विविध देशांतल्या, प्रदेशातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा आणि गमतीजमती, किस्से

Submitted by गमभन on 23 August, 2013 - 03:28

सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.

या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!

http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.

आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.

१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील? Happy

२. शिळेवर गाणे वाजवणे हे रशियात अपशकूनी मानतात. (संदर्भः लोकसत्तातला एक लेख) यामुळे काम लांबणीवर पडते असे म्हणतात.
भारतात सरकारी कार्यालयात कोणी शिळ घालत असतो का?

३. इंग्लंडमध्ये काळे, पांढरे ठिपक्यांचे कुत्रे दिसले की शुभ मानतात.

४. लहानपणी आम्ही असे मानायचो की लाल रंगाची मारुती वॅन दिसली की काहीतरी खाऊ मिळणार. शाळेत येताना, जाताना, टाईमपास करतानादेखील खिडकीतून लाल मारुती वॅन दिसतेय का बघत बसायचो.

५. मातीत खेळताना अनेकदा नखांवर ओरखडे यायचे. असे ओरखडे म्हणजे शनीची पीडा समजायचो. जो पर्यंत ते जात नाहीत तो पर्यंत पीडा आहे. मग नखे वाढली की लगेच कापायचो. नखे वाढून आपसूकच ते ओरखडे निघून जायचे.

६. लहानपणी कोणी खाऊ खाताना आपल्याबरोबर असेल आणि आपण त्याला खाऊ न देता एकट्यानेच खाल्ला की पोटात दुखते.
यातील चांगली बाब म्हणजे सोबतच्या मित्रांबरोबर खाऊ शेयर करणे (अगदी मनात नसेल तरीही :))
मी तर कुत्रा, मांजर, मुंग्या यांसाठीसुद्धा कॅडबरीचा तुकडा काढून ठेवल्याचे आठवतेय (आणि आता हसू येतेय)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय, तुम्ही जे म्हटलं आहे किंवा क्लिप मध्ये दाखवले आहे ते मि.बीन च्या एका सिनेमामध्ये पण होते.

<कढई/पातेल्यात उरलेली भाजी असेल तर डायरेक्ट त्यातच खाउ नये. नाहीतर खाणार्याच्या लग्नात पाऊस पडतो>

लग्न झालेल्याने खायला हरकत नाही ना?की मग ....

भानुप्रिया, मस्त, आवडले तुमचे ओल्या लाकडाबद्दलचं पण आईने मारले नाहीये, हि आयडीया आईला माहिती नाही म्हणून बरे पण तोंडाचा पटटा चालू करते उशिरा आल्यावर.

कात्रीत किंवा डाव्या हाताने मीपण पैसे देत नाही कोणाला. शनिवारी केस आणि नखे मात्र कापतो आम्ही, बरेच जण कापत नाहीत.

लहाणपणी मला काकांनी एक सांगीतले होते की अनेक दिवस पाऊस सतत पाऊस पडत असेल तर विना कपड्याचे उभे राहून पावसाला चटका द्यायचा म्हणजे पाऊस थांबेल. इतकेच नाही तर ते ऐकुण शेजारच्या काकूंनी त्यांच्या ३-४ वर्षाच्या मुलाला तसे करायला देखील लावले.

गेल्या महिन्यात सतत काही दिवस पुण्यात पाऊस होता आणि मला अचानक इतक्या वर्षांनंतर ते आठवले आणि मी माझ्या मुलांना सांगीतले. अर्थात तसे केले नाही पण माझ्या लहान मुलाची गंमत करण्याचे मात्र मनात आले होते Happy

. नाहीतर खाणार्याच्या लग्नात पाऊस पडतो>>>>

मी तान्दुळही खाय्चो कच्चे.

माझ्या लग्नात पाउस नाय पडला.

मे महिन्यात लग्न.. तरी मला त्यावेळी आठवलचं आणि वाटलं आता वळवाचा पाउस आला तर???

पण नाय पडला.
असो.

फक्त हा नियम सिद्ध करण्यासाठी अजुन एक लग्न नकोच्चे...
त्यामुळे देवाने माझी ही पापं माफ करावीत..

