मुलं - काही नोंदी

Submitted by मितान on 21 October, 2013 - 03:09

मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. Sad

केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>माझं मत एव्हधच आहे की "आज काल" ही मदत घराबाहेर्च्या व्यक्तिन्कडून जास्त मिळते... घरातुन नाही...(भावंडे, आई वडील, नातेवाईक, अगदी घरचेच असे हक्काचे मित्र-मैत्रिणी)...>>

मुलं वाढवताना कळत नकळत चुका होतात. काही वेळा परीस्थितीच विचित्र असते. कधी कधी सगळी काळजी घेऊनही अपघात होतात. यात शरीराला इजा झाली तर आपण मदत घेतोच ना, तसेच हेही. मनाच्या जखमा लगेच लक्षात येत नाहीत. बर्‍याचदा परीणाम ठळकपणे जाणवायला लागले की जाग येते. अशावेळी प्रोफेशनल मदत गरजेचीच. मित्र -मैत्रीणी, विश्वासाचे नातेवाइक एका ठराविक ट्प्प्यापर्यंतच मदत करु शकतात. ते काही ट्रेन्ड नसतात. एखाद्या बद्दल प्रेम, जिव्हाळा वाट्णे आणि त्याला योग्य मदत करण्यासाठी सक्षम असणे या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. साधा मुलांचा शाळेचा अभ्यास घ्यायचा झाला तर आपण हे मला नाही जमणार हे लक्षात घेऊन ट्युशन लावतो मग याच बाबतीत नकारात्मक का? लैगिक शोषण झाले असेल अश्या मुलांना मित्र-मैत्रीणी, नातेवाईक कितपत मदत करु शकणार? तिच गोष्ट एकामागुन एक कौटुंबीक सदस्य गमवलेल्या मुलीची. जसं साधी सर्दी असेल तर घरगुती उपाय पण काही गंभीर असेल तर योग्य डॉक्टरच हवे तसेच हेही.

स्वाती२, मस्त पोस्ट. Happy

पण माझा मुद्दा थोडा निराळा होता. अपघात झाल्यावर प्रोफेशनल मदत घेण्याबाबत दुमत नसावं, पण मुळात एलिअनेशन हे न्यूक्लियर फॅमिलीचा एक अपरिहार्य परिणाम आहे का असा विचारप्रवाह मांडत होते. मोठ्या गोतावळ्यात कदाचित ते त्या पातळीपर्यंत जात नसावं का, त्याला धडपडण्याअगोदर आपसुकच कुठे कुशनिंग मिळत असावं का असं प्रकटचिंतन.

पण माझा मुद्दा थोडा निराळा होता. अपघात झाल्यावर प्रोफेशनल मदत घेण्याबाबत दुमत नसावं, पण मुळात एलिअनेशन हे न्यूक्लियर फॅमिलीचा एक अपरिहार्य परिणाम आहे का असा विचारप्रवाह मांडत होते. मोठ्या गोतावळ्यात कदाचित ते त्या पातळीपर्यंत जात नसावं का, त्याला धडपडण्याअगोदर आपसुकच कुठे कुशनिंग मिळत असावं का असं प्रकटचिंतन. >>>
सहमत....

स्वाती२ ... नियमित लेखनाचा अभाव यामुळे,माझा म्हणणं नीट मांडता आलं नसेल तर क्षमस्व...

न्युक्लिअर फॅमिली मुळे एलिअनेशन >> मला वाटते की न्युक्लिअर फॅमिली स्ट्रक्चर स्विकारल्यावर त्याबरोबर जो जीवनशैलीत इतर बदल आवश्यक आहे तो स्विकारला जात नाही त्यामुळे एलिअनेशन होत असावे. मात्र मी अगदी घरी आजी-आजोबा, आई स्टे अ‍ॅट होम मॉम, भावंडे असलेल्या घरातूनही समस्या बघितल्या आहेत, त्याही २० वर्षांपूर्वी. पूर्वीच्या काळी मोठ्या गोतावळ्यातही कुटुंबाने ब्लॅक शिप ठरवलेले कुणीतरी असायचे, म्हणजे समस्या असलेली मुलं तेव्हाही होतीच. त्यामुळे नक्की काय?

