कल्हई

Submitted by इब्लिस on 5 October, 2013 - 05:10

कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.

लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.

कल्हई :
म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन. Sn) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथिल गंजत नाही, व या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ, वा इतरही खाद्यपदार्थ 'कावळून' खराब होत नाहीत.

तर हे कल्हईवाले सुभाष देवरे, अन त्यांचं पोर्टेबल वर्कशॉप :

kalhai (1).jpg

अंगणातल्या झाडाखाली एक छोटा खड्डा खणून त्यात एक हँडलवाल्या पंख्याची नळी सोडली आहे. पूर्वी कॅनव्हासच्या पिशवीचा भाता असे. समोर मांडलेल्या भांड्यांची 'ऑपरेशन पूर्वी' स्थिती पाहून ठेवा.

*

कल्हईसाठीचे मुख्य रासायनिक घटक.

kalhai (3).jpg

चौकोनी पांढरी वडी दिसतेय तो नवसागर. अन शेजारी चकचकीत धातूची पट्टी आहे, ते कथिल.
नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. (NH4Cl). गरम भांड्यावर नवसागराची पूड टाकली, की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते, तसेच नवसागरामुळे कथिल लवकर वितळते व पातळ होते. पातळ झालेल्या कथिलाचा थर कापडी बोळ्याने भांड्याला आतून पसरवतात.

*

भांडे आधी चांगले तापवायचे :

kalhai (4).jpg

*

मग त्यात टाकायचा नवसागर, अन भांडे स्वच्छ करून घ्यायचे :

kalhai (5).jpg

नवसागराचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो. तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.

*
या ठिकाणी तापलेल्या भांड्यातून नवसागराचा धूर येत असतानाच कथिलाची काडी त्या भांड्याच्या बुडाशी घासतात. कथिल वितळून भांड्यात रहाते. पितळेचे पिवळे भांडे तापून लाल झालेय हे नोट करा.

kalhai (6).jpg

*

वितळलेल्या कथिलाचा थर भांड्यात पसरवताना :

kalhai (7).jpg

मोठं भांडं असेल तर अधून मधून नवसागर टाकत रहातात, ज्याने कथलाच्या गोळ्या न होता ते पातळ रहाते, तसेच भांडे तापवत रहातात.

*

कल्हई करून पूर्ण झाली.

kalhai (8).jpg

आता हे भांडे पट्कन पाण्यात बुडवायचे. अचानक थंड केल्याने कल्हईला चमक येते. नाहीतर ती चमकत नाही.
(कल्हईचे फोटो काढण्याच्या नादात मी बादली जवळ उभा होतो, भसकन भांडे पाण्यात बुडवणे हा प्रकार माझ्या पायापाशीच झाल्याने नेमका तो फोटो हलला.)

*

हा आहे "ऑपरेशन नंतरचा" फायनल रिझल्ट :

kalhai (9).jpg

याला म्हणतात कल्हई! इतकी चमक असल्यावर हे भांडे आतून दिसायला चांदीला भारी पडते, अन चांदीसारखे कळकत नाही हा वेगळा फायदा.

(माबोवर इतिहास शोधला तेव्हा कल्हईवरचा हा एक छान लेख सापडला.)

ता.क.
कल्हईचा व्हिडिओ. खाली प्रतिसादात दिलेला आहे, तो सगळ्यांना दिसला नसेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप लहान असताना पहिले होते. खुप खुप छान वाटले वाचुन लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
तुम्ही धुळे जिल्ह्यातील आहात का?

मस्तच.

लहानपणीची जादू. कथल्याच्या पट्टीने ते काहीतरी लिहिल्यासारखे करतात. ते काय लिहिले ते ओळखायचा खेळ असे.

आता संग्रहालयात ठेवायच्या वस्तू झाल्यात ह्या. तो वास अजून लक्षात आहे.
स्टीलची भांडी आल्यावर बरीच जूनी भांडी माळ्यावर गेली. पण बेसन भाजायला मोठी पितळी कढई आणि चिवडा मिसळायला मोठी तांब्याची परात आमच्याकडे अजून आहे. त्यांना कल्हई करणारेच मुंबईत शोधावे लागतात.

अजून त्यांच्याची घंघाळे वापरात आहेत पण त्यात पाणीच ठेवायचे असल्याने ( आणि तो दिवाणखान्यात ठेवून त्यात फुले तरंगत ठेवायची असल्याने ) त्याला कल्हई लागत नाही. पितळी समईला पण कल्हई लागत नाही.०००

मोठी धनुकली घेऊन कापूस पिंजून देणारे, पाट्याला टाकी लावणारे, गोधडी शिवून देणारे, गाढवीणीचे दूध विकणारे पण येऊ द्यात.

मस्त ! घरी अजुन काही पितळीची भांडी कल्हई केलेले आहेत. वापर फार कमी असल्याने कल्हई थोडी टिकुन आहे. !

पाट्याला टाकी लावणारे? म्हणजे काय>> पाटा व वरवंटा पुर्वी डाळी बारीक करण्यासाठी वापरत, ते वापरुन थोडे गुळगूळीत होत, त्याल्या छन्नी व हातोड्याने घाव घालुन टाकवत असत. तसेच जात्याला पण करायचे !

