पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा

Submitted by मंजूताई on 10 January, 2014 - 03:17

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा ? ती एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते.

मैत्रेयीने तेरा ते सोळा ह्या वयोगटातील मुलांची भाषा वर्तणूक कशा प्रकारची आहे असे पालकांना विचारले असता उत्तरे आली ती अश्या प्रकारची : उद्धटपणे बोलणे,ओरडून बोलणे, ऐकून न ऐकल्या सारखे करणे, गॅझेटशी तास न तास खेळणे, तुलना करणे,खाण्याचे नखरे, बाहेरचे खायला हवे, बोअर होणं, बेशिस्त वागणे,मोकळेपणाने न बोलणं, वाद घालणं, चिडाचीड करणं, मित्रांचे आईबाबा चांगले, धीर नसणे, निष्काळजीपणा, वेळ नसणे, आरशासमोर वेळ घालवणे, घरी राहायला न आवडणे, पाहुण्यांकडे दुर्लक्ष करणे, शिक्षणाचे महत्त्व नसणे,इ. अशी जर का तुमची कुमारवयीन मुलगा/मुलगी वागत असेल तर काळजी करू नका निश्चिंत राहा कारण ह्याचा अर्थ असा की तो/ती एकदम नॉर्मल आहे. हे आपल्याला नॉर्मल वाटत नाही कारण ह्या वयातले शारीरिक बदल आपल्याला दिसतात, मुलांना मिशी येणे आवाज बदलणे, मुलींची छातीचा आकार वाढणे इ. पण त्याच्या मेंदूतही काही बदल होत असतात तिकडे आपण लक्ष देत नाही. ही प्रक्रिया जर का आपण समजून घेतली तर पटेल की हे सगळं त्याचं वागणं अगदी नॉर्मल आहे. पण त्यातल्या काही गोष्टी नक्कीच बदलायला हव्या आहेत उदा. बेशिस्तपणा, उद्धट बोलणे, ते कश्याप्रकारे बदलता येतील, त्यासाठी पालक म्हणून आपण काय करायला हवे हे नंतर बघू पण त्याआधी मेंदूत होणारे बदल पाहू.

मेंदूचे दोन भाग आहेत एक मागचा व दुसरा पुढचा. आपला रिमोट कंट्रोल म्हणजे निर्णय क्षमता, भावनेवर नियंत्रण, हे मेंदूच्या पुढच्या भागात होत असतं. मेंदूच वाढीची सुरुवात मागच्या भागापासून होत जाते. चौदा ते सोळा ह्या वयात फ्रंट लोबची वाढ झालेली नसते फ्रंट लोबाची पूर्णं वाढ पंचविशीमध्ये होते (ज्याला आपण गध्दे पंचविशी म्हणतो) भावनेवर नियंत्रण नाही, निर्णय क्षमता नाही, विचारशक्ती नाही, विवेकबुद्धी नाही त्यामुळे तो/ती इतका गोंधळलेला असतो की कधी कधी त्याला समोरची वस्तू दिसत नाही.एरिकसन म्हणतो हा काळ त्याच्या आयडेंटिटीचा व आयडेंटिटी क्रायसिसचा आहे आणि त्याचा शोध घेण्याचा तो चोवीस तास प्रयत्न करत असतो. तो/ती सगळ्या गोष्टी भावनिक पातळीवर तोलत असतो. लहानपणी मारलेली एखादी चापट दहा मिनिटाने विसरल्या जाते पण ह्या कुमारवयात मारलेली थप्पड ही त्याच्या आत्मसन्मानाला पोचलेली ठेच असते, इज्जतचा सवाल असतो, अपमान असतो. अश्या प्रसंगात, होतं काय, त्याचे भावनेवर नियंत्रण नसल्यामुळे चढ्या आवाजात उत्तर देतो.मी तुझी आई आहे एक हलकीशी चापट मारली तर चिडायला काय झालं म्हणताना आईच्या आवाजाची पट्टी चढत जाते क्रिया प्रतिक्षिप्त क्रियेच्या नियमानुसार त्याचा आवाज आणखीन वरची पातळी गाठतो आणि प्रसंग हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते.

ह्या वयातल्या मुलाला त्याच्या दिसण्या राहण्यावर टीका केलली आवडत नाही. हा काय शर्ट, सूट घातलाय जुन्या पद्धतीचा? त्यांच्या इमेजला कुठलाही धक्का सहन होत नाही. बुटा पासून ते हेअर स्टाइल पर्फेक्ट आहे की नाही हे बघायला तासन तास आरशासमोर घालवतात कारण ही त्यांची त्या वयाची गरज आहे. हा त्यांचा इमेज ,आयडेंटिटी बिल्डिंगचा काळ असतो. अक्कल, कॉमन सेन्स , लॉगिकल, अ‍ॅनॅलिटिकल थिंकिंग नसणे, ऐकायला न येणे ही सत्य परिस्थिती आहे त्याला कारण त्यांच्या मेंदूची अपूर्ण वाढ अन दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात झपाट्याने होणारे बदल.आता हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याला असं वाटतं असतं की तो आता मोठा झालाय आणि ते तो कृतीतून दाखवून देत असतो, उदा. गाडी चालवणं. हे एक जवळपास प्रत्येक घरात घडणारं उदाहरण आहे.आयांना जास्त बोलायची व सल्ले द्यायची सवय असते. तिचं सुरू होतं ह्या वयात तू गाडी चालवणं धोक्याचं आहे वैगेरे... तो/ती कधी उघड, कधी मनात म्हणतात ...झालं हिचं प्रवचन, भाषणबाजी आता अर्ध्या तासाची फुरसत... आई काय बोलतेय तिकडे लक्षच नसतं. काय आजकालची मुलं? आम्ही नाही असे वागलो.. आमची वडिलधार्‍यांसमोर बोलण्याची हिंमत नव्हती असे म्हणत तुलना केली जाते पण जरा आठवून पहा खरंच आपण 'आदर्श' होतो का? आपण ते मान्य करत नाही. आपल्या वेळेला सायकल मोठ्या मुश्किलीने मिळायची. त्यावर ह्या वयातील मुलं काय म्हणतील त्याला मी काय करू तुमची परिस्थिती... (मला माहीत आहे तुमची परिस्थिती असती तर तुम्ही असंच केलं असतं - स्वगत) आपण त्यांच्या समोर आपली एक आदर्श, पर्फेक्ट असल्याची प्रतिमा तयार करत असतो आणि ह्यामुळेच नात्यामध्ये एक दरी निर्माण होते. त्यांच्यात हीनतेची (मीच काय तो एक वाईट) भावना तयार होते. इथे पालकांची भूमिका अशी असायला हवी की हो, आम्ही पण ह्या वयात चुकलो होतो, स्थित्यंतरातून गेलो होतो. आपण आज ह्या सगळ्या गोष्टींना समस्या म्हणतोय, हे एक आव्हान पालकांसमोर आहे.या आधीच्या पिढीला ह्या समस्यांना तोंड द्यावं लागलं नाही कारण माहिती व तंत्रज्ञानाचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला नव्हता.

काळाबरोबर आपणही बदललो आहोत. आज मुलांशी मोकळेपणाने बोलतोय, त्यांच्याबरोबर बसून चिकनी चमेली सारखी गाणी बघतोय जे कधी आपल्या आईवडीलांबरोबर करू शकत नव्हतो. मुलाने मुलीकडे, मुलीने मुलांकडे बघणे, आकर्षण वाटणं, हे अगदी नॉर्मल आहे. तीव्र शब्दात त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याच्या/तिच्या ह्या भावना समजून घेऊन संवाद साधायला हवा. आपण 'तू कसा चूक आहे' व मुलं 'तो स्वतः कसा बरोबर आहे', असे एकमेकाबद्दलचे विरुद्ध समज सिद्ध करत असतो/चढाओढ सुरू असते. आज आईवडील दोघही काम करतात त्यामुळे त्यांच्याजवळ वेळ सोडून सगळं काही आहे. मुलं जेव्हा बोलू इच्छितं तेव्हा वेळ नसतो किंवा थकलेलो असतो आणि कधीतरी हे सगळं बाजूला ठेवून काहीतरी काम करता करता ऐकण्याचं नाटक करत कुत्रिम हुंकार देत असतो. काम बाजूला ठेवून , त्यांच्याकडे बघतं, पूर्णं त्यांच्याकडे लक्ष देत, त्यात इंटरेस्ट घेत त्यांना ऐकावं, (इन्स्टंट ग्रटिफिकेशन)ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते, ही क्वचितच पालकांकडून पूर्ण होते. ह्याचा परिणाम असा होतो की माझं तर कोणी ऐकतच नाही, मी कशाला सांगू, संवाद कमी व्हायला लागतात. त्यासाठी खरंतरं पाचच मिनिटं देण्याची गरज असते पण आजच्या धकाधकीच्या, तणावाच्या आयुष्यात कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

