आईची रेसिपी - गव्हाची खीर आणि चपाती/पोळीचे लाडू

Submitted by स्वप्ना_राज on 24 October, 2013 - 23:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गव्हाच्या खीरीचे जिन्नस - पाव किलो गहू, आवडीप्रमाणे गूळ, एक नारळ, वेलदोडा पूड

चपाती/पोळी लाडू जिन्नस - शिळी चपाती/पोळी, गूळ, तूप, शेंगदाणा कूट, वेलदोडा पूड

क्रमवार पाककृती: 

गव्हाची खीरः

गहू संध्याकाळी धुवून वाळत घालायचे.
ओलसर असतानाच मिक्सरमधून फोलपटं निघतील इतपत फिरवून घ्यायचे. (गहू साधारण अख्खे रहायला हवेत. रवा होऊ देऊ नये.)
गहू पुन्हा वाळत घालायचे. वाळले की पाखडून फोलपटं काढून टाकायची.

gahu1.JPG

गहू रात्रभर पाण्यात भिजत घालायचे.
सकाळी पाणी घालून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे.
पाणी असल्यास काढून टाकायचं (पाणी उरलं नसल्यास उत्तम कारण मग सत्त्व निघून जात नाही)
गरम असतानाच त्यात आवडीप्रमाणे गूळ किसून घालायचा.
एक नारळाचं दाट दूध घालायचं. वेलची पूड घालायची.
फ्रीजमध्ये ठेवून गार सर्व्ह करायची.

gahu2.JPG

चपाती/पोळी लाडू:

चपाती/पोळीचे तुकडे करुन घ्यावे,.
त्यात गूळ, शेंगदाणा कूट, वेलदोडा पूड इत्यादि जिन्नस घालावेत.
शेवटी पातळ केलेलं तूप घालून सर्व नीट मिक्स करून लाडू वळावेत.

ladoo.JPG

अधिक टिपा: 

१. लागणारा वेळ दोन्ही पाककृतींसाठी मिळून दिला आहे. त्यात आदल्या दिवशीच्या तयारीसाठी तसंच चपाती/पोळीसाठी करण्यासाठी लागणारा (!) वेळ समाविष्ट नाही.
२. ह्या पाककृती एकाच वेळेस करायच्या असं अजिबात नाहिये. चपातीच्या लाडवाची कृती छोटीशी असल्याने खीरीच्या कृतीसोबत दडपून दिली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
३. गव्हाची खिरीची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी करावी. रात्री अपरात्री मिक्सर फिरवून शेजार्‍यांना वात आणू नये. Happy

माहितीचा स्रोत: 
आईसाहेब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही पदार्थ माझे मनापासुन आवडते.:स्मित: अजूनही सकाळाची पोळी रात्री कुस्करुन त्यात गुळ आणी तूप घालुन खाते. गव्हाच्या खिरीत मात्र नारळाचा चव घालते, आता नारळाचे दूध घालुन करेन. सध्या घरात दलिया असल्याने तोच वापरते. गव्हाची तहान दलियावर.

छान Happy स्वप्ना, ती खीरीची वाटी ताबडतोब उचलावी अशी दिसतेय. नारळाचं दूध घातलेली खाल्ली नाहीये, करून बघायला हवी. पोळीचे लाडूसुद्धा छान घोटीव वळलेयस. मी सुका मेवा पण घालते लाडवात.

+१

पोळीचा लाडू.... माझा एकदम आवडता पदार्थ.
त्यात थोडेसे तीळ आणि सुके खोबरेपण भाजून घालावेत. मस्त चव येते.
मुलांसाठी एकदम पौष्टीक खाऊ.

गव्हाची खीर म्हटली मला वाईचा कृष्णाबाई उत्सव आठवतो. Happy

स्वप्ना_राज,
दोन्ही आवडत्या रेसिपीज आहेत.
गव्हाची खीर मी गहू भिजवून मोड आले की मग ते कुकर ला लावून शिजवते व नंतर त्यात खोवलेला नारळ, दुध,वेलदोडा पावडर घालून परत एकदा उकळते.मग गॅसवरून खाली उतरून गुळ घालते.
आता तुमच्या रेसिपीने करून बघेन.

स्वप्ना, आपल्या दोघांच्या माँसाहेब बहुतेक एकाच शाळेत शिकल्यात. आमच्याकडे हे पदार्थ याच कृतीने होत असतात.

२. ह्या पाककृती एकाच वेळेस करायच्या असं अजिबात नाहिये. चपातीच्या लाडवाची कृती छोटीशी असल्याने खीरीच्या कृतीसोबत दडपून दिली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
३. गव्हाची खिरीची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी करावी. रात्री अपरात्री मिक्सर फिरवून शेजार्‍यांना वात आणू नये.

>>>> Biggrin

चपातीला लाडू म्हटला की शाळेचा तो उभा स्टीलचा कडीवाला डबा आठवतो. Happy

दोन्ही मस्त आणि योग्यवेळी दिलेत .आता खिरीसाठीचा खास खपली गहू मिळणे कठीण झाले आहे .थंडीसाठी आणि काही ठिकाणी दत्तजयंतीचा प्रसाद म्हणून करतात .

