पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा

Submitted by मंजूताई on 10 January, 2014 - 03:17

सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) पौगंडावस्थेतील मुलांशी संवाद कसा साधावा ? ती एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते.

मैत्रेयीने तेरा ते सोळा ह्या वयोगटातील मुलांची भाषा वर्तणूक कशा प्रकारची आहे असे पालकांना विचारले असता उत्तरे आली ती अश्या प्रकारची : उद्धटपणे बोलणे,ओरडून बोलणे, ऐकून न ऐकल्या सारखे करणे, गॅझेटशी तास न तास खेळणे, तुलना करणे,खाण्याचे नखरे, बाहेरचे खायला हवे, बोअर होणं, बेशिस्त वागणे,मोकळेपणाने न बोलणं, वाद घालणं, चिडाचीड करणं, मित्रांचे आईबाबा चांगले, धीर नसणे, निष्काळजीपणा, वेळ नसणे, आरशासमोर वेळ घालवणे, घरी राहायला न आवडणे, पाहुण्यांकडे दुर्लक्ष करणे, शिक्षणाचे महत्त्व नसणे,इ. अशी जर का तुमची कुमारवयीन मुलगा/मुलगी वागत असेल तर काळजी करू नका निश्चिंत राहा कारण ह्याचा अर्थ असा की तो/ती एकदम नॉर्मल आहे. हे आपल्याला नॉर्मल वाटत नाही कारण ह्या वयातले शारीरिक बदल आपल्याला दिसतात, मुलांना मिशी येणे आवाज बदलणे, मुलींची छातीचा आकार वाढणे इ. पण त्याच्या मेंदूतही काही बदल होत असतात तिकडे आपण लक्ष देत नाही. ही प्रक्रिया जर का आपण समजून घेतली तर पटेल की हे सगळं त्याचं वागणं अगदी नॉर्मल आहे. पण त्यातल्या काही गोष्टी नक्कीच बदलायला हव्या आहेत उदा. बेशिस्तपणा, उद्धट बोलणे, ते कश्याप्रकारे बदलता येतील, त्यासाठी पालक म्हणून आपण काय करायला हवे हे नंतर बघू पण त्याआधी मेंदूत होणारे बदल पाहू.

मेंदूचे दोन भाग आहेत एक मागचा व दुसरा पुढचा. आपला रिमोट कंट्रोल म्हणजे निर्णय क्षमता, भावनेवर नियंत्रण, हे मेंदूच्या पुढच्या भागात होत असतं. मेंदूच वाढीची सुरुवात मागच्या भागापासून होत जाते. चौदा ते सोळा ह्या वयात फ्रंट लोबची वाढ झालेली नसते फ्रंट लोबाची पूर्णं वाढ पंचविशीमध्ये होते (ज्याला आपण गध्दे पंचविशी म्हणतो) भावनेवर नियंत्रण नाही, निर्णय क्षमता नाही, विचारशक्ती नाही, विवेकबुद्धी नाही त्यामुळे तो/ती इतका गोंधळलेला असतो की कधी कधी त्याला समोरची वस्तू दिसत नाही.एरिकसन म्हणतो हा काळ त्याच्या आयडेंटिटीचा व आयडेंटिटी क्रायसिसचा आहे आणि त्याचा शोध घेण्याचा तो चोवीस तास प्रयत्न करत असतो. तो/ती सगळ्या गोष्टी भावनिक पातळीवर तोलत असतो. लहानपणी मारलेली एखादी चापट दहा मिनिटाने विसरल्या जाते पण ह्या कुमारवयात मारलेली थप्पड ही त्याच्या आत्मसन्मानाला पोचलेली ठेच असते, इज्जतचा सवाल असतो, अपमान असतो. अश्या प्रसंगात, होतं काय, त्याचे भावनेवर नियंत्रण नसल्यामुळे चढ्या आवाजात उत्तर देतो.मी तुझी आई आहे एक हलकीशी चापट मारली तर चिडायला काय झालं म्हणताना आईच्या आवाजाची पट्टी चढत जाते क्रिया प्रतिक्षिप्त क्रियेच्या नियमानुसार त्याचा आवाज आणखीन वरची पातळी गाठतो आणि प्रसंग हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते.

