मुलं - काही नोंदी

Submitted by मितान on 21 October, 2013 - 03:09

मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. Sad

केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू नुसत्या घटना न लिहीता, त्यावर समुपदेशक म्हणून तुझी थोडी टिपणी (जरी तुला असं वाटलं की तुझी टिपणी काहींना रुचेल काहीना नाही तरीही तू लिहावीस हे माझं मत) <>>> सहमत.

जसा लहान मुलांचा वार्षिक शारिरीक वेलनेस चेकअप असतो तसेच त्यांच्या मानसिक आरोग्याचाही वेलनेस चेक अप अधून मधून करून घेता येणे शक्य आहे का? म्हण्जे समस्या अगदी ठळकपणे लक्षात आल्यावर उशीरा समुपदेशकाकडे जाण्याएवेजी समस्या initial stages मधेच लक्षात येऊ शकेल ?

या अश्या गोष्टी पहिल्यांदाच वाचतेय असं नाही, पण दरवेळी पोटात तुटतंच त्या बिचार्‍या लेकरांसाठी. :(.
मितान खरंच अकु म्हणतेय ते मनावर घे नक्की.

डेलिया, तू म्हणतेस तशी सोय अजून आपल्याकडे नाही. पण खरं सांगायचं तर मुलांसाठी त्याची गरजही नाही. काही समस्या असेल तर मुलं सिग्नल देत असतात. ते मेसेजेस नेहमीपेक्षा वेगळे असतात. अचानक बोलणं कमी करणं, झोपेत बडबड वाढणं, नख कुरतडणं, एकटक बघत बसणं, नेहमीच्या आवडत्या गोष्टींना अचानक नकार देणं, चित्रात काळे रंग जास्त वापरायला लागणं(अचानक) , अक्षर खराब होणं, नजर टाळून बोलणं अशा आणि इतर कितीतरी गोष्टी मुलांना अंतर्बाह्य ओळखणार्‍या पालकांच्या सहज लक्षात येऊ शकतात. नेमकी समस्या लक्षात नाही आली तरी काहीतरी चुकतंय, पिल्लाला त्रास देतंय हे नक्की लक्षात येतं. त्यातून मग मुलाशी बोलणे, समुपदेशकाकडे जाणे, शाळेत मित्रमैत्रिणिंकडे चौकशी करणे हे मार्ग निघू शकतात.
सध्या प्रॉब्लेम हा आहे की बहुतांश पालकांना 'मुलांचे निरीक्षण करायला' वेळच मिळत नाही. Sad

अकु, तू म्हणतेस ते मुद्दे आवडले. लिहीन.

मितान प्रथम तुम्हाला धन्यवाद कि अश्या विषयावर इथे लिहुन तुम्ही तुमचे मन मोकळे केलेत. तसेच इतरांना देखील यावर विचार करण्यास प्रेरणा दिलीत.

तुम्ही दिलेले प्रत्येक उदाहरण, त्यावर तुम्ही केलेले उपाय, असे प्रकार होउ नयेत म्हणुन घ्यायची काळजी याविषयी सविस्तर लेखमाला लिहु शकाल का? मला वाटते याचा येथील वाचकांना चांगला उपयोग होईल.

आताच्या काळात जीवन जगणे इतके जलद झाले आहे कि कोणत्याही गोष्टीला जास्त वेळ देता येत नाही. इथे लोकांना शारिरिक तक्रारी गोंजारायला वेळ नसतो तिथे मानसिक तक्रार तर कोणी गृहितच धरत नाही किंबहुना तसे काही असते हेच मुळी आता आता कुठे लोकांना कळु लागले आहे.

तुम्ही दिलेल्या बहुतेक उदाहरणातील मुले हि उच्चवर्गिय आहेत. ज्यांचे आईवडिल सो कॉल्ड सुशिक्षीत, स्वतःचे मत असणारे, आर्थिक स्थिती मजबुत असणारे व मुलांना आवश्यक तसेच अनावश्यक देखील गरजा लाडापोटी पुरवणारे आहेत. तरी मुलांच्या मानसिक गरजा मात्र कुणालाच नेमक्या कळल्या नाहीत. इथे तुमच्या मार्गदर्शानाची व समुपदेशनाची नितांत गरज आहे. कृपया वेळ काढुन या विषयावर सविस्तर लेखमाला लिहिलीत तर बरे होईल.

