आधुनिक सीता - १७

Submitted by वेल on 17 October, 2013 - 06:10

भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780

*******************************************************************************************

रफिक चमकला माझ्या कृतीने. त्याने ह्याची अपेक्षा केली नव्हती. क्षणभरात विचारमग्न होऊन तो बाहेर गेला. मी दिवाणावर बसून डोळे मिटले. माझ्या कौन्सेलिंगच्या अनुभवात मी जमा केलेली माहिती टॅबवर लिहून काढली. त्यानंतर मी मला जे अपेक्षित होतं तो विचार मी टॅबवर लिहून काढला आणि त्यानंतर त्या विचाराचा मनोमन जप करायला सुरुवात केली.
'मी माझ्या आईबाबांना आणि सागरला पत्र लिहित आहे. पत्रात मी लिहिलं आहे की मी इथे सौदीमध्ये एका श्रीमंत, देखण्या आणि उमद्या स्वभावाच्या राजकुमाराच्या प्रेमात पडले आहे आणि त्यामुळे मी सागरसोबत भारतात परत आले नाही. मला माझ्या राजकुमारासोबत कायमचं राहायचं आहे आणि त्याकरता मला सागरपासून घटस्फोट हवा आहे. परंतु घटस्फोटाच्या वेळखाऊ प्रक्रियेसाठी मी भारतात परत येऊ इच्छित नाही. माझ्या आयुष्यातल्या या सुंदर अनुभवांना मी क्षणभरासाठीदेखील दूर लोटू शकत नाही. त्यामुळे आई बाबा माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही सागर साने यांच्यासोबत बोलणी करून माझ्या पुढच्या आयुष्यातील ह्या लग्नाचा अडसर दूर करावा. आमच्या लग्नाला थोडेच दिवस झाले असल्याने, लग्न नल अ‍ॅण्ड व्हॉईड ठरवून मला लग्नबंधनातून मोकळे करावे. याशिवाय माझ्या राजकुमारासोबत निकाह करण्यासाठी मी इस्लाम धर्म स्वीकारायचे ठरवले आहे. हे कारण देखील माझ्या घटस्फोटासाठी पुरेसे आहे.'
हे पत्र वाचल्यानंतर आई बाबा आणि घरातले सगळेच माझ्यावर खूप चिडले आहेत. परंतु त्या रागाच्या आवगात देखील दादा आणि बाबांनी हे पत्र पोलिस स्टेशनला नेऊन दाखवले आहे आणि पोलिसांनी सागरला सोडले आहे.'

ह्या विचाराचा जप करत असताच फातिमा जेवण घेऊन आली आणि माझ्या विचारात खंड पडला. परंतु हाच विचार मी दिवस रात्र करायचे ठरवले होते. दोन दिवसानंतर मला तो विचार शब्द अन शब्द पाठ झाला. आता मी तो विचाराचा मनोमन जप करण्याऐवजी मी त्या विचाराचा मोठ्या आवाजात जप करू लागले. रफिकने म्हटल्याप्रमाणे माझे बोलणे त्याला माईकवरून ऐकायला जात असेल तर त्याचा मला फायदा होईल हा माझा उद्देश.

माझा उद्देश सफल झाला. साधारण दहा दिवसांनी, रफिक आणि मी चेस खेळत होतो तेव्हा त्याने मला सांगितले, "तुझं म्हणणं पटतय मला. आपण तुझ्या घरच्यांना पत्र लिहूया." ह्याचा अर्थ माझ्यावर रफिकचा विश्वास बसला होता किंवा त्याने हा जुगार खेळण्याचे ठरवले होते. मला खूप आनंद झाला. पण मी ठरवलं होतं त्याप्रमाणे हलकेच स्मित हास्य करून मी माझ्या भावना व्यक्त केल्या. टॅबवर मराठी टायपिंग नसल्याने रफिकने मला कागद पेन आणून दिले.

"प्रिय आई, बाबा, आजी आजोबा आणि दादा,
साष्टांग नमस्कार.

मी कुठे आहे कशी आहे ह्या विचाराने तुमची झोप उडाली असेल परंतु तुम्ही सगळे कुशल असाल असा माझा विश्वास आहे. मी अत्यंत आनंदात आहे. सध्या मी कुठे आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुम्हाला ह्या पत्राच्या शेवटापर्यंत कळेलच.