इंग्लिश लोक १११,२२२,३३३ या सिंगल,डबल्,ट्रिपल नेल्सन स्कोरला वचकून असतात.>>

Triple Nelson म्हणजे फक्त १११. बाकीचे स्कोअर नाहीत.
कारण नेल्सन नावाच्या एका नेव्हीतल्या कॅप्टनला (नक्की हुद्दा माहित नाही) एक डोळा, त्याच्या विरुद्ध बाजूचा हात, आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा पाय नव्ह्ता (म्हणजे डावा डोळा नसेल तर उजवा हात नाही आणि डावा पाय नाही). त्यामुळे माणसाने दुर्दैवी असावे तर किती तर त्याचे हे उदाहरण असे म्हणून हा प्रवाद निर्माण झाला असावा.

मला तर बाई मांजर आडवी गेली नाही तरच चिडचिड होते.....मांजर आडवी गेली तर माझी सगळी काम एक तर झटकन होतात तरी किंवा किचकट कामे असतील तर सकारात्मक रित्या मार्गी तरी लागतात...... नवरा मला वेड्यत काढतो पण अनेकदा अनुभव घेतलाय..... Happy

कधी मांजर दिसली समोर तर मी ती आडवी जाण्याची वाट बघत काही सेकंद थांबते...... Proud पण ती मेली आडवी गेली नाही की मला कसंसंच होतं. Lol दिसली पण नाही गेली आडवी तर हवी असलेली भाजी किंवा फळ हमखास बाजारातून गायब असते Uhoh

शिबा, असं करा आता, एक मांजर पाळाच तुम्ही.
सकाळी कामासाठी किंवा भाजी आणायला निघालात की तिला आडवे जाऊद्यात. तिला तसे ट्रेनिंग द्या.
शक्य आहे तुम्हाला त्या दिवशी कांदे स्वस्त मिळतील. Lol

आमच्या गावाकडे जगताप आडनावांची लोक दुमजली घर बांधत नाहीत.
दुमजली घरं जगतापांना धार्जिण नाहीत असा समज आहे.

मामाचं गाव मोरगावपासुन ६ किमी अंतरावर आहे, पण घरी गणपती बसवत नाहीत.

जगताप आडनावांची लोक दुमजली घर बांधत नाहीत.>>>

माझ्या सासरवाडीला (जिल्हा उस्मानाबाद) एक दर्गा आहे.
त्या दर्ग्यापेक्षा उंच घर बांधायच नाही म्हणुन गावात एक-दोन वगळता सगळी घर एकमजलीच आहेत.
लाभत नाही अशी समजुत आहे.

हल्ली माझ्या मुलीचा असा समाज आहे कि पिवळ्या रंगाची नानो दिसली आणि जर पटकन एक दोन तीन असे म्हटले तर गोड खायला मिळते.

आम्ही लहान असताना साळुंखी पक्षी एकटा दिसला कि मार मिळणार अशी समजुत होती. मग एखादी साळुंखी दिसली कि स्वत:च गालात मारून घ्यायचो Proud

आणि जोडी दिसली कि गोड खायला मिळणार अशी समजुत.

अनेकदा नदीवरुन गाडी गेली की लोक नाणी खाली नदीत/खाडीत टाकतात. लहानपणी विरार/वसई कडे जाताना आम्हीपण भाईंदरच्या खाडीत पैसे टाकत असू. Happy

रोममध्ये एक कारंजे आहे जिथे पैसे टाकल्याने रोममध्ये परत यायला होते असे लोक मानतात.

आग्रा किल्यात ज्या ठिकाणी शहाजहान ला कैद केल होत त्या ठिकाणी एक काळी शिळा आहे.
ह्या ठिकाणावरुन ताज महाल छान दिसतो.
तर असे म्हणतात की, तर ह्या शिळेवर बसलात तर तुम्ही नक्की परत ह्या ठिकाणी येता. (गाईडने सांगितलेले).

मागच्या (बर्‍याच वर्षापुर्वी) वेळी गेलो तेव्हा त्यावर बसलो होतो.
तर आता मागच्या महीन्यात जावुन आलो. तर ह्यावेळी त्या शिळेभोवती फेन्स घालुन बंद केली होती. त्यामुळे कोणालाच त्यावर बसायला मिळाले नाही.

हि शिळा.
http://www.flickr.com/photos/29384180@N04/3513999493/
http://www.flickr.com/photos/31086766@N04/5132444490/

आता आग्राकिल्याचा बराचसा भाग बंद करुन ठेवला आहे. जो मी मागच्या ट्रिप मधे बघितला होता.