ही झाली बोलण्याची पध्दत आपली व पाल्यांची. आपला आजचा दुसरा मुद्दा आहे तो लैंगिक शिक्षण विषयावर कसे बोलावे. त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया, माहिती समजावून घेतलेली असेल तर मोकळेपणी बोलता येईल, त्यासाठी तयारी करायची आहे मुलं वयात येण्याआधी. त्यांना अभ्यासक्रमात हे विषय शिकविल्या जातातच शिवाय प्रसार माध्यम, जाहिराती त्यांच्या ज्ञानात भर घालत असतात. सॅनिटरी नॅपकिन्स, कंडोम, एड्स दोघांनाही, मुलामुलींना ह्या सगळ्या बद्दलची अर्धवट माहिती कमीवयात झालेली असते व त्यांच्या मनात ह्या विषयाचे प्रचंड कुतूहल असते जे आपल्याला कदाचित कॉलेजजीवनात नव्हते. खास करून भारतात आपण दुनियाभराच्या विषयावर मोकळेपणाने बोलतो फक्त सेक्स विषय सोडून. मुलांनी जर अवघड प्रश्न विचारले तर न लाजता, न बुजता, न लपवता, न टाळता आपण त्यांच्याशी बोललो तर इतर चुकीच्या मार्गाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत. आंतरजालावर 'सेक्स' शब्द टाकला तर हजारो पानांची अयोग्य, चुकीच्या पद्धतीने दिलेली माहिती मिळते. वैज्ञानिक माहिती त्यांना अभ्यासक्रमात मिळालीच आहे पालकांना त्या माहितीला सामाजिकतेचा दृष्टिकोन द्यायचा आहे.

सेक्स व जेंडर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. सेक्स नरमादी ठरवतं तर जेंडर स्वप्रतिमा (आयडेंटिटी) देतं. मुलांना स्त्रीपुरुष समानता समजवण्यासाठी त्याला सेक्च्युयल आयडेंटिटी व नरमादीचे भान असायला हवे. स्वतःच्या सेक्सविषयी(स्त्री, पुरुष) त्याला/तिला वैज्ञानिक माहिती असायला हवी, त्याची लाज वाटायला नको व त्याबाबत पालकांपासून लपवून ठेवण्यासारखं काही नसावं. आपल्याकडे मुलींचे समुपदेशन योग्य तर्‍हेने झालेलं असतं. मुलींना वयात येण्यापूर्वी आई 'पाळी' बद्दल माहिती व लक्ष देते पण दुर्दैवाने म्हणावे लागेल सर्वसाधारणपणे मुलांना 'स्वप्नदोषा' 'हस्तमैथुन'बद्दल वडील बोलताना दिसत नाहीत. ह्याबाबत मुलांशी मोकळेपणाने बोललो तर इतर मार्गाने हे ज्ञान मिळवायला ते जाणार नाही. त्याचे हे कुतूहल शमले नाहीतर घाणरडे विनोद करणं, मुलींची छेड काढणं अश्या गोष्टींमध्ये तो रमेल, त्यात त्याला आनंद मिळेल. आपल्या समाजात मुलाने व मुलीने कसे वागावे ह्याचे नियम आहेत. मुलाने मुलींना धक्के देणे, शिट्ट्या मारणे,इ. गैर मानत नाही, मुलींनी खाली मान घालून चाललं पाहिजे... वैगेरे अर्थात हे योग्य नाही. हे असं घडतंय कारण स्त्रीपुरुष समानता शिकवल्याच गेली नाही. आज आपण ज्या आपल्या आजूबाजूला घटना बघतो आहोत ते लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा परिपाक म्हणता येईल. त्यासाठी शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे, त्यापूर्वी आपल्याला स्वतःला तपासून बघायची गरज आहे.

