'गोष्टी सार्‍याजणींच्या' : 'मिळून सार्‍याजणी'तल्या निवडक कथा - मेनका प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 21 August, 2013 - 12:54

'मिळून सार्‍याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. 'मिळून सार्‍याजणी' हे जगण्याशी, प्रामुख्यानं स्त्रीच्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलं गेलेलं आणि म्हणूनच अनुभवांना प्राधान्यानं स्थान देणारं मासिक आहे. स्त्रीप्रश्नांबाबत बोलताना पुरुषांनाही सामावून घेत 'जगणं' जोडून घ्यायचा प्रयत्न या मासिकानं सतत केला आहे. जगण्याचा अनुभव देणार्‍या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्‍याजणींच्या'.

गेल्या चोवीस वर्षांत 'मिळून सार्‍याजणी'त प्रसिद्ध झालेल्या कथांपैकी या निवडक पंधरा कथा स्त्रीविश्वाच्या वेगवेगळ्या स्तरांवरचे अनुभव आणि आनुषंगिक संघर्ष दर्शवणार्‍या आहेत. बाईच्या जगण्याचे कंगोरे या कथांमधून दिसतातच, पण प्रश्न उपस्थित करणार्‍या, प्रस्थापित व्यवस्थेला स्वतःच्या सामर्थ्यानं वाकवणार्‍या स्त्रियाही या कथांमधून भेटतात. काळाचा आलेख आपल्या शक्तीनिशी बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या या सार्‍याजणी वाचकांच्या मनात घर करून राहतात.

दहा लेखिका आणि पाच लेखक यांनी आपल्या लेखणीतून बोलत्या केलेल्या स्त्रियांच्या या कथा, वाचकांशी थेट संवाद साधतात हे त्यांचं मोठंच वैशिष्ट्य आहे.

मेनका प्रकाशनानं 'गोष्टी सार्‍याजणींच्या' हा संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहाच्या सुरुवातीला 'मिळून सार्‍याजणी'च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी संग्रह प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे ज्येष्ठ लेखिका-कवयित्री नीरजा यांची.

'गोष्टी सार्‍याजणींच्या' या 'मिळून सार्‍याजणी' या मासिकातील निवडक कथांच्या संग्रहातील सुरुवातीची भूमिका व प्रस्तावना -

Goshti_saryajaninchya_front-cover_ISBN-978-93-80572-65-9.jpg

'मिळून सार्‍याजणी' म्हणजे

नमस्कार!

'मिळून सार्‍याजणी' मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षारंभ विशेषांकाच्या सोबत 'गोष्टी सार्‍याजणींच्या' हा कथासंग्रह वाचकांच्या हाती सोपवताना आनंद होतो आहे. 'मिळून सार्‍याजणी' हे निव्वळ मासिक नाही, तर सहकार, बांधिलकी आणि मैत्रभाव जपणारी ती एक जगण्याची रीत आहे. भाषेचं संस्कृतीशी, परंपरेशी जवळचं नातं असतं. मराठीत 'सारेजण' म्हटलं, की त्यात 'सार्‍याजणी' आल्याच हे गृहीत आहे. पण उलट मात्र नाही. हा शब्दातला लिंगविशिष्ट भेदाभेद पार करण्यासाठी मासिकाच्या नावात 'मिळून सार्‍याजणी आणि प्रत्यक्षात सारेजणांना निमंत्रण आणि मन:पूर्वक स्वागतही आहे. मुखपृष्ठावरची 'स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी...' ही ओळ याची साक्ष आहे.

ऑगस्ट १९८९मध्ये 'मिळून सार्‍याजणी'चा पहिला अंक प्रकाशित झाला. त्या काळात स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्री-पुरुष समतेची चळवळ या शब्दांनासुद्धा अनेकजण बिचकत. त्याबाबत भीती आणि नकोसेपण अनेकांच्या मनात असे. या चळवळीतली एक बिनीची कार्यकर्ती विद्या बाळ यांच्या नावाबाबतही याच भावना लोकमानसात असल्याचा अनुभव येत असे. म्हणून त्यांनी सुरू केलेल्या 'मिळून सार्‍याजणी' या मासिकात स्त्रीमुक्ती, चळवळ हे शब्द किंवा त्यामागची संकल्पना आणि सिद्धांत यांची भाषा कमीत कमी उच्चारावी, पण त्याचा गाभा मात्र जगण्याच्या पातळीवर पोचवावा असं धोरण होतं. स्त्रीनं स्वत:चं स्वत्व ओळखावं, आपला आत्मसन्मान जागा ठेवावा आणि जोपासावा असा सांगावा देणारं साहित्य, अनुभवाधिष्ठित कथा, कविता, लेख, मुलाखती या स्वरूपात या मासिकातून प्रकाशित होत होतं आणि आहे. चळवळ ही केवळ कार्यकर्त्यांपुरती मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोचायला हवी असेल, तर आधी ज्यांवरून सिद्धांत मांडले जातात ते घराघरांतले अनुभव समोर यावे लागतात. त्यांचा उच्चार आणि लेखनातून उद्गार व्हावा लागतो, हा विचार त्यामागे होता. मासिकातले विचार वाचकांनी वाचावेत यासाठी तो अंक उचलला जावा, या हेतूनं मुखपृष्ठ आकर्षक, सुंदर आणि अर्थपूर्ण करण्यावर आम्ही भर दिला.

