स्वप्न आणि वास्तव - भाग १

Submitted by बोबो निलेश on 17 February, 2014 - 22:05

मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले. "अरे जरा उघडून तर पहा.",मॅनेजरसाहेब हसत म्हणाले.रोहनने धडधड्त्या छातीने आणि थरथरत्या हातांनी एन्वलप उघडले. आतला कागद उघडला आणि वाचायला सुरुवात केली. "कंपनी ला हे कळविण्यास दुःख होत आहे कि वाईट परफॉर्मंसमुळे आपल्याला कामावरून काढून टाकण्यात येत आहे." रोहन चमकला. "सर, याचा अर्थ काय?" त्याने मॅनेजरसाहेबांकडे पहात विचारले. एव्हाना रोहन कडे पाहून मंद स्मित करणाऱ्या मॅनेजरसाहेबाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मंद प्रेमळ स्मिताचे रुपांतर गडगडाटी खुनशी हास्यात झाले. "मूर्ख माणसा, याचा अर्थ तोच, जो तू लेटर मध्ये वाचलास. स्टार कसला, अरे तू तर फ्लॉप सेल्समन आहेस. कुठल्याच महिन्यात तू टार्गेट पूर्ण केले नाहीस. याचा परिणाम शेवटी हाच होणार" असे म्हणून मॅनेजरसाहेबांचे हास्य अधिकाधिक विकट होत गेले."नाही, हे साफ खोटे आहे",रोहन कानांवर हात ठेवून जोरात किंचाळला आणि.... आणि त्याच क्षणी त्याचे डोळे उघडले. त्याला दरदरून घाम फुटला होता. सरिता त्याला हलवून विचारत होती" अहो काय झाले?असे किंचाळलात कशाला? काही वाईट स्वप्न पाहिलेत का?"

"हो, ते एक वाईट स्वप्नच होते.अग काही कळत नाही. मी माझ्या कंपनीमध्ये एक यशस्वी सेल्समन आहे.पण मला सतत अशी अपयशाची स्वप्ने का पडतात?" "जाऊ दे ना.तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी आहात. त्यामुळे अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करा.", सरिताने रोहनला समजवायचा प्रयत्न केला. "अगं दुर्लक्ष तरी किती करू? गेल्या काही दिवसात अश्या स्वप्नांची फ्रीक्वेन्सी वाढली आहे. काही तरी कायम स्वरुपी उपाय करायला हवा, ज्याने अशी स्वप्ने पडणे कायमचे बंद होईल. " "हो",सरिताने त्याला दुजोरा दिला.
असेच काही दिवस गेले.परिस्थिती फारशी बदलली नाही. उलट अधिकाधिक बिघडली. सरिताने एके दिवशी तिच्या खास मैत्रिणीला निशाला घरी बोलावले. कदाचित ती मार्ग सुचवेल अशी तिला आशा वाटली.निशाने सारे शांतपणे ऐकून घेतले.शेवटी ती म्हणाली,"अगं, अशी स्वप्ने पडतात बर्याचदा. त्याचे मनावर घेण्याचे कारण नाही. अश्या स्वप्नांचा विचार करणे त्यांनी थांबवले पाहिजे. तुझा नवरा यशस्वी सेल्समन आहे, त्यामुळे उगाचच काळजी करण्याची गरज नाही." सरिता यावर काहीशी गप्प झाली. तिला काही तरी बोलायचे होते, पण बोलावे कि नाही असा विचार ती करत होती. शेवटी मनाचा हिय्या करून ती बोलली,"निशा, तिथेच तर खरा घोळ आहे." "म्हणजे?",निशा सरिताच्या या बोलण्यावर बुचकळ्यात पडली. तिने प्रश्नार्थक नजरेने सरिताकडे पाहिले.सरिता बोलू लागली,"अगं मागच्या आठवड्यात मला यांच्या ऑफिस मधला सहकारी भेटला. त्याने मला काही वेगळेच सांगितले. रोहन स्टार सेल्समन वगैरे काही नाही. त्याचा कामातला परफॉर्मंस सामान्य आहे. "काय सांगतेस काय? "आता चकित होण्याची वेळ निशाची होती, "म्हणजे तुझा नवरा तुझ्याशी खोटे बोलतो." "कदाचित अगदीच तसे बोलता येणार नाही.रोहनला मी जेवढे जाणते त्यावरून सांगते, कि तो स्वप्नांच्या दुनियेत वावरणारा माणूस आहे.ऑफिसमध्ये परफॉर्मंस चांगला होत नसल्यामुळे तो असमाधानी असावा, त्यामुळे त्याने दिवास्वप्ने पाहायला सुरुवात केली असावी ज्यात तो स्वताला स्टार सेल्समन समजू लागला. पण आता प्रॉब्लेम हा आहे कि तो स्वप्नांची हि दुनियाच इतकी खरी मानायला लागला आहे. त्याच्यासाठी स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा धूसर झाली आहे." "अच्छा!",निशा म्हणाली,"हा प्रॉब्लेम आहे तर.." "अगं नाही",सरिता म्हणाली,"प्रॉब्लेम इथेच संपत नाही." "म्हणजे?",निशाचा गोंधळ काही संपला नव्हता. "अगं, अश्या या परीस्थीती मध्ये त्यांनी खरतर दिवास्वप्ने बघणे बंद करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण त्याच्या डोळ्यात आता वेगळेच खूळ शिरले आहे." "आता आणखी काय नवीन?",निशाने विचारले.

क्रमशः
वाचा - स्वप्न आणि वास्तव - भाग २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड