मागे एकदा माझा एक मुंबईकर मित्र औरंगाबादला आला होता. ऐन उन्हाळ्यात. म्हणजे नेमके उन्हाळ्याचेच दिवस होते का ते आठवत नाही, पण हवा मात्र होती. त्याच्या येण्याच्या २ दिवस आधी ४३ अंशाच्या आसपास तापमान होतं. त्याने मला विचारलं, 'कसं करावं ?' मीही त्याला म्हटलं की, 'बघ बाबा ! आपण मुंबईकर ह्युमिडिटी सहन करू शकतो, पण हा कोरडा उन्हाळा म्हणजे बिनपाण्याची हजामत केल्यासारखा बिनघामाचं 'डिहायड्रेशन' करवतो. अगदीच आवश्यक असेल तर ये, नाही तर टाळ !' पण त्याचं काम अत्यावश्यक होतं. तो आला. आणि गंमत अशी की पाऊस पडला ! अन् तापमान बऱ्यापैकी सुसह्य झालं ! दोन दिवस मजेत गेले आणि जाताना म्हणाला, 'मुंबईपेक्षा इथेच छान आहे रे !'
त्याला तसं का वाटलं असेल हे मला काल समजलं. 'क्रिश - ३' पाहिल्यावर. तिकिट घाबरत घाबरत काढलं होतं. हृतिकसाठी पाहायचा होता आणि सुपरहिरो व विवेक ओबेरॉय मुळे टाळावासा वाटत होता. पण काढलं तिकीट, घेतली रिस्क, केली हिंमत आणि झाली गंमत ! कारण बऱ्यापैकी सुसह्य होता की ! अडीच तासांच्या स्टंटबाज नाट्यानंतर हा स्पायडरमॅन + एक्स-मेन + सुपरमॅन + मिशन इम्पॉसिबल + वगैरे + देसी शक्तिमान चांगलाच मनोरंजक वाटला.
'कोई मिल गया' मधला अर्धवटराव रोहित 'जादू'च्या मदतीने स्वत: स्वत:ला गवसतो, नंतर 'क्रिश' मध्ये त्याला डॉ. आर्या डांबून ठेवतो व त्याचा मुलगा 'क्रिश' स्वत: स्वत:ला गवसतो. 'क्रिश-३'मध्ये रोहित आणि क्रिश दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत. बाप एक नावाजलेला शास्त्रज्ञ आणि मुलगा एक नावाजलेला सुपरहिरो !
दुसरीकडे 'काल' (विवेक ओबेरॉय) हा एक महत्वाकांक्षी माथेफिरू अख्ख्या जगावर राज्य करायचं स्वप्न बघत असतो. त्यासाठी तो एक 'मानवर' (मानव + जानवर) फौज तयार करत असतो. जन्मजात अपंग असलेल्या 'काल'ने आपल्या दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धी आणि पैश्याच्या जोरावर आपल्या अपंगत्वावर एका मर्यादेपर्यंत मात केलेली असते. पण पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी तो जंग जंग पछाडत असतो. ह्या सगळ्या संशोधन, निर्मितीसाठी हवा असलेला पैसा कमवायची क्लृप्ती असते, विषाणू आणि त्याच्यावर 'अॅण्टीडोट' (प्रतिबंधक औषध) तयार करणे. आधी स्वत:च तयार केलेल्या विषाणूचा संसर्ग घडवून आणून हाहाकार माजवणे आणि मग त्यावरचं औषध स्वत:च पुरवून अव्वाच्या सव्वा कमावणे !
एक संहार नामिबियात यशस्वीरित्या घडवून आणल्यावर काल व कं. आपला मोर्चा 'बिग्गर मार्केट' भारताकडे वळवते आणि मुंबईत घातपात घडवला जातो.
ओव्हर टू शास्त्रज्ञ व सुपरहिरो.
ते काय करतात ?
अर्थातच शहराला वाचवतात, पण कसं ?
त्यानंतर काय होतं ?
'काल'च्या महाशक्तीस तोंड देताना 'क्रिश'ला कशाकशाला तोंड द्यावं लागतं ?
ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी चित्रपट बघा.

काही वर्षांपूर्वी काही सुपरहिरो किंवा चमत्कारी पुरुष हिंदीत आणायचे हास्यास्पद प्रयत्न केले गेले होते. 'क्रिश'सुद्धा मी घरी, टीव्हीवर तुकड्या-तुकड्यांत पाहिला होता. थेटरात जायची हिंमत झाली नव्हती. सुपरहिरो किंवा काहीही सुपरह्युमन दाखवण्यात बॉलीवूड मार खातं किंवा हॉलीवूड मात देतं ते मुख्यत्वेकरून 'स्पेशल इफेक्ट्स' मधल्या तफावतीमुळे. क्रिश-३ ही तरी उणीव भरून काढतो. (थ्री चिअर्स फॉर 'रेड चिलीज'!) पण फुटकळ प्रेमकहाणी अन् फडतूस गाणी मात्र कोंबतोच आणि बॉलीवूडपण राखतो.