'पर्सनल इज पोलिटिकल' (जे जे व्यक्तिगत ते ते राजकीयच!) या स्त्री-चळवळीच्या घोषणेचा खरा अर्थ सर्वदूर पसरलेल्या कुटुंबातल्या स्त्रियांपर्यंत पोचण्यासाठी 'मिळून सार्‍याजणी' मासिकामधल्या साहित्याचं योगदान खूप मोलाचं आहे. आपला प्रश्‍न केवळ मी, माझं कुटुंब, माझी परिस्थिती यातून जन्मलेला नाही, समाजात असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये याची मुळं गुंतलेली आहेत. थोड्याफार फरकानं बहुसंख्य घरांत ही मुळं रुजली आहेत. त्यामुळे तपशील वेगळा, रूप वेगळं असलं, तरी अनेकदा कौटुंबिक प्रश्‍नांची जात एकच असते. भारतीय समाजव्यवस्थेत जातीच्या वास्तवात जी गुलामी, दुय्यमता, जे नाकारलेपण दलितांच्या वाट्याला येतं, तेच कुटुंबव्यवस्थेत स्त्रियांच्या अनुभवाला येतं. याची जाणीव व्यापक विषमतेची समज वाढवायला हातभार लावू शकते, असं 'सार्‍याजणी'ला वाटतं.

स्त्री-प्रश्‍नांच्या वाळवटांत सर्वदूर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, ढोबळ किंवा तरल अशा विविध रूपांत असणार्‍या घरांपासून, गावांपासून, समाजापर्यंत सर्वत्र भरून राहिलेल्या, स्त्रीला अडवणार्‍या, तिच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या, तिच्या आत्मसन्मानाला- प्रतिष्ठेला छिलणार्‍या अन्याय्य घटना-घडामोडींना शब्दरूपात आणण्याचं काम 'सार्‍याजणी'नं अथकपणे केलं. स्त्रियांसाठी हे मासिक 'ओअसिस' (वाळवंटातली हिरवळ) बनलं. मध्यमवर्गीय कुटुंबात स्त्रीवर फारसे अन्याय-अत्याचार होत नाहीत, ते झोपडवस्तीत-ग्रामीण भागात होतात हे गृहीतक तपासण्याचं काम 'सार्‍याजणी'नं केलं, करत आहे. पारंपरिक सामाजिक-सांस्कृतिक, मध्यमवर्गीय चौकट एकदम मोडून न टाकता हळूहळू ती वाकवत-वळवत सैल करण्याचं काम 'सार्‍याजणी'नं महत्त्वाचं मानलं. यातून पुरुषप्रधान व्यवस्थेनं हजारो वर्षं केलेले, परंतु आज अर्थहीन, पोकळ, गैरलागू ठरणारे संस्कार गळून पडायला मदत झाली. मात्र त्यामुळे वाचकांच्या मनात अपेक्षित असलेले अनेक प्रश्‍न उगवून एक प्रकारची अस्थिरता-अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. हे लक्षात घेऊन पूर्वीच्या आत्मतुष्टतेपेक्षा ही अस्थिरता-अस्वस्थता अधिक सर्जनशील कशी आहे हे सांगत 'सार्‍याजणी'नं अनेकांना दिलासा दिला. नवा विचार ऐकल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणावासा वाटला तरी आजच्या समाजव्यवस्थेत स्त्रीला त्यात खूप अडचणी, अडथळे असतात. या सगळ्यांतून वाट काढण्यासाठी 'सार्‍याजणी'तले लेख, मुलाखती स्त्रियांना बळ देतात, असं त्या आवर्जून आम्हांला कळवतात, तेव्हा आमची उमेद वाढते.

'मिळून सार्‍याजणी' मासिक हे साहित्यिकपेक्षा सामाजिक जास्त आहे. आपल्या भोवताली स्त्रिया, दलित, कष्टकरी इ. अनेक वंचित घटकांवर होणारे अन्याय-अत्याचार बघून आपलं मन निराशेनं घेरलं जातं. अशावेळी सामूहिक कृती आणि संकल्प करण्यासाठी आपल्या मनाची, चैतन्याची आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेची 'बॅटरी चार्ज' करण्यासाठी 'सार्‍याजणी'चा वार्षिक स्नेहमेळावा हातभार लावत असतो. समाज स्वास्थ्यपूर्ण व निकोप होण्यासाठी स्वातंत्र्य, समता व मैत्रभावाचा पाया असलेल्या परिवर्तनाची नितांत गरज आहे. या 'सार्‍याजणी' एकांड्या शिलेदाराप्रमाणे काम करत नाहीत, तर आम्ही एकत्र, आमची एकजूट असं म्हणत अनेक संस्था-संघटनाचं जाळं विणत परिवर्तनाची वाट सुकर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये स्त्री-प्रश्‍न सोडवण्यात सक्रिय असणारी 'नारी समता मंच', मैत्रभाव जपणारी 'सखी सार्‍याजणी', स्त्री-पुरुष सहजीवन सकस-अर्थपूर्ण होण्यासाठी काम करणारं 'साथ साथ विवाह अभ्यास मंडळ', वाचनसंस्कृती जोपासत ज्ञानाचं भांडार खुलं करणारं 'अक्षरस्पर्श ग्रंथालय' आणि स्त्री-पुरुष समतेसाठी पूरक काम करणारा, विशेषत: पुरुषांच्या जाणीव जागृतीचं महत्वाचं काम करणारा 'पुरुष उवाच गट' यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. याबरोबरीनं लेखक, वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, गावोगावचे प्रतिनिधी, कलावंत, सहकारी आणि सुजाण नागरिकांचा एक 'कारवाँ बनता गया हा सुखद अनुभव 'सार्‍याजणीं'ना विद्याताईंच्या प्रसन्न, कणखर आणि समंजस नेतृत्वामुळे घेता आला हे कृतज्ञभावानं सांगावंसं वाटतं.

