आधुनिक सीता - १८

Submitted by वेल on 23 October, 2013 - 06:17

भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869

**************************************************************************************************

पण रफिक माझ्या नजरेत गुंतलाच नाही. तो निघाला. दाराकडे जाऊन मागे वळून त्याने मला विचारलं, "हे धर्म बदलायचं वेड तुझ्या डोक्यात कसं आलं?"
"घटस्फोट मिळवायचा तो सर्वात सोपा मार्ग आहे."
"पण घटस्फोटाची काय गरज आहे?"
"तुझ्यासोबत राहायला?"
"आणि तू तिथे न जाता तो कसा मिळणार?"
"कन्सेण्ट ... वेबकॅम वगैरे सोयी वापरायला सुरुवात झाली आहे भारतात. काऊन्सिलिंग सुद्धा होतं म्हणे वेबकॅम वापरून"
"या सगळ्याची मला तरी काही गरज वाटत नाही. पत्रात लिहिण्यापुरतं ठीक आहे. सागरला सोडवण्यापुरतं. पण तू धर्म बदलून माझ्याशी निकाह नाही केलास तरी मला काही फरक पडत नाही. त्याने माझं तुझ्यावरचं प्रेम काही कमी होत नाही की धर्म बदललास म्हणून वाढणार नाही."
"पुढचा विचार पुढे करू. मला तरी तुला सर्वस्व देण्यासाठी ह्याची गरज वाटते. माझ्यावर संस्कार आहेत तसे."
"मला मस्करी नाही करायची तुझी. पण एक गोष्ट लक्षात घे, आपण दोघेही मॅच्युअर्ड आहोत. अग समाजात राहाण्यासाठी आणि कुटुंबाने नातं स्वीकारलं आहे हे दाखवण्यासाठीच्या रुढी आहेत ह्या सगळ्या आणि आपण जे करतोय ते ना तुझ्या समाजाला मान्य होणार ना माझ्या समाजाला ना तुझ्या कुटुंबाला ना माझ्या."
"काय? तुझ्या कुटुंबाला हे मान्य नाही?"
"नाही माझ्या मोठ्या अम्मीला आणि अब्बूंना हे मान्य नाही. पण मी फातिमासोबत लग्न टिकवून ठेवावं ह्याकरता ते मला काही बोलत नाहीत."
"फातिमावर तुझा राग का एवढा?"
"असं कोण म्हणतं माझा राग आहे तिच्यावर? ती माझी बायको आहे आणि मी तिच्याप्रती असलेली सगळी कर्तव्य पार पाडतो आहे. फक्त मी तिच्यावर प्रेम नाही करू शकत."
"आणि तिच्यावर प्रेम न करण्याचं कारण?"
"तिच्याशी लग्न करायचं म्हणून मला माझ्या सुनिताला सोडून यावं लागलं."
" आता मी आले तुझ्या आयुष्यात आता तिला तिचा प्रेमाचा हक्क देऊ शकशील?"
"तुला प्रेमात वाटेकरी चालेल?"
"खूप चांगली आहे ती असं मला वाटतं, मला चालेल."
"मग ठीक आहे. तू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलीस की मी तिच्यावर प्रेम करेन."
"प्रेमात अशा कंडिशन्स नसतात."
"तूसुद्धा टाकल्यास ना?"
"..."
"मनावर घेऊ नकोस जास्त. मी असंच म्हटलं. आज जेवणात मटण आहे. तुला वास सहन होत नाही ना? मी उद्यापासून तुझ्यासोबत जेवायला येतो."
मी डोळे मोठे करून पाहातच राहिले.
"पत्रात एक सुधारणा कर, मी तुला दुसरे पेपर आणून देतो उद्य संध्याकाळी, इस्लाम धर्माप्रमाणे मुलाला त्याच्या होणार्‍या बायकोला काही रक्कम द्यावी लागते. मेहेरची रक्कम. सागर तुझा पालक होता म्हणून तीच रक्कम मी त्याला दिली आहे कारण असं त्याला सांग. त्याला म्हणावं ती रक्कम त्याच्या हॉस्पिटलसाठी वापर आणि याशिवाय मी त्याला अजून पन्नास लाख रुपये द्यायला तयार आहे. "
"तू माझा आणि माझ्या भावनांचा सौदा करतो आहेस?
"मूर्ख आहेस तू. धर्म बदलण्याचा विषय कोणी काढला? आणी मी म्हटलं त्याला सांग. फरक कळला का? आणि माझ्या स्टेटसअनुसार मी ही रक्कम देत आहे. आता जेव आणि झोप तुझं मेडिटेशन करून. खूप विचार केला आहेस. थकली असशील."

रफिक निघून गेला. रावण राम होऊ पाह्तोय का? का माझ्या वागण्याला उत्तर म्हणून असा वागतोय. हा बुद्धीबळाचा खेळ सुरु त्याने केलाय म्हणजे त्याच्याही काही खास चाली असणारच. पण त्या तरी खर्‍या आहेत का? का तो खरंच चांगला वागतोय. आजी सांगते तसंच करायचं. चांगुलपणावर विश्वास ठेवायचा.