प्रियांका चोप्राला स्वत:कडून नेमक्या काय अपेक्षा आहेत ? असा प्रश्न 'जंजीर' आणि 'क्रिश-३' मुळे पडतो. जिथे 'नटी की केवळ शोभेची बाहुली असते' हा पूर्वीचा बहुमान्य समज हळूहळू मोडीत निघत आहे, तिथे प्रियांका एकानंतर एक कमजोर भूमिका करते आहे. स्वत:ची अधोगती स्वत:च करवते आहे. कदाचित आधीच्या भागात तीच 'प्रिया' होती म्हणून कंटिन्यू केलं असेल, पण तरी डझ नॉट मेक सेन्स.
गाणी म्हणजे तर कोपरापासून दंडवत आहेत ! राजेश रोशन साहेबांचं घणाघाती संगीत त्यांच्या वयाच्या इतर कुठल्या सामान्य माणसास ऐकवलं तर त्याचा रक्तदाब निश्चित वाढेल, कदाचित गचकेलही ! 'छू कर...', थोडा हैं थोडे की जरूरत हैं', 'बातो बातो में' सारखं तरल संगीत आत्ताच्या काळात अपेक्षित नाही. पण हे ? असं ?
बरं, गाणी भंकस आहेतच. त्यांची पेरणी ? म्हणजे कसंय.... कहाणी आपली पुढे जात असते. मध्येच 'कट' ! --------- गाणं ---------- गाणं संपलं. कहाणी पुढे………. अरे काय लावलंय काय ? गणेशोत्सवाचा मंडप आहे का हा ?
समीर अनजान कोण आहे माहित नाही. तो 'अनजान'च राहिलेला बरा. 'समीर'कडून काहीच अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांबद्दल तक्रार नाही. चालू द्या दळण.
हृतिक हा एक अत्यंत प्रामाणिक कलाकार आहे. तो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो. त्याने साकारलेला म्हातारा रोहित अप्रतिम ! सुपरहिरोच्या भूमिकेतही तो अगदी फिट्ट. आजच्या हिरोंपैकी तो एकटाच आहे जो 'सुपर' वाटू शकतो. दोन्ही भूमिका करताना त्याने लाजवाब अदाकारी केली आहे, नि:संशय ! इतकं की, हे दोन नट नसून एकच आहे ह्याचाही विसर पडावा !
'काल'ची हुकमाची राणी मानवर 'काया' उभी करणारी 'कंगना राणावत' एक आश्वासक अभिनेत्री वाटते बऱ्याचदा. प्रियांकापेक्षा कंगना लक्षात राहावी, ह्यातच सर्व काही यावं, नाही का ?
पण, द सर्प्राईज इज 'विवेक ओबेरॉय' ! हातापायाची हालचाल करण्याला काही वावच नसताना, केवळ मुद्राभिनयातून त्याने 'काल' सुंदर साकारला आहे. ह्यापूर्वी अत्युत्साही अभिनयाने काही बऱ्या भूमिकांची माती करणारा वि. ओ. इथे समजूतदार, संयत अभिनयाचं दर्शन घडवून सुखद धक्का देतो. आत्तापर्यंतचे हे त्याचे नक्कीच सर्वोत्कृष्ट काम आहे.
अॅक्शन, स्टण्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स अनन्यसाधारण महत्वाचे असणार होते, आहेतही. काही ठिकाणी इंग्रजी चित्रपटांची आठवण येते, नाही असं नाही. पण चालसे. एकूणच हाणामाऱ्या, उड्या, फेकाफेकी, तोडफोड, चिरफाड चांगली रंगली आहे.
शंभर वर्षानंतर हिंदी चित्रपटाला एक सुपरहिरो मिळाला आहे का ?
ह्याचं उत्तर 'हो' द्यावंसं वाटतंय. पण होल्ड ऑन. चित्रपटाच्या अखेरीस पुढील भागाची सोय केलेली आहेच, तोही पाहू या, मग ठरवू ! घाई काय आहे ? १०० वर्षं थांबलो अजून ३-४ थांबू !!
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/krrish-3-movie-review.html
तो नाचताना कधीची तो नाचणं
तो नाचताना कधीची तो नाचणं एंजॉञ्य" करतोय हे दाखवू शकत नाही >>>>
नंदीनी तुला माहीत नाही ????
त्याला कंबरेचा स्लिपडिस्क प्रोब्लेम आहे.. त्याला वेदना होतात नाच करताना.. हा प्रोब्लेम त्याला करण अर्जुन करताना झालेला .. तरी सुध्दा त्याने मेहनत करुन " कहो ना प्यार है" मधे नाच केला..
बहुतेक त्या वेदनेमुळे तो एंजोय करु शकत नाही
उदयन, नाही. तो नीट नाचू शकतो.
