कादंबरी लेखन- तंत्र, मंत्र.

Submitted by शर्मिला फडके on 10 December, 2013 - 05:53

'कादंबरी' हा साहित्य प्रकार ज्यांना वाचायला आवडतो आणि लिहायलाही आवडतो त्यांच्याकरता हा धागा.

गेली काही वर्षं माझ्या डोक्यात कादंबरीचे बीज घोळत आहे. बराचसा भाग लिहूनही झाला आणि मग लक्षात आले की वाटते तेव्हढे हे सोपे नाही. म्हणजे नेमाड्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेऊन सलग महिन्याभरात कोसलाचा पहिला ड्राफ्ट पूर्ण लिहून काढला किंवा जे.के.राउलिंगनी कॉफी हाऊसमधल्या एका टेबलावर बसून आपली पहिली कादंबरी लिहिली वगैरेचे अनेक किस्से वाचल्यावर कादंबरी लिहिणे म्हणजे डोक्यात विषय असेल पक्का तर केवळ मांडी घालून लिहायचीच खोटी की झालीच पाचशे पाने लिहून असं काहीतरी बहुधा आधी डोक्यात होतं त्याला विलक्षण छेद गेला. कादंबरी म्हणजे केवळ डोक्यात घोळणारी चमकदार विषय-कल्पना नाही. त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी असते, घाट असतो आणि त्याला अनुसरुन कादंबरी पुढे न्यायला लागते हे लक्षात आलं. साधारणपणे आपल्याला ज्या कादंबर्‍या आवडल्या त्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे जास्त आवडल्या हे माहीत होते त्यामुळे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा आवडत्या कादंबर्‍यांचे वाचन केले आणि मग कादंबरी लेखनाचे अनेक भ्रम उलगडायला लागले. कादंबरी लेखनाचे अनेक टप्पे असतात ज्यात प्लॉट, स्ट्रक्चर, सीन्स, चॅप्टर्स यांचा योग्य त्या क्रमाने डोक्यात पक्का विचार व्हावा लागतो. फ्लिपकार्टवरुन मी काही पुस्तकेही मागवली. जी वाचताना बरीचशी निरुपयोगी आहेत हे लक्षात आले पण त्यातून काही महत्वाचे मुद्दे लक्षात आले. मराठीत प्लॉट आणि स्ट्रक्चर्सचे फार काही वेगळे प्रयोग आजवर झाले नाहीत. किरण नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस', नेमाडेंची कोसला, अरुण साधूंची मुंबई दिनांक ही काही खणखणीत उदाहरणे सोडली तर रंगनाथ पाठारेंची एक कादंबरी, श्री.ना.पेंडसेंची 'लव्हाळी', वगैरेही आहेत, गौरी देशपांडेच्या 'तेरुओ'मधे स्ट्रक्चरच्या दृष्टीने काही वेगळे प्रयोग आहेत. पण हे मोजकेच प्रयोग. कुणाला काही वेगळे प्रयोग आढळत असतील तर ते इथे द्यावेत कृपया.
तर आत्ता हा धागा काढण्याचे मुख्य कारण टाइम्स लिटररी कार्निव्हलमधे विल्यम डॅरलिम्पर, बाप्सी सिधवा, ग्यान प्रकाश आदींनी ऐतिहासिक कादंबरी लेखनाबद्दल काही चर्चा केल्या, रवी सुब्रमण्यनने ग्रिशॅम टाइप कादंबर्‍या कशा लिहाव्यात (बॅकिंग क्षेत्रातले फ्रॉड वगैरे) याबद्दल काही सांगीतले. मला जरी ऐतिहासिक कादंबरी लिहायची नसली (म्हणजे लिहिलेली कादंबरी ऐतिहासिक ठरली तर चालेल :प) तरी सांगीतलेल्या गोष्टी "अरेच्चा, हो की, या अडचणी आपल्यालाही येतात.." अशा वीजा चमकावून गेल्या, मग वाटलं की सगळ्यांच्या सोबतच करुया कादंबरी लेखनाच्या संदर्भातल्या चर्चा. कुठेतरी काही चमकून जाईल, इतरांना उपयोगी ठरेल, आपल्याला प्लॉट-स्ट्रक्चरच्या ज्या अडचणी येतात त्या इतरांनाही येतात हे कळले की बरं वाटतं जरा. नेटवर अशा तर्‍हेचे असंख्य मार्गदर्शक, चर्चा ब्लॉग्ज आहेत (उदा. नॅनोरिमो) इंग्रजीतून लिहिणार्‍यांकरता. तर हा एक मराठीतून कादंबरी लिहू इच्छिणार्‍यांकरता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कादंबरी लिहायला घेतली तेव्हा एक 'लिहिण्याची डायरी' नामक प्रकार सुरु केला. काय अडचणी येत आहेत, प्लॉटमधले बदल, कॅरेक्टर्स, टाइम-लाईन यांचे घोळ निस्तरणे हा त्यातला एक मुख्य हेतू. तर त्यातले काही मी इथे टाकीन. किंवा ब्लॉगवर टाकून त्याची इथे लिंक देईन. दरम्यानच्या काळात इतरही कोणी काही लिहावे इथे. कारण मला लिहायला निदान अजून ३-४ दिवस वेळ होणार नाही.

