१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.pnghttps://www.facebook.com/photo.php?fbid=10152365342678833&set=a.10150157...

साधारण ८ वर्षापुर्वी मी वालचंद कॉलेज मधून उत्तीर्ण झाल्यावर सास्केन मधे जॉब सुरू केला , तेव्हा माझे वजन होते ७८ किलो . क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड (घरच्यांच्या भाषेत नाद), कधी कधी ट्रेकिंग , पोहणे यामुळे बर्यापैकी फिट होतो . हळूहळू कामाचा ताण , अरबट चरबट खाणे यामुळे वजन ८० , ८५ करत ९० ला कधी पोचले कळलेही नाही . तरी क्रिकेट चालू असल्याने थोडा दिलासा होता. पण एकामागून एक गुडघ्याचे अन हर्नियाचे ऑपरेशन झाल्यावर तेही बंद झाले . मग काय ९५ -१०० Sad . मधे प्रयत्न केलेच नाहीत असे नाही . जी एम डाएट , उपास, अगदी डाएटीशियन कडून ही डाएट घेऊन झाले , पण त्यात गांभीर्य नव्हते . मग काय सेंच्युरी पार . कळतय पण वळत नाही अशी स्थिती होती , आणि काटा १०५ ला पोचला . आणी मग ते घडल.
साधारण १२ ऑगस्ट ला अचानक छातीत दुखायला लागल , आमच्या डॉक्टर दातार(खरोखर देवमाणूस)नी रिस्क नको म्हणून TMT आणी इतर टेस्ट साठी क्रांती कार्डिएक क्लिनिक ला पाठवल अन तिथल वातावरण पाहून आणी आई, वडिल आणी बायकोच्या चेहर्यावरचे भाव पाहून मला जाणीव झाली की अरे हे आपण काय करून बसलोय ? तब्येतीच्या बाबतीत केलेला निष्काळाजीपणा चांगलाच महागात पडणार अस दिसत होत.
सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले . (दारू अन सिगरेट चे व्यसन नव्हते हा एक फायदा असेल कदाचित )
पण डॉ नी मला प्रचंड झापले ." तू सायन्सचा विद्यार्थी ना ? मग एखाद्या इंजिनला त्याच्या दीडपट लोडने चालवले तर खराब होणार च ना ? नीट जगायचे असेल तर आधी वजन कमी करा " मग त्यानीच मला डॉ वंदना फाटक या डाएटीशियनची चिठ्ठी दिली अन हा प्रवास सुरू झाला . (तशी त्यानी ती आधीही एकदा दिली होती पण त्यावेळी सिरियसनेस नसल्याने त्यांच्याकडे जाऊनही काही फायदा झाला नव्हता . ) पण आता वेळ वेगळी होती

खर तर वजन कमी करायच म्हटल तर अडचणी अनंत होत्या . एक तर रोजच ऑफिसच जेवण (आनंदी आनंद) , रात्री अपरात्री मिटींग . दुसर म्हणजे गुडघा अन पोटाच्या ऑपरेशनमुळे फक्त सायकलिंग , चालणे अन पोहणे च शक्य . त्यात दिवसातून १०-१५ कप चहाची सवय .पण आता ठरवल होत करायचच .

डाएटिशियन ने सांगितल्या प्रमाणे आहार सुरू केला . त्याचबरोबर स्वतःही प्रचंड वाचन चालू केल (पण त्याने उलट जास्त कन्फ्युझ होत Happy )

Equation was Simple
जेवढे कॅलरी खाल्ले जात होते , त्यापे़क्षा जास्त जाळायच्या , अन त्या जाळण्यासाठी (चरबीचे रूपांतर कॅलरीत होण्यासाठी ) प्रोटीन्स जास्त खायचे .
म्हणजे
१. कमी कॅलरी खाणे (साखर , तळलेले पदार्थ , बेकरी पदार्थ , मिठाया , कोल्ड ड्रिंक्स , पिझा ई ..)
२ . जास्त कॅलरी जाळणे ( कमीत कमी एक तास व्यायाम , चालणे किंवा सायकल)
३ . अन प्रोटीन्स जास्त खायचे (मोड , अंड्याचा पांढरा भाग , सोया , टोंड मिल्क )
४ . त्याचबरोबर हेल्थ साठी (फळे , पालेभाज्या इ .) जास्त खाणे