गीता, एकदम क्षमस्व वगैरे काय? माबोवर बिंधास लिहायचे. समस्या असलेली मुलं हा सगळ्यांनाच हलवणारा विषय. जो तो आपापल्या परीने उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो इतकेच.

मला वाटते की न्युक्लिअर फॅमिली स्ट्रक्चर स्विकारल्यावर त्याबरोबर जो जीवनशैलीत इतर बदल आवश्यक आहे तो स्विकारला जात नाही त्यामुळे एलिअनेशन होत असावे.

>> म्हणजे इतर कोणते बदल तुला आवश्यक वाटतात स्वाती२?
(अगदी सहज विचारतेय.. प्रतिवाद म्हणुन नाही)

हो, प्रत्येक सिस्टीमचे फायदे-तोटे असतातच हे खरं आहे.
कदाचित आता अवेअरनेस वाढल्यामुळे जास्त ढळढळीतपणे समस्या जाणवत असाव्यात.

गीता_९ तुम्ही या समस्यांसाठी प्रतिबंधात्मक उपायांबद्दल बोलताय. आणि स्वाती तुम्ही उपचारात्मक. दोन्ही गरजा सारख्याच मह्त्त्वाच्या.
मुळात पालक म्हणून आपण स्वतःकडून खूप अवास्तव अपेक्षा करत नाही आहोत ना हे पण वारंवार तपासले गेले पाहिजे. आपल्या हातून मुलं वाढवताना कोणतीही चूक झाली नाही पाहिजे हा अट्टहास नात्यातला ताणच वाढवतो. पालकत्वामध्ये मग तांत्रिकता येते. त्यातला नैसर्गिक जिवंतपणा संस्कार, शिस्त, मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध नावामध्ये हवा तसा वळवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ताण अजून वाढतो.
एक लक्षात आलंय. मुलांच्या वर्तनसमस्या या प्रामुख्याने नातेसंबंधांशी निगडीत असतात. म्हणजे समस्या मुलाच्या वागण्यात नाही तर नात्यात असते. कधी कधी हे लक्षात येत नाही. मग लेबलिंग आणि पुढच्या काळ्याकुट्ट गोष्टी मुलांची वाढण्याची वाट अजूनच बिकट करतात. अशा वेळी दिशा दाखवणारे हात मुलांसोबत पालकांनाही मिळणे गरजेचे.

>> ते मेसेजेस नेहमीपेक्षा वेगळे असतात. अचानक बोलणं कमी करणं, झोपेत बडबड वाढणं, नख कुरतडणं, एकटक बघत बसणं, नेहमीच्या आवडत्या गोष्टींना अचानक नकार देणं, चित्रात काळे रंग जास्त वापरायला लागणं(अचानक) , अक्षर खराब होणं, नजर टाळून बोलणं अशा आणि इतर कितीतरी गोष्टी मुलांना अंतर्बाह्य ओळखणार्‍या पालकांच्या सहज लक्षात येऊ शकतात. <<

ईंट्रेस्टिंग ऑब्जर्वेशन्स ....
मितान अशा बाह्यखुणांबद्दलही लिही ना कृपया.

वाचते आहे. अजून वाचायला आवडेल. स्वतःला जज करायलाही एक परिमाण मिळतय या लेखामुळे.
अनेक धन्यवाद!

लेख वाचल्यावर इतक्या सगळ्या आणि त्याही विविध वयोगटातल्या केसेस एकत्र पाहून नाही म्हटलं तरी धक्का बसलाच. निवांत पाटील म्हणतात, तसं हे सगळं काही पहिल्यांदाच कानावर पडलेलं नाही. हव्या त्या महागड्या वस्तूंसाठी आईला ब्लॅकमेल करणारी , प्रसंगी फिजिकल होणारी, नुकतीच सज्ञान झालेली मुलगी पाहण्यात आहे.