शर्मिला, धाग्यासाठी धन्यवाद.

लिहिण्याची डायरी मस्त आहे, त्याचे अपडेट्स पण शक्य असतील तर इथेच लिहत जा.

हे सगळं लिखाणाचं बाडबिस्तारा सांभाळण्यासाठी ywriter5 वापरतेय. फ्री सॉफ्टवेअर आहे. आणि बर्‍याच गोष्टी त्यात लिहून ठेवल्या की बरं पडतं. टाईम लाईन आणि सीन्स-चॅप्टरसाठी तर खूप उपयोगी पडतं.

मी सध्या काय करतेय....
१. रीसर्च. एका कादंबरीसाठी रीसर्च चालू आहे. त्या विषयाला रीसर्चशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तूर्तास ते काम एका गतीने चालू आहे.
२. मोरपिसे रीराईटः जी हां आपने सही पढा. चार वर्षे रडत खडत लिहिल्य्याने एका चांगल्या विषयाची मी बर्‍यापैकी वाट लावली होती. आणि तेवढं पुरेसं झालं नाही म्हणून आता ते परत लिहून काढतेय. बेसिक कॅरेक्टर्स सेम ठेवून प्लॉट घटना बदलायचा एक प्रयोग रेहान टू समुद्रकिनारा असा करून पाहिला- जो बर्‍यापैकी सक्सेसफुल झाला. आता मोरपिसे मधे बेसिक घटना त्याच ठेवून कॅरेक्टर्स बदलत आणतेय. अर्थात घटनांचा स्पॅन वाढतोय. पुढच्या एका पोस्टमधे एखादा सीन शेअर करेन.
३. माझा प्रॉब्लेम हा होतोय, की मला जे काही लिहायचे आहे ते सरळ क्लीअर दिसतंय. पण लिहेपर्यंत मधेच गहाळ होत जातं. लिहिण्याचा पेशन्स कमी पडतो. मग फक्त संवाद लिहून होतात, आणि एकंदर प्रॉडक्ट शब्दबंबाळ होतं. त्यावर थोडे काम करायला हवंय. त्यासाठी टिप्स वगैरे असतील तर द्या.

माफ करा,
मी लेखक नाही वाचक आहे.
>>
जे.के.राउलिंगनी कॉफी हाऊसमधल्या एका टेबलावर बसून आपली पहिली कादंबरी लिहिली वगैरेचे अनेक किस्से
<<
रौलिंग बाई महान आहेत.
पहिली ५-७०० पाने नव्हेत, तर नेक्स्ट २-अडिच हजार पानांचा प्लॉट डोक्यात तयार असावा त्यांच्या. हॅपॉचे प्रत्येक नवे पुस्तक ब्याकवर्ड काँप्याटिबल आहे.

खरोखर असे तंत्र असते का ? अन तंत्राशिवाय कादंबरी लिहिता येतच नाही का ? मार्गरेट मिचेल किंवा टॉल्स्टॉय किंवा थॉमस मान यांनी तंत्राचा अभ्यास करुनच त्यांच्या कादंबर्‍या लिहिल्या का ?

मला खरोखर प्रश्न आहे की तंत्र शि़कून मगच कादंबरी लिहिता येत का ? किंवा फक्त तंत्र शिकूनच कादंबरी लिहिता येईल का ?

नाही, तंत्र शिकूनच कादंबरी लिहिता येते असं तर नक्कीच नाही. (पण तंत्र माहीत असेल तर सोपं नक्की जाऊ शकतं) वर तशी उदाहरणे दिलेली आहेतच. त्याव्यतिरिक्तही शेकडो, दर्जेदार कादंबर्‍या आहेत.

वैयक्तिक मला कादंबरी लिहित असताना काही अडचणी आल्या, त्यावरची उत्तर शोधायला मला खूप वेळ लागला. काही कादंबरी लेखकांची मला त्यात मदत झाली, जेव्हा मी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले.

इतरांनाही तशाच अडचणी/प्रश्न आलेले असू शकतात, त्यांना त्यांची उत्तरं मिळालेली असू शकतात. मला माझ्या कादंबरी लिहिताना आलेल्या अनुभवाचाही काही फायदा इतरांना हवा असल्यास देता येऊ शकतो इतकंच.