त्यासाठी आधी आपण नक्की केलं पाहिजे की तो/ती लहान आहे की मोठा झालाय? आपण आपल्या सोयीनुसार एकाचवेळेला कधी लहान तर कधी मोठा ठरवत असताना तो स्वतंत्र (इंडीपेंडंट) व्हावा असेही वाटत असते.. आपले विचार सुस्पष्ट असायला हवे त्याने काय करावे व काय करू नये ?दुसरी गोष्ट म्हणजे आपआपसातील नवरा बायकोचे संबंधाचा थेट प्रभाव पाल्यांवर होत असतो. मुलामुलींनी एकमेकांशी मैत्री करणं गैर नाही, हे अगदी स्वाभाविकही आहे. मैत्रिपूर्ण नात्याला मात्र एक सीमा असायला हवी. मैत्री व प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज चाळिशीतले पालक हॉट, सेक्सी, कूल वैगेरे शब्द सर्रास वापरत असतील तर त्यांना मुलांची भाषा का खटकावी ? आपण चांगलं, सुंदर, तरुण दिसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं तर वयच आहे हीरो, हिरॉईन(मुलींना झीरो फिगर व मुलांना मॅचो मॅन) सारखं दिसण्याचं,त्यात काय चूक आहे ? प्रॉब्लेम असा झालाय की मोठे लहान दिसण्याचा प्रयत्न करताहेत तर लहान मोठ्यांसारखं दिसण्याचा. मुलांना आईवडील हे आईवडीलासारखेच दिसायला हवे आहेत न की कॅतरिना सलमान सारखे. सुंदर, तरुण दिसण्यात गैर काही नाही. जर तुम्ही वयानुरूप दिसतं, वागतं असाल तर आपोआप मुलं तुमचा आदर करतील. काहीवेळा आपल्या व मुलांच्या हातून एकसारख्याच चुका घडतात त्यासाठी त्यांना दूषणं देत असतो पण आपल्या चुका मात्र मान्य करत नसतो, असे अनेक वेळा, अनेक प्रसंगी आपले धोरण दुटप्पीपणाचे असते त्यावर विचार करून सुधारणा करायला हवी.आज वेगाने काळ बदलतो आहे त्याचबरोबर समाज, नीतिमूल्येही बदलत आहे. पालक म्हणून आपणही गोंधळलो आहोत अन मुलांचं हे कुमारवयीन वय तर गोंधळण्याचंच आहे. पॉकेटमनी द्यावा की न द्यावा, द्यायचा तर किती द्यायचा, गाड्या चालवू द्यायच्या की नाही, स्वातंत्र्य द्यायचं की नाही, द्यायचं तर कुठल्या गोष्टींमध्ये द्यायचं अन त्याची सीमारेषा काय?आजची ही अशी गोंधळाची परिस्थिती मागच्या पिढीची नव्हती.त्यांची काही नैतिक मूल्ये होती, काही तत्त्वे होती, काही नियम होते व त्यावर ते ठाम असायचे.तो जो ठामपणा आज पालकांमध्ये नाही व तो मुलांनी ओळखलेला आहे. मुलं आपल्यापेक्षाही खूप हुशार आहेत. कुठली गोष्ट केव्हा व कशी मागायची हे ते अतिशय उत्तम जाणतात. त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देण्यात आपण कमी पडतोय का?

ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यावर उपाय काय? त्यावर एकच बिनतोड असा उपाय नाही कारण प्रत्येक पालक व प्रत्येक मुलं वेगळं आहे.त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या . मुलांना आदराने वागवावं(रिस्पेक्ट), कुटुंबातलं त्याचं स्थान महत्त्वपूर्ण असावं, छोट्या छोट्या गोष्टीत त्याला त्याचं मत व्यक्त करू द्यावं. मुलांशी ओरडून बोलू नये, हे जरा कठीण आहे पण अशक्य नाही. त्याचा हातात हात घेऊन सांगा की तुला राग आलाय अगदी बरोबर, जरा शांत हो, मग बोलू असं केल्याने त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या आहेत हे त्याला कळेल व तुम्ही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आहात हेही. आपण खूप आदर्श होतो.... आम्ही कसे वागायचो... ह्या कथा त्यांना ऐकवू नये. स्वतःच्या अन मुलाच्या बालपणाची तुलना करू नये. जग झपाट्याने बदलतंय. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर आनंदाने संवाद साधल्या जाईल. पैशाची किंमत त्यांना कळायला हवी त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची जाण द्यावी व त्यात त्यांना सहभागी करून घेतले तर, ते खूप हुशार आहेत त्यातून ते मार्गही सुचवतील. .सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ऐकाल तर ते तुम्हाला ऐकतील व सगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुतै, या लेखाबद्दल तुमचे शतशः धन्यवाद! Happy
<<अशी जर का तुमची कुमारवयीन मुलगा/मुलगी वागत असेल तर काळजी करू नका निश्चिंत राहा कारण ह्याचा अर्थ असा की तो/ती एकदम नॉर्मल आहे.<< हे वाचुन हुश्श झाले.

<<उद्धटपणे बोलणे,ओरडून बोलणे, ऐकून न ऐकल्या सारखे करणे, गॅझेटशी तास न तास खेळणे, तुलना करणे,खाण्याचे नखरे, बाहेरचे खायला हवे, बोअर होणं, बेशिस्त वागणे...<< अगदी हेच आमच्या घरात घडतय!! Sad

मुलांशी बोलून त्यांना त्यांची रेस्पॉन्सिबिलिटि समजावून त्यांच्यासोबत बसून एक टाईम टेबल / बिहेवियर बुक आखायला मदत केली तर. म्हणजे जे वादाचे विषय असतात - आठवड्यातून किती वेळा बाहेर खायचं दिवसातून किती वेळ गॅझेटशे खेळायचं किती वेळ अभ्यास करायचा, कोणते कपडे घालायची. उदा - मुलं तुमच्यासोबत जाताना डिसेण्ट कपडे घालायचे आणि त्यांच्या मित्रांसोबत जाताना त्यांना कोणते कपडे घालणं अलाऊड आहे. कधी किती वाजता घरी यायचं - वीकडेजला किती वाजता आणि वीकेन्डला किती वाजता. उशीर होणार असेल तर का आणि कसं कळवायचं. मुलांनी घरात कोणती कामं केलीच पाहिजेत, कोणत्या वेळात केलीच पाहिजेत. प्लस मायनस टाईम. अर्थात हे बिहेवियर बुक लिहिताना मी म्हणेन तेच बरोबर आणि तेच तू एइकलं पाहिजे असा अ‍ॅटिट्युड ठेवून नाही चालत. तुम्ही तुमचे पॉईंट्स लिहा मुलांना त्यांचे लिहू द्या. कॉर्पोरेटस मध्ये जसं निगोशियेट करता तसं असू द्या विन विन सिच्युएशन दोघांसाठी.

मुळात मुलांकडून काही चुकतं आपल्यामते आणि आपल्याला राग येतो तेव्हा आपण काही बोलू नये. आपण शांत झाल्यावर आपल्याला त्याम्च्या वागण्यातले काय आवडले नाही हे सांगावे. आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगायला जातो त्याचा अर्थ मुलं "मी तुम्हाला आवडतच नाही" असा लावू शकतात. त्यामुळे घडलेली घटना अयोग्य होती एवढेच सांगावे. तू बेशिस्तच आहेस. उद्धटच आहेस असे मुलाला बोलू नयेस. लेबल्स लावू नये. मुलांना त्यांच्या मित्रमंडळींसमोर ओरडू नये.

ह्या सगळ्याबरोबर त्यांना त्यांच मत तुमच्याबद्दल पण विचारा की तुम्ही त्यांच्यासोबरत बाहेर जाता तेव्हा त्यांच्यामते तुम्ही कोणते कपडे घालायला हवेत? इत्यादी.