समाजजीवन प्रवाही ठेवण्याचं काम साहित्य करतं. अनेकविध अनुभवांनी वाचकांच्या मनाच्या तारा झंकारवत त्यांचं जगणं समृद्ध करतं, वाचकांनी स्वत:च्या अंत:करणातला अंतर्नादही ऐकावा असं आवाहन 'सार्‍याजणी' साहित्यामधून असतं. नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक ही मुखपृष्ठावरची ओळ म्हणूनच अर्थपूर्ण होती. याबरोबरीनं समाजात सुरू असलेल्या स्त्री-चळवळीसहित अंधश्रद्धा निर्मूलन, अण्वस्त्रविरोध, जातिअंत, पर्यावरणरक्षण आदी चळवळींमागची वैचारिक भूमिका, त्यांच्यापुढे उभ्या असलेल्या समस्या-अडचणी आणि त्या चळवळींना पाठिंबा देणारा विचार वाचकांपुढे सातत्यानं मांडला जातो. वाचकांनी विचारशील आणि विवेकी व्हावं यासाठीची 'सार्‍याजणी'ची ही धडपड वाचकांच्याही मनाला स्पर्शून जाते, असा आमचा अनुभव आहे.

स्त्री-प्रश्‍न म्हणजे केवळ स्त्रियांचा प्रश्‍न नाही, तर समाजातल्या लिंग भेदभावाचा प्रश्‍न! या भेदभावाचं स्वरूप, त्याचा इतिहास आजही आपल्या सर्व व्यवहारात कसा दिसतो-जाणवतो याचं बहुरंगी, बहुआयामी रोचक विश्‍लेषण असणार्‍या 'सार्‍याजणी'मधल्या निवडक लेखांचं 'स्त्रीमीती' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यातल्या वैचारिक लेखांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

ललित साहित्य मनाचा हळवा-हळुवार कोपरा जपतं. कथांमधली उत्कट भावना, उत्स्फूर्तता, तरल संवेदना, जीवनाच्या गाभ्याला स्पर्शणारे अनुभव यांमुळे कथा जास्त प्रभावीपणे वाचकांच्या मनाला भिडते आणि त्यातला विचार खोलवर रुजतो. आपली लेखणी व्यवस्था परिवर्तनाशी बांधील असावी असा विचार करणार्‍या प्रतिभावंत लेखक दिनानाथ मनोहर, प्रज्ञा दया पवार, लता प्र.म, नीरजा, वंदना भागवत आदींच्या कथा अनमोल वाटतात. बाईभोवती मौनाचे कडेकोट पहारे असतात. त्या मौनाला छेद देणारे बाईचे बोलणारे डोळे, देहबोली- अंगांगानं ती बोलत असते, पण ते ऐकण्याची संवेदना आपल्याकडे हवी. ही संवेदना जागी करणार्‍या कथा हे 'सार्‍याजणी'मधल्या कथांचं वैशिष्ट्य आहे. अशाच पंधरा कथांचा हा संग्रह आहे. वाचकांना तो भावेल असा विश्‍वास वाटतो.

गेल्या चोवीस वर्षांच्या दोनशे चौसष्ट अंकांतून या पंधरा कथा शोधून काढण्याचं अतिशय अवघड आणि जिकिरीचं काम पुस्तकाचे सहसंपादक उत्पल व. बा. आणि मानसी घाणेकर यांनी अतिशय चोखंदळपणे केलं. कथा निवडीचे निकष सैलसर ठेवले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे पूर्वी कथासंग्रहात प्रकाशित झालेल्या प्रथितयश लेखक गौरी देशंपाडे, आशा बगे, सानिया आदींच्या उत्कृष्ट कथा या कथासंग्रहात समाविष्ट न करता आल्यामुळे निवडीला मोठीच मर्यादा आली, याची आम्हांला जाणीव आहे. पुढील कथासंग्रहात ही अडचण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