कादंबरीची काही वेगळी स्ट्रक्चर्स, फॉर्म्स, प्लॉट्सही या निमित्ताने चर्चेला येऊ शकतात.

मेधा, अभिनय हा उपजत असतोच. पण तरी अभिनय शिकवणार्‍या संस्था असतात. दिलीप कुमारने कोणत्याही अभिनयशाळेत न जाता अभिनय केला आणि नासिरुद्दीन शहाने अभिनयाचे तंत्र शिकून घेऊन तो केला. यात दोघांच्याही अभिनयाच्या स्तराबद्दल, गुणवत्तेबद्दल कोणतीही शंका, फरक उपस्थित केले जात नाहीत. दोन्हीही दर्जेदारच. तसेच आहे हे. कोणतीही सर्जनशील कला उपजत, नैसर्गिक देणगी असते हे ठीकच पण तंत्रामुळे जर काही आयते तोडगे उपलब्ध होत असतील तर त्याचे स्वागतच असते.

मी अरुण साधु यांची "मुंबई दिनांक" हि कांदबरी वाचली आहे... ती तिच्या वेगळ्या मांडणीने खुपच आवडली...
चांगली कांदबरी लिहणे खुपच अवघड असते कारण त्यासाठी त्या विषयातली बरीच माहिती आवश्यक असते... तसेच तिचा आवाका फारच मोठा लागतो.

वाचनिय धागा.

मला आवडलेल्या डॉ. नारळीकरांच्या कादंबर्‍या. का ते माहिती नाही, पण सोडवत नाही.

मला वाटते, मन जसं मानेल तसं लिहित गेलं तर पहिला ड्राफ्ट बनेल आणि नंतर त्यात हवे तसे बदल. किमान पहिल्या काही कथा मी अश्याच लिहिल्या. त्यापुर्वी जवळजवळ ३-४ महिने, अगदी तपशिलासकट (कच्चा दुवा राहु नये म्हणुन) डोक्यात घोळत होती, आणि फक्त प्रसंग नोट्स स्वरुपात डायरीत लिहिले होते.

याबद्दल लिहण्याचा माझा अनुभव शुन्य आहे. पण बर्‍याच गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारच्या अ‍ॅनालॉजीज असतात त्या आधारावर एक उदाहरण लिहतो. Happy इथे या विषयाला लागु पडेल कि नाही माहित नाही.

जेंव्हा रीसर्च ओरिएंटेड सबजेक्ट्मध्ये एखादा प्लॉट (कल्पना) डोक्यामध्ये अशिच कधीतरी चमकुन जाते, त्यावेळी त्याचे पोटँशिअल प्रचंड आहे, यासम हेच असे वाटते कारण त्यावेळी एक मोठे चित्र डोळ्यासमोरुन चमकुन गेलेले असते. आता जिगसॉ पझल प्रमाणे त्यातले छोटे छोटे युनिट जेंव्हा पहायला सुरु करतो तेंव्हा अचानक अरे हे काहितरी भलतेच चुकिचे आहे असे वाटुन त्यातला सगळा इंटरेस्ट निघुन जातो. कारण त्याक्षणी नेमकी जिथे जिगसॉचा एखादा पिस मिस्सींग आहे किंवा चुकिच्या ठिकाणी बसला आहे अशा ठिकाणीच नजर पडलेली असते, मग तोपर्यंत केलेले काम निरर्थक वाटु लागते किंवा सुरवातीस केलेले अस्युमशन चुकिचे आहे असे वाटु लागते.

मग एकतर प्लॉट कंप्लिट डिस्कार्ड केला जातो किंवा अजुन उमेद असेल तर अस्युमशन बदलुन परत तेच काम सुरु होते. जे लोक या सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंटेशन अगदी व्यवस्थित ठेवतात, त्यांचा प्लॉट छान रंगतो, ऐनवेळी केलेले बदल योग्य ठिकाणी बसतात लुपहोल रहात नाहित इत्यादी...... ज्याचे डॉक्युमेंटेशन होत नाही असे प्रोजे़टस बासनात जातात (कारण कल्पना सुचल्या नंतरचे तपशिल जर लिहुन ठेवले नाहित नंतर चक्क आठवत नाहीत, स्वानुभव). असे बासनात गेलेले प्रोजेक्टस नंतर कुणीतरी केले कि अरेच्या हे तर आपल्याला सुचलेच होते आपण का बरे केले नाही Uhoh (तंव्हा आपण तो प्रोजेक्ट का बासनात टाकला हेच आठवत नाही)