ह्याचा विचार करा तुम्ही उशीरा येता तेव्हा तुम्ही त्यांना कळवता का? तुम्ही त्यांच्या पुढ्यात कोणाशीही काहीही खोटं बोलता का? तुम्ही त्यांच्या पुढ्यात कोणताही नियम तोडता का आणि काही कारणास्तव तोडलात तर त्याबद्दल तुम्ही बेजबाबदारीने वागता की तुम्हाला गिल्ट असते आणि तुम्ही त्याबद्दल असलेला दंड भोगता. उदा. काही महत्वाच्या कारणाने तुम्ही सिग्नल तोडलात आणि तुम्हाला पोलिसाने पकडले तर तुम्ही काय करता, पोलिसाशी उद्धटपने बोलून त्याला चिरीमिरी देऊन सुटता आणी मग त्याची बढाई मारता की दंड भरून पावती घेऊन माफी मागोन मग पुढे जाता. तुम्ही जर उद्धटपणे बोलून चिरीमिरी देऊन पुढे जात असाल तर मुलेही हेच शिकणार.

मंजू ताई लेख छानच झालाय. खूप बोलल्या गेलेला तरी खूप कळायचं राहिलेला हा विषय आहे.
मैत्रेयी ह्या विषयावर खरच छान बोलते.
- हे सगळ माहिती असत पण पुन्हा ऐकल्यावर धूळ झटकली जाते.
- मुख्य म्हणजे प्रत्यक्ष कृती च्या वेळी बळकटी येते.
- घरोघरी मातीच्या चुली ह्याचा पुनः प्रत्यय येतो.
- आपण एकटेच ह्यातून जात नाही ह्या विचारानी हायस वाटत.

'आपला आजचा दुसरा मुद्दा आहे तो लैंगिक शिक्षण विषयावर कसे बोलावे ?'
- सजग पालक म्हणून आपल्या सगळ्यांना ह्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण हे सगळ मुलांना कसं सांगायचं हे माहिती नसत. प्रत्यक्ष मुलांना हे सांगताना अनेकांना फार अवघडल्या सारखं होत. त्यावेळी आपली body language आपण हे बोलताना comfortable नाही हे न सांगताही कळत. वेळेवर योग्य शब्द सुचत नाहीत. कोणत्या वयाच्या मुलांना नेमकं काय ? कुठपत सांगाव ह्या बाबत ही संभ्रम असतोच.

'सेतू' चा आमचा हा ग्रूप कुठेतरी ह्याच उद्देशांनी सुरु झाला होता की पालक असलो तरी आपणही नवं शिकत राहणं आवश्यक आहे.

दोघी-तिघी मैत्रिणींनी त्यांच्या टीन एज मधील मुलांबाबत सांगितलेला अनुभव असा - की, एखादा सामायिक छंद, सामायिक (घराव्यतिरिक्तची) अ‍ॅक्टिविटी, सामायिक खेळ यांच्या माध्यमातून मुलं व पालक परस्पर-संवादाचा मार्ग तयार करू शकतात.

एका मैत्रिणीला व तिच्या कॉलेजमधील मुलाला, दोघांना लाँग ड्राइव्हची खूप आवड आहे. ती कित्येकदा मुलाला बरोबर घेऊन मस्तपैकी बाहेर लाँग ड्राइव्हला जाते. तास-दीड तास दोघेही भटकून येतात. आळीपाळीने गाडी चालवतात. त्यावेळी भरपूर गप्पा हाणतात. त्यांच्या आवडीची गाणी जोरजोरात गातात. मजा करतात. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून भुट्टा किंवा पाणीपुरी खाणे, टपरीवरचा चहा पिणे असे उद्योगही चालू असतात... तिने सांगितले की ह्या दरम्यान त्यांच्या अगदी टाईमपास ते गंभीर विषयांवर गप्पा होतात. घरी जे विषय सहसा हाताळले जात नाहीत किंवा क्वचित ऑकवर्ड वाटू शकते अशा अनेक विषयांबद्दल बोलले जाते. ह्या सर्वाचा तिला मुलाशी खेळीमेळीचे नाते जपण्यासाठी खूप उपयोग झाला आहे. कधी त्याला काही समजावून सांगायची वेळ आलीच तर त्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार झाली आहे व त्याचा तिने उपयोगही केला आहे. [मुलानेही नक्कीच केला असणार!] मला तिचा हा अनुभव खूप आवडला.