<. कुठलेच आईवडील काही हौसेने मुलापासून तासन्तास लांब राहणार नाहीत. पूर्वीही खुद्द आईवडील किती लक्ष द्यायचे कोण जाणे, पण एकत्र/मोठ्या (अनेक भावंडं इ.) कुटुंबांत समवयस्क/समविचारी/आयडॉल/मार्गदर्शक म्हणून आपलं विश्वासूच कोणीतरी भेटणं जास्त सहज घडत असावं की काय असं वाटतं>

स्वातींनी म्हटल्याप्रमाणे पूर्वी हे आपसूक व्हायचं. तसंच मुलांचं विश्व, त्यांन मिळणारं एक्स्पोझर (बाहेरच्या जगाचं वारं?) मर्यादित होतं. कोणा मोठ्याला चुकवून त्या विश्वाचा स्पर्श मुलाला होणं सहजसोपं नव्हतं. आता तसं राहिलेलं नाही. त्यामुळे मुलांबद्दलची सजगता वाढणं गरजेचं आहे, हे या लेखातनं लक्षात यावं. मुलांच्या वागण्यातल्या बदलाला हट्टीपणा, नादिष्टपणा, संगत अशी लेबल्स लावून, त्या वागण्यासाठी त्यालाच जबाबदार ठरवलं जातं का?

हे इथे लिहावं का कळत नाही. कुणाशीतरी शेअर करावेसे वाटले म्हणून लिहितोय. कदाचित नंतर उडवून टाकेन.
.मी गेले दीड वर्षे एका कॉन्व्हेंट शाळेशी संलग्न ऑर्फनेजमधल्या मुलांसोबत काम (मराठी-हिंदी शिकवणी)करतोय. (तिथली सगळी मुलं ऑर्फन्स आहेत असे नाही. काहींना एक पालक आहे. काहींनी कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश सुकर व्हावा म्हणून ऑर्फनेजला बोर्डिंग मानून मुलांना इथे ठेवले आहे. मुलांना मी किती आणि काय शिकवलंय माहीत नाही. पण मुलं मात्र मला रोजच काही ना काही शिकवून जातात. आधी माझाही अ‍ॅटिट्युड मुलांना लक्ष द्यायला , अभ्यास करायला नको. त्यांच्यासाठी केल्या जाणार्‍या कामाची कदर नाही असाच होता. हळूहळू अर्थातच तो बदलत गेला.
गेल्याच आथवड्यात परीक्षेच्या आधल्या दिवशी माझ्या विषयाच्या उजळणीसाठी दिवसभर नववीतल्या मुलांसोबत होतो, तेव्हा एक मुलगा बराच वेळा तोंड, चेहरा आक्रसून बसलेला दिसला. लिहिताना, वाचतानाही . "तुला परीक्षेचे टेन्शन आहे का" विचारल्यावर नाही म्हणाला. त्याच्या शेजारी बसून काही प्रश्नोत्तरांचा सराव करून घेतला. बघ तुला येतंय सगळं असं सांगितलं. एका ब्रेकमध्ये वर्गाबाहेर टेन्शन न घेता पेपर लिही. असं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला की बाकीची मुलं माझं डोकं फिरवतात. त्यमुळे अभ्यास लक्षात राहत नाही. बाकीच्या मुलांकडे दुर्लक्ष कर असं सांगायचा प्रयत्न केला.
काही वेळाने मला कळले की काही मुलांच्या एका टोळक्याकडून त्याला रॅगिंगचा त्रास होत होता आणि त्या दिवशी सकाळीच नववीतला हा मुलगा ढसाढसा रडला होता. सुदैवाने ऑर्फनेजमध्येच राहून मोठा झालेला, सध्या कॉलेज शिकणारा आणि ऑर्फनेजच्या ऑफिसचे काम बघणारा एक मुलगाच (आता तरुण) [जो आमच्यापुरता(व्हॉल्युन्टीअर ट्युटर्स) डि-फॅक्टो इन-चार्ज आहे] त्याने हे प्रकरण हाताळले. त्यानंतर त्या मुलाचे टेन्शन कमी झाल्यासारखे वाटले.