'सार्‍याजणी'ची सखी आणि संवेदनशील कवयित्री आणि लेखिका नीरजा हिनं वेळात वेळ काढून कथासंग्रहाला प्रस्तावना लिहून दिली, त्याबद्दल तिला मनापासून धन्यवाद देते. कथा छापण्याला अनुमती दिल्याबद्दल सर्व लेखकांचे मन:पूर्वक आभार! या कथासंग्रहामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद आपल्याला मिळवून देण्याचं सर्व श्रेय 'मेनका प्रकाशना'च्या सुजाता देशमुखांचं आहे. सुजाता 'सार्‍याजणी'तलीच एक असल्यामुळे तिला आभार मानलेले आवडणार नाहीत, पण मलाही 'मेनका प्रकाशना'च्या आनंद आगाशे, सुजाता देशमुख आणि सहकार्‍यांविषयीचा कृतज्ञताभाव व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.

- डॉ. गीताली वि. मं.
(संपादक, 'मिळून सार्‍याजणी'

***

प्रस्तावना

'मिळून सार्‍याजणी' हे मासिक सुरू झालं ते विशिष्ट अशा भूमिकेतून. आपल्या समाजव्यवस्थेतल्या पुरुषप्रधान संस्कृतीत वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या तर्‍हेनं बाईचं शोषण होतं आहे याची कल्पनाही नसणार्‍या स्त्रियांना या शोषणाची जाणीव करून देण्याकरता आणि त्याचबरोबर स्वतःशीही बोलता येतं, स्वतःला शोधून पाहता येतं हे माहीत नसलेल्या बाईला स्वतःशी संवाद करता यावा म्हणून विद्या बाळ यांनी हे मासिक सुरू केलं. त्या वेळी त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची त्यांना कितपत कल्पना होती माहीत नाही. पण हे मासिक स्त्रियांना आपल्या आतल्या आवाजाशी जोडून देऊ लागलं. गेली अनेक वर्षं या मासिकाची मी वाचक आहे. साहित्यिकदृष्ट्या 'मिळून सार्‍याजणी'ची तुलना इतर वाङ्मयीन मासिकांशी करता येणार नाही. कारण मासिकातल्या लेखनाचा जो वाङ्मयीन दर्जा 'सत्यकथा', 'आलोचना', 'युगवाणी', 'नव-अनुष्टुभ'पासून 'नवाक्षर दर्शन', 'अभिधानंतर', 'खेळ', 'मुक्त शब्द' यांसारख्या मासिकांनी जपला तो जपण्याचा प्रयत्न या मासिकानं केला असता, तर त्यांना तळागळातल्या किंवा वाङ्मयीन जाण नसलेल्या सामान्य स्त्रीपर्यंत पोचता आलं नसतं. त्यामुळेच चोखंदळ वाचकांबरोबरच थोडंफार शिक्षण झालेल्या, वाचनाची आवड असलेल्या, आणि स्वतःच्या जगण्याचा थोडाफार विचार करण्याची इच्छा असलेल्या अगदी गावपातळीवरच्या, तळागाळातल्या, किंवा अगदी रिकामा वेळ कसा भरून काढायचा हा प्रश्‍न पडलेल्या शहरी तसंच ग्रामीण मध्यमवर्गीय बाईपर्यंत हे मासिक पोचू शकलं.

आपल्या वाचकांना त्यांच्या जगण्याचा विचार करायला लावणारे सरळ, साध्या शब्दांत लिहिलेले लेख, कविता, कथा हे मासिक देत राहिलं. पण त्याबरोबरच त्यांची वैचारिक पातळी वाढवण्याचं कामही या मासिकानं हळूहळू करायला सुरुवात केली. प्रथम केवळ स्त्रियांना जागृत करण्याचं काम करणार्‍या 'सार्‍याजणी'नं स्त्री-पुरुष दोघांनाही एकमेकांशी संवाद साधण्याचं कसब शिकवलं. त्यासाठी दर्जेदार लेखन करणार्‍या लेखकांकडून मुद्दाम लिहून घेतलं आणि ते लेखन वाचकांसमोर आणलं. त्यांना आपलं मर्यादित अनुभवांनी व्यापलेलं जग ओलांडून बाहेरच्या व्यापक जगाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. आजचं प्रखर वास्तव त्यांच्या समोर ठेवलंच, पण त्याचबरोबर मनाच्या डोहात डोकावायला शिकवलं. संस्कृती आणि समाजाच्या आरशासमोर उभं करून या आरशात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहायला शिकवलं. या प्रतिबिंबाचा बुरसटलेला चेहरा समोर आणला आणि तो स्वच्छ धुऊन स्वतःच्या मूळ चेहर्‍याकडे पाहायला भाग पाडलं. आणि यासाठी चांगल्या, दर्जेदार कथा, कविता आणि लेख त्यांनी वाचकांसमोर ठेवले. या अशा 'सार्‍याजणी'त प्रकाशित झालेल्या निवडक कथांचं पुस्तक वाचकांसमोर येतं आहे. यात आजच्या काही महत्त्वाच्या लेखक-लेखिकांच्या पंधरा कथा आहेत.

