ओडिशा: आंबखटा - कैरीची आंबटगोड चटणी

Submitted by सावली on 14 April, 2014 - 04:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैरी - १
गुळ - कैरी एवढा
मिरच्या - २/३
कडीपत्ता
पंचफोडण ( मोहोरी, जीरं, मेथी, कलौंजी, बडीशेप ) - १ छोटा चमचा
लसुण - २ पाकळ्या
आलं - साधारण लसुणाइतकेच
मीठ - चवीपुरते
तेल - फोडणीला
तिखट - ऑप्शनल

क्रमवार पाककृती: 

कैरीची सालं काढुन छोट्या फोडी करुन घ्या.
एका भांड्यात घालुन, फोडी बुडतील एवढे पाणी घालुन शिजवुन घ्या. शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल. कैरी पुर्ण शिजली पाहीजे. हवे असल्यास शिजताना आणखी थोडे पाणी घाला.
कैरी शिजल्यावर दुसर्‍या एका कढईत तेलाची फोडणी करा. त्यात पंचफोडण घाला, ते तडतडले की मिरच्या कडीपत्ता घाला. आलं आणि लसुण ठेचुन घाला. हवे असल्यास हळद घाला. हे किंचीत परतल्यावर शिजलेली कैरी त्यातल्या पाण्यासकट फोडणीत घाला आणि उकळी येऊ द्या. हवे असल्यास थोडे तिखट घाला.
आता मीठ आणि गुळ घालुन गुळ विरघळेपर्यंत शिजू द्या. चमच्याने ढवळुन कैरी थोडी मॅश करा.

चिंच खजुराच्या पातळ चटणी इतकी पळीवाढ असावी.

पोळीबरोबर , वरण भाताबरोबर किंवा डीप म्हणुनही छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

- डिप म्हणुन करणार असाल तर अजुन थोडी घट्ट करायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
सा.बा.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच्या बंगाली आवृत्तीत आलं-लसूण-मिरच्या-कढीपत्ता गायब असतं. गुळाच्या जागी साखर असते. पण एकुणात प्रकार मस्तच असतो. विशेषतः कडक उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या शेवटी ओरपायला Happy

हे वाक्य राहीले होते "शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल." ते वर लिहीलेय.
वरदा, हे काल केले होते आणि उरलेले फ्रिजमधे ठेवले होते. आत्ता तु म्हणालीस म्हणुन मी जेवणानंतर नुसते पिऊन पाहीले. गारेगार मस्त लागले. Happy

सावली Happy
बंगाल्यांमधे चटणी (आणि त्याबरोबर पापड) हे जेवणाच्या शेवटी खायचे पदार्थ. मुखशुद्धी उत्तम होते. यानंतर हातबित धुवून मिठाई...
तळीराम तृप्त!!

परवा महाराज भोज मध्ये अशीच कैरीकी सब्जी होती त्याची पाककृती अशीच असेल ? एक बार करको देखतुं.
तिथे तीन दा मागून घेउन खाल्ली.

कसली मस्त रेसीपी आहे. कधी एकदा करून बघीन अस झालय.
सावली, अगं कित्ती मस्त फोटो काढत असतेस. रेसीपीचे फोटो तुझ्याकडून मस्ट आहे. Happy