बुद्ध

Submitted by संजय क्षीरसागर on 13 September, 2013 - 14:20

परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.

मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं

Sitting Buddha.jpg

बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.

बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.

बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:

एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________

तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?

बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.

त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’

सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.

बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.

बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.

तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________

दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?

बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.

त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.

पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्‍यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

____________________________

तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?

बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.

सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?

जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.

आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?

तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.

श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.

_________________________________

एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधु साधु साधु!

येचि बुद्धा आगता येचि बुद्धा अनागता
प्रत्युपन्नाचि ये बुद्धा अहं वंदामि सब्बदा

आणि हे धम्म आणि संघ याबद्दलपण!
बुद्धाचा धर्म स्टॅटिक नाही. हे खरेच आहे.

मूर्ती आणि चर्चा तुफान आवडली....... (मूर्तीपेक्षा चर्चा अधिक आवडली..... ;))
बाकी संजयजीचा मिपापासूनच मी चाहता आहे हेवेसांनल......

बाकी रिया, उदय वगैरे क्षूद्र जीव उगाच अशा चर्चेत काड्या टाकायचा प्रयत्न करतात याबद्दल त्यांचा तीव्र निषेध. Proud
संजयजी अशा कारनाम्यांना अजिबात भीक घालत नाहीत याचाही अनुभव आहेच. Wink बाकी 'चर्चा' चालूदेत.......

साती......... मी आपलं जरा क्रिप्टिक लिहायचा प्रयत्न केला हो......... जाऊ द्या....... आमच्याने नाहीच होणार बहुतेक.......... Proud
बाकी तुमच्या चिकाटीला त्रिवार मुजरा बरं का........ संजयजींच्या तुम्हीही माझ्यासारख्याच चाहत्या आहात तरी उत्साहाने आलात पहिल्याच पानावर........... Wink

उदय...... Lol

क्षीरसागर महोदय, तुम्हाला काही सांगण्यात पॉइंट नाहीच आहे हे मी मागेच लिहीले आहे. आता पुन्हा एवढ्याच साठी लिहीत आहे की ''लेखनिक'' या शब्दाचा अर्थ जरा सांगा राव.

बुद्ध ही व्यक्ती नसून स्थिती आहे हे वाक्यच पोलिटीकली लोडेड आहे. तत्वज्ञानाच्या आवरणाखाली अशी कोणी व्यक्ती नव्हती किंवा त्याचे ऐतिहासिक अस्तित्व कमी महत्वाचे आहे हे ठसवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि ते करण्याचीही मजबूरी आहेच. कारण एकदा बुद्ध ही व्यक्ती या दूष्टीने विचार केला की तो 'कधी' होता?, तेंव्हाच 'का' होता? त्याने हेच का सांगितले? हे प्रश्न येतात आणि त्याच्या उत्तरात कोण्या प्राचीन महान परंपरेचा मुखवटा फाटतो!
<<एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा.>> हे ही अमान्य, साधनेचा सुर मनात लागला असेल तर अशी कोणतीही बाह्य परिस्थिती असण्याची गरज नसते

तो फोटो सुंदर आहे!

क्षीरसागर, इथे गोंधळ का झाला असावा ? फक्त लेखाच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करतो. आशयाबद्दल काहीच म्हणायचं नाही.

आपण लेखातली वाक्यं पाहू.
१. बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे. (मागचा पुढचा संदर्भ ध्यानात घेतलेला आहे )

२. बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. >> हे वाक्य फक्त.

३. बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:
एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
>>> हा परिच्छेद.

पहिल्या मुद्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली तो त्याचा बुद्ध होण्याचा क्षण. तुमचं म्हणणं मान्य कि बुद्ध ही स्थिती आहे. बुद्ध ही व्यक्तीही आहे आणि जगात अनेक लोक त्याचा शोध घेतात, रोज काही न काही लिहीत असतात आणि भारताला भेटही देत असतात. पण तुमचं म्हणण्याप्रमाणे लेखाचा फोकस फक्त बुद्धस्थिती बद्दल आहे. याला हरकत असण्याचं कारण दिसत नाही.

दुस-या मुद्यात तुम्ही आणखी स्पष्ट केलंय कि "आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात." >> ठीक आहे.

वर दोन रूल आपण डिफाईन केले आहेत. नियम मान्य केले आहेत. आपल्याला राजपुत्र सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यात जायचं नाही. किती साधना केली, कशी केली, ज्ञान कुठे झालं हे आपल्याला पहायचं नाही. तर ज्ञान झाल्यानंतरच्या स्थितीवर लक्ष द्यायचं आहे असा अर्थ मी यातून घेतो.