मितान, आपल्या जगात परक्या माणसाला प्रवेश द्यायला, त्याच्यासमोर मोकळे व्हायला मुलं सहजी तयार होत नाहीत. हे तुम्ही नोंदवलेल्या केसेसमध्येही दिसते आहे. या भिंतीत तुम्ही खिडकी कशी बसवता ते वाचायला आवडेल.
मुलांनाही, विशेषतः घरापासून दूर, स्वतःच्या डिग्निटीची एक जाणीव असते, त्याबद्दल ती प्रोटेक्टिव्ह असतात, त्यांच्या या प्रोटेक्टिव्ह कृतींनाही भलतेच लेबल लागू शकते. ही एक मोठी गोष्ट मी गेल्या दीड वर्षात ठळकपणे शिकलोय.
येणारे अनेक सो कॉल्ड डिग्निटरीज त्यांना डु रिअलाइझ हाउ लकी यू आर हे ऐकवल्याशिवाय राहत नाहीत. Sad

ऑर्फनेजमधल्या मुलांसाठी दोन कौन्सेलर्स स्वेच्छेने विनामूल्य वेळ द्यायला तयार झाल्या होत्या. पण त्यांना गरज नाही असे सांगितले गेले. Sad

बर्‍याच प्रतिक्रियामधून पूर्वीच्या काळी हे नसायचे किंवा इतर सपोर्ट सिस्टीम्स असल्याने प्रश्न सुटायचे असा सूर आहे तो मलातरी फारसा मान्य नाही. प्रश्न तेच आहेत, स्वरुप बदलले आहे.
कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.

कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>> +१

त्यातही पूर्वीच्या काळी सपोर्ट सिस्टिम असायचीच हेही तितकेसे खरे नाही. आपल्या पिढीतल्या बहूतेकांचं कुटूंब चौकोनी होतं. आज्जी /आजोबा गावाकडे, आई-बाबा नोकरी करणारे , एक किंवा दोन मुले ही काही अगदी अश्यातली पद्धत नाही आहे. अगदी २०-२५ वर्षांपासून हे चित्र खूप कॉमन आहे. हां त्यावेळी हल्लीइतकं पिअर प्रेशर नसेल कदाचीत मुलांवर.

वाचते आहे. अजून वाचायला आवडेल. स्वतःला जज करायलाही एक परिमाण मिळतय या लेखामुळे.
अनेक धन्यवाद! >>>>> +१००००००

कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>>> +१०००००

कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>>> +१०००००

कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>>>
मस्त आगाऊ. पण लक्षात कोण घेतो Sad
मुलाच्या प्रत्येक वाईट कृत्यामागे , आई - आईची नोकरी आणि आईने केलेले वा न केलेले संस्कार असे शेपूट लावून ब्लेम गेम सुरू होतोच.

कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>> +१
मुलांचं विश्व, त्यांन मिळणारं एक्स्पोझर (बाहेरच्या जगाचं वारं?) मर्यादित होतं. कोणा मोठ्याला चुकवून त्या विश्वाचा स्पर्श मुलाला होणं सहजसोपं नव्हतं. आता तसं राहिलेलं नाही>> +१
पुर्वीच्या सोशल फॅब्रिक मधे (ह्याला योग्य शब्द नाही सापडला मला) बदल होत गेले, सणवार त्यानिमित्ताने नातेवाईक ,समाजात होणारा वावर, शेजार पाजार, त्यांचा आप्ल्या खाजगी (?) जगण्यातला वावर कमी झाला. पण दुर्दैवाने त्याची जागा घ्यायला नविन फॅब्रिक मात्र विणल गेल नाहिये .
बाहेर्च्या जगातला चकचकीत पणा (भलेही बेगडी असेल) मित्रवर्गाकडून प्रेशर , टीव्ही, सिनेमे ह्यासारख्या माध्यमातून बिंबवले गेलेले खोटे आदर्श अशी खूप कारणं असू शकतील.

