जायचे नाही

Submitted by दाद on 10 October, 2013 - 22:23

कसलाच जिव्हाळा मजला सुचवून जायचे नाही
सांत्वनास माझ्या ये पण बरसून जायचे नाही
(सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही)

सांगून ठेवतो माझे ना खरेच काही आता
ठरवून माळ गजरा पण विसरून जायचे नाही
(कुस्करला गजरा नकळत सजवून जायचे नाही)

उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही
(श्वासांवर माझ्या दरवळ नखलून जायचे नाही)

मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही

हा अवेळीच का येतो, का वसंत ऐकत नाही
विनविले किती की मजला फुलवून जायचे नाही

तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांत्वनास माझ्या ये पण भिजवून जायचे नाही

श्वासांवर माझ्या दरवळ नखलून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

वा वा! शलाका काय लिहिलयंस!!

अजून एक शल्यकर्म केलय.
मतलाच बदलला... पण किंचितच.
जिव्हाळा सुचवून ला जिव्हाळा सांगून ... हा पर्याय नाही पटला. त्याचबरोबर, कोरून, विसरून, नखलून ह्यातले खयाल मलाच जरा जास्तच आवडले होते. म्हणून मतला बदलला.
आता बघा बरं.(मला मजा आली हे घडताना... वाचणार्‍यांचं ते जाणे Happy )

तू रंगविले मज म्हणुनी, मी दंग खेळलो रंगी
लपवून चेहरा आता, फसवून जायचे नाही

हा आणि अलखवाला शेर जबरदस्त आहे.

जियो दाद !

सांगून ठेवतो माझे ना खरेच काही आता
ठरवून माळ गजरा पण विसरून जायचे नाही

मी जरा सावरित असता परतून यायचे नाही
हलकेच फुंकुनी जखमा उसवून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही
फार अप्रतिम शेर ...उत्तम गझल !
खरे सांगायचे तर मला शब्दलाघव फार भावले .

दाद ,
खूपच छान लिहिता (नेहमीप्रमाणेच)

>>
उलटलीच लाघववेळा. दे खूण म्हणालो मी, पण
श्वासांवर माझ्या दरवळ कोरून जायचे नाही

ये खुशाल आयुष्या तू, कहराच्या ऐन दुपारी
पण अलख गर्जुनी दारी, चुकवून जायचे नाही

>> हे शेर जास्ती आवडले.

दाद, शेवटचा शेर मस्त, एक पूर्ण आणि अर्थपूर्ण कविता आहे तो शेर म्हणजे. अख्खा एक लेख लिहू शकतेस तू त्यावर :).
अलख आयुष्याचा लखलखता शेर.

दाद.. तुम्ही परत या हो मायबोलीवर.. कुठे आहात..
कसलं अप्रतिम लिहीता.. ह्रुदयाच्या बंद कुपीचे झाकण क्षणभरासाठी उघडावे आणि त्यातून मुग्ध दरवळ सगळीकडे पसरावा असं वाटलं ही गझल वाचून.. तुमच्या गद्य लेखनाची फॅन होतेच आता पद्य लेखनाचीही झाले!

Pages