उदयन, नाही. तो नीट नाचू शकतो. वेदनेचा प्रोब्लेम क्वचित होत असेल पण नाच तो काय कहो ना प्यार पासून प्रत्येक फिल्ममधे करतोच आहे. स्टेज शोमधे पण चांगलाच नाचतो की.
नाचतानाचा एण्जॉय म्हणजे गोविंदा, रणबीर कपूर, सलमान खान करतात तसे. या लोकांपेक्षा ह्रितिकच्या स्टेप्स परफेक्ट असतात, पण चेहरा पूर्ण ब्लँकतरी किंवा कुठेतरी हरवल्यासारखा. त्याची बॉडी लवचिक आहे, ह्रिदम आहे सर्व काही आहे, पण डान्सचा आत्मा नसल्यासारखं. म्हणून असेल पण त्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करायला कायम कठीण जातात.
हृतिकच्या नाचाबद्दल बहुतांशी
हृतिकच्या नाचाबद्दल बहुतांशी सहमत, नंदिनी आणि साजिरा ह्यांच्याशी.
त्याचा नाच खटकेबाज वाटतो... तालाची प्रत्येक मात्रा तो अचूक साधतो आणि बीट - ऑफ बीट परफेक्ट नाचतो.. पण नाचात लटकेबाजीसुद्धा हवी, ती फार क्वचित दिसते. 'जिंनामिदो' मधल्या 'सिनोरिटा' मध्ये हृतिक आणि फरहानला एकत्र नाचताना पाहिल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.
त्याच्या नाचावर, नंदिनी म्हणतात त्याप्रमाणे पाश्चिमात्य पगडा जाणवतो. 'बुंमरो' सारखी गाणी त्याने क्वचितच केली आहेत. सर्टनली अ स्कोप फॉर इंप्रूव्हमेंट फॉर हिम.
साजिरा म्हणतात तसा अभिनय मात्र मला त्याचा कृत्रिम वाटत नाही. अखेरीस तो राकेश रोशनचा मुलगा आहे. त्याला अंगभूत अभिनयकसब तसे कमीच आहे. पण त्याच्या ह्या कमतरतेला त्याचा प्रामाणिकपणा भरून काढतो. खूप जीव ओतून तो प्रयत्न करतो.... रोहित मेहरा त्याने अफलातून केला आहे. तोडच नाही. कुठेही मला कृत्रिमपणा जाणवला नाही.
उदयन ह्यांचे राजेश रोशन ह्यांच्या संगीताबद्दलचे विचार इंटरेस्टिंग आहेत. मला जरा वेगळं वाटतं मात्र... तालाचे विविध पॅटर्न्स एकाच गाण्यात वापरण्याची स्टाईल आरडी आणि जतिन-ललित व्यतिरिक्त इतरांत मला तरी अभावानेच जाणवली. दोन-तीन बदल तर प्रत्येक गाण्यात संभवतातच, ती स्टाईल असू शकत नाही. राजेश रोशन ह्यांची गाणी माझ्या मते मुख्यत्वेकरून 'मेलडी'बेस्डच होती. जतिन ललितच्या तर कित्येक गाण्यांत धृवपदाच्या दोन ओळींसाठीही भिन्न र्हिदम पॅटर्न जाणवतात. उदा. वो तो हैं अलबेला, वादा रहा सनम, ही गाणी नीट ऐकल्यास संपूर्ण गाण्यात १०-११ र्हिदम पॅटर्न्स वापरलेले जाणवतील. इतकी प्रयोगशीलता राजेश रोशनमध्ये नाही.
'जिंनामिदो' मधल्या 'सिनोरिटा'
'जिंनामिदो' मधल्या 'सिनोरिटा' मध्ये हृतिक आणि फरहानला एकत्र नाचताना पाहिल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो.<<< केव्हाचं मी हा फरक दाखवण्यासाठी उदाहरण आठवत होते, हे गाणं परफेक्ट आहे.
फरहान पण चांगलाच डान्सर आहे त्यामुळे हे लगेच जाणवतं. (याच गान्यात अभय "देओल" असल्याचं सिद्ध करतो.) मला पॅरलल उदाहरण, कभी खुशी गम मधलं बोले चुडीयां आठवलं होतं. त्यात शाहरूख नॉन डान्सर असूनदेखील नाचताना बघायला आवडतो. ह्रितिक चांगलाच नाचतो, पण ते "पंजाबी बॉलीवूड डान्स" वाटत नाही.
इम्प्रूव्हमेंटपेक्षाही ती त्याची शैली नाहीच आहे. पण हे तो बरोबर हेरून आहे. त्याचा डान्स रोबोटिक नाही, परफेक्शनिस्ट आहे. त्याला फराह खान बरोबर कोरीओग्राफ करू शकते. इधर चला मै उधर चला मधे याच मशिन डान्सचा तिने उत्तम वापर केला होता. त्याच्या किंचित इरॅटिक वाटणार्या स्टेप्स "दिल ना दिया" मधे चांगल्या वापरल्या होत्या. क्रिश ३ मधे रेमोला तितकं नीट जमत नाहीये.
Pages