ह्या वयातल्या मुलाला त्याच्या दिसण्या राहण्यावर टीका केलली आवडत नाही. हा काय शर्ट, सूट घातलाय जुन्या पद्धतीचा? त्यांच्या इमेजला कुठलाही धक्का सहन होत नाही. बुटा पासून ते हेअर स्टाइल पर्फेक्ट आहे की नाही हे बघायला तासन तास आरशासमोर घालवतात कारण ही त्यांची त्या वयाची गरज आहे. हा त्यांचा इमेज ,आयडेंटिटी बिल्डिंगचा काळ असतो. अक्कल, कॉमन सेन्स , लॉगिकल, अ‍ॅनॅलिटिकल थिंकिंग नसणे, ऐकायला न येणे ही सत्य परिस्थिती आहे त्याला कारण त्यांच्या मेंदूची अपूर्ण वाढ अन दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात झपाट्याने होणारे बदल.आता हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याला असं वाटतं असतं की तो आता मोठा झालाय आणि ते तो कृतीतून दाखवून देत असतो, उदा. गाडी चालवणं. हे एक जवळपास प्रत्येक घरात घडणारं उदाहरण आहे.आयांना जास्त बोलायची व सल्ले द्यायची सवय असते. तिचं सुरू होतं ह्या वयात तू गाडी चालवणं धोक्याचं आहे वैगेरे... तो/ती कधी उघड, कधी मनात म्हणतात ...झालं हिचं प्रवचन, भाषणबाजी आता अर्ध्या तासाची फुरसत... आई काय बोलतेय तिकडे लक्षच नसतं. काय आजकालची मुलं? आम्ही नाही असे वागलो.. आमची वडिलधार्‍यांसमोर बोलण्याची हिंमत नव्हती असे म्हणत तुलना केली जाते पण जरा आठवून पहा खरंच आपण 'आदर्श' होतो का? आपण ते मान्य करत नाही. आपल्या वेळेला सायकल मोठ्या मुश्किलीने मिळायची. त्यावर ह्या वयातील मुलं काय म्हणतील त्याला मी काय करू तुमची परिस्थिती... (मला माहीत आहे तुमची परिस्थिती असती तर तुम्ही असंच केलं असतं - स्वगत) आपण त्यांच्या समोर आपली एक आदर्श, पर्फेक्ट असल्याची प्रतिमा तयार करत असतो आणि ह्यामुळेच नात्यामध्ये एक दरी निर्माण होते. त्यांच्यात हीनतेची (मीच काय तो एक वाईट) भावना तयार होते. इथे पालकांची भूमिका अशी असायला हवी की हो, आम्ही पण ह्या वयात चुकलो होतो, स्थित्यंतरातून गेलो होतो. आपण आज ह्या सगळ्या गोष्टींना समस्या म्हणतोय, हे एक आव्हान पालकांसमोर आहे.या आधीच्या पिढीला ह्या समस्यांना तोंड द्यावं लागलं नाही कारण माहिती व तंत्रज्ञानाचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेला नव्हता.