>>कुटूंबाची पाल्याबद्दलची सजगता ही एक समज आहे, स्कील आहे. ते असणे किंवा नसणे, हे आई नोकरी करते का, आ़जी-आजोबा आहेत का, शिक्षण, पैसा यावर अवलंबून नाही.>>> +१०००००

>> म्हणजे इतर कोणते बदल तुला आवश्यक वाटतात स्वाती२?>>

१. न्युक्लिअर फॅमिलीच्या बाहेर स्वतःसाठी तसेच मुलांसाठी नवी आश्रयस्थाने शोधणे तसेच दुसर्‍यांसाठी असे आश्रयस्थान बनणे आणि आपल्या मुलांनाही असे करण्यास प्रोत्साहन देणे. इथे परदेशात आम्ही हे केले. आज मुलाला मार्गदर्शन करायला हक्काचे काका, मावश्या, ताई-दादा आहेत. आजी सुद्धा आहे. तोही कुणासाठी तरी दादा झाला,
२. विविध माध्यमे वापरुन विखूरलेल्या नातेवाईकांच्या संपर्कात रहाणे. संवाद तुटू न देणे. तो पुढल्या पिढीतही चालू राहील यासाठी प्रयत्न करणे. आज माझा मुलगा सहजतेने फोनवर माझ्या आतेसासूबाईंशी गप्पा मारतो, माझ्या मामाला इमेल पाठवतो, माझ्या कझिनचा सल्ला घेतो आणि माझ्या दुसर्‍या कझिनच्या मुलीची स्काईपवर समजूतही घालतो.
३. मुलांचे शिक्षक, काउंसेलर, फॅमिली डॉक्टर्स यांच्याबरोबर स्ट्रॉन्ग रिलेशनशिप ठेवणे. माझ्या मुलाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या बरोबर मुलाचे शिक्षक, काउंसेलर , फॅमिली डॉक-ऑप्टोमेस्ट्रीट, ब्युरो डिरेक्टर ही मंडळी होती. ज्या शिक्षकांशी मुलाचे सूर जमले अशा शिक्षकांच्या संपर्कात मुलगा ते शैक्षणीक वर्ष संपल्यानंतरही राहिला, आजही आहे. मध्यंतरी त्याला कॉलेज टिमच्या वेबसाईट्साठी मदत हवी होती. त्याने त्याच्या हायस्कूल टिचरला फोन केला आणि मदत मिळाली. तो त्याच्या एका टिचरचा उल्लेख प्रेमाने आणि आदराने 'ममा अबक' असा करतो. Happy
४. शाळेत पिअर मेंटरींग प्रोग्रॅम असेल तर त्याचा खूप उपयोग होतो. ही मेंटर स्टुडंट्स आणि मेंटी दोघांसाठी विन-विन असते. तसेच शाळेत अ‍ॅक्टीव अँटी बुलींग प्रोग्रॅम हवा. ड्रग, अल्कोहोल अब्युझ, नेट पोर्न, सेक्स प्रिडेटर, वगैरे गोष्टींसाठी शाळेत शिक्षक आणि पालकांसाठी तसेच मुलांसाठी सातत्याने मार्गदर्शन हवे. यात लोकल पोलीस सहभागी झाल्यास उत्तम. पिअर प्रेशर बद्दल कुरकुर करुन काहीच साध्य होणार नाही हे लक्षात घ्यावे. चांगले लाईफ चॉइस करण्यासाठी शाळेत.मुलांचा सपोर्ट ग्रुप हवा. बहुतेक मुलांना चांगले वागायचे असते. ही मुले संघटित झाल्यास आपोआप पॉझिटिव पियर प्रेशर तयार होते. माझ्या मुलासाठी अशा प्रकारचा S.A.D.D. ग्रुप होता.
५. न्युक्लिअर फॅमिलीत मनुष्यबळ कमी आहे, व्यस्त जीवनशैलीमुळे मोजकाच वेळ हाताशी आहे हे लक्षात घेऊन मुलांसाठी द्यायचा वेळ राखीव करावा. महत्वाच्या मिटिंग प्रमाणेच डेप्लॅनरमधे त्याची नोंद करुन ठेवावी. मगच बाकी रिकाम्या वेळाचे नियोजन करावे. माझा मुलगा लहान होता तेव्हा माझ्या नवर्‍याचे स्केड्युल अतिशय डिमांडिंग होते. बहुतेक वेळा मुलगा उठायच्या आधी तो घर सोडायचा आणि मुलगा झोपल्यावर घरी यायचा. शनिवारी अर्धा दिवस काम , बरेचदा रविवारी दुपारी धावतपळत एअरपोर्ट गाठणे हे रुटिन होते. त्यामुळे रविवारी नवरा पहाटे लवकर उठून त्याची आठवड्याची कामे सकाळी १० पर्यंत उरकायचा. १०-१२ हा वेळ मुलाशी खेळायला राखीव असायचा. तसेच शनिवारी लायब्ररी विझीट आणि बाबाकडून बेडटाईम स्टोरी पक्की असायची. तो वेळ फक्त बाप-लेकाचा असायचा. दोघे खूप एंजॉय करायचे. तो मोठा होत गेला तसे त्यांचे गोल्फ, फुट्बॉल, कार रेसिंग वगैरे गोष्टींचेही असेच पक्के स्केड्युल असायचे. हा वेळ आपला हक्काचा हे माहित असल्याने मुलगा आश्वस्त असायचा आणि नवर्‍यालाही मुलाबरोबर क्वालिटी टाईम मिळाला.
६. शक्य झाल्यास लोकल कम्युनिटीत समाजसेवेच्या संधी शोधणे. खूप आनंद मिळतो आणि माणसेही जोडली जातात.
आमच्यासाठीतरी हे सगळे खूप उपयोगी पडले/ पडत आहे.

