.गेम्स ,टी.व्ही.मालिका एकाच जागी बसून तासनतास बघणे बंद करा व मोकळ्या मैदानावरचे खेळ खेळा.
९. प्रकृतीला झेपेल असाच व्यायाम करा.
१०. मधुमेहींसाठी चालणे हा उत्तम व्यायाम आहे. (यासाठी ना पैसे खर्चून जिमला जावे लागत, ना कोणते साहित्य लागत वा नाही जागेची जरूरी ! मनात आले की कधीही,कोठेही व केंव्हाही हा व्यायाम तुम्ही करू शकता.
११. फक्त चालण्याचा व्यायाम करतेवेळी शक्यतो जॉगिंग शूजचा वापर करावा.
१२. इन्सुलीनच्या पेशी पायाच्या पोटरीत जास्त असल्याने चालण्याच्या व्यायामाने त्या जास्त कार्यरत होतात.
१३. व्यायाम सुरूवातीला १५ मिंनिटांपासून सुरू करून हळूहळू वेळ वाढवीत नेऊन शेवटी ४५ मिनिटावर थांबवा.
१४. Exercise व Exertion ह्यातील फरक ओळखून व्यायाम करा. (Exertion म्हणजेच दमणूक नको)
१५. व्यायाम करताना तुमचे लक्ष पूर्णतः फक्त व्यायामावरच केन्द्रित करा. म्हणजेच गप्पा मारत फिरल्यासारखा व्यायाम नसावा. व्यायाम चालू असतांना इतराशी बोलताबोलता चालू नका) व्यायामाची ती ४५ मिनिटे फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. (मी तर बागेच्या आत पाऊल टाकताच पत्नीसह सर्वांपासून एकदम आलिप्त होतो,व्यायाम चालू असतांना जरी कोणी ओळखीचे भेटले तरी ओळखही दाखवत नाही. त्यमुळे बरेच लोक बायकोकडे मी शिष्ठ आहे अशीही कॉमेंट करतात पण मी तिकडे लक्षच देत नाही. थोडक्यात तो एक तास मी फक्त माझ्यासाठीच राखून ठेवतो)
१६. शास्त्रशुद्ध व्यायाम करतांना नेहमी व्यायाम चालू करतेवेळी सुरवात हळू चालण्याने करावी व हळूहळू वेग वाढवीत नेऊन १५ मिनिटांनंतर पूर्ण वेग आणून (यालाच ब्रिस्क वॉकिंग असे म्हणतात) पुढील १५ मिनिटे पूर्ण वेगाने (brisk walking) चालावे व शेवटच्या १५ मिनिटात वेग हळूहळू कमीकामी करत जाऊन अगदी कमी वेग आल्यावर बसावे. वेगात चालत असतांना एकदम थांबून बसू नये. ( थोडक्यात सांगायचे तर पंखा जसा चालू केल्यावर त्याचा वेग जसा हळूहळू वाढत जातो व आपण जेंव्हा पंखा बंद करतो त्यावेळी त्याचा वेग हळू हळू कमीकमी होत जातो तसे चालावे) १५ मिनिटे ब्रिस्क वॉकिंग हे इतक्या वेगाने करा की कडाक्याच्या थंडीतसुद्धा घामाने अंग डबडबले गेले पाहिजे. रुमाल ओलाचिंब होऊन पिळला तर त्यातून पाणी निघाले पाहिजे. (येथे मी अभिमानाने सांगतो की मी ब्रिस्क वॉकिंग करत असतांना वीस वर्षांचा तरुण किंवा तरुणीसुद्धा मला ओलांडून पुढे जाऊच शकत नाही इतका माझा वेग असतो. आणि जर असे कोणी आलेच तर दुसर्या दिवशी माझा वेग मी आणखी वाढवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न करतो व त्या नव्या व्यक्तिला मागे टाकण्या यशस्वी झाल्याखेरी थांबत नाही.
१७. मनावर व जिभेवर तुमचा ताबा ठेवा,आवडते म्हणून मोहाला किंवा इतरांच्या आग्रहाला बळी पडून अतिरिक्त गोडच काय इतरही काही खाऊ नका ( “अति खाणे व मसणात जाणे” ही म्हण कायम लक्षात असू द्या)
१८. जिभेला बजावून सांगा की तू फक्त चार इंच लांब आहेस तेंव्हा या ५.५ फूटी देहावर मी तुला सत्ता चालवू देणार नाही तर या देहावर माझीच सत्ता असेल हे लक्षात ठेऊन गुपचुप तोंडाच्या आंत बसून रहा.
१९. मन सदैव प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा , जाणीवपूर्वक प्रयत्न करून सकारात्मक विचार करा व अकारण टेंशन घेऊ नका. जरूर असेल टेणहा व टेधीच काळजी करा. (एक लक्षात ठेवा की तुम्ही पॅनिक होऊन किंवा टेंशन घेतल्याने प्रश्न सुटत नसतात)
२०. वजन आटोक्यात ठेवा व वाढणार नाही ह्यासाठी जागरूक रहा.
२१. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेत जा. (स्वत:च्या मनाने त्यात बादल करू नका किंवा बंदही करू नका)
२२. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमितपणे सर्व वैद्यकीय तपासण्या करून घ्या.
वेळचेवेळी नियमित मित-आहार + औषधे + व्यायामात सातत्य + डॉक्टरांच्या साल्यानुसार कालबद्ध वैद्यकीय तपासण्या - या चतु:सूत्री अंगिकारून मधुमेहासारख्या दुर्घर व्याधीला आपला मित्र बनवा व उर्वरित आयुष्य निरामय जागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बिस्किटं टाळा म्हणाता आणि भल्या पहाटे चहा बिस्किटं खाताय? पुन्हा तुम्ही राजगिरा लाडू, खजूर, चवन्यप्राश प्राशन करताय; ह्यात किती साखर असते हे माहीती असेलच.
चुकीचं नाही का? Happy

