कल्हई

Submitted by इब्लिस on 5 October, 2013 - 05:10

कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.

लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.

कल्हई :
म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन. Sn) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथिल गंजत नाही, व या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ, वा इतरही खाद्यपदार्थ 'कावळून' खराब होत नाहीत.

तर हे कल्हईवाले सुभाष देवरे, अन त्यांचं पोर्टेबल वर्कशॉप :

kalhai (1).jpg

अंगणातल्या झाडाखाली एक छोटा खड्डा खणून त्यात एक हँडलवाल्या पंख्याची नळी सोडली आहे. पूर्वी कॅनव्हासच्या पिशवीचा भाता असे. समोर मांडलेल्या भांड्यांची 'ऑपरेशन पूर्वी' स्थिती पाहून ठेवा.

*

कल्हईसाठीचे मुख्य रासायनिक घटक.

kalhai (3).jpg

चौकोनी पांढरी वडी दिसतेय तो नवसागर. अन शेजारी चकचकीत धातूची पट्टी आहे, ते कथिल.
नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. (NH4Cl). गरम भांड्यावर नवसागराची पूड टाकली, की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते, तसेच नवसागरामुळे कथिल लवकर वितळते व पातळ होते. पातळ झालेल्या कथिलाचा थर कापडी बोळ्याने भांड्याला आतून पसरवतात.

*

भांडे आधी चांगले तापवायचे :

kalhai (4).jpg

*

मग त्यात टाकायचा नवसागर, अन भांडे स्वच्छ करून घ्यायचे :

kalhai (5).jpg

नवसागराचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो. तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.

*
या ठिकाणी तापलेल्या भांड्यातून नवसागराचा धूर येत असतानाच कथिलाची काडी त्या भांड्याच्या बुडाशी घासतात. कथिल वितळून भांड्यात रहाते. पितळेचे पिवळे भांडे तापून लाल झालेय हे नोट करा.

kalhai (6).jpg

*

वितळलेल्या कथिलाचा थर भांड्यात पसरवताना :

kalhai (7).jpg

मोठं भांडं असेल तर अधून मधून नवसागर टाकत रहातात, ज्याने कथलाच्या गोळ्या न होता ते पातळ रहाते, तसेच भांडे तापवत रहातात.

*

कल्हई करून पूर्ण झाली.

kalhai (8).jpg

आता हे भांडे पट्कन पाण्यात बुडवायचे. अचानक थंड केल्याने कल्हईला चमक येते. नाहीतर ती चमकत नाही.
(कल्हईचे फोटो काढण्याच्या नादात मी बादली जवळ उभा होतो, भसकन भांडे पाण्यात बुडवणे हा प्रकार माझ्या पायापाशीच झाल्याने नेमका तो फोटो हलला.)

*

हा आहे "ऑपरेशन नंतरचा" फायनल रिझल्ट :

kalhai (9).jpg

याला म्हणतात कल्हई! इतकी चमक असल्यावर हे भांडे आतून दिसायला चांदीला भारी पडते, अन चांदीसारखे कळकत नाही हा वेगळा फायदा.

(माबोवर इतिहास शोधला तेव्हा कल्हईवरचा हा एक छान लेख सापडला.)

ता.क.
कल्हईचा व्हिडिओ. खाली प्रतिसादात दिलेला आहे, तो सगळ्यांना दिसला नसेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy
आमच्याही चाळीत अगदी परवापरवापर्यंत यायचा.
हे लोक काही सेफ्टी गिअर न वापरता हे उद्योग वर्षानुवर्षे कसे करायचे असं आता मनात येतं. तेव्हा बघायला मजा वाटायची मात्र.

हो, मजा यायची कल्हई करताना पहाताना. प्रत्येकवेळी अपुर्वाई वाटायची कळकट्ट भांडे चकचकीत झालेले पहाताना. तो भाता भप्पभप्प आवाज करायचा तो आवाज तर अजुनही ताजा वाटतो.

इब्लीस सुरेखच झालय डॉक्युमेंटेशन. फार आवडले. हे लक्षात तरी कस आल रेकॉर्ड करुन ठेवायच तुमच्या? Happy
आजीकडे पितळी डबे होते. ओळीने फळीवर इतके देखणे दिसायचे. पातेली तर एकात , एक घालून असंख्य होती. काही ठोक्याची काही प्लेन.

भारीच इब्लिस ! कित्येक वर्षात बघितली नाहीये कल्हई करताना. गंमत वाटायची कल्हई होत असताना बघायला. धन्यवाद ! विकिवर टाकायची कल्पना मनावर घ्या खरच.