काळाबरोबर आपणही बदललो आहोत. आज मुलांशी मोकळेपणाने बोलतोय, त्यांच्याबरोबर बसून चिकनी चमेली सारखी गाणी बघतोय जे कधी आपल्या आईवडीलांबरोबर करू शकत नव्हतो. मुलाने मुलीकडे, मुलीने मुलांकडे बघणे, आकर्षण वाटणं, हे अगदी नॉर्मल आहे. तीव्र शब्दात त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याच्या/तिच्या ह्या भावना समजून घेऊन संवाद साधायला हवा. आपण 'तू कसा चूक आहे' व मुलं 'तो स्वतः कसा बरोबर आहे', असे एकमेकाबद्दलचे विरुद्ध समज सिद्ध करत असतो/चढाओढ सुरू असते. आज आईवडील दोघही काम करतात त्यामुळे त्यांच्याजवळ वेळ सोडून सगळं काही आहे. मुलं जेव्हा बोलू इच्छितं तेव्हा वेळ नसतो किंवा थकलेलो असतो आणि कधीतरी हे सगळं बाजूला ठेवून काहीतरी काम करता करता ऐकण्याचं नाटक करत कुत्रिम हुंकार देत असतो. काम बाजूला ठेवून , त्यांच्याकडे बघतं, पूर्णं त्यांच्याकडे लक्ष देत, त्यात इंटरेस्ट घेत त्यांना ऐकावं, (इन्स्टंट ग्रटिफिकेशन)ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते, ही क्वचितच पालकांकडून पूर्ण होते. ह्याचा परिणाम असा होतो की माझं तर कोणी ऐकतच नाही, मी कशाला सांगू, संवाद कमी व्हायला लागतात. त्यासाठी खरंतरं पाचच मिनिटं देण्याची गरज असते पण आजच्या धकाधकीच्या, तणावाच्या आयुष्यात कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

ही झाली बोलण्याची पध्दत आपली व पाल्यांची. आपला आजचा दुसरा मुद्दा आहे तो लैंगिक शिक्षण विषयावर कसे बोलावे. त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया, माहिती समजावून घेतलेली असेल तर मोकळेपणी बोलता येईल, त्यासाठी तयारी करायची आहे मुलं वयात येण्याआधी. त्यांना अभ्यासक्रमात हे विषय शिकविल्या जातातच शिवाय प्रसार माध्यम, जाहिराती त्यांच्या ज्ञानात भर घालत असतात. सॅनिटरी नॅपकिन्स, कंडोम, एड्स दोघांनाही, मुलामुलींना ह्या सगळ्या बद्दलची अर्धवट माहिती कमीवयात झालेली असते व त्यांच्या मनात ह्या विषयाचे प्रचंड कुतूहल असते जे आपल्याला कदाचित कॉलेजजीवनात नव्हते. खास करून भारतात आपण दुनियाभराच्या विषयावर मोकळेपणाने बोलतो फक्त सेक्स विषय सोडून. मुलांनी जर अवघड प्रश्न विचारले तर न लाजता, न बुजता, न लपवता, न टाळता आपण त्यांच्याशी बोललो तर इतर चुकीच्या मार्गाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत. आंतरजालावर 'सेक्स' शब्द टाकला तर हजारो पानांची अयोग्य, चुकीच्या पद्धतीने दिलेली माहिती मिळते. वैज्ञानिक माहिती त्यांना अभ्यासक्रमात मिळालीच आहे पालकांना त्या माहितीला सामाजिकतेचा दृष्टिकोन द्यायचा आहे.