चिकू, आंबा पण टाळायला हवा. बाजारात तज्ञ डॉक्टरांनी लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठीतही आहेत. तीच वाचणे जास्त योग्य. शिवाय तूमची प्रकृती आणि तपासण्या बघून डॉक्टर योग्य तो सल्ला देतातच.

मलाही काकांची दिनचर्या आणि त्यातला आहार पाहुन प्रश्न अनेक पडले. पण जर ह्या आहारावर त्यांचा मधुमेह ९ वर्षे त्यांना काहीच त्रास न देता गुपचुप बसुन आहे तर मग काय वाईट आहे त्यात?? माझे सगळे ज्ञान पुस्तकी आहे, काकांनी अनुभवातुन लिहिलेय.

काका, जीभेबद्दल जे लिहिलेत ते अगदी आवडले. माझ्या जीभेला मला असे खडसवायला जमेल तो सुदिन.. Happy

सर व्यायाम किती करतात तेही पाहा. सर ४५ मिनिटे वेगात चालतात.

त्या शिवाय थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खातात, एकदम खात नाहीत.

>>पण जर ह्या आहारावर त्यांचा मधुमेह ९ वर्षे त्यांना काहीच त्रास न देता गुपचुप बसुन आहे तर मग काय वाईट आहे त्यात??<<

भले त्रास देत नसेल पण साखरेचे प्रमाण आणखी आटोक्यात राहिल आणि तो हि एक छुपा फायदाच आहे.
मधूमेहींची गोळी सुद्धा कमी होवु शकते. व छुपे आजार आणखी लांब राहतील. हे मी घरच्या मधूमेहींनी केलेले उपाय बघून सांगतेय.
४५ मिनिटे जलद चालून दोन बिस्किटे
आणि
४५ मिनिटे जलद चालून बिस्किटेच नाही खाल्ली तर फरक असेलच ना?

अ. आ. मा. म.

तांबे काका,
मी स्वतः डायबेटॉलॉजिस्ट आहे.
तुम्ही सांगितलेली जीवनशैली तुमच्यासाठी अत्युत्तम आहे.
फक्तं फारच लवकर उठता बुवा तुम्ही.
अजून तासभर झोपले तरी चालेल.

आणि एक- इन्स्युलिन रिसेप्टर काफ मसलमध्ये असतात, सिक्रीटर नव्हेत.

झंपी आणि दिनेश, डायबेटिसमध्ये 'टाळायलाच हवा' असा कोणताही अन्नपदार्थ नाही.
मात्रं तुम्ही तो किती खाता आणि त्यासोबत व्यायाम करून कॅलर्या जाळता का हे महत्त्वाचे आहे.