एकंदर सार्‍या प्रतिक्रिया वाचून मला तरी असे वाटले की पालक व शिक्षक यांनाच समुपदेशनाची नितांत गरज आहे. मुलं तर काय ओल्या मातीचा गोळा - कोण कोण व कसे कसे संस्कार करतात यालाच जास्त महत्व आहे खरं तर ...
घरात आई-वडिलांना मुलांशी बोलायला वेळ नसेल तर अवघडच आहे अशा मुलांचे...
आणि शाळेत एकाच वर्गात फार मुले असतील तर शिक्षक कोणा-कोणाला वेळ देणार ???

एक सत्यघटना सांगतोय (माझाही आधी विश्वासच बसत नव्हता यावर...) - मुलीसाठी डेन्टिस्टकडे गेलो होतो - तिच्या दातांमधे कॅल्शिअम कमी असल्याने तिच्या वरच्या व खालच्या सगळ्याच दातांसाठी कवळी सारख्या फ्लेक्झिबल कॅप्स केल्या होत्या - ज्यात ती कॅल्शिअमयुक्त पेस्ट घालून काही काळ दातांवर लावायची असते.
मी डेन्टिस्टला विचारत होतो की या अशा कॅप्स अजून कशासाठी वापरतात - त्याने सांगितले की घोरणार्‍या मंडळींसाठी व
दुसरे कारण हायपर मंडळींसाठी - मला वाटले की लहान मुले हायपर असतात त्याकरता असेल तर डेन्टिस्ट म्हणाला हायपर मुलांसाठी नाही - "हायपर शिक्षकांसाठी" - हे ऐकून मी पडलोच पार ......

शिक्षकाची भूमिका इतकी महत्वाची असते की काही अतिशय चांगल्या शिक्षकांमुळे मुले छान घडतात तर काही विचित्र शिक्षकांमुळे त्या मुलांच्या बालमनावर इतके ओरखडे उमटतात की जे पुढे आयुष्यभर तसेच रहातात..... (मधे इथे मा बो वर कोणी तरी एक धागा काढला होता - बालपणीच्या शिक्षकांच्या आठवणी - ज्यात काही जणांनी हे स्पष्टपणे लिहिले होते की अमुक अमुक शिक्षकांनी मला कारण नसताना शिक्षा दिलेली मी अजून विसरु शकलो/ले नाहीये....)

त्यामुळे - मला तरी असे वाटले की पालक व शिक्षक यांनाच समुपदेशनाची नितांत गरज आहे.

अरे बापरे.....मितान किती स्ट्रेस्फुल पण महत्वाचं आहे तुझं काम.
यातले खूपसे प्रॉब्लेम्स अगदी कल्पनेच्या पलिकडचे आहेत........ज्याच्यातून ही मुलं जाताहेत.
तुला शुभेच्छा!

मितान , अजून लिहित रहा.
ह्या घटना आपल्या घरात घडणारच नाहीत, आपल्या घरातल वळण चांगलच आहे ह्या ग्रुहितकाना धक्का बसवणार्या बर्याच घटना अगदी घरी ,जवळाच्या घरातिल मुलांबाबत पाहिल्या. खडबडून जाग आली. Sad
आपलं लहान्पण , त्याकाळातल एक्स्पोजर, स्पर्धा, दडपणं आणि आताच्या मुलांची अवस्था ह्यातच मुळात कितीतरी फरक आहे.
मला माझ्या आईवडिलांनी दिलेली स्पेस, मोकळीक मी माझ्या मुलाला देतेय का ह्याच उत्तर चक्क नकारार्थी आलं. माझ्याच नाही तर माझ्या आजुबाजुच्या घरातही. माझ्या आजुबाजुच्या अश्या काही पालकांनी एकत्र चर्चा करावी अस मी सुचवल होतं , पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याच भाषेत, स्पोर्टस, स्टडीज, म्युझिक , सब क्लास में भेजते है , आने जाने के लिये गाडी है, जो कुछ हमे नही मिला वो सब हमारे बच्चे के लिये करवाके रखा है. Sad
मितान , तुमच काम खरच फार महत्वाच आहे.

