गूळपोळी

Submitted by मंजूडी on 17 January, 2014 - 04:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मायबोलीवर गूळपोळीच्या दोन उत्तम पाककृती आहेत - १. मनःस्विनीने लिहिलेली गूळपोळी २. सिंडीची खुसखुशीत करायला गेले गूळपोळी

आमचा गूळपोळी करण्याचा उत्साह बघून या दोन पाककृतींमधे लिहिलेल्या आणि चर्चिल्यापेक्षा वेगळं प्रमाण आमच्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखणार्‍या (कॉरा - सिंडी) आमच्या जन्मदात्रीने आम्हांस दिले आणि आम्ही यशस्वी झालो.
आम्हांला गूळपोळी करण्यास प्रेरीत करणार्‍या पूनम आणि सिंडीचे खास आभार! त्यांनी प्रेरणा दिली नसती तर आमची जन्मदात्री आम्हांस प्रमाण आणि पाककृती देण्यास कधीच धजावली नसती.

गेल्या वर्षी आणि यंदाही माझ्या हातून ह्या कृतीने पोळ्या उत्तम घडल्या. प्रमाण वेगळे आहे म्हणून फक्त इथे पाककृती लिहिली आहे.

गुळासाठी:
चार वाट्या शीगोशीग भरून चांगला गूळ - व्यवस्थित बारीक चिरलेला
एक वाटी बेसन
अर्धी वाटी तेल
अर्धी वाटी खमंग भाजलेल्या तीळाचं कूट
दोन चमचे भाजलेली खसखस
जायफळ, वेलची स्वादासाठी

पारीसाठी:
४ वाट्या मैदा
४ वाट्या कणीक
अर्धी वाटी बारीक रवा
१ वाटी तेल
चवीपुरतं मीठ
कणीक भिजवायला पाणी
पोळी लाटताना लावण्यासाठी तांदुळाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

१. तीळ कढईत घालून बारीक गॅसवर खमंग भाजून कूट तयार करा. खसखसही बारीक गॅसवरच भाजा. त्याच कढईत आता अर्धी वाटी तेल गरम करून त्यात बेसन चांगलं खमंग भाजा.
२. चिरलेला गूळ झाकणाच्या डब्यात ठेवून झाकण लावून कूकरमधे ठेवा. गॅस चालू करून कूकरच्या दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
३. कूकरचं प्रेशर पडलं की ताबडतोब डब्यातल्या गूळात भाजलेलं बेसन, तीळाचं कूट, खसखस मिसळा. आपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलचीपावडर घाला. हे मिश्रण कोमट झालं की हाताने चांगलं मळून घ्या. हा पोळीचा गूळ तयार झाला.
४. पारीसाठी कणीक, बारीक रवा आणि मैदा मिसळून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घालून अगदी कडकडीत गरम तेल घाला. चमच्याने ढवळत सगळ्या पीठाला ते गरम तेल लागेल असं पहा. मग लागेल तसं पाणी घालत आपण नेहमी पोळ्यासाठी कणीक भिजवतो तेवढी नरम कणीक भिजवून घ्या.
५. भिजवलेल्या कणकेचा लाडवाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करा. त्यात गोळ्याच्या साधारण दुप्पट गूळ भरून पारी बंद करून पोळी लाटा. पोळी लाटताना चिकटू नये म्हणून तांदूळाची पिठी भुरभुरवा.
६. चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी खमंग भाजा. ही पोळी एका बाजूने एकदाच भाजावी.
७. गरम पोळी खाऊ नका. जीभेला फोड येईल. पोळी गार झाली की त्यावर तुपाचा गोळा टाकून चवीचवीने खा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२-१५ पोळ्या होतात.
अधिक टिपा: 

पारीसाठी हे प्रमाण घेतल्यामुळे पोळी मस्त खुसखुशीत होते, मऊ पडत नाही. लाटायला सोपी आणि भाजतानाही गूळ शक्यतो पोळीबाहेर येत नाही, आला तरी संकटपरिस्थिती निर्माण होत नाही.