दहा लेखिका आणि केवळ पाच लेखक असले, तरी जवळजवळ सर्व कथा स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या प्रश्‍नांचा, तिच्या वेगवेगळ्या पातळीवर होणार्‍या शोषणाचा विचार करतात. एवढंच नाही, तर आज आत्मशोधाचा विचार करणारी स्त्री या सर्व कथांतून सहज उभी राहते.

माणसाचं जगणं कवेत घेण्यासाठी कादंबरीच्या तुलनेनं कथा हा साहित्यप्रकार तोकडा पडतो, असं विधान केलं गेलं असलं, तरी कवितेनंतर कथाच मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. छोट्या छोट्या प्रसंगांतून मानवी मनाचा आविष्कार करणार्‍या, त्यातले ताण, गुंते दाखवणार्‍या, नातेसंबंधातली तरलता दाखवणार्‍या आणि जमलंच तर सामाजिक चौकटींचा माणसाच्या जगण्यावर होणारा परिणाम दाखवणार्‍या कथा आज मोठ्या प्रमाणावर लिहिल्या जात आहेत. मराठी कथेचा गेल्या काही वर्षांचा काळ पाहता आशय आणि रूपबंधाच्या दृष्टीनं अनेक प्रयोग झालेले आपल्याला दिसतात. दलित जीवनाबरोबरच ग्रामीण भावविश्व दाखवणारी कथा जितक्या जोमानं आज लिहिली जाते आहे, तेवढ्याच जोमानं मुंबईसारख्या महानगरात राहणार्‍या, आयुष्यालाच बकालपण आलेल्या, संपामुळे कणा मोडलेल्या कामगारवर्गाचं भावविश्व रेखाटणारी कथाही आज लिहिली जाते आहे. सदानंद देशमुख, भारत काळे, आसाराम लोमटे यांच्याबरोबरीनं जयंत पवार, जी. के. ऐनापुरे, समर खडस यांसारखे कथाकार महानगरातल्या सामान्य माणसाची फरफट, त्याच्या आयुष्यातलं क्रौर्य, परिस्थितीनं लादलेलं अधोगतांचं जिणं अशा अनेक गोष्टी आज आपल्यासमोर आणत आहेत. गेली पंधरा-वीस वर्षं विभावरी शिरूरकर, कमल देसाई, गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया यांसारख्या स्त्री-कथाकारांचा वारसा पुढे नेण्याचं काम मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर, नीलिमा बोरवणकर, प्रतिमा जोशी, प्रज्ञा दया पवार यांसारख्या कथाकार करत आहेत. स्त्रीच्या वेदनेचा प्रवास दाखवतानाच तिच्या स्वत्वशोधाची कथा त्या लिहिताहेत. या पार्श्वभूमीवर या संग्रहातल्या लेखकांच्या कथेकडे पाहता येईल.

यातले बरेचसे लेखक-लेखिका आजच्या काळात लिहिणारे आहेत. काही नव्या दमाचे कथाकार यांत आहेतच, पण त्याचबरोबर कथा हा साहित्यप्रकार लीलया हाताळणारे दिनानाथ मनोहर, मधुकर धर्मापुरीकर, श्रीनिवास भणगे यांसारखे लेखकही आहेत. अलीकडे नव्यानं कथा लिहू लागलेल्या आणि आपल्या लेखनसामर्थ्यानं वाचकांचं लक्ष वेधून घेतलेल्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार, तसंच वंदना भागवत, भारत काळे यांसारखे लेखक-लेखिकाही आहेत.

स्त्री-पुरुष नातं, त्यातले ताण, गुंते, त्या नात्यातलं सत्ताकारण; स्त्री-पुरुष मैत्री, त्यातले भावनिक ताण, त्यातल्या हळुवार जागा अशा स्त्रीनिष्ठ अनुभवांबरोबरच मुलांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणारे आणि त्यांचं आयुष्यच हिरावून घेणारे वडील, लग्न आणि लग्नानंतरची मैत्री सांभाळताना तारेवरची कसरत करणार्‍या स्त्रिया, लेखनाचा बाजार मांडणारे लेखक, स्त्रीशिक्षण, पर्यावरणाचे तसंच वृद्धांचे प्रश्‍न, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तींचं भांडवल करून पैसे मिळवण्याची लोकांची मानसिकता आणि त्यावर उभे राहिलेले नातेसंबंध इत्यादी विषयांना या कथा भिडतात. विषयांत वैविध्य असलं, तरी सारेच विषय समर्थपणे पेललेले आहेत असं मात्र होत नाही. अर्थात, काही कथा कच्च्या वाटतात हे मान्य करूनही 'बम्पकिन ब्राईड', 'आईच्या नावानं', 'दोघी', '...आणि थोडी ओली पाने' यांसारख्या कथा या संग्रहातल्या महत्त्वाच्या विषयांना भिडणार्‍या असल्याचं लक्षात येतं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कथांतल्या स्त्रिया पारंपरिक स्त्रिया नाहीत. सोसणार्‍या, भोगणार्‍या तर अजिबात नाहीत. आपल्यापेक्षा कमी शिक्षण आणि समज असलेल्या नवर्‍याच्या छळाला कंटाळून मुलीला पाठीशी बांधून घर सोडणारी आणि शिकायची हौस पूर्ण करून घेणारी 'तंबू आणि वळण' या कथेतली कमल खरंतर गावाकडची मुलगी आहे. पण एका मर्यादेपर्यंत सारा कोंडमारा सहन करणारी ही कमल एका निर्णायक क्षणी स्वतःच्या शोध घेण्यासाठी सारं सोडून निघून जाते. 'बम्पकिन ब्राईड' या कथेतली नायिका तर कल्पनेत जगणारी. आपल्या आवडत्या लेखकानं आपल्यालाशी लग्न करायचं ठरवल्यावर हुरळून जाणारी. पण ज्या क्षणी या लेखकानं त्याच्या लेखनासाठी आपल्याला वापरलं आहे हे तिच्या लक्षात येतं, त्या क्षणी सौभाग्याच्या सार्‍या कल्पनांना तिलांजली देऊन त्याच्या पद्धतीनंच त्याचा काटा काढताना दिसते. या कथेत लेखकानं प्रथमपुरुषी निवेदन वापरलं आहे. निवेदिकेचं शिक्षण आणि तिची भाषा यांचा मेळ बसत नाही असं वाटत असलं, तरी तिच्या तोंडी घातलेली भाषा आणि निवेदनाचा सारा सूरच ती या निर्णयाला येण्याची क्षमता दाखवतो.