मात्रं लोकांना हे मॉडरेशन कळत नाही किंवा कळले तरी वळत नाही.
म्हणून मग 'खा/ मर्यादित खा/ अज्जिबात खाऊ नका' अशी लिस्ट मी ही पेशंटाना देते.
पण तांबेकाकांसारखा एखादा हुशार पेशंट आला तर फक्त त्याला मॉडरेशनच्या संकल्पना समजवाव्या लागतात.
बाकी सगळे पेशंटच सांभाळतात.

(वैधानिक इशारा- वरिल प्रतिसाद फक्त तांबेकाकांसारख्या केवळ कंट्रोल्ड टाईप टू डायबेटिस असणार्या रूग्णासाठीच आहे.
टाईप १ डायबेटिस किंवा डायबेटिसबरोबरच बीपी, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज इ. आजार असणार्यांसाठी नाही)

जिभेला बजावून सांगा की तू फक्त चार इंच लांब आहेस तेंव्हा या ५.५ फूटी देहावर मी तुला सत्ता चालवू देणार नाही तर या देहावर माझीच सत्ता असेल हे लक्षात ठेऊन गुपचुप तोंडाच्या आंत बसून रहा. >>> हे वाक्य आवडल...

जिभेला बजावून सांगा की तू फक्त चार इंच लांब आहेस तेंव्हा या ५.५ फूटी देहावर मी तुला सत्ता चालवू देणार नाही <<<

माफ करा, पण हे वाक्य मला नाही आवडलं!

(असं आपण एकेका अवयवाला सांगत राहिलो तर पुढे करणार काय?)

आभार साती ! पण असा एका व्यक्तीचा आहार सर्वच रुग्णांना लागू पडेल असे वाटत नाही. शिवाय लोक फक्त आहार वाचतील, व्यायाम नाही. त्यामूळे पेशंटच्या जीवनशैलीशी, वयाशी आणि रक्ततपासणीवर आधारीतच आहार हवा ना ?

<९.३० वाजता आंघोळ झाल्यावर नाश्ता. नाश्त्यात एखादा पराठा (मुळा,मेथी,पालक,बटाटा ह्यांचा) , ५-६ इडल्या,दोन धिरडी,एखादे टोमॅटो आमलेट,फोडणीचा भात,पोळीचा चिवडा..........

हे वाचता वाचता तोंडाचा मोठ्ठा आ वासला तो पुढचे किंवा आणि यापैकी एक हे वाचल्यावर मिटला.

<कॉमिक्स वाचन ,टी.व्ही.गेम्स ,टी.व्ही.मालिका एकाच जागी बसून तासनतास बघणे बंद करा व मोकळ्या मैदानावरचे खेळ खेळा.> यात मायबोलीही टाकायला लागेल.

सकाळच्या बिस्किटांबाबत : सकाळी एक तास व्यायाम करायच्या वेळी पोट पूर्ण रिकामे असणे मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे काहीतरी खायलाच हवे. रक्तशर्करा अचानक कमी होऊ शकते. आणि आता हाय फायबर बिस्किटेही मिळतात.

डॉ. साती, लिहिलेली बहुतेक फळे जास्त साखरेची नाहीत का? बहुतेक मधुमेहींनाना साखर पूर्ण वगळायचा, भात कमी किंवा न खायचा सल्ला का मिळतो?.

साती एकदम बरोबर.:फिदी:

अहो ताम्बे काका तुम्ही इथे लिहीता साखर, मैदा, मीठ घातक, मग तेच आहारात जास्त का ठेवता. आणी कुठली बिस्किटे घेता? नाचणी आणी डायबेटीक बिस्किटे आहेत की.

मठरीतही मैदा असतोच. ब्रेड ब्राऊन खाता की व्हाईट? जिलबी आणी गुलाबजाम खायचे आणी ते पचवायला पळापळी करायची?

मी तर तुमच्या दाम दुप्पट गोड खाऊ आहे, पण साखर कमी केल्याने वजन पण कमी होते आणी थकवा ( हो जाड झाले की धाप लागायची, परत मग अमावस्या पौर्णीमा व्हायची) कमी होतो हे लक्षात आल्याने साखर कमी केलीय.

तुम्ही पण तसेच करा, म्हणजे धावाधाव होणार नाही.