>>एखादा सामायिक छंद, सामायिक (घराव्यतिरिक्तची) अ‍ॅक्टिविटी, सामायिक खेळ यांच्या माध्यमातून मुलं व पालक परस्पर-संवादाचा मार्ग तयार करू शकतात.>> +१

बरेचदा असे बघायला मिळते की मुलं आपले नवे छंद, आवडी-निवडी याबद्दल काही सांगू लागली की पालक नीट ऐकूनही न घेता नसती फॅड्स म्हणून उडवून लावतात किंवा मला वेळ नाही/ त्यातलं काही कळत नाही असे म्हणून आपल्या बाजूने संवादाची संधी घालवतात. हे असे कळत नकळत वारंवार होत जाते. मग मुलेही हिरमुसून संवाद थांबवतात.

>>आपला आजचा दुसरा मुद्दा आहे तो लैंगिक शिक्षण विषयावर कसे बोलावे ?
यावर माझे म्हणणे आहे की पालकांनी हे असे डायरेक्ट सांगणे खरेच किती योग्य आहे ?
अप्रत्यक्ष रित्या देखील हे शिक्षण देता येऊ शकते, उदा. पुस्तके, काउन्सेलर्स, इ.
एका वेगळ्या विषयावरील धाग्यावर ही अशी चर्चा आधी झालेली आहे एकदा.

आपण मुलांना सांगतो टीव्ही बघु नका पण मुलांना आपल्याशी बोलायचं असतम तेव्हा आपण वर्तमानपत्र आणि टीव्ही वरच्या बातम्या ह्यात व्यस्त असतो आणि मुलांना संगतो, आम्ही बोलत असताना टीव्ही बंद करा, गॅझेटस बाजूला ठेवा..

महेश, पालकांना बोलायला अवघडल्यासारखे वाटणार असेल तर पाल्याने काउन्सेलरशी जरूर बोलावे. पण एक तर हा एकदा सांगून संपले असा विषय नाही. दुसरे म्हणजे मुलं जशी मोठी होत जातात तसे त्यांना वेगवेगळे प्रश्न पडतात. भोवताली घडणार्‍या घटनांबद्दल बोलायचे असते, सल्ला हवा असतो. दर वेळी काउंसेलर उपलब्ध असेल असे नाही. अशावेळी पालकांशी संवाद करणे शक्य नसेल तर मुलांनी काय करायचे? शिवाय या विषयावर बोलणे नाकारुन पालक कळत न कळत मुलाला सांगतात की हे काहीतरी लाजिरवाणे, लपूनछपून करायचे आहे. पालक मुलांशी बोलताना आईबाबांचे नाते, त्यातील विश्वास, प्रेम, एकनिष्ठता वगैरे खूप महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलून मुलाच्या समोर सेक्स बद्दल जी बाजारु, गल्लाभरु प्रतिमा येते तिला काउंटर बॅलन्स करु शकतात त्याच बरोबर बाहेरच्या जगात सावधपणे, विवेकाने, संयमाने वागायला शिकवतात.

महेश, मला तरी माझ्या मुलाशी बोलायला काही प्रॉब्लेम आला नाही. कारण या विषयावर संवाद तो लहान असल्यापासून होता. पण पालकांना संकोच वाटणार असेल तर त्यांनी मुलाबरोबर काउंसेलरकडे जावे. काही जॉइंट सेशन्स करावे. काउंसेलरच्या उपस्थितीत गप्पा मारुन अवघडलेपण दुर होईल. मग मुलांशी मोकळेपणाने बोलणे सहज जमेल.

>>असा विचार करणे सोपे आहे, प्रत्यक्षात किती जण आपल्या मुलांशी असे मोकळेपणे बोलू शकतील ?

अगदी बोलता येतं. बोललोय.