सेक्स व जेंडर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. सेक्स नरमादी ठरवतं तर जेंडर स्वप्रतिमा (आयडेंटिटी) देतं. मुलांना स्त्रीपुरुष समानता समजवण्यासाठी त्याला सेक्च्युयल आयडेंटिटी व नरमादीचे भान असायला हवे. स्वतःच्या सेक्सविषयी(स्त्री, पुरुष) त्याला/तिला वैज्ञानिक माहिती असायला हवी, त्याची लाज वाटायला नको व त्याबाबत पालकांपासून लपवून ठेवण्यासारखं काही नसावं. आपल्याकडे मुलींचे समुपदेशन योग्य तर्‍हेने झालेलं असतं. मुलींना वयात येण्यापूर्वी आई 'पाळी' बद्दल माहिती व लक्ष देते पण दुर्दैवाने म्हणावे लागेल सर्वसाधारणपणे मुलांना 'स्वप्नदोषा' 'हस्तमैथुन'बद्दल वडील बोलताना दिसत नाहीत. ह्याबाबत मुलांशी मोकळेपणाने बोललो तर इतर मार्गाने हे ज्ञान मिळवायला ते जाणार नाही. त्याचे हे कुतूहल शमले नाहीतर घाणरडे विनोद करणं, मुलींची छेड काढणं अश्या गोष्टींमध्ये तो रमेल, त्यात त्याला आनंद मिळेल. आपल्या समाजात मुलाने व मुलीने कसे वागावे ह्याचे नियम आहेत. मुलाने मुलींना धक्के देणे, शिट्ट्या मारणे,इ. गैर मानत नाही, मुलींनी खाली मान घालून चाललं पाहिजे... वैगेरे अर्थात हे योग्य नाही. हे असं घडतंय कारण स्त्रीपुरुष समानता शिकवल्याच गेली नाही. आज आपण ज्या आपल्या आजूबाजूला घटना बघतो आहोत ते लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा परिपाक म्हणता येईल. त्यासाठी शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे, त्यापूर्वी आपल्याला स्वतःला तपासून बघायची गरज आहे.

त्यासाठी आधी आपण नक्की केलं पाहिजे की तो/ती लहान आहे की मोठा झालाय? आपण आपल्या सोयीनुसार एकाचवेळेला कधी लहान तर कधी मोठा ठरवत असताना तो स्वतंत्र (इंडीपेंडंट) व्हावा असेही वाटत असते.. आपले विचार सुस्पष्ट असायला हवे त्याने काय करावे व काय करू नये ?दुसरी गोष्ट म्हणजे आपआपसातील नवरा बायकोचे संबंधाचा थेट प्रभाव पाल्यांवर होत असतो. मुलामुलींनी एकमेकांशी मैत्री करणं गैर नाही, हे अगदी स्वाभाविकही आहे. मैत्रिपूर्ण नात्याला मात्र एक सीमा असायला हवी. मैत्री व प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज चाळिशीतले पालक हॉट, सेक्सी, कूल वैगेरे शब्द सर्रास वापरत असतील तर त्यांना मुलांची भाषा का खटकावी ? आपण चांगलं, सुंदर, तरुण दिसण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचं तर वयच आहे हीरो, हिरॉईन(मुलींना झीरो फिगर व मुलांना मॅचो मॅन) सारखं दिसण्याचं,त्यात काय चूक आहे ? प्रॉब्लेम असा झालाय की मोठे लहान दिसण्याचा प्रयत्न करताहेत तर लहान मोठ्यांसारखं दिसण्याचा. मुलांना आईवडील हे आईवडीलासारखेच दिसायला हवे आहेत न की कॅतरिना सलमान सारखे. सुंदर, तरुण दिसण्यात गैर काही नाही. जर तुम्ही वयानुरूप दिसतं, वागतं असाल तर आपोआप मुलं तुमचा आदर करतील. काहीवेळा आपल्या व मुलांच्या हातून एकसारख्याच चुका घडतात त्यासाठी त्यांना दूषणं देत असतो पण आपल्या चुका मात्र मान्य करत नसतो, असे अनेक वेळा, अनेक प्रसंगी आपले धोरण दुटप्पीपणाचे असते त्यावर विचार करून सुधारणा करायला हवी.आज वेगाने काळ बदलतो आहे त्याचबरोबर समाज, नीतिमूल्येही बदलत आहे. पालक म्हणून आपणही गोंधळलो आहोत अन मुलांचं हे कुमारवयीन वय तर गोंधळण्याचंच आहे. पॉकेटमनी द्यावा की न द्यावा, द्यायचा तर किती द्यायचा, गाड्या चालवू द्यायच्या की नाही, स्वातंत्र्य द्यायचं की नाही, द्यायचं तर कुठल्या गोष्टींमध्ये द्यायचं अन त्याची सीमारेषा काय?आजची ही अशी गोंधळाची परिस्थिती मागच्या पिढीची नव्हती.त्यांची काही नैतिक मूल्ये होती, काही तत्त्वे होती, काही नियम होते व त्यावर ते ठाम असायचे.तो जो ठामपणा आज पालकांमध्ये नाही व तो मुलांनी ओळखलेला आहे. मुलं आपल्यापेक्षाही खूप हुशार आहेत. कुठली गोष्ट केव्हा व कशी मागायची हे ते अतिशय उत्तम जाणतात. त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देण्यात आपण कमी पडतोय का?