तांबे काकानी स्वतः जे व्यवधान पाळले आणि त्यांना जो लाभ झाला त्यावरुन इतरांनी बोध घ्यावा म्हणुन इतरांना सल्ला द्यायला निघाले, तर लोक त्यांचा सल्ला ऐकणे दुर, त्यांनाच सल्ले देताहेत Happy

सकाळच्या बिस्किटांबाबत : सकाळी एक तास व्यायाम करायच्या वेळी पोट पूर्ण रिकामे असणे मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे काहीतरी खायलाच हवे. रक्तशर्करा अचानक कमी होऊ शकते. आणि आता हाय फायबर बिस्किटेही मिळतात.>>>>> मयेकराना भरपूर अनुमोदन.

साधना सल्ला नाही ग. मलाच डॉक ने सान्गीतलेय की गोड आवरा नाहीतर कायमचे बन्द करायची वेळ येईल.

पण हे वरचे पटलेच नाही.

जेवणानंतर अर्धा-पाऊण तासाने एखादे फळ (चिक्कू,सफरचंद ,संत्रे,अंजीर,द्राक्षे,कलिंगड,आंबा इ.) किंवा फळ नसेल तर ( देवाला नैवेद्य दाखवतो ती भरून )खीर,शिकरण,दुधी किंवा गाजर हलवा अशी एखादी स्वीट डिश.>>>> हे रोज असते?

बाकी त्यानी बरेच उत्तमच लिहीले आहे.:स्मित:

ऑलिव्ह ऑईल तळणात कसे वापरणार? करडई वगैरे ठीक आहे.

बेफिकीर आवरा. हसून तर नक्कीच वाट लागलीय तोन्डाची आणी पोटाची.:फिदी:

इन्सुलीनच्या पेशी पायाच्या पोटरीत जास्त असल्याने चालण्याच्या व्यायामाने त्या जास्त कार्यरत होतात. >> आं ?
पँक्रीआज मधून नाही का तयार होत इंसुलिन ? ते पोटरीत कुठे पोचले आता ?

प्रत्येकाचे मेटॅबॉलिजम कशा प्रकारे एका सेट ऑफ ट्रीटमेंट्ला व रूटीनला प्रतिसाद दे ईल हे डॉक्टरांना सुध्दा अनेकदा कळत नाही ---------- होल्ड ऑन----- असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले !!!!!!!!.
म्हणून तांबेंच्या रूटीनवर शंका कुशंका व्यक्त न करता त्यात किती शिकण्याजोगे आहे, पॉजिटिव्हिटी आहे , ही मी पाहिले.
कारण मी देखील रक्तदाबाचा एके काळी पेशंट असूनही,, काही दिवसंनंतर माझ्या डॉक्टरांनी गोळ्या बंद केल्या अन नंतर ते कंटिन्यू करायची गरज भासली नाही------ मी वॉकिंग तसेच आणखी काही लाईफस्टाईल बदल केले. डॉक्टरांच्याच मते बी पी च्या गोळ्या बंद करणे ही एक असामान्य गोष्ट आहे. पण माझ्या बाबतेत घडली. आता हे वाचून काय म्हणाल?

डॉक्टरांच्याच मते बी पी च्या गोळ्या बंद करणे ही एक असामान्य गोष्ट आहे. पण माझ्या बाबतेत घडली. आता हे वाचून काय म्हणाल?
<<
He was encouraging you. असे म्हणतो.
अभिनंदन.
योग्य लाईफस्टाईल चेंजेस व्यायाम यांच्या योगाने, काही रुग्णांत हे होणे ही अगदीच सामान्य गोष्ट आहे, असेही सुचवितो.

मी इतरांसारखाच तीन वेळा दोन चमचे साखरेचा चहा घेतो, >>>> एका कपाला दोन चमचे साखर ? किती नॉर्मल (नॉन-डायबेटिक) लोक तरी इतकी साखर रोज चहात घालत असतील ?

लेख चांगला आहे. परंतू बरीच फळं, स्वीट डिश इत्यादी मी मधुमेहींना चालत नाहीत असेच ऐकले व पाहीले आहे. हे तांबेकाकांना चालत असेल परंतू सर्वांनाच चालेल असे नाही.