हा फोटो गेल्या वर्षीचा आहे, यंदा पुन्हा पोळ्या करेन तेव्हा हा फोटो बदलेन.

gulpolya.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मि पन केलि अशिच. (१४.०१.१४). . ला ( मनःस्विनीने लिहिलेली गूळपोळी २. सिंडीची खुसखुशीत करायला गेले गूळपोळी.).. नेट वर बघुन वर दिलेल्या पारिचे सामान आहे तसे. .अजुन आहे सारन .. केलि कि फोटो टाकते..

पहिल्यादाच केलि पन मस्त . झालि होती.....

स्व मे स्व दि ना.>>> पण कुठं कुठं मरायचं ? ;). हे खाण्याचे स्वर्ग तर एकदा दिसून पण भागत नाही, परत फोटो दिसले की परत निघा स्वर्गाकडे.

खास टीपेसह मी केलेल्या गुपोचा फोटो - पारीत बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा चिमूटभर घालावा.

कसल्या भारी दिसताहेत सगळ्यांच्या पोळ्या..
परवाच या पोळ्या करुन खाल्ल्या तरी परत खाव्याश्या वाटत आहेत. पुन्हा करायचे पेशन्स नाहीत माझ्यात.

मंजूडी, तू केल्यास तरी फोटो टाकायचा नाहीस बरं का Happy

saaran jhalay. udya pahilyandach karanar aahe. Wish me LUCK. Happy

सगळ्यांच्या पोळ्या छान आहेत. आई ह्यात १ वाटी खवा घालते. मस्त चव येते आणि तोंडात घातल्या की विरघळतात. पारी बनवताना मैदा नाही वापरत फक्त कणिक घालते. मी कधीच केल्या नाहीत पण आईने केल्या की भरपूर खाते. Wink

वा खुपच सोप्पी पाकृ आहे... अश्या गुळपोळ्या करुन बघण्यात येतील... कश्या झाल्या तेसुद्धा सांगण्यात येईल.. मस्त...

आमच्यात संक्रांतीला गुळपोळी करण्याची पद्धत नाही. पुरणपोळी च करतात. पण गेले अनेक वर्ष नेटवर पाहून पाहून इच्छा झालीय. मंजूडी तुझी रेसिपी सोप्पी वाटतेय. यावर्षी नक्की करून बघेन. धन्यवाद!

बरं झालं ही पाकृ वर आली. मस्त आहे पद्धत. मी करेन म्हणते यंदा.

आईची युक्ती करणार. गूळ पातळ न करता बारीक किसून घालून सारण करून ठेवायचं. रोजच्या चपात्यांबरोबर त्याच कणकेच्या पीठाच्या २-३ गूळपोळ्या करायच्या. दिवसाभरात संपतील.

मी असे ऐकले आहे की गुळात किंचीत चुना घातला तर गूळ पोळीच्या कडेपर्यंत पसरतो आणि बाहेर येत नाही. हे खरे आहे का ?

त्याच कणकेच्या पीठाच्या २-३ गूळपोळ्या करायच्या. दिवसाभरात संपतील........मीही हेच करते.फक्त ६- ७ किवा 8 करायच्या.नाश्ता म्हणून मस्त वाटतात.

मी शेंगदाण्याच्या पोळ्याकरते तेव्हा कधीच गुळ पातळ करुन घेत नाही. चिरुन मिक्स करुन घेते आणि ते छान वर्क होते. आणि कणिक पण नेहमीची पण शरबती गव्हाची अगदी छान मऊ होते. इथे आता ते पीठ मिळते त्यामुळ ते वापरते.
यावेळी त्यातच वरच्या प्रमाणात तीळ आणि थोड बेसन पीठ वापरून बघेन.

वैदेही फक्त बेसनची अ‍ॅलर्जी आहे कि स्गळ्याच डाळीची ? (नाही वापरले तरी वाईट नाही लागणार नक्कीच.)
पण मुगाचे पीठ चालेल का ?

Pages