ही अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यावर उपाय काय? त्यावर एकच बिनतोड असा उपाय नाही कारण प्रत्येक पालक व प्रत्येक मुलं वेगळं आहे.त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या . मुलांना आदराने वागवावं(रिस्पेक्ट), कुटुंबातलं त्याचं स्थान महत्त्वपूर्ण असावं, छोट्या छोट्या गोष्टीत त्याला त्याचं मत व्यक्त करू द्यावं. मुलांशी ओरडून बोलू नये, हे जरा कठीण आहे पण अशक्य नाही. त्याचा हातात हात घेऊन सांगा की तुला राग आलाय अगदी बरोबर, जरा शांत हो, मग बोलू असं केल्याने त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या आहेत हे त्याला कळेल व तुम्ही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आहात हेही. आपण खूप आदर्श होतो.... आम्ही कसे वागायचो... ह्या कथा त्यांना ऐकवू नये. स्वतःच्या अन मुलाच्या बालपणाची तुलना करू नये. जग झपाट्याने बदलतंय. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर आनंदाने संवाद साधल्या जाईल. पैशाची किंमत त्यांना कळायला हवी त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची जाण द्यावी व त्यात त्यांना सहभागी करून घेतले तर, ते खूप हुशार आहेत त्यातून ते मार्गही सुचवतील. .सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ऐकाल तर ते तुम्हाला ऐकतील व सगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान मांडला आहे हा विषय,
पण एक लक्षात घ्या, ज्यांची वये जास्त असतात त्यांनी स्वतःला बदलवणे कठिण असते,
त्यामुळे पालकांना एवढे सगळे बदल करायला सांगण्याऐवजी मुला मुलींना पण त्यांचे वागणे आचार विचार संयमित / नियंत्रित / सुसंस्कारित करायला नाही सांगता येणार का ?
हे म्हणजे सर्व पालकांनी हार मानल्यासारखे वाटते आहे.

सुजाण पालकत्वाच्या दिशेने स्तुत्य व आवश्यक उपक्रम दिसतो आहे हा! पालक व पाल्यांमध्ये मोकळा संवाद होणे हे खूप खूप गरजेचे आहे, आणि सध्या ह्या गोष्टीची निकड खूप प्रकर्षाने जाणवते आहे. ह्या विषयावर विस्तृत चर्चा व अनुभव वाचायला आवडतील.

मस्त आहे उपक्रम. अगदी माझ्याच घरात डोकाउन लिहिल्या सारख वाटतय बरचस. Wink
महेश , माझा अनुभव आहे की पालकांनीच का मुलांनी का नाही असा इगो इश्यु , करण चुकतच. बर्फाची फॅक्टरी चालू करणे, त्या लाद्या डोक्यावर ठेवणे अन मुल ह्या फेज मधून बाहेर पडण्याची वाट पहाणे. Happy
मुळात मुलं मुद्दाम वाईट वागत नाहीयेत ह्यावर विश्वास ठेउन संवाद साधत रहाणे.

छानच आहे लेख. आवडला.

लेक आता १२ वर्षांची आहे. त्यामुळे ह्यातल्या बर्याच गोष्टीची सुरवात झाली आहे Happy

त्यामुळे पालकांना एवढे सगळे बदल करायला सांगण्याऐवजी मुला मुलींना पण त्यांचे वागणे आचार विचार संयमित / नियंत्रित / सुसंस्कारित करायला नाही सांगता येणार का ?