हे वर वर सोप असल तरी करण कठीण होत . पहिला अडथळा होता चहा .
पहिले २ दिवस चहा कमी केला तर अक्षरशः गडाबडा लोळेपर्यंत डोक दुखल .
मग यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो तो बंद केला .
हळू हळू सवय कमी होत गेली .
तेच जेवणा बद्द्ल , आपल्याला कल्पना नसते की आपण किती ग्रेन इटर असतो . २ चपात्या चहा बरोबर , भातावर एवढीशी आमटी , उसळी तर कधीच नाहीत. आधी हे सगळ बदलाव लागल . थोड थोड करत कर्ब्ज कमी अन प्रोटीन्स वाढवत गेलो .
त्याच बरोबर फळ आणी पालेभाज्यांच प्रमाणही वाढवल . कुठेही जाताना १-२ सफरचंद, संत्र बरोबर नेऊ लागलो .

वेळोवेळी थोडा थोडा आहार बदलत गेला तरी साधारण तो असा होता .
१. सकाळी ६ वाजता : १ ग्लास पाणी + आवळा रस/लिंबू
२. सकाळी ७ वाजता : १ कप चहा
३. सकाळी ९ वाजता : १ कप टोंड दूध + १ सफरचंद + १ वाटी मोड आलेले मूग/ओट्स
४. दुपारी १ वाजता : ऑफिसमधे २ चपाती + १ भाजी + १ उसळ + सॅलड्/कोशिंबीर + १ ग्लास ताक/लिंबू पाणी
५. संध्याकाळी ५ वाजता : २ इड्ली (चटणी नाही)/ साधा डोसा / सँडविच + १ मूठ फुटाणे
६. रात्री ९ वाजता : २ फुलके + १ भाजी (शक्य असल्यास पालेभाजी) + काकडी/टोमेटो

या सगळ्यात शक्य तितके कमी तेल वापरल .

या सगळ्यापे़क्षाही महत्वाचे होते म्हणजे नियमीत व्यायाम करणे . सुरूवातीला १० मिनीट चालयावर धाप लागायची . मग आज १५ , उद्या २० करत वाढवत गेलो अन मग रोज कमीत कमी १ तास चालणे (वेग हळू हळू वाढवत नेणे) वा सायकलिंग (बैठी) अन जमतील तेव्हा १०/१५ सूर्यनमस्कार हे रूटी न ठेवल .
काही झाल तरी यात खंड पडू दिला नाही . सकाळी नाही तर संध्याकाळी अन संध्याकाळी नाही तर रात्री ११ लाही व्यायाम केलाच .
आणखी एक महत्वाच म्हणजे बाहेरच्या खाण्यावर कंट्रोल ठेवल . कधी बाहेर खाव लागलच तर किती आणी काय खाव यावर ताबा ठेवला . उदा . ऑफिस पार्टी असेल तर सॅलेड , सूप वर जास्त जोर दिला . केएफसी
मधे गेलो तर एकच झिंगर बर्गर . तेच पाहुण्यांचही. जेवायला गेला सगळ्याना (प्रेमाने :)) सांगितल की डाएट करतोय . कधी एखादा दिवस जास्त खाण झाल तर पुढच खाण थोड कमी .

साधारण १-२ महिन्यात परिणाम दिसायला सुरूवात झाली. वजन तर कमी झालच पण स्टॅमीना अन रोग प्रतिकार शक्तीही वाढली . साधारण ४ महिन्यानंतर पोट कमी व्हायला लागल Happy आणी ७ महिन्यानी तर वर पाहिलच असेल Wink
या सगळ्यात तेवढच श्रेय कविताला , माझ्या बहिणीला आणी आईलाही आहे.
प्रयत्न अजूनही चालूच आहेत , टारगेट ७४-७५ आहे ,पाहूया जमतय का ? Happy