एक साळुंकी दिसली तर वाईट असते हे बालपणी मनावर इतके ठसलंय कि अजूनही एक साळुंकी दिसली तर आजुबाजूला दुसरी आहेका हे मी बघत असते. दोनच्या वर कितीही दिसल्या तरी चांगले असते असे म्हणतात म्हणून आम्ही दोन साळुंक्या राम-राम, असे जितक्या दिसतील त्यांना राम-राम म्हणायचो, एक इंग्रजी गाणे आहे साळुंक्यांवर, कोणाला माहिती आहे का?

पापणीचा केस मिळाला तर हातावर घेऊन (तळहात उलटा किंवा सुलटा धरून) डोळे मिटून इच्छा प्रकट केली तर पूर्ण होते असे म्हणतात.

तुटता तारा बघितल्यावरदेखील इच्छा पूर्ण होते असे म्हणतात(कुछ कुछ होता है). पण अनेक लोक ते अशुभ असते असे मानतात.

दुसर्‍या कोणाला आपला रुमाल वापरायला दिल्याने नात्यात वितुष्ट येते.
मी लहानपणी खुप पाळायचे.. मोठे झाल्यावर अंधश्रद्धा म्हणुन बंद केले..

पण कॉलेजमध्ये एक मैत्रीण होती.. घाणेरडी कधीच रुमाल आणायची नाही..
मग कॉलेज कँटीनमध्ये काहीही खाऊन हात धुतले की ते तेलकट हात पुसायला माझा रुमाल जबरदस्तीने घ्यायची..

मग स्वतःचा रुमालदेखील न बाळगणार्‍या त्या मुलीशी मी कायमचे संबंध तोडले..

आजही माझा रुमाल कोणीही घेतला (नवरा सोडुन) तर मी कसलाही मागचा-पुढचा विचार न करता त्या माणसाशी संबंध तोडुन टाकते.. Sad

हो गमभन, तुटत्या ता-याबद्दल हे दोन्ही प्रवाद ऐकलेले आहेत.

पियुपरी रुमाल भेट देऊ नये असेपण म्हणतात, तसे केल्याने भांडण होते.

कुठलेही शस्त्र हातात डायरेक्ट दयायचे नाही असे म्हणतात त्याने शत्रुत्व येते, त्यामुळे आमचे शेजारी कोयता मागायला आलेकी मी हातात न देता खाली ठेवते, आमचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहावे म्हणून.

आणि जीभ चिकटायला एक सेकंद ही खूप जास्त होतो. हे का होते >>>>
यामागे अत्यंत सोपी गोष्ट आहे, - ४ च्या खूप खाली तापमान असलेल्या आणि वर बर्फ न जमलेल्या कुठल्याही धातूच्या सरफेसवर हे घडू शकतं, कारण इतक्या कमी तापमानाला जिभेवरल्या पाण्याचे (मॉइश्चरचे म्हणू ) तत्क्षणी बर्फ होते आणि हे बर्फ जिभेवरील पोकळीत आणि धातूच्या सरफेसवर एकत्रीत जमून त्याला एकसंघ करते त्यामुळे जिभ चिकटते. फक्त जिभच नव्हे तर ओला हातही अश्या सरफेसवर चिकटतो. यासाठी सोपा घरगुती प्रयोगही करून पहाता येऊ शकतो. नुकत्याच डिफ्रॉस्ट झालेल्या फ्रीज च्या ( तो चालू असताना ) फ्रीजरमधे बर्फाचा थर जमायच्या आत जर ओलं बोट लावलं तर ते चिकटतं ( वर एक चटकाही बसतो Wink )
याचा एक मजेदार अनुभव आमच्याकडे कोल्ड स्टोअरेज मधे येतो.. या -२० च्या स्टोअरेजमधे चुकूनही कुणी ओली चप्पल ( स्लिपर असेल तर ती तिथेच विसरायची तयारी हवी Happy ) घालून गेलं तर चप्पल आणि पर्यायानं माणूसही जमिनीला चिकटतो Happy

१) रविवारी दुधी भोपळा पाहु/खाउ नये
२)रात्री केस वि.न्चरु नये
३)बुधवारी च्प्पल, शनिवारी नविन कपडे घेवु नये
४) सोमवारी/अमावस्या/ नवरात्रिला/गणपती बसताना/ प्रवासाला निघायच्या दिवशी बायका.न्नी केस धुवु नये
५)शुभ कामाला जाताना पहिले उजवा पाय बाहेर टाकावा
६)रात्री कापसाला हात लावु नये
अजुन अनेक आहेत ज्याच लॉजिकच कळत नाही.