जबरदस्त लिहिले आहे.
मुलांचे निरिक्षण करायला वेळ नाही हा समान धागा आहेच पण त्या वेळेची, वस्तूरुपाने भरपाई करु हे लॉजीकही कारण आहे.
मी काम करतो त्या निवासी शाळेत, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला नव्या विद्यार्थ्यांच्या फाईल्स वाचणे मस्ट आहे. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दलची थोडि माहितीही खूप मदत करते हा माझा अनुभव. कोणतेही ग्रह न बाळगता, लेबल लावायची घाई न करता, त्यांना बारकाईने पाहिले, अनौपचारीक गप्पा मारल्या तरी फार फायदा होतो.
'हेल्प मी टू हेल्प यू' हे मी तयार केलेले सूत्र आहे.

अतिशय महत्वाचा विषय. पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. इथे बर्‍याच लोकांना या गोष्टी खुपच शॉकिंग वाटल्या, (असे त्यांच्या प्रतिसादावरुन वाटले.) म्हणजे या गोष्टी "आपल्या आजुबाजुला घडताहेत आणि आपल्याला त्याचा गंधही नाही" असे एक चित्र तयार झाले. असो.

मध्ये एका धाग्यावर नक्कि आठवत नाही पण चौथीत शिकनार्‍या कोल्हापुरातील एका मुलाच्या आत्महत्येबद्दल चर्चा केली होती आणि त्याचा अ‍ॅप्रोच असा होता कि १० वर्षाच्या मुलाला आत्महत्या करावी असे का वाटत असावे.

हा विषय सरळसोपा नसुन कॅल्क्युलस पेक्षाही क्लिष्ट आहे. एकच नियम सगळ्यांना लागु होणार नाही किंबहुणा व्यक्ती तितके वेगवेगळे नियम आणि ते देखिल परेस्थितीनुरुप बदलणारे असतील. सरसकट एक जनरल दृष्टीकोनातुन बघितले (म्हणजे आपल्याकडे एखादी घटना घडली कि त्यात चुक कोणाची / दोष कोणाला द्यायचा, याला जबाबदार कोण अश्या उत्तरापर्यंत पोहोचले की बर्‍याचजणांना वाटते कि चला प्रश्न मिटला) कि यात दोष कोणाचा?

कोणाला वाटेल पालकांचा, काय हे मुलांना वेळ देत नाहित म्हणजे काय? सगळ्या भौतिक गरजा भागव्ल्या म्हणजे झाले का? अजुन गावाकडे आलात तर, "आई बाप पैश्यापाठी लागलेत" इत्यादी इत्यादी....

कोणाला वाटेल याला जबाबदार शाळा / शिक्षक. मुले तर दिवसभर शाळेतच असतात. उगाच त्यांच्या अव्वाच्या सव्वा फिया भरतो का आपण. मुल्यशिक्षणाची जबाबदारी नाही का त्यांची. आणि इतके सगळे करायचे पैसे कमी पडु द्यायचे नाहीत मग जास्त काम करावे लागते, थोडं शेड्युल होतं बिझी, पण बाकि कुठे काही कमी पडु दिलयं का? इत्यादी इत्यादी....

यापुढे जाउन काहिना वाटेल, याला कारणीभुत समाज आहे समाज. सगळा समाजच (म्हणजे नक्की कोण?) बिघडला आहे. या टीव्ही सिनेमाने सगळं वाट लावली आहे. त्यात अजुन इंटरनेट... ... आमच्या वेळी असं काही नव्हतं इत्यादी इत्यादी.

यात अजुन बर्‍याच गोष्टींची भर घालता येइल. चर्चा तर अखंड कित्येक वर्षे करता येइल. पण ही लुज-लुज सिच्युएशन आहे. (काहिही झालं तर लॉस हा ठरलेला आहेच). तुम्ही जर आजुबाजुला बघितलतं तर अशी अनेक उदाहरणे दिसतील. मितान यांनी फक्त येथे शेअर केली आहेत त्यांच्या (समुपदेशक नजरेतुन).

हे जरा विस्कळीत झालं आहे. अजुन मनातलं सगळ लिहता आलेलं नाहीय.