जिभेचे वाक्य अभय बंगांच्या पुस्तकात आहे. गांधी असे म्हणतात असे त्यांनी लिहीले आहे. माझेही आवडते वाक्य..

मवा, मी आहे नॉन डायबेटिक आणि एका कपाला २ चमचे साखर् घेते Wink

रोज सकाल संध्याकाळ नवैद्याची वाटी एवढी का होइना स्वीट डिश वाचून मला पण नवल वाटलं होतं...पण इफ इट वर्क्स फॉर हिम्..देन ही मे अ‍ॅज वेल एंजॉय!

शूप्मे, खरंच ? पूर्वीच्या काळी बायका ब्रेफा करत नसत, डायरेक्ट जेवत, त्याआधी शारीरीक श्रमाची कामे उरकायला एनर्जी यावी म्हणून असा गोडमिट्ट चहा पीत असे ऐकले होते, पण अजून लोक असा चहा पितात हे मला माहित नव्हते. Happy

मवा, बरोबर. मलाही ते दुपारी शिकरण किंवा स्वीट डिश ते ही रोज खायची काय गरज असू शकते हे कळलं नाही. म्हणजे एखाद दिवस खावंसं वाटल्याने खाणं आणि रोज हटकून खाणं वेगळं..

>>>झंपी आणि दिनेश, डायबेटिसमध्ये 'टाळायलाच हवा' असा कोणताही अन्नपदार्थ नाही.
मात्रं तुम्ही तो किती खाता आणि त्यासोबत व्यायाम करून कॅलर्या जाळता का हे महत्त्वाचे आहे.<<

ते ठिक आहे.
------------
पण रोज एवढे गोड खाण्यात काय अर्थय? मधूमेह तसाही डीटेक्ट झालाय ना, मग शरीराला इतकी साखर काय कामाची तेवढी अंगमेहनत नसताना? पुर्वीसारखे शेतात कामं कोण करतो आजकाल.
तांबेकाका त्यांच्या जैविक बागेत काम करतात व ४५ मिनिटे जलद चालतात फक्त असे त्यांनीच लिहिलेय ना. (मा. व्य. म.) Happy

रोजच्या रोज इतक गोड खाण्याची आणि ते सुधा दोन्ही वेळेला खर तर जरुरी नसावी. आम्हाला डायबेटीस डीटेक्ट झाला नाही तरीही आम्ही खात नाही
<<पण इफ इट वर्क्स फॉर हिम्..देन ही मे अ‍ॅज वेल एंजॉय!>> +1

ताम्बे काका अभिन.न्दन! खुप पॉसिटिव्ह अटिट्युड ने डील करताय मधुमेहाशी. इथेच तुम्हि अर्धी लढाई जि.न्कलीत. उरलेली अर्धी नियमीत जीवनशैलीने.

आवडता विषय असल्याने सगळे लेख आणि प्रतिसाद वाचुन काढलेत. काहि ठिकाणि लेखातिल विचार आणि प्रतिसाद ह्यात डिस्कनेक्ट जाणवला म्हणुन खाली काहि गोष्टि क्लिअर करण्याचा प्रयत्न करते.

त्या.न्ची परिभाषा चुकली आहे पण मतितार्थ बरोबर आहे. इन्सुलिन हा हॉर्मोन रक्तातील साखर पेशी.न्मध्ये पोहचवण्याच काम करतो पण इन्सुलिन ला पेशी.न्मध्ये डायरेक्ट अ‍ॅक्सेस नसतो, इन्सुलिनला पेशि.न्च्या आत मध्ये जाण्यासाठी इन्सलुनि रिसेप्टर्स मदत करतात. रक्तातील साखरेची पातळी वाढली की हे इन्सुलिन रिसेप्टर्स पेशिच्या आतल्या भागातुन पृष्ठभागा वर येतात. त्याचवेळी रक्तातील साखरेची पातळीवाढल्या मुळे पॅनक्रिआज इन्सुलिन सिक्रिट करतात. इन्सुलिन पेशि.न्च्या पृष्ठभागावर असलेल्या रिसेप्टर्स च्या मदतीने पेशिन्च्या आतमध्ये जात.