सर्वांना खूप धन्यवाद! रच्याकने, ते लाडू मी वळले नाहीत, आईने वळलेत. मी वळले असते तर ते लाडू आहेत हे सांगायला लागलं असतं Proud

माझ्या आजोळी रगडा होता त्यात गहू कांडून ही खीर केली जायची. एप्रिल-मे च्या सुट्टीत गेल्यावरच ती खायला मिळायची. आता मुंबईत कुठला रगडा? Sad म्हणून आई मिक्सरवर करते. पण दर वेळी ती खाताना जिथे आता कधीच जाता येणार नाही अश्या आजोळची आठवण येते.

स्वतःलाच पोळ्या कराव्या लागत असल्याने जास्त पोळ्या केल्या जात नाहीत्/उरत नाहीत.
आत बहुतेक रोटोमॅटीक आणल्यावरच पोळ्यांचा लाडू बनवेन मी. Proud

स्वतःलाच पोळ्या कराव्या लागत असल्याने जास्त पोळ्या केल्या जात नाहीत्/उरत नाहीत.
आत बहुतेक रोटोमॅटीक आणल्यावरच पोळ्यांचा लाडू बनवेन मी.<<< +१.

रेसिपी मस्त. मी गव्हाची खीर दलिया वापरून करते. झटापट आणि पटापट होते. Happy

टिपा स्वप्ना स्टाईल आहेत!!!

गव्हाची खीर म्हटलं की अक्कलकोटच्या प्रसादाच्या जेवणाची आठवण होते. अफलातून चव असायची. त्या खिरीसाठी मी त्या प्रसादाच्या जेवणाला हपापलेली असायचे पुर्वी :-P. हल्ली ६-७ वर्षांत अक्कलकोटला जाणं न झाल्याने आता प्रसादाच्या जेवणात गव्हाची खीर वाढतात की नाही माहित नाही.

मी घरी नंदिनीसारखी दलियाचीच करते.

लाडवाचा फोटो खतरनाक. आत्ता खावेसे वाटतायत!
गव्हाची खीर... माझ्या आईची, आज्जीची फार आवडती.. मला तेव्हा नाही आवडली कधी. .. पण अलिकडे आवडते.. Happy

दलिया वापरुन खीर करणेत येइल आणि पोळ्या जास्त करुन लाडू! फार दिवसात दोन्ही पदार्थ केले/खाल्ले नाहीत. आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

रच्याकने, शिळ्या पोळीचा लाडू केल्या केल्या खायचा असा आमच्याकडे गेल्या बरेच वर्षातला नियम आहे. माझ्या आत्याला एकदा असा लाडू डब्यात घेऊन गेल्यानंतर जेवणाच्या सुटीत खाल्ल्याने भयंकर फूड पॉयझनिंग झाले होते. पोळ्या रात्रीच्याच होत्या. पण डॉ म्हणाले होते की असं शिळं परत खाऊ नका वगैरे

स्वप्नाच्या रेसिपीमुळे आज मी केली गव्हाची खीर. Happy दलिया वापरूनच!! नारळाचे दूध घालण्याऐवजी ओले खोबरे घातलंय. सुनिधीला प्रचंड आवडली.

परत एकदा धन्यवाद लोक्स! सगळे प्रतिसाद मातोश्रींना दाखवले.

वत्सला, फूड पॉयझनिंगचं वाचून आश्चर्य वाटलं.

ताज्या पोळ्यांचे लाडूपण चांगले लागतात. जरुर करून बघा. पोळ्या झाल्यावर वाफ जाऊन थोड्या गार होऊ द्यायच्या. जेणे करून कुस्करल्यावर पुन्हा कणीक होऊ नये. ज्यांना कुणाला तव्यावरून ताटलीत आलेल्या पोळीची तुप गुळाची सुरळी आवडते त्यांना हे लाडू उरलेल्या पोळ्यांपेक्षा जास्त आवडतील Happy

फूड पॉयझनिंगचं वाचून आश्चर्य वाटलं.>>> उन्हाळ्याच्या दिवसांत पोळ्यांना वाफ धरली असेल तर इतक्या तासांनी त्या खराब होतात.

स्वप्ना ही कानडी खासियत आहे Happy .....माझी आई पण करते हे दोन्ही पदार्थ...याला गोदी कुट्टी पायसा असं म्हणतात...

अवंतिका, दलिया पाण्यामधे दोन तीन तास भिजत घाल, त्यातच मूठभर तांदळाची कणी घाल. नंतर हा दलिया कूकरला दोन तीन शिट्ट्या देऊन उकडून घे. या उकडलेल्या दलियाला गॅसवर ठेवून त्यात गूळ चिरून घाल. नारळाचे दूध किंवा ओले खोबरे खवणून घाल. त्यामधे आवड असेल तर दालचिनी पूड जायफळ पूड, बदम्म काजू पिस्ता मनुका वगैरे घाल. चांगली रटरटवून उकळी आली की गॅस बंद कर. गरम गरम देताना वर तूप घालायचं गार वाढायला देताना कुणाला फार घट्ट वाटली तर थोडं दूध घालून द्यायची.

Pages