याचं कारण म्हणे कुणी 'गेल्यावर' ३ र्या दिवशी 'सावडायला' जातांना स्मशानात नैवेद्य ठेवावा लागतो, त्यात ३ पोळ्या देतात म्हणुन
रिकाम्या पानात सर्वात आधी पांढरा भात वाढू नये कारण तसे कुणी मेल्यानंतर करायच्या विधीत तसे करतात म्हणे. आधी चिमूटभर मीठ तरी वाढावे.

कच्चे तांदूळ खाल्ले तर पोट दुखेल! लग्नात पाऊस पडला तर ज्यांचे लग्न होते त्यांना ते अत्यंत शुभ समजले जाते. अश्या एका लग्नाला मी गेलो होतो, लग्न बागेत उघड्यावर होते, सर्व लोक आनंदाने भिजले. मला मात्र जाम सर्दी होऊन, माझे एव्हढे मोठे नाक गळून पडते की काय अशी भीति वाटत होती दोन दिवस.

तसेच कात्री, सुरी, चाकू इ. गोष्टी हातात ने देता खाली ठेवाव्यात, नाहीतर भांडणे होतात. अर्थात् बहुधा मागून पाठीत सुरा खुपसणारे लोक आसपास असतील तर काही फरक पडत नाही.

माझ्या माहितीतील काही -
उजव्या तळहाताला खाज सुटली तर पैसे मिळतात, डाव्या तळहाताला खाज सुटली तर पैसे खर्च होतात.
काही खाताना जीभ चावली तर गोड खायला मिळते.
मुलींनी उंबरठ्यावर बसु नये. माझी आजी तर काठी घेउन मारायला यायची. कारण म्हणे तुझं देणं (पक्षी हुंडा) द्यायचाच आहे. आता पासुनच उंबरठ्यावर बसुन तगादा लावु नकोस. Sad
शनिवारी नखे, केस कापु नयेत.
शनिवारी लोणी कढवू नये.
उजव्या डोळ्याची खालची पापणी लवत असेल तर काहीतरी कारणामुळे खुप रडु येते.
पाल अंगावर पडली की अपशकुन होतो.
बोलणं चालु असताना फोन ची रिंग वाजली तर समोरचा / जो कोणी काही सांगत असेल ते सत्य आहे म्हणे.

बोलणं चालु असताना फोन ची रिंग वाजली तर समोरचा / जो कोणी काही सांगत असेल ते सत्य आहे म्हणे.
>>
हो, अगदी घड्याळाचे टोल जरी पडले तरी जे काही बोलणे चालले आहे ते सत्य होते म्हणे.

रविवारी दही घुसळुन ताक करु नये - याला आदित्यराणुबाईच्या व्रताचा दाखला आहे म्हणे Uhoh
सोमवारी लोणी कढवु नये, संध्याकाळी ताक करु नये आणि लोणीही कढवु नये.
सोमवारी, बुधवारी, अमावस्येला न्हाऊ (केस धुवु) नये म्हणे....
शनिवारी पिठल, खिचडी, थालिपीठ करु नये....पिठल तर नाहीच करु.
वरील सगळ्या गोष्टीं आमच्याकडेही होत्याच.

कोणताही पदार्थ ताटात वाढताना एकदा किंवा तीनवेळा वाढू नये म्हणे.
एक डाव भात घातला तर अजून एकदा एखादे शित तर नक्की घालावे.

शिवाय नुसती पोळी किंवा नुसती भाकरी देऊ नये कुणाला त्यात चिमूटभर मीठ्/तेल तिखट/ चटणी असे घालून द्यावे म्हणे. कोल्हापूरात तर हे सर्रास पाळतात.

माझी आई मधल्या बोटात अंगठी घालू नये असं म्हणायची.
वरिल कशाचीच कारणे माहित नाहीत.

Pages