स्वप्न आणि वास्तव - भाग २ ( अंतिम )

Submitted by बोबो निलेश on 19 February, 2014 - 14:57

वाचा - स्वप्न आणि वास्तव - भाग १
-----------------------------------------------------------------------------------------
"अगं याच्या डोक्यात लेखक बनण्याचे खूळ शिरले आहे. काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी मासिकात त्याने केतन भगतची मुलाखत वाचली. त्याने मुलाखतीत म्हटले, "फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." झाले, यांनी ते नको तितके सिरीयसली घेतले. जॉब सोडतो आणि पूर्ण वेळ लेखक बनतो म्हणताहेत.ऐकायलाच तयार नाहीत.काही दिवसापूर्वी रात्र रात्र जागून कसलीशी कादंबरी लिहिली म्हणे. अगं त्या केतन भगत चे ठीक आहे. त्याची बायको आहे आय आय एम वाली.भले त्या केतनची पुस्तके नाही खपली तरी ती त्याला आयुष्यभर पोसू शकेल. पण यांना हे कळेल तर शपथ.शिवाय केतनला पैसा मिळाला तो इंग्रजी पुस्तके लिहून. पण हे लिखाण करणार मराठीमध्ये. मराठी लिखाणात कुठला आलाय पैसा. मला एक तरी मराठी लेखक दाखव जो पूर्ण वेळ लेखक होता. एक तर सध्या रिसेशनच्या काळात हातात असलेला जॉब टिकवणे लोकांसाठी कठीण झाले आहे. आजूबाजूला रिसेशन मुळे जॉब गमावलेल्यांच्या गोष्टी ऐकल्या कि फार भीती वाटते. पण हे काही ऐकायलाच तयार नाहीत."
"अरे देवा",निशासुद्धा आता पुरती विचारात पडली.अचानक तिला मार्ग सुचला."सरिता, माझ्या ओळखीचे एक सायकीयाट्रीस्ट, आहेत, डॉ. बर्वे. आपण त्यांचा सल्ला घेतला तर?" "हं..",सरिताला निशाच्या बोलण्यात अर्थ जाणवला.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. ह्या वेळेला कोण आले असेल सरिताला प्रश्न पडला. तिने दरवाजा उघडला. दारात एक मध्यमवयीन सुखवस्तू दिसणारे गृहस्थ उभे होते. "रोहन काळे साहेबांचे घर हेच का?",त्यांनी पृच्छा केली. "आपण?", सरिताने विचारणा केली. रोहनला साहेब म्हणणारे हे गृहस्थ कोण असा तिला मनात विचार पडला होता. "आत आले तर चालेल ना?",त्यांनी विचारले. "माफ करा. याना आत." ते गृहस्थ आत येऊन खुर्चीवर बसले."आपण त्यांच्या पत्नी का?"त्यांनी विचारले."हो",सरिताने म्हटले. त्यांनी खिशातून एक एन्वलप काढले. "काळे साहेब घरात नाहीत?", त्यांनी विचारले. "नाही, ते ऑफिस मध्ये गेले आहेत." "काय, ते अजूनही ऑफिसला जातात?",त्या गृहस्थांनी विचारले. "म्हणजे? काय म्हणायचे आहे तुम्हाला?"सरिताच्या काळजात धस्स झाले. "रोहनचा जॉब सहीसलामत आहे कि नाही? आणि जर जॉब गेला असेल तर तो ऑफिस च्या नावाखाली गेला तरी कुठे?",तिच्या मनात एका क्षणात नाना प्रकारचे विचार येऊन गेले. तेवड्यात ते गृहस्थ हसत म्हणाले, "अहो वहिनी, गैरसमज नको. मला म्हणायचे होते कि त्त्यांना आता जॉब करायची काय गरज आहे? आता जॉब सोडायला सांगा." "म्हणजे?",सरिताने गोंधळून विचारले. निशाच्या चेहऱ्यावर सुद्धा गोंधळ होता. "हा घ्या चेक पाच लाखांचा",त्या गृहस्थांनी चेक पुढे केला."काय पाच लाख? पण कशाबद्दल?" "घ्या, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही?",आता बुचकळ्यात पडण्याची पाळी त्या गृहस्थांची होती.