मोस्ट इंपॉर्टंट टीप्स ( काही अनुभवाचे बोल )
१. वरच्या आहारात जिथे शक्य नाही तिथे थोडीशी अॅडजस्ट्मेंट करायची (सॅलड नसेल तर फक्त काकडी खायची , उसळ नसेल तर सकाळचे मूग परत खायचे) ऑफिस पार्टी असेल तर सूप , सॅलड वर भर देऊन शेवटी फक्त थोडा दाल राईस घ्यायचा . पण कसल्याही परिस्थितीत पूर्ण कंट्रोल सोडाय्चे नाही.
२. व्यायाम कधीही केला तरी तितकाच फायदा देतो . सकाळी नाही जमला तर रात्री करा, पण चुकवू नका.
३. आपली लाईफस्टाईल अॅक्टीव्ह करा (१ तासाने ऑफिसमधे छोटीशी चक्कर मारा. जिने चढा. कॅरम ऐवजी टेबल टेनीस खेळा . पाण्याची बाटली जवळ ठेवण्याऐवजी तिथे जाऊन दर १-१.५ तासाने पाणी प्या)
४. सर्वात महत्वाचे म्हणजे मी डाएट करतोय याचा अभिमान बाळगा, लाज नको.
लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका.
आणि विश्वास ठेवा, एकदा तुमच्यात बदल दिसून यायला लागले की आधी कुचेष्टा करणारेही कौतुक करतील आणी टीप्सही मागतील Happy
५. फळांचे ज्यूस घ्यायचे असतील तर बिन साखरेचे घ्या , चहा लगेच सोडता येत नसेल तर जेवढा पिल्यावर तलफ भागेल तिथून टाकून द्या (हा उपाय मला फार कामी आला , चहा पिला नाही तर मासे डोके दुखायचे, अन्न टाकून देणे वाईट आहे मान्य , पण नको असताना पोटात टाकणे जास्त वाईट ना Happy )
६. डाएट एंजॉय करा , अकारण कमी खाऊ नका . त्यामुळे फक्त अशक्तपणाच येतो . फळे (चिक्कू , केळ आणी आंबा सोडून), हिरव्या भाज्या हव्या तितक्या खा .
७. शक्य असल्यास वजन करण्याचा काटा खरेदी करा . (साधे ५०० रू पासून आणी डिजिटल १००० रू पासून येतात) . त्यामुळे आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे कळते. डाएट न करणार्यानाही त्याचा फायदा होतो डोळा मारा
८ . वजन कमी होण्याचा वेग जितके जास्त दिवस तुम्ही डाएट कराल तितका वाढतो , तेव्हा सुरूवातीलाच हे काही जमत नाही म्हणून सोडू नका.
९ . "आज एका दिवसाने काय होतय " हा विचार सगळ्यात घातक . तो एक दिवस येऊ देऊ नका Happy
१० . आपल्याला हेल्दी व्हायचय , वजन फक्त एक पॅरामिटर आहे हे ध्यानात ठेवा .

बाकी सौ बात की एक बात अन स्वत: खाल्लेल्या चटक्यातून आलेल्या शहाणपणातून दिलेला फुकटचा सल्ला Happy
निरोगी राहून वजन कमी करायचे असल्यास (अन ते तसे टिकवायचे असल्यास) आहारावर नियंत्रण व व्यायामाला पर्याय नाही .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्सॉलिड प्रवास...रोज ६ किमि या रेटनी चालला असाल तर १२७८ किमि गेलात कि ७ महिन्यात!! लगे रहो बॉस्स्स्स!!

सगळ्या चालणार्‍यांची सोबतीण....स्वरा!

वॉव जबरीच!! तुम्हाला पोतंभर सॅलड बक्षिस!! Happy
खूप आवडला लेख. त्यात कळकळ , प्रामाणिकपणा व साधेपणा आहे. तुमचं कौतुक!

माझाही सेम प्रॉब्लेम आहे , चहा. ३-४ कप होतो चहा. आणि अगदी अवघड जातं सोडवणं. पण गेले महिनाभर मी ही प्रयत्न करत आहे. तुमचा सल्ला आवडला. करून बघते.

झक्कास, तुम्ही म्हणजे एकदम आली लहर केला कहर प्रकारात मोडता.
तुम्ही अधून मधून लिहीत होताच तुमच्या या प्रवासाबद्दल पण १०५ ते ७७ खरच अविश्वसनिय आहे. तुम्ही हे करतांना खूप चिकाटी दाखवली असणार हे नक्की. अभिनंदन. एक सॅलड पार्टी हवीच सेलीब्रेट करायला.
मला फक्त(!) ५/६ किलो कमी करायचे आहेत तरी बापरे कधी होणार असे वाटतेय.