अप्रतिम लेख ! डॉक्युमेंटेशन करुन ठेवायची कल्पना आवडली Happy धन्यवाद तुम्हाला आणि कल्हईवाल्याकाकांना Happy

लहानपणी कल्हई करताना बघितलंय. आजीकडे आणि मग आईकडे पितळेची भरपूर भांडी होती.. मोठमोठाली सगळी आता काढुन टाकली पण काहि ठेवली आहेत ताईकडे आठवण म्हणून. सासरी देखिल आहेत. त्यात मसालेभात, साखरभात असले पदार्थ अजुन बनतात Happy

कापुस पिंजणार्‍याचा तो खास आवाज अगदी कानात फिट्ट बसलेला आहे. अजुन त्या बोहारणी, पाट्याssssला टाssssक्कीय्ये वाले, भंग्गारवाल्लेssss... त्यांचे एक टिप्पीकल आवाज पण आठवतात.

ईब्लिस, तुम्ही हा लेख त्या कल्हईवाल्याकाकांना पण दाखवा... अर्थात परत भेटले तर Happy

या विषयावरची आणखी रंजक माहिती :
http://www.thehindu.com/todays-paper/tp-miscellaneous/polish-wearing-off...

http://www.hindu.com/seta/2005/12/08/stories/2005120800101700.htm

वर कुणीतरी कुठले धातू आरोग्यासाठी चांगले असं विचारलंय ना ?

http://whfoods.org/genpage.php?tname=dailytip&dbid=92

http://health.nytimes.com/health/guides/nutrition/cooking-utensils-and-n...
माहितीसाठी.

या लेखाच्या निमित्तानं छान माहिती वाचायला मिळाली, जुन्या काळच्या भांड्यांना उजाळा मिळाला याबद्दल इब्लिसांचे आभार.

ज्यांच्याकडे अशी जुनी भांडीकुंडी आहेत त्यांनी त्यांचे फोटो काढून, एक नविन धागा सुरू करून तिथे एकत्रित टाकावेत. तेही एक सुरेख डॉक्युमेंटेशन होईल.

मस्त लेख! जुन्या आठवणींना परत एकदा 'कल्हई' केली. Proud
<< तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.<<
अगदी अगदी! कल्हई म्हटलं की आधी हा वास 'नाकात' शिरतो.

चांगली माहिती, शिवाय माबो सुविधा वापरुन मला दिसू शकणार्‍या फोटोंसहित! Happy धन्यवाद.
लहानपण आठवले, धुराचा वास आठवला!
अन हे देखिल आठवले की शाळकरी/कॉलेज वयात आम्ही घरच्या घरीच स्वतःच कल्हई करायचो.

क्या बात है!
लहानपणीच्या खूप गोष्टी आठवल्या.
फोटूंबरोबर विडियो असते तर अजून मजा आली असती Happy

>> हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.
अगदी अगदी खरंय!!

मस्त माहिती. असे आठवणीतून हरवलेले अनेकजण पुन्हा शब्दांकित करता येतील? कहां गये वो लोग?
पूर्वी गावोगावी वॉचमेकर असायचे. एका डोळ्याला भिंग लावून हातातल्या बारीक हत्यारानं घड्याळं दुरुस्त करणारे. त्यांची ती काचेची पेटी, बाजूचा छोटा टेबल लॅम्प, ... कुठे गेले ते वॉचमेकर?

झकास.
जुनी भांडी असतील तर त्यांचे फोटो येउ द्यात. नविन पिढीला बरं पडेल, बरेचदा जुनं साहित्य वाचताना संदर्भ कळत नाही. Happy

इब्लीस धन्यवाद.. जुन्या आठवणिना उजाळा दिल्या बद्दल... गावच्या घरी माळ्यावर पडलीली भली मोठी थोरली ताम्ब्या पितळेची भान्डी आईला विकु नकोस म्हणुन नेहमी सान्गतो. लहानपणी मुम्बईत मी कल्हई काम करताना पाहिले आहे... तो धुर... तो वास.... पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.....

खुप महत्वाची माहिती मिळाली आणी आमच्या घरात पडुन असलेल्या पितळी भान्ड्यान्ना घरीच नवसन्जिवनी मिळाली ,

मनापासुन धन्यवाद

लेख नॉस्टल्जिक एकदम. कल्हईवाला मला जादूगार वाटे! धुर येत असताना ते कथील टाकणे व ते सुती धाग्यांचे गॉझ ने एकदम चमकदार पुसणे बघायला फार भारी वाटायच.

वा! सुंदर!!! लहानपणीचे घर, गल्ली आणि मन लावून कल्हई ची प्रोसेस बघत बसण्याचा आनंद सगळे आठवले. धन्यवाद इब्लिस.

मस्त.... जुन्या आठवणित घेऊन गेला....

मुंबइत लालबाग येथे "चैतन्य" या भांडयाच्या दुकानात तांब्या पितळेची भांड्यांना कल्हई करुन देतात....

मस्त वाटले.या प्रोसेस बद्दल फक्त ऐकून होते
मी लहान असताना गॅस शेगडी ला क्रोमियम कल्हई केली होती, ती मात्र भांडी वाल्याकडे नेऊन मशीन ने.

Pages