वर दिलेले अनेक ख्यात्नाम लेखक / कादंबरीकार हे असे जिगसॉ छान जुळवु शकले असेच वाटते. वाचक वाचतानादेखिल कदाचित तीच अनुभुती घ्यायचा प्रयत्न करत असेल (जिगसॉ जोडायचा). (इव्हन हेच लॉजिक तुम्ही व्याखानाला लावुन बघितले तरी लागु पडेल.) Happy

हि आक्खी पोष्ट अवांतर असु शकेल, पण इथे लिहावेसे वाटले म्हणून लिहले Wink

2 post

इथे कुणीच का लिहत नाहीये.?????/

कादंबरीच्या रीसर्चसाठी मुरली खैरनार यांनी केलेला एक प्रयोग आवडला. त्यांनी फेसबूकवर एक पेज बनवून त्यांच्या रीसर्चमधील महत्त्वाच्या बाबी तिथे शेअर केल्या आहेत, तिथल्या चर्चांमधून देखील त्यांना अनेक नवीन बाबी लक्षात येत जातात.

मी सध्या बुडत्याचा पाय अधिक खोलात या न्यायाने बुडत आहे. काय करावे तेसुचत्त नाही. Happy

दुर्दैवाने आत्ता माझ्याकडे त्या लेखाची लिंक नाही आहे ज्याबद्दल लिहावेसे वाटत आहे. आजच्या मटामध्ये आला आहे.

'रंजनवादी' लेखन जवळपास बंद झाल्याची 'खंत' असे नव्हे पण 'दखलपात्र उणीव' त्या लेखात व्यक्त झाली आहे.

त्या लेखात काही महत्वाचे मुद्दे समाविष्ट झाले आहेत ज्यांच्यावर इच्छुकांनी चर्चा करावी असे वाटते.

ते मुद्दे खालीलप्रमाणे:

१. उदाहरणार्थ सुशि, चिंतामणी लागू, धारप, बाबा कदम, वपू ह्यांच्याप्रमाणे लेखन आता कोणी करत नाही.

२. ह्यामुळे 'आज काहीही करायचे नाही, नुसते चहा / कॉफी घेत एखादी रंजक कादंबरी (/कथासंग्रह) वाचून संपवायची (/चा)' ही 'एन्जॉयमेन्ट'ची संकल्पना काही वर्षांनी हद्दपार होऊ शकेल अशी एक भावना व्यक्त करण्यात आली आहे.

३. सुपरडुपर मुद्दा म्हणजे आज तसे लेखक राहिलेले नसले आणि आंतरजालीय युग दैनंदिनीला संपूर्णपणे व्यापत असले तरीही अशी'च' पुस्तके वाचनालयातून घरी नेऊन वाचणारा एक प्रचंड मोठा वाचकवर्ग अजूनही अस्तित्त्वात आहे हे नोंदवले गेलेले आहे.

अश्या रंजनवादी कथाकादंबर्‍यांचे नेमके योगदान लेखात दिलेले आहे की नाही हे वाचायला नेमका वेळ नव्हता. (अभिरुचीनिर्मीतीसाठीचे व वेळ 'मजेत' घालवू इच्छिणार्‍यांसाठीचे योगदान)

वरील मुद्दे वाचून मनात आलेल्या ह्या खालील मुद्द्यांवरही चर्चा व्हावी असे वाटत आहे.

१. बातम्या, स्तोत्रे अश्या स्वरुपाचे वाचन सोडून जे इतर वाचन आपण हेतूपुरस्पर करतो त्यात आपला हेतू ज्ञानसंपादन / मनोरंजन / करिअर बिल्डिंग ह्यापैकी कोणता किती प्रमाणात, टक्केवारीत असतो?

२. विशिष्ट ज्ञान देणारी किंवा इतिहासकथन करणारी पुस्तके ह्यांच्या तुलनेत रंजनवादी पुस्तकांनी (उदाहरणार्थ) मराठी वाचकाला मराठीशी व वाचनसंस्कृतीशी निगडीत ठेवण्यामधील योगदान कमी की अधिक?

३. रंजनवादी लेखन कमी होण्यामागे ते क्षुल्लक, स्वस्त व निव्वळ व्यावसायिक असते अश्या प्रकारची भूमिका समाजातील दिग्गजांनी घेतल्यामुळे 'आम्ही तसले नाहीच आहोत' हे दाखवण्याचा आटापिटा असेल का?

४. रंजनवादी लेखनात लेखकाचा / लेखिकेचा (लेखक / लेखिका म्हणून) कस कमी लागत असेल का?

५. रंजन कश्यामुळे होते हेच माणसामाणसानुसार बदलते असे विधान केले तर (उदाहरणार्थ) मराठीतील अनेक लेखक निव्वळ रंजनवादी ठरू शकतील हे विधान पटू शकेल का?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!