>> पालकांनी बदलायचे अश्यासाठी कि पालक जास्त मॅच्युअर आहेत. ते मुलांच्या फेज मधून गेलेले आहेत. त्यामुळे मुलांची मनस्थिती समजुन घेणे मुलांपेक्षाही पालकांना जास्त सोपे आहे. ट्रस्ट मी.. जर पौगंडावस्थेत पालकांनी मुलांशी सुसंवाद साधुन त्यांना समजुन घेतले.. तर मुले जेव्हा पालकांच्या भुमिकेत जातील तेव्हा त्यांचा पालकांसाठी असलेला आदर शतपटीने वाढलेला असेल.

थंड , सेम हियर Happy
म्हणूनच बर्फाची फॅक्टरी , एक लादीसे क्या होगा ! Happy
आपण आणि मुलं काही वर्षानी हे आठवून एकत्र बसून हसणार आहोत हे लक्षात ठेव. Happy

चांगली माहिती.

>> मुळात मुलं मुद्दाम वाईट वागत नाहीयेत ह्यावर विश्वास ठेउन संवाद साधत रहाणे.
पते की बात! Happy

उत्तम लेख!

हे म्हणजे सर्व पालकांनी हार मानल्यासारखे वाटते आहे.>> असं काय म्हणता महेश. हार-जीत काय त्यात.

ज्यांची वये जास्त असतात त्यांनी स्वतःला बदलवणे कठिण असते>> असं नाहीये. तो आपण सोयिस्कर ग्रह करून घेतलेला असतो. स्वतःला बदलवणं म्हणजे विचार बदलणं. मनाची तयारी(ओपन माइंड) तर विचार बदलता येतात.

पालकांनी बदलायचे अश्यासाठी कि पालक जास्त मॅच्युअर आहेत. ते मुलांच्या फेज मधून गेलेले आहेत. त्यामुळे मुलांची मनस्थिती समजुन घेणे मुलांपेक्षाही पालकांना जास्त सोपे आहे.>>+१

महेश,
पालकांना एवढे सगळे बदल करायला सांगण्याऐवजी मुला मुलींना पण त्यांचे वागणे आचार विचार संयमित / नियंत्रित / सुसंस्कारित करायला नाही सांगता येणार का ? >>>> हे सोल्युशन फार छान आहे! एकदम सोप्पे आणि इन्स्टन्ट !! Happy
चला तर, मुला मुलींना त्यांचे वागणे "आचार विचार संयमित / नियंत्रित / सुसंस्कारित करायला" सांगायचे !! - ऊप्स ! पण, हे "सांगायचे" काम कुणी करायचे हो ??
त्यापेक्षा पालकांनीच फक्त सुसंस्कारितच मुले जन्माला घाला बॉ यापुढे. हे सोल्युशन जास्त चांगले नाही का ? Proud

सुजाण पालकत्वाच्या दिशेने स्तुत्य व
आवश्यक उपक्रम दिसतो आहे हा! पालक व
पाल्यांमध्ये मोकळा संवाद होणे हे खूप खूप
गरजेचे आहे,
आणि सध्या ह्या गोष्टीची निकड खूप
प्रकर्षाने जाणवते आहे. ह्या विषयावर
विस्तृत चर्चा व अनुभव
वाचायला आवडतील.>>>>>>+111

छान लेख

खुपच माहितीपुर्ण आणि उपयुक्त लेख आहे! बरेच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत ज्याचा आपण फारसा विचार करत नाही. धन्यवाद इथे टाकल्याबद्दल. Happy अधून मधून परत वाचावा (जेणेकरुन आपण पालक म्हणून ट्रॅक वर आहोत की नाही हे पडताळून पाहायला) असा लेख आहे त्यामुळे फेवरेट्स मध्येच टाकला.

