१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन.
खूप प्रेरणादायी लेखन आहे हे! बर्‍याच जणांना लिंक पाठवली. Happy

चहाबद्दलची टिप उपयोगी आहे. पण तल्लफ भागली, की उरलेला चहा टाकून देण्याऐवजी मुळात घेतानाच अर्धा कप भरून घेतला तर??
(मी दिवसभरात एकदाच कॉफी पिते; अगदी क्वचित दोनदा. पण गेली दोन वर्षं मी कपभराऐवजी अर्धा कपच घ्यायला सुरूवात केली आहे. पहिले काही दिवस चुकल्या-चुकल्यासारखं वाटायचं. आता सवय झाली. आता कुणी कपभर कॉफी दिली, तर ती संपवायची कशी असा प्रश्न पडतो.)

नॉनव्हेजबद्द्लचा प्रश्न माझ्याही मनात आला होता. पण त्याचं निरसन झालं. अजून एक प्रश्न म्हणजे - आहारात भाताचा समावेश नाहीच का?

धन्यवाद केदार ,,, pls share address / contact details for डॉ वंदना फाटक
I would like to go and meet with her.... hopefully i wil have my story here after 7 months Happy

अभिनंदन !!! Happy
एवढ अवघड काम, खुप साध-सरळ-सोप्प सांगितल आहे. वाचुन वाट्त कि हे आपल्यालाही सहज जमु शकेल Happy

धन्यवाद ललिता-प्रिती ,

चहाबद्दलची टिप उपयोगी आहे. पण तल्लफ भागली, की उरलेला चहा टाकून देण्याऐवजी मुळात घेतानाच अर्धा कप भरून घेतला तर?? >> चालेल ना . मोस्टली मी आमच्या ऑफिसच्या मशिनचा प्यायचो , त्यात एक कप यायचाच म्हणून Happy
घरी आपण हवा तेवढा घेऊ शकतोच .

अजून एक प्रश्न म्हणजे - आहारात भाताचा समावेश नाहीच का? >>
मी तरी
अर्धी मोठी वाटी (बाऊल) भात == १ चपाती == १/२ भाकरी == १/२ पुरणपोळी
हे समीकरण ठेवल होत

म्हणजे २ चपाती ऐवजी १ वाटी भात , १ भाकरी किंवा १ पुरणपोळी .
भात खायला माझ्या मते काही अडचण नाही , पण २ गोष्टी .
१ . माझ्या मते तरी २ चपाती वर जेवढा पोट भरल्याचा फील येतो ते १ वाटी भातानंतर येत नाही.
२ . आणी २ चपाती बरोबर जेवढी भाजी/उसळ्/डाळ खाल्ली जाती ती १ वाटी भातानंतर मला खाता येत नाही

मनापासून अभिनंदन केदार Happy मेहनत बिल्कुल रंग लायी है! इथे सविस्तर एकाच धाग्यावर लिहिलंस ते बरं केलंस.. आमच्यासारख्या इच्छुकांना सोपं केलंस एकदम.
आवडत्या १०त!! कायमसाठी...

जग जिंकल्यासारखं वाटत असेल ना रे आता? Happy

कीप इट डाउन.>> अगदी!! Happy

अभिनंदन केदार Happy मेहनत बिल्कुल रंग लायी है! इथे सविस्तर एकाच धाग्यावर लिहिलंस ते बरं केलंस.. आमच्यासारख्या इच्छुकांना सोपं केलंस एकदम.
आवडत्या १०त!! कायमसाठी...

जग जिंकल्यासारखं वाटत असेल ना रे आता? Happy

कीप इट डाउन.>> अगदी!! Happy

रोज सायकलींगने गुडघे दुखत नाहीत, मला खूप दुखतात.
पण जाडी ़ वाढली की माणूस खूप विचित्र दिसतो हे पटलेय.

,,,,

केजा,
रोज पुरण्पोळी.
टायपो नाहीना? >>
नाही रोज नाही , पण सणादिवशी खावी वाटली/लागली तर २ चपात्याऐवजी १च खायची .

रोज सायकलींगने गुडघे दुखत नाहीत, मला खूप दुखतात. >> मला तर उलट बैठी सायकल हा चांगला व्यायाम सांगितला होता गुडघ्यांसाठी

पण जाडी ़ वाढली की माणूस खूप विचित्र दिसतो हे पटलेय. >>
झंपीजी , तस असेलही Happy
पण माझ्या मते वजन कमी करण्याच मोटीवेशन ते नसाव , किमान माझ तरी नव्हत .
कारण त्यामुळे तुम्ही लवकर परिणाम दिसावे म्हणून अती व्यायाम किंवा अती कमी खाणे करू शकता .
किंवा अरे काहीच बदल दिसत नाहीये म्हणून सोडू ही शकता.

