पापण्यांतला पाऊस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.

पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...

पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.

तू येशील... भेटशील...

शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

येशील ना?
दार उघडचं आहे..
आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे.

प्रकार: 

दक्षिणा....

कित्येक दिवसांनी तुझे लिखाण वाचायला मिळाले आणि तेही इतक्या सुंदर चित्रमय कवितेच्या रुपात.... मन खरेच हरखून गेले....विशेषतः कवितेतील 'आशा मनी अजुनी तरंगत आहे...' हा भावनेने....खालील ओळ प्रतीकच आहे तुझ्या विचारांचे :

"......आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे...."

पाऊस पापण्यांत साठवून ठेवल्या आहे ज्याच्यासाठी तो भाग्यवंत कवितेमुळे सुखावून जाईल. काय योगायोग बघ....आजच भारती बिर्जे-डिग्गीकर यांची एक कविता वाचली. त्यातील खालील चार ओळी ह्या तुझ्या स्पर्शदायी विचाराशी किती मिळून जातात ते पाहा :

घर उभेच आहे जराजरासे थकलेले
मन माझेही तडजोडी करून झुकलेले
वेढतो मला दशबाहुंनी पण परिसर हा
सांगतो मला ,’’येथलीच तू, येथेच रहा..’’

सारेच सुंदर केलेस तू दक्षिणा....

आवडली !
एकदम मस्त.. एका बैठकीत.. एकदाही फेरफार न करता.. लिहीलेली आहे असे मनाला वाटुन गेले Happy

खल्लास कविता! खुप तरल!! Happy
दक्षे, माझा विश्वासच बसत नाहीये... तु इतकी सुंदर कविता करतेस.
लिहीत रहा गं. आम्ही आता तुझ्या कवितांची वाट पहाणार.

रच्याकने, पाऊस हा आपल्या दोघींचा जिव्हाळ्याचा विषय आहे, हे आताच समजलं. Wink

अग्गोबाई Happy सुरेख लिहिलियस गं! तुझ्यातल्या कवयित्रीनं असं अधूनमधून हळूच बाहेर डोकावणं हा खुपच सुखद साक्षात्कार आहे.

दक्षिणा,

शेवट फार आवडला. प्रवाहीपणा आणि संयत अभिव्यक्ती हे गुणविशेष प्रामुख्याने जाणवले. कृपया लिहीत राहावेत. Happy

मनापासून शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

खूपच सुरेख आणि अवीट… ही कविता "माझी असती" तर कित्ती बरं झालं असतं असं वाटायला लावणाऱ्या फार मोजक्या कविता माझ्याकडच्या यादीत आहेत …. तुझी ही कविता आज त्या यादीत जाउन बसली एवढं नक्की…

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

येशील ना?
दार उघडचं आहे..

खास !!! एकदम मनातल मांडलस माझ्या Happy

लिहीती रहा !

आपण भेटलो की पाऊस येणार हे नक्की,
अजून तो पापण्यांत शिल्लक आहे..............वाह वा !!
-सुप्रिया.

Pages