दुसर्‍या दिवशी सकाळी रफिक मी लिहिलेलं पत्र आणि अजून काही कागद घेऊन आला. आदल्या दिवशी रफिकने सांगितल्याप्रमाणे मी पत्रामध्ये त्या पन्नास लाख रुपयाचा उल्लेख केला. आता मात्र पत्र अगदी जेन्युअनली लिहिलेलं दिसत होतं. रफिक पत्र वाचून आनंदी झाला आणि माझ्या मनात मात्र विचित्र अशा एकत्रित भावना होत्या. एकिकडे आनंद होता दोन कारणाकरीता - सागर जर तुरुंगात किंवा कोणत्या केसमध्ये असेल तर तो सुटणार होता आणि माझ्या घरच्यांना माझी खुशाली कळणार होती. कमीत कमी मी जिवंत आहे हे तर नक्कीच कळणार होते. पण त्याच सोबत सागर माझ्यापासून कायमचा दूर जाणार होता आणि आई बाबांनी ह्या पत्रावर विश्वास ठेवला असता आणि माझा तिरस्कार केला असता तर. पण कदाचित आजी असं नाही होऊ देणार, केवळ आजीच समजून घेऊ शकते माझ्या पत्राची सत्यता. आजी बरी असेल ना? आणि सागरची आजी. मी पत्रात हे काहीच विचारू शकत नव्हते. पण मनात एक शंका आली. एवढं पत्र लिहून देखील त्या पत्रावर विश्वास नाही ठेवला माझ्या घरच्यांनी तर? त्यांनी सागरला सोडायचे प्रयत्न नाही केले तर? मी रफिकला घाबरत घाबरत विचारले, "रफिक, तू प्लीज हे पत्र हॅण्ड डिलिवरीने देशील ना? मला उगाच भीती वाटते आहे, की माझ्या घरचे हे पत्र वाचून ते फेकून तर देणार नाहीत ना? सागरला सोडवतील ना?"
"म्हणे आता भीती वाटते. पत्र लिहिण्या आधी विचार नव्हता का केला. मग पत्र पाठवू नको का?"
"असं केलं तर ह्या पत्राची एक फोटोकॉपी तू सागरच्या पत्त्यावर पाठवून देशील का? म्हणजे माझ्या आई बाबांनी काही मदत नाही केली सागरला, तरी त्याचे आई वडिल मदत करू शकतील."
"तुझे आई वडिल असे आहेत का की ते मदत करणार नाहीत. तुझ्या स्वभावावरून तरी वाटत नाही तसं."
"नाही तसे नाहीत ते. शिवाय आजी त्यांना तस करू देणार नाही. पण तरीसुद्धा."
"तुला माहित आहे तू किती मोठी रिस्क घेते आहेस हे पत्र लिहून, तुझ्या घरचे, सागरच्या घरचे तिरस्कार करतील तुझा. तिरस्कराचं एवढं ओझं घेऊन जगू शकशील?"
"माझ्या घरचे तरी नाही करणार आणि केला तरी काय फरक पडतो. माझ्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम आहे त्यामुळे माझ्यापर्यंत त्यांचा तिरस्कार पोहोचणार नाहीच. मग कसलं ओझं?"
"तू वाटतेस तितकी साधी नाहीस ग? तू माणूसच आहेस ना नक्की. इतकी स्थितप्रज्ञता एखाद्या फकिरामध्ये सुद्धा नसेल."
"माझ्या आजीची शिकवण आहे ही सगळी."
"तुझ्या आजीला भेटता आलं असतं तर खूप बरं झालं असतं मलाही काही शिकता आलं असतं."
"भेटता आलं असतं म्हणजे? भेटू शकतोस तू. मी तुझ्याशी निकाह केला की तुझा माझ्यावर विश्वास असेल आपण भारतात जाऊन माझ्या घरच्यांना भेटून येऊ, किंवा त्यांना इथे बोलावून घेऊ. पण त्यांना इथे आणायचे खर्च मात्र तुलाच करावा लागेल. ते असे नाही येणार."
"पुढचं पुढे बघू."
"पण ते पत्र तू.."
"माझ्यावर सोड आता."रफिकने विषय मध्येच तोडला.

दिवस असेच जात होते. आता मी आणि रफिक रात्रीचं जेवण बुद्धीबळ खेळून झाल्यावर एकत्र घेत होतो. बुद्धीबळात मी थोडी प्रगती दाखवत होते. पण तरीही जाणून बुजून हरत देखील होते. तीन आठवड्यानंतर एक दिवस बुद्धीबळासोबत तो काही कागद हातात घेऊन आला.

क्रमशः

puDhachaa bhaag - http://www.maayboli.com/node/46013

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1 chan

मस्त चालू आहे, पण जरा मोठे भाग टाकत जा ना , आणि संवाद असतील तेव्हा मधे एक लाईन सोड म्हणजे वाचायला जरा बरं पडेल Happy

खुपच मस्त चाललीय कथा........... यासाठी माबोवर आलोय...............

खुप मस्त चालली आहे गं कथा, वल्लरी... लवकर टाक बाई आता पुढचा भाग... Happy हुशार आहे आपली नायिका एकदम.. चित्रपट निघायला हवा ह्या कथेवर.. जबरदस्त पोटेन्शियल आहे..

आज सगळे भाग एकत्र वाचले. कथा आवडतेय, तुमची लेखनशैलीही आवडली.
फक्त प्रत्येक भागात पुढच्या भागाचा दुवा देता ना शेवटी तो द्या. १२ व १७ भागात तो दिला नाहीए.

खूपच छोटुसा भाग Sad एनीवे पुढच्या भागाची वाट पाहतोय नेहमीप्रमाणे... पु. ले. शु Happy