पण एक गोष्ट नक्कि. या गोष्टी संसर्गजन्य आहेत. अगदी सर्दी सारखं. एक उदा. देतो. सगळं छान पैकी सुरु असलेल्या एका घरातील मुलगा अचानकच हट्ट करु लागला कि मला टचस्क्रिन मोबाइल पाहिजे नाहितर मी दिवाळीला घरी येणार नाही. मोठा मुलगा फायनल इयर मध्ये हा फर्स्ट इअर मध्ये. मोठ्या भावाने खुप समजाउन सांगुन बघितले. पण हा बधला नाही. त्याच्या वडिलांनी मोबाइल द्यायचे कबुल केले, घेउन दिलाही. नंतर मोठ्या भावाने या गोष्टीचा छडा लावला. दिवाळीला घरी न यायच्ची धमकि द्यायची आयडिया ही त्याच्याच वर्ग मित्राची होती. त्याच्या बाबतीत १०० % यशस्वी ठरली म्हणुन यानेही वापरली आणि आता येथुन पुढे वापरत राहिल. अजुन त्याचे मित्रही वापरतील. या उदाहरणामध्ये एकच वाटते, कि लसीकरण (व्हॅक्सिनेशन) ( याचे डिटेल्स नंतर देइन) चांगले झाले नव्हते. प्रश्न मोबाइलचा नसुन ज्या पध्ह्तीने ब्लॅकमेल केले त्याचा आहे.

जाता जाता आपण लहान होतो तेंव्हा आपण असं करत नव्हतो का? / करायचा प्रयत्न केला नव्हता का? आणि तसे केल्यावर आपल्या पालकांनी काय काय केले होते त्याचा आढावा खुप काही शिकवुन जाइल आणि बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देखिल मिळतील. (हां त्यावेळ्ची परीस्थिती वेगळी होती हे उत्तर थोडा वेळ बाजुला ठेवु)

जाता जाता आपण लहान होतो तेंव्हा आपण असं करत नव्हतो का? / करायचा प्रयत्न केला नव्हता का? आणि तसे केल्यावर आपल्या पालकांनी काय काय केले होते त्याचा आढावा खुप काही शिकवुन जाइल आणि बर्‍याच प्रश्नांची उत्तरे देखिल मिळतील. (हां त्यावेळ्ची परीस्थिती वेगळी होती हे उत्तर थोडा वेळ बाजुला ठेवु)>>>>>>> पटलं.

फर्स्ट इयरचे मुल हे असे ब्लॅकमेल करायला धजावत असेल तर बरेच काही मुळातच चुकलयं असे म्हणावे लागेल.

निवांत पाटील : पोस्त खूप छान विश्लेषक आहे.. विचार पटतात ..

अशी खूप उदाहरणे बघितली आहेत...

समाजातील सगळ्या स्तरांमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होऊन मुले बिघडणे ( अपवादात्मक केसेस मध्ये घडणे ) हे सर्रास दिसून येतंय..

कारण: आमच्यावर 'तशी' वेळ अजून आली नाही हि शेखी मिरवणे. आम्हाला मुलांना द्यायला तेव्हढा वेळ नाही.. आणि आम्ही चांगले आहोत तर आमची मुलं कशी वाईट होतील हा गैर विश्वास ..

मानवी स्वभाव हा काहीसा उपजत असतो अन काहीसा घडलेला असतो.. 'घडणे' अविरत चालू असते.. त्याला योग्य मार्ग मिळतोय का नाही हे बघणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे...२४ तास ही जिथे मुलांबरोबर सार्थकी लावायला कमी पडतात, तिथे आज काल नोकरी करणाऱ्या आई-वडिलांना असा कितीसा वेळ मिळतो?? ह्याला उत्तर ज्याचे त्यानी शोधावे..

मितान, तुम्ही खूप महत्वाचे काम करत आहात.. फक्त दुर्दैव एव्हढाच कि या कामाची गरज आज काल घरात आई-वडिलांकडून नाही तर बाहेरून भागवली जाते ... ( तुमच्या कामाबद्दल वैयक्तिक आकस नाही.. परिस्थिती बद्दल वाईट वाटते ! )...

>>दुर्दैव एव्हढाच कि या कामाची गरज आज काल घरात आई-वडिलांकडून नाही तर बाहेरून भागवली जाते ...>>

नाही पटले. गरज पूर्वीही होती. पण अशी गरज आहे हे मान्यच केले जात नसे. खरे तर पालक मुलांच्या समस्यांसाठी असे काउंसेलरकडे जात आहेत हे देखील आशादायक आहे.