आजवर बोललं नसेल तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे? मुलांना कायमच हाताच्या अंतरावर ठेवून, पालकांनी स्वतःला, "आय अ‍ॅम द बॉस" समजून वागवलेलं असेल तर कदाचित अचानक हे जमणार नाही. 'आमच्या आईवडलांना आमच्याशी असलं काही बोलायची गरज पडली नव्हती. आम्हालाही नाही.' हा अ‍ॅटिट्यूड सोडावा लागतो. मुलांना, आपण काही न सांगता, काय आणि कितपत माहिती आहे हे जाणून घ्यावं लागतं. तो धागा पकडून पुढे बोलता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांशी या विषयावर बोलताना आधी आपण स्वतः व्यवस्थीत तयारी करावी लागते. शेवटी काय, तर या विषयावर बोलण्याचा मोकळेपणा येण्याआधी मुलं-पालक संबंधात मोकळेपणा असणं अत्यावश्यक आहे. तो नसेल तर त्या दृष्टीनं पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. बेटर लेट दॅन नेव्हर!

>>शेवटी काय, तर या विषयावर बोलण्याचा मोकळेपणा येण्याआधी मुलं-पालक संबंधात मोकळेपणा असणं अत्यावश्यक आहे. तो नसेल तर त्या दृष्टीनं पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. बेटर लेट दॅन नेव्हर!>> +१००

मृ +१.

just a week before when one of my friends who had gone to a lecture on parenting said why don't they give a lecture to kids on what kind of health/mental/emotional problems parents go thru afrer crossing 45! She is going thru a menopausal phase n is having really bad days and on top of that
her only daughter is actually 20 years old but giving her hard time,
(My marathi typing is not working properly hence written in Eng)

अभिश्रुती - खरंय सगळी लेक्चर्स स्त्रियांकरिता असतात पण ती कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी हवी.
त्यासाठी वेगळा धागा असावा

अभिश्रुती, २० वर्षाच्या सज्ञान मुलीला आपली आई बदलाला तोंड देतेय हे कळत नसेल तर बेसिकमधेच लोचा अहे असे मी म्हणेन. मुलीला मेनॉपॉज म्हणजे काय, त्यामुळे होणारे बदल, निर्माण होणारे इमोशनल्/फिजीकल प्रॉब्लेम्स हे व्यवस्थित समजावून सांगितले आहे का? शक्य झाल्यास तिला गायनॅककडे जाताना बरोबर न्यावे. आईच्या वेलबिइंगमधे तिचा काय सहभाग हवा हे डॉकने सांगितले तर कदाचित जास्त परीणाम करेल.
आपले पालक हे आई-बाबा असले तरी त्या आधी ते एक माणूस आहेत आणि त्यांनाही ताण-तणाव, हेल्थ प्रॉब्लेम्स, काळज्या असतात याची जाणीव मुलांना सुरुवातीपासूनच करून द्यायला हवी. आपण एका कुटुंबात रहातो तेव्हा एकमेकांची काळजी घ्यायची हे समजावून सांगितले तर मुलांना पटते. अगदी ५वर्षाच्या मुलालाही आईला/बाबांना/आजीला बरे नाहिये, त्रास द्यायचा नाही हे समजावले तर कळते. आजार संसर्गजन्य नसेल तर आजारी माणसाची काळजी घेताना हळूहळू मुलांना त्यात सहभागी करुन घेतले तर मुलं छान शिकतात. आईला बरे नसताना तसेच काम करताना पहायची सवय मुलांना असेल तर ती लगेच, आपोआप बदणार नाही.

स्वाती, तुझं बरोबर आहे हल्ली मुलांना काही कामच करायला लावत/शिकवत नाहीत ते चुकीच आहे. पण आता मला वाटतं डोक्यावरुन पाणी गेलय एकदाचं त्या ,मुलीच लग्न लावून दिलं की माझी मैत्रीण सुटेल असं वाटतय

चांगला लेख, काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासारख वाटलं, या "सेतू" आणि "मैत्रेयी " ग्रुप बद्दल माहिती मिळू शकेल का, ते आमच्या शहरात (औरंगाबाद) कार्यरत आहेत का ?? दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे ह्याची जाणीव आहे पण तरीही कोणी माहिती देऊ शकेल का प्लीज

Pages