प्रत्येक पेशि.न्मध्ये असे हजारो रिसेप्टर्स असतात. मधुमेह होण्याची पहिलि पायरी म्हणजे हे रिसेप्टर्स इन्सुलिन ला प्रतिसाद देण कमी करतात. ह्याला शास्त्रीय परिभाषेत इन्सुलिन रेसिस्टन्स अशी स.न्ज्ञा आहे. उदा. निरोगी व्यक्तीअ मध्ये जर प्रत्येक पेशिच्या पृष्ठभागावर २०,००० रिसेप्टर्स असतील तर प्रिडायबेटिक (इन्सुलिन रेसिस्टन्त) व्यक्तीमध्ये फक्त ५००० रिसेप्टर्स इन्सुलिन ला प्रतिसाद देतात. (आकडे फक्त मुद्दा स्पष्ट करण्यासाठी उदाहरण म्हनुन दिलेत). त्यामुळे पेशि.न्ना हव तितक अन्न पुरवता याव म्हणुन पॅनक्रिआज ना तेवढ्या प्रमाणात ज्यास्त इन्सुलिन तयार कराव लागत. नियमीत पणे अस ज्यास्त काम कराव लागल्यामुळे पॅनक्रिआतिल इन्सुलिन तयार करनार्‍या पेशी (बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लॅन्गरहॅन्स) हळु हळु निकामी होत जातात. पर्यायाने शरीरातिल मधुमेहाची तीव्रता वाढत जाते. भारतीय व.न्शाच्या (साउथ एशियन एथ्निसिटि) व्यक्ति.न्मध्ये हे इन्सुलिन रिसेप्टर्स अनुव.न्शिक रित्या कमी असल्याने आपल्याला मधुमेह होण्याचा धोका इतर व.न्शीय लोका.न्पेक्षा ज्यास्त आहे.

वरती जो इन्सुलिन रिसेपटर्स चा कार्यकारण भाव सा.न्गितला आहे त्याला एक अपवाद आहे तो म्हणजे मसल्स पेशी त्या.न्च्या अ‍ॅक्टिव्ह स्टेट मध्ये असताना त्या.न्ना साखर (ग्लुकोज) आत घेण्यासाठी इन्सुलिन आणि पर्यायाने इन्सुलिन रिसेप्तर्स ची गरज नसते. स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या स.न्शोधनात अस निष्पन्न झाल की जितका वेळ आपण व्यायाम करतो त्याच्या दुप्पट वेळ मसल पेशी रक्तातुन ग्लुकोज शोषुन घेउ शकतात. उदा. काका जर रोज ४५ मिन्टे व्यायाम करत असतील तर ९० मिनिटे त्या.न्च्या मसल्स मध्ये नॉर्मल माणसाप्रणामेच ग्लुकोज शोषल्या जाइल. इअतर कुठल्याही अवयवा.न्पेक्षा पायात मसल्स च प्रमाण ज्यास्त असल्याने आणि चालण्याने त्या मसल्स अ‍ॅ़क्टिव्ह होत असल्याने चालण फायदेशीर आहे अस बहुदा काका.न्ना म्हणायच असाव.

बर्‍याच झणा.न्ना रोज गोड खाण्याबद्दल प्रश्न पडला. पण हा वैय्यतीक निवडीचा प्रश्न आहे. काहि लोका.न्ना 'आउट ऑफ साईट आउट ऑफ माइ.न्ड' हा म.न्त्रा उपयुक्त वाटतो तर काहि.न्च्या बाबतीत तो काउन्टर प्रोडक्टिव्ह ठरतो (म्हणजे एखादी गोष्ट वर्ज्य करण्याच्या कल्पनेने ती खाण्याची इछ्छा दुपटीने उफाळुन येते). काका बहुदा दुसर्‍या गटात मोडत असावेत. रोज ठरावीक वेळेला नियमीत पणे रक्तशर्करा तपासुन डॉ़क्टरा.न्च्या सल्ल्याने ते त्या.न्च्या सध्याच्या आहाराला आवश्यक इतक इन्सुलिन घेत असावेत. बाहेरुन आवश्यक इन्सुलिन घेतल्यास गोड खाउन सुध्धा साखरेचा चयापचय निरोगी व्यक्ति.न्प्रमाणे राखता येउ शकतो हे त्या.ना सा.न्गायच असाव. ते नियमीत पणे रक्तचाचणि करतात अस नसत तर ते रक्त चाचनीत दिसल असत.

Pages