नाही पटले. गरज पूर्वीही होती. पण अशी गरज आहे हे मान्यच केले जात नसे. खरे तर पालक मुलांच्या समस्यांसाठी असे काउंसेलरकडे जात आहेत हे देखील आशादायक आहे. >>> +१

>> फक्त दुर्दैव एव्हढाच कि या कामाची गरज आज काल घरात आई-वडिलांकडून नाही तर बाहेरून भागवली जाते ... >>

पूर्वीही ही गरज होतीच पण ती भागवायला बरीच माणसे (भावंडे, आई वडील, नातेवाईक, अगदी घरचेच असे हक्काचे मित्र-मैत्रिणी) असायची. हल्लीच्या काळात तिघा - चौघांचे एक कुटुंब असते. सगळे नातेवाईक दूर/ बिझी असतात. त्यामुळे बाहेरच्या माणासाची मदत लागते. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. बदलत्या समाजरचनेमुळे निर्माण झालेली गरज आहे ती.
फक्त ती गरज आहे हेच बरेचजण मान्य करत नाहीत.

माझ्या मते प्रत्येकानेच असे काऊन्सेलरशी मधुन मधुन बोलणे गरजेचे आहे. मुलांच्या बाबतीत तर नक्कीच. अगदी "सगळे व्यवस्थित तर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही मला / माझ्या मुलाला" असे वाटत असले तरी.

लेख काल वाचला होता पण काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. मुलांबद्दल वाईट वाटतंच, पण तुम्ही म्हणालात तसं याला काही 'वन साइझ फिट्स ऑल' सोल्यूशन नसतं. वेळ देऊ न शकणं, संवाद साधू न शकणं हा त्यातल्या त्यात समान धागा असावा. पण त्यात कोणाला काही चॉइस असतो असं मला खरंच वाटत नाही. कुठलेच आईवडील काही हौसेने मुलापासून तासन्तास लांब राहणार नाहीत. पूर्वीही खुद्द आईवडील किती लक्ष द्यायचे कोण जाणे, पण एकत्र/मोठ्या (अनेक भावंडं इ.) कुटुंबांत समवयस्क/समविचारी/आयडॉल/मार्गदर्शक म्हणून आपलं विश्वासूच कोणीतरी भेटणं जास्त सहज घडत असावं की काय असं वाटतं. असो.

तुम्ही फार मोलाचं काम करत आहात. Happy

@ मितान, तुम्हि हा database कसा गोळा केला?? तुम्हि थेरापिस्ट आहात का??
माझा मुलगा ५.५ वर्षाचा आहे अजुन बोलत नाहि. स्पिच, occupational, remedial therapy and special education चालु आहे. दोन वर्ष झालि परंतु अजुनहि पाहिजे तशी improvement नाहि.

पूर्वीही ही गरज होतीच पण ती भागवायला बरीच माणसे (भावंडे, आई वडील, नातेवाईक, अगदी घरचेच असे हक्काचे मित्र-मैत्रिणी) असायची. >>>

एकदम मान्य.. Happy

माझं मत एव्हधच आहे की "आज काल" ही मदत घराबाहेर्च्या व्यक्तिन्कडून जास्त मिळते... घरातुन नाही...(भावंडे, आई वडील, नातेवाईक, अगदी घरचेच असे हक्काचे मित्र-मैत्रिणी)...

यावर उपाय काय?? इथे पण 'आउट्सोर्सिंग' हाच एक उपाय आहे का?
सर्सकट सगळ्या नाही.. पण अश्या केसेस घडनार्या बर्याच घरंमधून 'संवाद' हरवत चालाला आहे...
म्हणुन मुलं मनाच्या जंगलात हरवत्तात....

तू नुसत्या घटना न लिहीता, त्यावर समुपदेशक म्हणून तुझी थोडी टिपणी (जरी तुला असं वाटलं की तुझी टिपणी काहींना रुचेल काहीना नाही तरीही तू लिहावीस हे माझं मत) , तू योजत असलेले उपाय योजना (अगदी सविस्तर नाही पण निदान तुला ह्यात पालकांचा काय सहभाग अपेक्षित आहे त्याबद्दल) >>>>
या लेखनाच्या प्रतीक्षेत

मितान , फार चांगले काम करीत आहात तुम्ही. पालकांनी मुलांना तुमच्यापर्यंत आणण्याची पहिली स्टेप तरी घेतली हे महत्वाचे आहे.

Pages