'मॅन इन थ्री पीस' या कथेत जिवंत माणसांना आपल्या खेळासाठी वापरणार्‍या जादूगाराला भेटल्यावर स्वतःच्या जगण्याचा विचार करणार्‍या स्त्रीची साधी, सरळ गोष्ट आहे. माणसाला तीन भागांत कापून जोडणार्‍या जादूगाराच्या या खेळाशी स्वतःला जोडून घेणारी स्त्री आपल्याला याच नावाच्या कथेत सापडते. बाईला जन्मल्यापासून पिता, पती आणि पुत्र यांवर अवलंबून राहावं लागतं हे सांगणार्‍या मनुस्मृतीचा संदर्भ या कथेला असला, तरी तो फारच दुरान्वित वाटतो.

मराठीत विज्ञानकथा तशी कमीच लिहिली गेली आहे. माणसांच्या भावभावना विज्ञानातल्या काही शोधांच्या आधारावर तपासून पाहणारे लक्ष्मण लोंढे, जयंत नारळीकर, सुबोध जावडेकर यांसारखे चांगली विज्ञानकथा लिहिणारे काही लेखक आपल्याकडे असले, तरी या प्रांतात स्त्रिया तशा कमीच आहेत. त्यामुळे शुभदा गोगट्यांची या संग्रहातली 'हरवले ते गवसले का?' ही कथा वेगळी ठरावी. विषय आणि त्याची हाताळणीही नवी नसली, तरी ही कथा विज्ञानाशी जोडलेली असल्यानं त्यातलं वेगळेपण भावतं.

'अशाच एका संध्याकाळी' या कथेत नवर्‍याच्या मृत्यूनंतर आधार देणारा अभिनसारखा बॉस आणि तिच्या विवाहबाह्य संबंधामुळे मुलीचं न होणारं लग्न, त्यामुळं तिला येणारे अ‍ॅटॅक्स या सार्‍यात अडकलेली नायिका जेव्हा 'जयंत, तू मेलास म्हणून सुटलास, अभिन, तू पुरुष आहेस म्हणून सुटलास, माझं काय रे?' हा प्रश्‍न विचारते, तेव्हा एक सामाजिक वास्तव आपल्यासमोर उभं करते. पुरुष असल्यानं अभिनच्या विवाहबाह्य संबंधाकडे समाज दुर्लक्ष करतो आणि त्याच्या मुलींची लग्नंही सहज होतात. पण तिच्या संबंधामुळे मात्र केवळ तिलाच नाही, तर तिच्या मुलीलाही भोगावं लागलं. आपल्या समाजाचा हा दुटप्पीपणा या नायिकेलाच नाही, तर आपल्या सर्वांनाच अस्वस्थ करतो.

बाईचा मेनोपॉज हा तसा न चर्चिला जाणारा विषय. या काळात होणारे बदल बाईच्या मानसिक आरोग्याशी निगडित असतात. एका संक्रमणातून बाई जात असते, पण याविषयी बाई काही बोलत नाही आणि पुरुष तिची या काळातली चिडचिड, त्रास समजून घेऊ शकत नाही. विजया राजाध्यक्ष यांची याच विषयावर एक उत्कृष्ट कथा आहे. याच विषयावर लता प्रतिभा मधुकर यांनी 'आणि थोडी ओली पाने' ही कथा लिहिली आहे. बाईच्या या सार्‍या वेदनेची जाणीव पुरुषांना करून देण्याचा प्रयत्न करणारी सामाजिक कार्यकर्ती असलेली नायिका, तिची गोष्ट ऐकायला जमलेली सारी मंडळी, कार्यकर्ता असलेल्या नवर्‍यालाही न समजलेली तिची व्यथा आणि नव्या पिढीतल्या मुलाला जाणवलेलं त्या वेदनेतलं कारुण्य हा या कथेचा विषय आहे.