अधून मधून परत वाचावा (जेणेकरुन आपण पालक म्हणून ट्रॅक वर आहोत की नाही हे पडताळून पाहायला )>>> +१ बुवा.

जरी हे विचार खुप चांगले असले तरी पुर्णपणे प्रॅक्टीकल नाहीयेत. Sad
कारण निदान काही प्रमाणात वडिलधार्‍यांचा आदर, धाक असणे आवश्यक आहे मुलांना.
जास्तीत जास्त मैत्रीपुर्ण नाते असावे असे जरी असले, तरी मुळात पाल्य / पालक हे नाते १००% मैत्रीपुर्ण होऊ शकत नाही. एक प्रकारची गॅप ही असतेच.

<<<उद्धटपणे बोलणे,ओरडून बोलणे, ऐकून न ऐकल्या सारखे करणे, गॅझेटशी तास न तास खेळणे, तुलना करणे,खाण्याचे नखरे, बाहेरचे खायला हवे, बोअर होणं, बेशिस्त वागणे,मोकळेपणाने न बोलणं, वाद घालणं, चिडाचीड करणं, मित्रांचे आईबाबा चांगले, धीर नसणे, निष्काळजीपणा, वेळ नसणे, आरशासमोर वेळ घालवणे, घरी राहायला न आवडणे, पाहुण्यांकडे दुर्लक्ष करणे, शिक्षणाचे महत्त्व नसणे,इ. अशी जर का तुमची कुमारवयीन मुलगा/मुलगी वागत असेल तर काळजी करू नका निश्चिंत राहा कारण ह्याचा अर्थ असा की तो/ती एकदम नॉर्मल आहे>>> +११११११११
<<.झालं हिचं प्रवचन, भाषणबाजी आता अर्ध्या तासाची फुरसत... आई काय बोलतेय तिकडे लक्षच नसतं>>अगदी अगदी .""बोअर करू नकोस ह आत्ता"" हे पण महत्वाच वाक्य Happy

काहीवेळा आपल्या व मुलांच्या हातून एकसारख्याच चुका घडतात त्यासाठी त्यांना दूषणं देत असतो पण आपल्या चुका मात्र मान्य करत नसतो, असे अनेक वेळा, अनेक प्रसंगी आपले धोरण दुटप्पीपणाचे असते त्यावर विचार करून सुधारणा करायला हवी. >>> पटले.

अतिशय मुद्देसूद आणि छान लेख आहे, सगळेच मुद्दे, वाक्ये महत्वाची आहेत. प्लीज जरा अजून पॅराग्राफ्स पासून, जागा सोडून लिहा, खूप महत्वाचे विचार मांडले आहेत, पण त्या भल्यामोठ्या पॅरा मधे हरवून जाताहेत.
पालक म्हणून खरंच आपणच बरंच शिकायला हवंय. जरी हे बरंचसं माहित असलं तरी वेळोवेळी असे लेख, चर्चा वाचून परत एकदा उजळणी होते.

लेख वाचताना अजून एक जाणवलं, पालकांना मुलांबद्दल सांगा म्हणल्यावर १०-१२ प्रकारच्या तक्रारी सांगितल्या गेल्या, पण आपलं मूल काय काय चांगल्या गोष्टी करतंय ते कितीजणांनी सांगितलं असेल ? या वयात ह्या सगळ्या विचित्र वागण्याबरोबर मुलं इतर कितीतरी चाम्गल्या गोष्टी पण करत असतीलच की, जसं एखाद्या छंदाला डेडीकेट केलेले असणे, एखाद्या नवीन कल्पनेवर काम करत असणे, कुणाला मदत करणे, अभ्यासात टॉपर असणे, किंवा इतर काही.
आईवडील म्हणून आपल्याला मुलांबद्दल सांगा म्हणल्यावर तक्रारींच्या आधी या पॉझिटीव गोष्टी आठवायला, प्रोजेक्ट करायला हव्या ना ? म्हणजे मुलांनाही त्याच पॉझिटीव गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतील.

