मसूरची खिचडी

Submitted by अवल on 26 March, 2014 - 00:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ २ वाट्या ( आंबेमोहोर सोडून कोणताही )
मोड आलेले मसूर १ वाटी
कांदे ३
सुके खोबरे किसलेले - अर्धी वाटी
हळद, तिखट, मीठ , हिंग चवी प्रमाणे
दालचिनी, २ तुकडे
मिरे ५-६
लवंग ४-५
लसूण ६-७ पाकळ्या
तेल
ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबू, साजूक तूप, पापड, लोणचे सोबतीसाठी

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळत ठेवावेत
मोड आलेले मसूर निवडून धुवून निथळत ठेवावेत
२ कांदे उभे चिरावेत, एक बारीक चिरावा
कढईत २ चमचे तेल टाकावे त्यात उभा चिरलेला कांदा मंद आचेवर परतावा. त्यातच दालचिनीचा १ तुकडा, सर्व लवंगा, सर्व मिरे, सर्व लसूण टाकावेत. कांदा चांगला तपकिरी झाला की ते सगळे मिक्सरमध्ये घ्यावे. आता त्याच कढईत सुके खोबरे भाजावे. चांगले लाल करावे. आता तेही मिक्सरमध्ये टाकावे. आता हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, थोडे पाणी टाकून गुळगुळीत वाटावे.
एकीकडे ४-५ वाट्या पाणी गरम करत ठेवावे. दुसरी कडे जाड बुडाचे पसरट पातेले आचेवर ठेवावे. त्यात ४ चमचे तेल टाकावे, त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकावा. त्याचा खमंग वास आला की त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा परतावा. आता त्यात मसूर टाकावेत. त्यात हळद टाकावी. २ मिनिट परतावे. आता त्यात तांदूळ टाकावेत तेही २ मिनिट परतावेत. आता त्यात तिखट घालावे, वाटलेला मसाला टाकावा आणि सर्व मंद आचेवर ५-७ मिनिट छान परतावे. खमंग वास सुटला पाहिजे.
मग त्यात आधनाचे पाणी घालावे.
चांगली उकळी आली की मीठ टाकून उकळू द्यावे. पाणी आळत आले की आच बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. सधारण १० मिनिटांनी आच विझवावी. त्यानंतर ५ मिनिट वाफ खिचडीतच जिरू द्यावी.
वाढताना खिचडीची मूद, त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर, साजूक तुप, लिंबू ठेवावे. बाजूला पापड, लोणचे वाढावे .

वाढणी/प्रमाण: 
वन मील असेल तर दोघांना, ताटातील एक प्रकार असेल तर चार जणांना
अधिक टिपा: 

यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे परतणे. कांदा, खोबरे आणि नंतर संपूर्ण खिच्डी आधण घालण्याआधी परतणे. यात अजिबात कंटाळा करायचा नाही Happy
फोटो नेक्स टाईम.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सीकेपी पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, खूपच चवदार लागेल असं वाटतंय, करुन बघेन नक्की.
तुमची मसुराची अजून एक सोपी रेसिपी, मसुराचे खाट्ट, पण खूप आवडली होती, आता नेहेमी केली जाते घरी.

अवल, मस्त! Happy

साधना, मुगाच्या डाळीच्या खिचडीसाठीही आपण चांगलं परततोच की तांदूळ ओपेक दिसू लागेपर्यंत.

अरे वा! मस्तच. बर्‍याच दिवसांत खाली नाहीये मी. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद गं.

रच्याकने, मायबोलीवर झाकणाकरता अनेक क्रियापदं वापरली जातात हे लक्षात आलंय. झाकण लावणे, झाकण मारणे, झाकण टाकणे, झाकण ठेवणे, झाकण घालणे. Happy

ह्यातील फक्त झाकण ठेवणे बरोबर आहे. >>>> म्हणेनात काहीही. त्यांच्या दृष्टीने 'झाकण ठेवणे' चुकीचं असू शकतं. मी फक्त माझं निरीक्षण नोंदवलं. बोलीभाषेत विविधता असणारच.

>> म्हणेनात काहीही. त्यांच्या दृष्टीने 'झाकण ठेवणे' चुकीचं असू शकतं. मी फक्त माझं निरीक्षण नोंदवलं. बोलीभाषेत विविधता असणारच.<<
अच्छा, अस आहे का? तुमचे ते निरिक्षण होते. मग मी माझा मत/अंदाज सांगितले/ला हे लक्षात आले असेलच ना. माझे बरोबर म्हटले म्हणजे इतर चुकीचे आहेत असे नाही ना म्हटले मी, हे तुम्हाला कळले नाही का(नसावेच बहुधा)?

आरती, आज लगेच केली ही खिचडी. मस्त झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. Happy
पुढच्यावेळी केली की फोटू डकवेन इथे. आज संपून गेली; त्यामुळे राहिला फोटू.

मस्त वाटतेय रेसिपी, नेहमीच्या मुगाच्या वगैरे खिचडीपेक्षा.
विकेंडला बरी म्हणजे वाटण-घाटण वेळ मॅनेजमेंट करता येईल. Happy

सायो मसुराला मोड आणून उसळ केलीस तर ती पण यमी लागते. माझा बर्^याच पॉटलकमध्ये हीट्ट मेन्यु आहे मेनली नॉन मराठी ग्रुप्समध्ये. बहुतेक त्यांना तो कन्सेप्टही माहित नाही.

विकेंडला बरी म्हणजे वाटण-घाटण वेळ मॅनेजमेंट करता येईल >>> मी २-३ महीन्यासाठी कन्दा-खोबर वाटण छोट्या-छोट्या डब्यात घालून फ्रीझरमधे ठेवते. same with ginger-garlic paste.

मस्त रेसिपी आहे ..

मसूराची खिचडी मृ नेही दिली आहे .. वर लिंक आहेच .. दोन्ही रेसिपीज् छान आहेत पण त्यात काही फरक आहेत .. मृ ला कोणीतरी कायम ह्यावरून बोलायचं बहुतेक (;)) पण तीने टोमॅटो घालायला सांगितलं आहे, सुकं खोबरं नाही आणि आलंही वापरायला सांगितलं आहे .. साजूक तूप ही शिजताना घालायला सांगितलं आहे ..

तर मी टोमॅटो वगळून दोन्ही रेसिपीज् एकत्र करून केली खिचडी .. अप्रतिम झाली आहे ..

एक हिरवी मिरची घालायचाही मोह आवारला नाही .. चव आवडलीच मात्र लेकाकरता थोडी तिखट झाली ..

धन्यवाद मरु आणि तुला, ह्या रेसिपी करता .. Happy