मला तुम्हाला एक अत्यंत आनंदाची गोष्ट सांगायची आहे. त्यापूर्वी तुमचे आभार की तुम्ही मला सागरसोबत लग्न करण्यास भाग पाडले. सागरसोबत लग्न केल्यामुळेच मी इथे येऊ शकले आणि माझ्या राजकुमाराला भेटू शकले. सागर मला आवडला होता एक व्यक्ती म्हणून आणि तुम्ही सगळ्यांना तो खूप जास्त आवडल्यामुळे मी त्यापलिकडे जास्त विचार करू शकले नव्हते. पण इथे आल्यावर सागरबरोबर राहिल्यावर मला हळू हळू जाणवत गेलं की सागर मला आवडला असला तरी तो माझ्या स्वप्नातला राजकुमार नाहिये. तो स्वभावाने चांगला आहे शिवाय थोडेफार पैसेही राखून आहे. पण तरीही तो राजकुमार नाहिये. राजकुमार तो जो अत्यंत देखणा असतो. जो राजवाड्यात राहातो. ज्याला उद्याची चिंता नसते. ज्याच्या कंपॅनियनला कधीही कसलेही काम करावं लागत नाही. जी सुखांच्या राशीवर लोळत असते आणि मला असं आयुष्य देऊ शकणारा राजकुमार मला इथे आल्यावर भेटला. आणि मी सागरला सोडून माझ्या राजकुमारासोबत राहाण्याचा निर्णय घेतला आहे.
आज जवळ जवळ तीन महिने मी माझ्या राजकुमारासोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण असे की इतके दिवस मी त्याची परिक्षा घेत होते. तो माझ्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मी इथे राहयचा निर्णय घेतला आणि मगच तुम्हाला कळवत आहे.

तुमचे संस्कार वाया गेले असं समजू नका. मी अजूनही नीतिमत्ता सोडली नाही की माझी संस्कारांची सीमा ओलांडली नाही आणि त्याच करीता मी हे पत्र लिहित आहे. मला माझ्या राजकुमाराला आयुष्याच्या जोडीदाराचा दर्जा द्यायचा आहे. त्याच्या आयुष्यात त्याची पत्नी म्हणून राहायचे आहे. परंतु कायद्याने मी सागरची पत्नी असताना मी माझ्या राजकुमाराची राणी बनू शकत नाही. ह्याकरीता मला सागरकडून कायद्याने घटस्फोट हवा आहे. मला सागरकडून घटस्फोट मिळाला की माझ्या राजकुमाराची कायद्याने पत्नी होण्याचा माझा मार्ग मोकळा होईल.

घटस्फोटाची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असल्याने मला भारतात येऊन घटस्फोटाची वाट पाहाण्याची इच्छा नाही. माझ्या सुखाचे हे क्षण मला असे वाट पाहाण्यात वाया नाही घालवायचे. त्याऐवजी माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही सागरला विनंती करा की त्याने घटस्फोटाची प्रक्रिया सुरु करावी. आम्ही विवाहीत पती पत्नी म्हणून फार कमी काळ एकत्र राहिलो असल्याने आम्हाला घटस्फोट न घेता आमचे लग्न नल अ‍ॅण्ड व्हॉईड ठरवता येईल. तशी प्रक्रिया केल्यास मी या लग्नबंधनातून फार लवकर मोकळी होईन आणि पुढची वाटचाल सुरू करू शकेन.

माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी माझा मार्गही अवलंबला आहे आणि तो म्हणजे माझा धर्म बदलणे. मी माझ्या राजकुमाराचा धर्म, इस्लाम धर्म स्वीकारायचे ठरवले आहे. माझे सागरसोबतचे लग्न नल अ‍ॅण्ड व्हॉईड ठरवण्यासाठी माझा धर्म बदलणे त्याला फायदेशीर ठरेल. लग्न नल अ‍ॅण्ड व्हॉईड असे ठरून माझा मार्ग मोकळा होत नसेल तर धर्म बदलल्याने मला घटस्फोट लगेच मिळेल.

सागरला मानसिक ताण पडू नये, ह्याशिवाय मी असा इथे राहाण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्यावर अन्याय केला आहे ह्या भावनेमुळे मी त्याला किंवा त्याच्या घरच्यांना पत्र लिहित नाही आहे.

मी धर्म बदलून माझ्या राजकुमारासोबत निकाह केल्यानंतर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला नक्की येईन. तोपर्यंत आपण पत्राद्वाराच संपर्कात राहू. दादा, मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझे प्रयत्न वाया जातील. मी माझा निकाह होईपर्यंत कोणाशीही प्रत्यक्ष संपर्कात राहायचे नाही असे ठरवले आहे.

माझ्या निर्णयाचा राग मानू नका. आजी नेहमीच म्हणते, जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतं त्यात ईश्वराची काहीतरी योजना असते. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात पुढे जायला मदत करा. तुमचे उत्तर आले की मी तुम्हाला माझ्याबद्दल अधिक सवीस्तर कळवेन.