या कथा वाचताना एक विशेष गोष्ट जाणवली, ती अनेक कथांतून स्त्रीचं जगणं नव्या पिढीचे पुरुष समजून घेऊ पाहताहेत. किंवा नवी पिढी स्वतःला या सार्‍या वेदनेशी जोडून घेऊ पाहते आहे आणि म्हणूनच ती जास्त समंजस होते आहे. ती संवेदनशील आहे, पण सारासार विचार करणारी आहे. अकारण भावनिक होताना ती दिसत नाही, असं वाटत राहतं. म्हणूनच 'सूर्य प्यायलेली फुलं' या कथेतला कृष्णन आणि नंदिता यांच्यातलं ताणलं गेलेलं नातं, ते संपवण्याचा त्यांचा समंजस निर्णय आणि नवरा-बायको म्हणून असलेलं नातं संपल्यावरही टिकून राहिलेली आपलेपणाची भावना आणि त्यांच्यातली मैत्री या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात. जुन्या पिढीतल्या निवेदिकेला वाटतं, हे आपल्याला जमलं नसतं, किंवा अगदी या पिढीतल्या सायलीलाही जमलं नसतं. पण मुलीमध्ये आणि जावयामध्ये या अशा वेगळे पदर असलेल्या नात्यानं ती सुखावते. कोणत्याही अपेक्षांवर नातं आधारलेलं नसलं, की किती वेगळ्या प्रकारे संबंधांकडे पाहता येतं याकडे ही कथा लक्ष वेधते.

अर्थात, सारासार विचार करताना आलेला कोरडेपणा अनेकदा एकमेकांना समजून घेताना कामी येत नाही. एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या वेदनांसकट समजून घेणं तसं कठीणच जातं. पण 'आईच्या नावानं' या कथेतली मुलगी आपली आई आपल्यासाठी स्वतःचं शरीर विकताना कोणत्या वेदनेतून गेली असेल, हे जाणून घेण्यासाठी एक रात्र का होईना पण त्या अनुभवातून जाते. अतिशय धाडसी असा निर्णय ती घेते. पण असे निर्णय घेण्याची क्षमता पुन्हा याच पिढीत आहे, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ती वेदना समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जायलाच पाहिजे का, असा प्रश्‍न 'सोवळया' मनाच्या काही वाचकांना स्पर्शून जाऊ शकतो. पण आपल्यासारखीच बाई असलेल्या आपल्या आईची वेदना समजून घेण्यासाठी आईच्या नावानं सोडलेला स्वतःच्या शरीराचा भोग वाचकांना अस्वस्थ करून जातो.

'दोघी' ही दिनानाथ मनोहरांची कथा पुन्हा एकदा बाईचं वेगळं रूप आपल्यासमोर घेऊन येते. सावित्री आणि शांती या दोन वेश्यांमधलं प्रेम आणि द्वेषावर आधारलेलं नातं या कथेत आलं आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते गिरिधर पाटील आणि सावित्रीमधलं नातं. आठ वर्षं संसार करूनही स्त्रीसुख काय असतं, हे न कळलेला गिरिधर एका रात्री फक्त तिच्या घरात झोपायला येतो आणि हे सुख काय असतं, हे सावित्रीकडून कळल्यानंतर त्याच्या नकळत तो तिचा गुलाम होऊन राहतो. त्याच्यासाठी सावित्री वेश्याव्यवसाय सोडून मजुरी करायला लागते. कष्ट करते. आणि त्याच्या मागचं कारण सांगताना शांतीला म्हणते, "शांते, या सावित्रीनं, या भिलाच्या पोरीनं, गिरधर पाटलाला ठेवलाय."

या समाजात बाईला रखेल म्हणून ठेवणारे पुरुष सगळीकडेच आहेत. तिला वापरून चोळामोळा करून फेकणारे आहेत. या अशा समाजात सावित्रीही वापरली गेली आहे. पण अशा समाजात एक बाई पुरुषाला ठेवू शकते याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करणारी सावित्री मात्र त्याला वापरून फेकत नाही, तर त्याच्यासाठी कष्ट उपसते, मजुरी करते. आणि त्याबरोबरच आपण पुरुष ठेवला आहे, याचा अभिमानही मिरवते.

रजनी परुळेकर या कवयित्रीनं त्यांच्या 'स्वप्न' या कवितेत म्हटलं होतं,

एक स्वप्न
अलीकडे माझा सतत पाठलाग करते
समाजात पुरुष-वेश्याचे मोहल्ले आहेत
आणि स्त्रिया प्रेमाच्या मृगजळावर थुंकून
ज्यांच्या भावना गोठून गेल्या आहेत
अशा पुरुष-वेश्याच्या तोंडावर पैसे फेकून
सर्वत्र प्रतिष्ठित म्हणून मिरवतात
पन्नास, शंभर किंवा दोनशे वर्षांनी तरी
हे घडावे असे वाटते.