तिसरा नियम देखील सुसंगत आढळला. पण मग त्याला साधना कशी झाली, राजपुत्राने त्याच्या आयुष्यात काय पाहीलं याचं विवेचन देखील तुम्ही हे नियम मोडून स्वतःच करताहात. मग इतरांकडून या नियमांच्या अंमलबजावणीची अपेक्षा कशी करू शकाल ? ज्या क्षणी तुम्ही बुद्धाला ज्ञानाच्या शोधात जावेसे का वाटले याचा उच्चार केला त्याच क्षणी ते तसंच अ‍ॅ़सेप्ट केलं जाईल याची अपेक्षा सोडून द्यायला हवी. इतिहासामधे अमूक एक गोष्ट अशीच झाली यावर एकमत असूच शकत नाही. राजपुत्राला एकाच दिवशी मानवी जीवनाच्या चार अवस्था दिसल्या तोपर्यंत त्याला ते दिसलं नसेल हे लॉजिकली अ‍ॅक्सेप्टेबल वाटत नाही. राजवाड्यातल्या लोकांना या अवस्था टळल्यात का ? यावर कुणाला तरी मत मांडावंसं वाटेलच.

पुढे तुम्ही स्वतःच त्याने अनेक साधना केल्या असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही स्थितीवर न बोलता व्यक्तीने काय केलं आणि तो या स्थितीला कसा पोहोचला यावर भाष्य करताय. म्हणजेच हा नियम तुम्हाला स्वतःलाच अडचणीचा ठरत असावा किंवा तुम्ही तो गंभीरपणे घेतला नसावा.

बरं बुद्ध झाल्यानंतर त्याने सांगितलेल्या विपश्यनेसोबतच त्याच्या तत्वज्ञानालाही ओझरता स्पर्श करून तुम्ही मधाचं पोळं उठवलंच आहे आणि नंतर फक्त विपश्यनेवर लक्ष केंद्रीत करा अशी अपेक्षाही ठेवली आहे.

या परिस्थितीत तुम्हाला हवी ती चर्चा कशी झाली असती हे समजत नाहीये. तुम्हाला विपश्यना या विषयावर लिहायचं होतंत तर कात्री चालवायला हवी होती. विषय नेमका मांडणे हे तसं स्कीलचं काम आहे, लोकांनाही समजून घेता येतं, पण जेवणावळीत सामिष भोजनाच्या मेन्यूचं टेबलही लावायचं आणि लोकांना फक्त व्हेजच खा असं म्हणायचं असं म्हटलं तर लोक ऐकणार आहेत का ?

सामिष भोजनाचं उदाहरण खूपच वाईट दिलं गेलंय माझ्याकडून, पण अनेकांनी हेच सांगूनही लोकांनाच दोष देत असाल तर समजण्यासाठी उपयोग होईल असं वाटतंय.

कमी अधिक लिहीलं गेलं असल्यास उदार मनाने बुद्ध होऊन क्षमा कराल ही अपेक्षा.

>या परिस्थितीत तुम्हाला हवी ती चर्चा कशी झाली असती हे समजत नाहीये

= अध्यात्म अवघड नाही. इट इज द सिंप्लेस्ट पॉसिबल अंडरस्टँडींग.

मला दोन गोष्टीच सांगायच्या आहेत : एक, बुद्ध म्हणतो : सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.

ही इतकी मुक्तीदायी आणि स्वास्थ्यदायी उकल आहे की कुणाही साध्यातल्या साध्या व्यक्तीला वस्तुस्थिती जाणून आनंद होईल.

आणि दोन : तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही. श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्‍या जगाचा, सार्‍या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.
________________________

आता यात वाद घालण्यासारखं, माझ्यावर व्यक्तिगत रोख धरण्यासारखं काय आहे?

मी पुन्हापुन्हा त्या ओळी वाचल्या, हरप्रकारे अर्थाच्या शक्यता आजमावल्या आणि ते लेखन निर्विवाद वाटलं. माझ्या प्रामाणिकपणात कुठेही कसूर नाही.

तुम्ही अत्यंत शांतपणे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचा, तुम्हाला उलगडा होईल.

असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.

संजय,

१०००००% अचुक बोललात.

मुळात जाणीव एकच आहे, बरोबर.

इब्लिस,

१.
>> " अरे हूऽट! कैच्याकै अर्थ लावत जाऊ नका."
>> असे म्हणून नम्रपणे असहमत.

ठीके. आपण तत्त्वज्ञान या शब्दाऐवजी तात्विक मत असा शब्दप्रयोग करूया. तर भारतीय परंपरेनुसार शाब्दिक मत आणि प्रत्यक्ष दर्शन यांत फरक आहे.

२.
>> चार्वाक दर्शनाची "अनुभूती" घ्या जरा

तुम्ही स्वत: या मताचे प्रणेते दिसता. आपण चार्वाकदर्शनाचा साधनामार्ग दाखवून दिलात तर त्याप्रमाणे साधना करून मला अनुभूती घेता येईल. कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
<<<
अगदी अगदी. नक्की करीन.
अ‍ॅडव्हान्स गुरुदक्षिणा म्हणून तुमचा कीबोर्ड आधी इकडे जमा करा. मग सांगतो. Happy

Pages