अभिनन्दन केदार.
असो. वजन वाधायची लढाई आयुश्यभर असते तेंव्हा उत्तम दिनचर्या चालुच ठेवा.

असो.. भारतीय/मराठी आहारामधे कर्बोदके जास्त असतात हा समज चुकीचा आहे. आपणच भाज्या महाग आहेत, बटाते आवडतात, एका चपातीने काय होतय अशा कारणाने चुकिचे नेहमी पोटभर जेवतो आणि पोट व वजन वाढवतो...

@गौरांग: Toned दुध म्हणजे साय काढलेले किंवा नॉन-fat दुध.

केदार, तुमचे खरोखरच खूप कौतुक वाटते. एव्हडे महिने जिद्दीने मनावर निग्रह ठेवणे सोपे नाही!

मस्तच. एकदम हँडसम रिझल्ट हां. Happy आणि कित्ती सोप करून लिहिलय तुम्ही ते.
मला वजन कमी करण्याची गरज नाहीये पण तुम्ही लिहिलेल्या हेल्दी लाईफ स्टाईलचा उपयोग नक्की होईल.

मागच्या महिन्यात सायकल गटगला भेट झाली तर मी चक्रावलो होतो. अभिनंदन परत एकदा !

फोटो मुळे लेख इतरांना प्रेरणादायी नक्कीच होईल.

टोण्ड दूध म्हणजे इथलं स्किम्ड मिल्क का?
हा फोटो नवर्‍याला दाखवून वजनातली घट सांगितल्यावर् नवरा म्हणे 'छ्या, हा खरा फोटो नसणार' तेव्हा मायबोलीवर असं खोटं कुणी लिहीणार नाही हे सांगावं लागलं Wink
बायदवे, तुम्ही वेजिटेरियन का? डाएटमध्ये फिश, चिकनचा उल्लेख दिसला नाही म्हणून विचारतेय.

<<<<<<मुक्तेश्वर कुळकर्णी | 2 April, 2014 - 07:56

मी फक्त ५८, किलोचा - दोन टाईम जेवण, २ टाईम चहा, ऑफिसात क्वचित चहा पितो.
सकाळी १० ला जेवलो की घरी रात्रई ८, ८.३० मग शतपावली, सकाळी गच्चीवर येरझारा, सुर्यनमस्कार
>>>>

मुक्तेश्वर , तुमच्च्या दोन जेवणांमध्ये दहा तासांचा फ़रक. मध्ये तुम्ही काहीच खात नाही? जर तसे असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ही हेल्दी सवय नसावी. माबोवरच्या डॉंक्टरांनी/आरोग्यतज्ञांनी कृपया हे चूक की बरोबर सांगावे.

धन्यवाद बस्के, रूनी ,चिनूक्स, गौरांग , सुसुकु , ज्ञाती , फारेंड , पल्लवी , सीमा , सायो , केदार , सशल , स्वाती , शैलजा , बोबडे बोल , विजिगीषु Happy

Toned दुध म्हणजे साय काढलेले दुध / स्किम्ड मिल्क किंवा घरी साय काढलेले ही चालेल.

सायो ,
तुम्ही वेजिटेरियन का? डाएटमध्ये फिश, चिकनचा उल्लेख दिसला नाही म्हणून विचारतेय. >> नाही Happy

अंडी बर्याचदा मोड आलेल्या मूगाना पर्याय म्ह्णून खाल्ली .
साधारण आठवड्यातून एकदा फिश , एकदा चिकन खाल्ले . फक्त तळून नाही Happy
फिश , चिकन , अंडी यामधे भरपूर प्रोटीन असते , पण आपण ती तळून अन खोबरे , तीळ घालून त्यांचा पार सत्यानाश करतो .

व्यायाम सवय झाल्यानंतर नाही केला तर कस तरी वाटू लागत .>>>>> +१११
मी सध्या हेच अनुभवते आहे
एक दिवस जरी नाही केला तरी चुकल्यासारखे होते

अभिनंदन केदार
लेख माहितीपूर्ण आहे
टिप्स एकदम उपयोगी आहेत

Pages