कविन, वाचून खुप अस्वस्थ वाटायला लागलेय.
या केसेस कशा हाताळल्या गेल्या, त्यावर काही उपाय सापडले का ते अवश्य लिहा. वाट बघतोय.

मितान
माफ कर पण मला हे असं सगळ्या मुलांबद्दल इथे लिहिलेलं नाही आवडलं. कुणितरी विश्वासानं तुला काहीतरी मनातलं सांगितलंय आणि तु ते चक्क इथे ओपन फोरमवर लिहिलंयस. कौन्सिलिंगचा पहिला नियमच गोपनियता हा आहे. आणि तो इथे मोडला गेलाय असं मला वाटतंय.,
भले ही आम्ही यातल्या एकाही मुलाला ओळखत नसू.... पण तरिही एक कौन्सेलर म्हणून हे योग्य नव्हे.
ह्या सर्व केसेसचा (नावं न लिहिता) एक लेख करून तु इथे त्यावर सोल्युशन म्हणून काही टाकलं असतस तरी तो लेख उत्तम झाला असता. इथे तर नुसत्याच समस्या दिसतायत.
शिवाय तुला असंही वाटलं नाही की इथे आपण त्या मुलांचे प्रश्न मांडतोय तर निदान त्यांची नावं तरी बदलून टाकावीत. आणि बदलली असलीस तर तशी टिपही दिसली नाही मला लेखाच्या शेवटी.
असो.

Lol

दक्षिणा, तिने केवळ टीप टाकली नाही तर तू गृहीत धरलंस आणि त्यावरुन तिने गोपनियतेचा भंग केला वगैरे लिहीलंस पण ? Lol

आधी विचार तिला की तिने नावं बदलली आहेत ना ? Happy

मला खात्री आहे की बदलली आहेत.

@दक्षिणा
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

Pages