"अहो वहिनी, काळे साहेब आता सेलेब्रिटी झाले आहेत. स्टार रायटर. एक प्रसिद्ध लेखक.मी मेहता प्रकाशनचा मालक. तीन महिन्यांपूर्वी काळे साहेबांनी त्यांच्या एका कादंबरीचे हस्तलिखित माझ्याकडे दिले. खरेतर आमची संस्था फक्त प्रतिथयश लेखकांचीच पुस्तके छापते. मी ते बाड खरतर अडगळीतच टाकणार होतो. पण सहज वाचायला गेलो आणि वाचतच गेलो. जादू आहे वहिनी काळे साहेबांच्या लेखणीत. सरस्वतीचे वरदान आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. नुसती माउथ पब्लिसिटी. वाचकांच्या नुसत्या उडया पडल्या पुस्तकावर.गेले दोन महिने पुस्तक बेस्ट सेलर लिस्ट वर पहिल्या नंबर वर आहे. हजारो वाचकांनी ऍडवांस बुकिंग केले आहे पुढील आवृत्तीसाठी."
न राहवून निशाने विचारले,"हि कादंबरी आहे तरी कशाबद्दल?" मेहतांनी उत्साहाने सांगू लागले,"अहो, ही कथा आहे एका सेल्समनची. तो सेल्समन म्हणून फारसा यशस्वी होऊ शकत नाही. याचे दुखः लपवण्यासाठी तो त्याला हव्या असलेल्या यशस्वी आयुष्याची कल्पना तो करू लागतो. आपण यशस्वी सेल्समन झाल्याची दिवास्वप्ने पाहू लागतो. आणि त्यात तो इतका गुंततो कि सत्य आणि स्वप्न यात त्याची गल्लत होऊ लागते. स्वप्नातले आयुष्य खरे असल्याचे त्याला भास होऊ लागतात. आयुष्यातल्या अश्या वाईट पॅचमधून तो जात असताना त्याच्या वाचण्यात एक मुलाखत येते. त्या मुलाखतीतला संदेश त्याला भावतो,"फॉलो युवर ड्रीम्स, तुमची स्वप्ने पूर्ण करा." त्याच्या मनातली पूर्वीपासून सुप्त असलेली लेखक बनण्याची इच्छा उसळून वर येते. तो हे त्याची फॅमिली आणि मित्र यांच्याशी बोलतो,पण ते त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला या वेडेपणापासून परावृत्त करू पाहतात. पण आता त्याचा निश्चय ठाम असतो. तो त्याची पहिली कादंबरी लिहितो आणि प्रकाशकांचे उंबरठे झिजवतो. बर्याच ठिकाणी निराशा पदरी पडल्यावर शेवटी एक प्रकाशक ती प्रकाशित करतो आणि.... रेस्ट­ इज हिस्ट्री...." मेहता पुढे बरेच काही बोलत होते. सरिता भान हरपून ऐकत होती. नकळत एक चुकार अश्रू तिच्या गालावर ओघळला. तो अश्रू अर्थातच आनंदाचा होता..

============================ समाप्त ============================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी हो अस्सच होत होऽऽ माझ पण! Sad आमच्याहिला मुळी कौतुकच नै ! Proud
मग मी बसतो आपला लिहीत, माबोवर! स्वतः एकही धागा काढायचा नाही....... कॉन्फिडन्सच नै ना....., फक्त प्रतिक्रियात्मक लिहायचे! तेवढेच जमते .... आता प्रतिक्रियान्ना हो कुठला प्रकाशक भेटायला? असो.

छान लिहीलय, थोडक्यात पण बराच आशय.

माझंही असंच आहे....
अगदी अगदी हो अस्सच होत होऽऽ माझ पण! Sad आमच्याहिला मुळी कौतुकच नै !
मग मी बसतो आपला लिहीत, माबोवर! स्वतः एकही धागा काढायचा नाही....... कॉन्फिडन्सच नै ना....., फक्त प्रतिक्रियात्मक लिहायचे! तेवढेच जमते .... आता प्रतिक्रियान्ना हो कुठला प्रकाशक भेटायला? असो.