तुमची लाडकी
छ्कुली उर्फ सरिता. "

माझ्या डोक्यात पत्राचा साचा तयार असल्याने मी लगेच पत्र लिहून रफिकच्या हातात दिले. माझे पत्र वाचून झाल्यावर रफिकने म्हटले, "यु आर जिनियस. पण मला सांग तू माझ्याशी कुठला गेम खेळत नाहीयेस ना?"
"मी काय गेम खेळणार? मी जे लिहिलय ते अगदी सरळ शब्दात लिहिलय. त्यात काही लपाछपी नाहिये. की आम्ही आमच्या फॅमिलीत अशा स्ट्रॅटेजी नव्हत्या बनवल्या की संकटात सापडलं की असं पत्र लिहायचं की घरच्यांपर्यंत निरोप पोहोचेल की मी संकटात आहे आणि मला सोडवायला या. तू खूप निगेटीव विचार करतो आहेस."
"तू इथे राहण्यासाठी इतक्या सहज तयार झालीस म्हणून शंका येते."
"शंका, संशय रिलेशन्स बिघडवतात. आणि इथे राहण्याबद्दल मला चॉईस आहे का? नाही. मग जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेण्यात शहाणपणा आहे आणि त्यातच माझं नाही तर कमीतकमी त्या बिचार्‍या सागरचं तरी भलं आहे."
"म्हणजे इथे राहण्यात तुझं भलं नाही असं म्हणते आहेस का तू?"
"हे बघ स्पष्ट सांगायचं तर मला निवडायचं असेल मी काय करायचं तर मला परत जायचं आहे. पण निवड करणं माझ्या हातात नाहीये हे मला माहित आहे. त्यामुळे आलेल्या परिस्थितीत आनंदात कसं राहायचं ह्याचा विचार करते आहे. शिवाय तसं पाहायला गेलं तर मला इथे जो कम्फर्ट आहे तो मला माझ्या आईबाबांच्या किंवा सागरच्या घरीदेखील नाही मिळणार. तेव्हा हा वेळ मी स्वतःच्या अभ्यासासाठी वापरू शकते. मग त्याकरता मला थोडी अ‍ॅडजस्टमेंट करावी लागणार आहे, ती करेन मी."
"माझा अजूनही विश्वास बसत नाहीये."
"बसेल, लवकरच बसेल. हे पत्र तू असेच पाठवणार की तुला ह्यात काही बदल करून हवे आहेत."
"हे ठीक आहे. असेच पाठवूया."
"कसं पाठवणार?"
"म्हणजे?
"म्हणजे हँड डिलिवरी की कुरियर वगैरे?"
"तुला का पंचायती?"
"हे बघ कुरियरने पाठवलस तर उत्तर येईल ह्याची खात्री नाही. पण तुझ्या एखाद्या माणसाला पाठवलस की उत्तर मिळेपर्यंत निघायचं नाही तर उत्तर नक्की मिळेल."
"मला विश्वास बसत नाहीये की तू आत्ता चेस शिकते आहेस. तुझे विचार अगदी चेस चँपियन प्रमाणे आहेत."
"अरे इथे बसून दिवसभर विचारच करते ना मी. शिवाय मी सायकॉलॉजीची स्टुडण्ट आहे. माझ्या घरचे काय विचार करत असतील. ते कशावर कसे रिअ‍ॅक्ट होतील ह्याचा अंदाज मला आहेच ना?"
"हं. पाहू काय करता येतं ते. कळेल तुला लवकरच काय होतय पुढे." असे बोलून रफिक पत्र घेऊन जायला निघाला.
"रफिक!"
"बोल, आता अजून काय. मीच जाऊ का पत्र द्यायला की तुला पाठवू?"
"माझ्यासोबत रात्री जेवायला येत जाशील? मला एकटीला कंटाळा येतो."
रफिकच्या चेहर्‍यावर आश्चर्य पसरलं. "तू मला मस्का मरते आहेस का?"
"नाही रे, खरच. अख्खा दिवस मी एकटी असते, तू चेस खेळायला येतोस आणि फातिमा जेवण घेऊन तेवढच काय ते मला कोणीतरी बोलायला मिळतं. मी माणसांची भुकेली आहे रे. हा अज्ञातवास मला खायला उठतो. आणि एकटं कधी जेवू नये. जेवताना सोबत कोणी असेल तर जेवण अंगाला चांगलं लागतं असं माझी आजी म्हणायची. येशील ना?
"पाहू."
"आता भाव नको खाऊ, मी तुला समजून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करते आहे. जेणे करून मी तुझ्या सोबत अधिक सुखी करू शकेन स्वतःला आणि तुला देखील. प्लीज ये ना." असे बोलून मी थोडेशी त्याच्याजवळ सरकले. पुन्हा एकदा त्याचे हात पकडले. त्याच्या डोळ्यात डोळे घालून अगदी आर्जवाने म्हटले. "जेवताना वाट पाहेन."

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45994

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल्लरी, मूळ कथा आणि तुझे आत्तापर्यंतचे सगळे भाग एकादमात वाचले...दोन्ही खुप आवडलं.. तुझा पहिला प्रयत्न असेल, असं वाटत नाही, इतकं सफाईदार लिहीलं आहेस.. खिळवून ठेवलंस अगदी.. Happy सरीताचं पात्र जाम आवडलंय...पुढचे भाग लवकर येऊदे... खुप उत्सुकता आहे...

मायबोलीकर मित्र मैत्रिणींनो,

थोडी कळ काढा. थोडी तब्बेतीमुळे आणि थोडी ऑफिस आणि घरच्या कामामुळे व्यस्त आहे.

सांभाळून घेताय, त्याबद्दल आभार.

Pages