सगळ्यांना धन्यवाद!
@ मवा लेख संपादित केलाय. ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की ह्यावयातल्या मुलांच्या समस्यांच (अर्थात त्या आपल्याला वाटत असतात) निवारण कसं करायचं.
<<<<या वयात ह्या सगळ्या विचित्र वागण्याबरोबर मुलं इतर कितीतरी चाम्गल्या गोष्टी पण करत असतीलच की, जसं एखाद्या छंदाला डेडीकेट केलेले असणे, एखाद्या नवीन कल्पनेवर काम करत असणे, कुणाला मदत करणे, अभ्यासात टॉपर असणे, किंवा इतर काही.>> अगदी सहम्त. ४ व ५ ५ जाने. छंदोत्सव आयोजित केला होता त्याबद्द्ल लवकरच लिहीन. हा खरोखरचं आम्हा सर्वांकरिता 'उत्सव' असतो. मुलं आपल्या छंदाविषयी इतके भरभरुन बोलत असतात, हे नक्कीच पाहण्याजोगं - ऐकण्याजोगं असतं.
'
@महेश सगळी नाती आपापल्या ठिकाणी असतात त्याला सब्स्टीट्युट नसतं. काल 'नाते मना मनाचे' असा एक सांगितिक कार्यक्रमाला गेले होते तिथे समुपदेशक अनुपमा गडकरी व डॉ सतिश गावंडे ह्यांनी सांगितलं की नातं हे वार्म अन फर्म (ठाम) असण हे आवश्यक आहे तुम्ही फर्म राहिलात तर धाक वाटेलच तो भितीयुक्त ऐवजी आदरयुक्त असावा. तसेच नातं नॉन जजमेंटल व अनकंडिशनलही असावं. डिसग्री विथ रिस्पेक्ट. हा काही काळा पुरता प्रॉब्लेम असतो. बाकी पियु, इन्ना, स्वातीआं, स्वाती२, शुम्पी, सिंडरेला ह्यांनी लिहिलंच आहे.

मंजु तै मस्त लेख.........

सॉरी ४ तारखेला यायला विसरले Sad

अगदी माझ्याच घरात डोकाउन लिहिल्या सारख वाटतय बरचस. >>>>१००.
अगदि, माझा पुतण्या आणि जाऊ बाई यान्चात नेहमी च छोट्या छोट्या गोश्टिन्वरुन वाद चालु असतात.
गॅझेटशी तास न तास खेळणे, तुलना करणे,खाण्याचे नखरे, बाहेरचे खायला हवे, बोअर होणं, बेशिस्त वागणे,मोकळेपणाने न बोलणं, वाद घालणं, चिडाचीड करणं, मित्रांचे आईबाबा चांगले, धीर नसणे, निष्काळजीपणा, वेळ नसणे, आरशासमोर वेळ घालवणे, घरी राहायला न आवडणे, >>>>> १००
पुतण्या- वय १७, केस असे विन्चरु नकोस, असे काय कपडे घालतोस, कुटे जातोस, काय करतोस नेहमी च हे असे चालु असते, एके दिवस असाच भांड्न करुन मैत्रिनिच्या वाढदिवसाला मित्रान सोबत गेला आणि ट्रेन मधे चढताना हात सुट्ला icu त होता ४ दिवस . एकटाच आहे म्हनुन जास्त लाड झाले कि खरचं आई वडिल चुकले त्याला समजायला.या बाबतितल हे लिखाण मी जावेला ऩक्कि वाचाय्ला देईन.

एक पुस्तक आहे How to Talk So Teens Will Listen and Listen So Teens Will Talk [Adele Faber, Elaine Mazlish] खूप खूप छान पुस्तक आहे. वेळ मिळाल्यास वाचा. मी वाचलं आहे, वेळ मिळेल तशी त्यातली सजेशन्स मी पोस्ट करत जाईन.

Pages