दिवाळी स्पेशल - गुलाबाचे चिरोटे

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 November, 2013 - 01:18
gulabache chirote
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा - ३ वाट्या,
मीठ - अर्धा चमचा,
बेकिंग पावडर - अर्धा चमचा,
पातळ तूप - पाव वाटी,
लाल रंग - १ टीस्पून ,
भिजवण्यासाठी दूध

साठ्याचं साहित्य -
कॉर्न फ्लोअर - २ टेबल स्पून,
तूप - अर्धी वाटी

क्रमवार पाककृती: 

१. मैदा, मीठ, बेकिंग पावडर, तुपाचे मोहन एकत्र करावे. त्यात थोडा लाल रंग घालून थंड दुधाने भिजवून १ तास झाकून ठेवा.

२. तूप फेसून त्यात कॉर्न फ्लोअर घालून साठा तयार करावा.
३. पिठाच्या ८ अगदी पातळ पोळ्या लाटून घ्या.
४. एका पोळीवर साठा पसरुन त्याची गुंडाळी करा. दुसर्‍या पोळीवर साठा पसरा. त्याच्या कडेला पहिली गुंडाळी ठेवून दुसर्‍या पोळीची गुंडाळी करा.
५. अशा ८ पोळ्यांच्या ४ गुंडाळ्या करुन घ्या. ओल्या कापडाखाली झाकून थेवा.
६. आता त्याचे साधारण १ इंच जाडीचे तुकडे कापून घ्या. कापलेली बाजू वर करुन चिरोटा लाटून घ्या.
७. कढईत तूप तापले की त्यात एकेक चिरोटा घाला. कढीत टाकल्याबरोबर जरा खाली दाबा. डाव्या हाताने टोकदार चाकू किंवा विणायच्या सुईने दाबून दुसर्‍या हाताने चिरोटा फिरवत तूप उडवा, तूप उडवतांना एकेक पापुद्रा छानपैकी फुलून येतो आणि चिरोटा गुलाबासारखा दिसतो.
८. असे सगळे चिरोटे तळून झाले की ताटात पसरुन ठेवा आणि साखरेचा घट्ट पाक करुन प्रत्येक चिरोट्यावर एक टेबल स्पून छान गोल फिरवून टाका आणि पाक गरम असतांनाच त्यावर पिस्त्याचे काप घाला म्हणजे ते चिकटतील.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात साधारण ६० चिरोटे होतात.
अधिक टिपा: 

१. चिरोट्याच्या पोळ्या अगदी पातळ लाटाव्या म्हणजे पापुद्रे छान फुलतात.
२. एकेक चिरोटा तळावा लगतो त्यामुळे वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर इतका सुरेख दिसतो आणि अतिशय खुसखुशीत, चविष्ट लागतो त्यामुळे मेहेनत सार्थकी लागते Happy
३. साधारण प्रसन्न मूड असला की हे चिरोटे करायला घ्यावे कारण मूड चांगला असला की गुलाब चांगले फुलतात Wink

माहितीचा स्रोत: 
मंगला बर्वेंचं "दिवाळी आणि सणासुदीचे पदार्थ" हे पुस्तक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण प्रसन्न मूड असला की हे चिरोटे करायला घ्यावे कारण मूड चांगला असला की गुलाब चांगले फुलतात >> ही टीप चिरोट्यांइतकीच खुसखुशीत आणि आवश्यक Happy मस्तच झालेत चिरोटे...

गुलाब छान फुललेत.अगदी निगुतीने केलेत. ह्यात सगळ्यात आतली पोळी पिवळ्या रंगाची (परागकण) बाहेरच्या दोन लाल किंवा गुलाबी (पाकळ्या) आणी सगळ्यात बाहेरची हिरवी (Sepal मराठी शब्द माहीत नाही.) असे करून पहा.

मस्त! मि केलाय हा प्रकार...वेळ्खाउ आसल्याने आता करण होत नाहि...
क्रुतित पाकाचे साहित्य राहिलय

मंगला बर्व्यांच्या पुस्तकात या चिरोट्यांचा अगदी असाच फोटो आहे का? मराठी पाककृतींचं पुस्तक दिसल्यावर, २०० पानांत असणार्‍या ४ गुळगुळीत पानांवरचे फोटो बघायची घाई व्हायची, त्यात बघितल्यासारखा वाटतोय.

धन्यु लोक्स Happy

मृण्मयी....... हा फोटो ५०० % माझ्या चिरोट्यांचा आहे Happy

मंगला बर्वेंचं मी वापरत असलेलं हे पुस्तक ८० पानांचं आहे आणि त्यात पदार्थांचे रंगीत फोटो नाहीत Happy

स्वाती....... म्हणून तू करत नाहीस.......म्हणजे गं काय ?????

प्राजक्ता...... पाकाचं साहित्य लिहिलं नाही कारण जितका पाक हवा त्या प्रमाणात साखर घ्यायची. कुणाला जास्त गोड हवे असतील तर जास्त पाक ओतायचा. मी अंदाजानेच करते. जेमतेम पाणी घालून एकतारी पाक करते. चिरोट्यांवर टाकतांना संपला की पुन्हा करते. अगदी ५ मिनिटात होतो पाक.

जयू, अरे देवा! हा फोटो तुझा नाही असं अजीबात इंप्लाय नाही करत. रुचिरा किंवा तत्सम कुठल्यातरी पुस्ताकात फार पूर्वी असे चिरोटे बघितलेत एव्हडंच म्हणायचंय!

>> स्वाती....... म्हणून तू करत नाहीस.......म्हणजे गं काय ?????
इतका प्रसन्न मूड कधीच नसतो म्हणून. गंमत गं उगाच. Happy

सुरेखच दिसताहेत हे चिरोटे. Happy
आपल्या बस, रिक्शा, ट्रक कशातलीच बात नाही असे सुरेख चिरोटे. तुम्हांला सलाम. Happy

गुलाब छान फुललेत.अगदी निगुतीने केलेत. ह्यात सगळ्यात आतली पोळी पिवळ्या रंगाची (परागकण) बाहेरच्या दोन लाल किंवा गुलाबी (पाकळ्या) आणी सगळ्यात बाहेरची हिरवी (Sepal मराठी शब्द माहीत नाही.) असे करून पहा >>> अगदी अगदी ... मला या वेळेला जमले ( अर्थात साबांच्या मदतीने ) पण आम्ही पाकात नाही घालत , गरमगरम असताना पीठीसाखर भुरभुरवतो .
\
बच्चे कंपनीला भारी आवडले.. flowers म्हणून खाल्ले ..

IMG1214.jpg

जयवी आणि स्वस्ति, दोघींचेही चिरोटे मस्त दिसत आहेत. पाक किंवा पिठीसाखर भुरभुरवलेले असे दोन्ही प्रकारचे आवडतात. एकंदरीत गोडच खूप आवडतं Uhoh

ते 'साटा' हवं ना? (साठा च्या ऐवजी) >>>> +१ हे माहित असल्याबद्दल आणि नोटिस केल्याबद्दल परागचं कौतुक.

Pages