सुरेख माहीती इब्लीस.
आज सकाळी अ‍ॅल्युमिनियमची कढई घासताना ...म्हणजे खूप जोर लावून ती लखलखवली तेव्हा कल्हईवाल्याचीच आठवण झाली होती आणि लगेच हा लेख.
अ‍ॅल्युमिनीयमची (की हिंडालीयम? ही जास्त चांगली असते का?) कढई घासून झाल्यानंतर अगदी अलगद हाताने लिंबु फिरवले तर काळे काळे पाणी दिसू लागले...तेव्हापासून डोक्यात किडा आहे की अ‍ॅल्युमिनियम मधे पदार्थ घालताना लिंबु/आंबट काही घालायचे नसते की काय? मी तर पोहे झाले की कढईमधे असतानाच लिंबू पिळते त्यात्..

अ‍ॅल्युमिनम मधे चालते लिंबु पिळणे वगैरे सुमेधाव्ही
पण पितळेत नाही चालत. त्याला कल्हई करावी लागते.

बाकी लेख जुन्या आठवणित घेऊन जातो. अकोल्यात एवढ्यात तरी कल्हईवाला नाही दिसला. पण घरात काही भांडी आहेत. कल्हई केलेली !

आहा. तो कल्हईचा वास अजुनही नाकात आहे. हल्लीच्या स्टेनलेस स्टीलच्या जनरेशनला नाही कळायच्या या गमती. Sad

डॉक्टर.....

सुरेख आठवण....सोबत दिलेल्या फोटोजमुळेही लेखाला खास 'कल्हई' लाभली आहे. आमच्या कोल्हापूरात तर कल्हईवाले, लग्न बॅण्डवाले आणि जुने कपडे खरेदी करणारे जोशी यांची स्वतंत्र अशी एक चाळच होती. बहुतांशी कल्हईवाले पोस्टमन जसे खांद्यावर आपली पत्राची पार्सल्सची बॅग टाकून रस्ता कापतो, तद्वतच काळे कोट घालून [जितकी पाहिली तितकी मंडळी काळाच कोट घालत], धोतर नेसून ही कल्हईवाली मंडळी गल्लीगल्लीत "भांड्याला कल्यौ..." अशी दमदार आरोळी देत. त्या काळात कामही छान मिळे....ज्या गल्लीत काम असेल तिथेच मग ऐसपैस बैठक मारून अवजारे बाहेर काढून जवळपास 'युद्धा' ची तयारी सुरू करत असत.....बहुतेक वेळा [मला आठवते] कल्हईवाल्याकडे कुणी सहाय्यक नसायचाच....एकटा बाब्याच सारी कामे करायचा.... आमच्या दृष्टीने त्या कामातील 'वेलकम' भाग म्हणजे भांड्यामध्ये कथील कांडी फिरविणे....तशी ती फिरविली की आजुबाजूला एक खमंग वास पसरे, धुराच्या माध्यमाने.....आणि मग चकचकीत झालेली ती पिवळी भांडी पाहाणे फार आल्हाददायक गोष्ट होती.

काम झाले की....कल्हईवाला आपली आयुधे पेटीत भरत असे, शेवटी इंगळावर पाणी मारुन झाले की पैसे गोळा करेपर्यंत राहिलेला कोळसा पिशवीत भरणे चालू असायचे.

खासच! Happy

कल्हई करतानाचा वास खूप आवडायचा. आता वाचतानाही आसपास दरवळला.

[जितकी पाहिली तितकी मंडळी काळाच कोट घालत] >>> 'सगळे कल्हईवाले जाकीट का घालतात?' - हे पु.लं.चं वाक्य आठवलं. Lol

मस्त काम इब्लिस.
आमच्याकडे कल्हईवाल्यांची एक जोडी एक-दोन वर्षांत अचानक दिसू लागली आहे. धोतर, सदरा, पांढरी टोपी असा वेश असतो त्यांचा.

मला तर कल्हई कशी करतात ते माहिती नव्हते. फक्त वर्णनच माहिती होते. एक्दम सचित्र वर्णन केल्याबद्दल धन्यवाद.

आमच्या कडे एक पितळी पातेले आहे, त्यात सत्यनारायणाचा प्रसादच करतात. इतर काही नाही. ह्या पातेल्याला अधून मधून कल्है करावी लागते, तेव्हा पातेले भांडीवाल्याला देतो. तो मग परस्पर कल्हई करुन आणून देतो.

कथिलाचे आरोग्यावर काही वाईट परिणाम होऊ शकतात का? जाणकारांनी प्रकाश टाकावा!
(आता कल्हईचा प्रश्न नसल्याने डोक्याला कल्हई करण्याच्या दृष्टीने हा प्रश्न मनात आला Wink )

लै भारी! लहानपणी कल्हईवाल्याच्या भोवती उभं राहून अचंब्याने ती सगळी प्रोसेस बघायचो ते पुन्हा कित्येक वर्षांनी पहायला मिळालं. याकरता धन्यवादच. Happy

वत्सला,
अन्नावर पितळेतील तांब्याचे वाईट परिणाम होऊ नयेत, म्हणून त्या भांड्याला कल्हई करतात. कथिलाचे वाईट परिणाम नाहीत. पण जसे नॉनस्टिक भांड्याचे कोटिंग डॅमेज झाल्यावर ते वापरू नये, तसेच कल्हई उडायला लागली तर नवी करावी.
कल्हईची भांडी राखेने घासा असा सल्ला कल्हईवाले देतात. "साबणात काष्टीक असते" (कॉस्टिक सोडा / वॉशिंग सोडा) त्याने कल्हई खराब होते, असे कारण त्यांनी सांगितले.

Pages