पहिले ३-४ महिने माझ पोट अजिबात कमी झाल नव्हत . इन फॅक्ट दिसण्यासारखा बदल साधारण ५-६ व्या महिन्यापर्यंत (२० किलो कमी होईपर्यंत नव्हता)
हेल्दी व्हाव , हार्ट अन गुडघ्यावरचा ताण कमी व्हावा ही अपेक्षा होती . दिसणे तर बायप्रॉडक्ट आहे Happy

हॅट्स ऑफ केदार!!! फोटोंवर विश्वासच बसत नाहिये!! Happy त्रिवार अभिनंदन!
किती प्रांजळपणे आणि कळकळीने लिहिलाय सगळा प्रवास! खरंच, एवढं(स)च खाऊन राहता येतं?? मुद्दे ३-६ मधल्या मुख्य खाण्यांमधे ४-४ तासांची गॅप आहे.... मधे पोट रिकामं नाही वाटत? त्यामुळे पित्त नाही होत? आणि रात्रीचं जेवण ८ च्या आत संपायला हवं ना? अर्थात, व्यक्तीसापेक्ष फरक पडत असणारच.
व्यायामाच्या टीप्स मात्र खरंचच उपयोगी आहेत!! Happy
हेल्दी व्हाव , हार्ट अन गुडघ्यावरचा ताण कमी व्हावा ही अपेक्षा होती . दिसणे तर बायप्रॉडक्ट आहे .>>> हे ही खूप आवडलं!
इथे लिहिल्याबद्द्ल धन्यवाद!!! Happy

सुरुवातीपासूनच तुझ्या कन्सेप्टस खुप क्लिअर होत्या केदार, ते मला या सगळ्यात सर्वात महत्वाचं वाटलं. तू वरती ज्या महत्वाच्या आणि उत्तम टिपा दिल्यायस, त्यात ही पण लिहायला हवी खरंतर... कशाकरता वजन कमी करायचंय ते आधी नीट लक्षात घेतलं तर पुढचा मार्ग स्मूथ होईल बहुतेक. आणि ते कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं.

इतक्या पोस्टी ?? म्हणजे वजन कमी करणेच्छुक भरपुर आहेत तर. आता सहा महिन्यात यातले किती जण कमी करतात वजन पाहु. इथेच लिहा सहा महिन्यानंतर काय झाले ते.

धन्यवाद ओवी आणि सई Happy

ओवी ,
मुद्दे ३-६ मधल्या मुख्य खाण्यांमधे ४-४ तासांची गॅप आहे.... मधे पोट रिकामं नाही वाटत? त्यामुळे पित्त नाही होत? आणि रात्रीचं जेवण ८ च्या आत संपायला हवं ना? >>
एकदा सवय झाली की नाही वाटत , कारण आपण सकाळी प्रोटीन्स भरपूर घेतली असतात.
तुझ बरोबर आहे , जेवण ८ च्या आत व्हायला हव , पण तोपर्यंत घरीच पोचत नाही Happy मग काय जमेल तस .

केदार, पिंची मध्ये आहेस का रहायला.
एकदा भेटलो की अजुन जास्त हवा भरेल आणि पुन्हा सुरवात होइल माझी. Happy

कारण आपण सकाळी प्रोटीन्स भरपूर घेतली असतात >>> हम्म्म्.... शक्य आहे! Happy
साधना Happy सहा महिन्यांनी इथे लिहिता यावं असं मला कित्ती कित्ती वाटतंय! क्रॉस फिंगर्स!!

खत्त्त्तरनाक काम!!!
त्रिवार अभिनंद्न Happy

मी गेले अनेक वर्षे वजन वाढवता कसं येईल यावर कुणी लेख लिहील का हे आतुरतेने वाट बघतोय... Proud

चहाबद्दलची टिप उपयोगी आहे. पण तल्लफ भागली, की उरलेला चहा टाकून देण्याऐवजी मुळात घेतानाच अर्धा कप भरून घेतला तर??
>> हाच प्रश्न मलाही पडला होता. पण एवढ्या प्रचंड प्रयत्नांसमोर हा फालतु भोचकपणा नको म्हणून प्रश्न गिळणार होतो Proud

मी गेले अनेक वर्षे वजन वाढवता कसं येईल यावर कुणी लेख लिहील का हे आतुरतेने वाट बघतोय>>>> काय राव हाय ते बरं हाय कि Wink कमी असलं तर बिघडतं कुठे?

केदार्, पुन्हा अभिनंदन आणि स्टील आय एम टेलिंग, अ लॉट स्कोप फॉर बिझिनेस Happy

Pages