हे असंच या कथेत घडत नसलं, तरी ज्या स्त्रीला वर्षानुवर्षं पुरुषांनी आपल्या शरीरसुखासाठी ठेवलं, त्या समाजात एका स्त्रीला पुरुषाला ठेवताना होणारं सुख म्हणजे कदाचित या व्यवस्थेवर उगारलेला सूडच असावा. अर्थात, हा सूड उगवतानाही स्त्रीमध्ये असलेलं मार्दव, तिच्यातलं ममत्व दिनानाथ मनोहरांनी अत्यंत वेधकपणे दाखवलं आहे.

दिनानाथ मनोहर, श्रीनिवास भणगे आणि मधुकर धर्मापुरीकर हे गेली अनेक वर्षं कथालेखन करताहेत. विषयातलं वैविध्य, निवेदनातले प्रयोग हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्याबरोबरच आज नव्यानं लिहू लागलेल्या प्रज्ञा दया पवार, वंदना भागवत यांसारख्या कथाकारांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रज्ञा दया पवार या त्यांच्या एकाच कथासंग्रहानं लोकांपर्यंत पोचल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांना समर्थपणे त्या भिडतातच, पण निवेदनातले प्रयोगही अतिशय समर्थपणे करताहेत. वंदना भागवतांच्या कथा अजूनही पुस्तकरूपानं आपल्यापुढे आल्या नसल्या, तरी त्यांची विषयाची हाताळणी आणि लेखनशैली लक्ष वेधून घेणारी आणि कथाविश्वासाठी आश्वासक वाटणारी आहे.

एकूणच या संग्रहातल्या या काही कथा आजच्या बदलत्या समाजाची बदलत चाललेली मानसिकता दाखवतात. विशेषतः बाईचं तिच्या कोषातून बाहेर येऊन स्वतःचा शोध घेणं, स्वतःला ओळखणं, स्वतःच्या सुखाचा विचार करणं या गोष्टी या कथांतून नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोचतात. मग ती 'तिसरी बाजू' या कथेतली स्वतःचा नव्यानं शोध लागलेली मनू असेल, 'गहाणवट' या कथेतली मारहाण करणार्‍या नवर्‍याला त्याच्याच पट्ट्यानं उलटं मारून घर सोडणारी लीला असेल, या सार्‍याच स्त्रिया स्वतःच्याच आयुष्याचे तुकडे कातरत संपून जाण्याचा मार्ग अवलंबलेल्या असल्या, तरी त्या मार्गावरून चालताना आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा, स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते निभावून नेण्याचं धाडस दाखवतात, हे महत्त्वाचं वाटतं.

अर्थात, हे धाडस मान्य करूनही या कथांतल्या स्त्रियांना नेमकं काय हवं आहे, किंवा या कथांचे लेखक आजच्या स्त्रीकडून कोणती अपेक्षा करताहेत, हा प्रश्‍न मनात उभा राहतो. 'बंपकिन ब्राईड'मधली नायिका लेखक नवर्‍याचा सहज खून करते. किंवा 'दोघी'मधली सावित्री गिरिधरला ठेवते, तेव्हा या लेखकांना स्त्रीचा प्रवास नेमका कोणत्या दिशेचा चाललेला दाखवायचा आहे? आजची स्त्री आपल्या स्वत्वशोधाचा विचार करते आहे, की त्यापलीकडे जाऊन केवळ सुडाचा प्रवास करू लागली आहे? तसं जर असेल, तर मात्र हे बरं चित्र नाही असं म्हणावं लागेल. (या दोन्ही कथा पुरुषांनी लिहिलेल्या असल्यानं तसं झालं नाही ना?)

विभावरी शिरूरकरांनी कथा लिहिल्या त्या आपल्या जगण्याचा विचार करू लागलेल्या स्त्रियांविषयी. त्यांच्या पुढे जाऊन हळूहळू कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे यांच्यासारख्या लेखिका स्त्रीविश्वाच्या वेगवेगळ्या चौकटींना स्पर्श करू लागल्या, त्या चौकटीबाहेर असलेल्या स्त्रीविषयी लिहू लागल्या. स्त्रीच्या जगण्याबरोबरच ती ज्या वेगवेगळ्या नातेसंबंधांत गुंतली गेली होती, त्या नात्यांचा गुंता सोडवू लागल्या आणि हा गुंता सोडवताना नात्यांच्या पसार्‍यात बांधल्या गेलेल्या स्त्रीला स्वतःकडे पाहायला शिकवू लागल्या. या सार्‍याच लेखिकांची शैली वेगळी होती. त्यांचा स्त्रीकडे पाहण्याचा तसंच मानवी संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. स्त्रीशोषणाचा पैलू कमीअधिक तीव्रतेनं त्या मांडत होत्या. काही समंजस भूमिका घेत होत्या, तर काही टोकाची भूमिकाही घेत होत्या. पण प्रत्येकीचा प्रवास सुरू होता तो स्त्रीच्या एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून चाललेल्या शोधाकडे. आज लिहिणार्‍या या लेखिकाही तो प्रवास करताना दिसत आहेत. तिच्या वागण्या-बोलण्यामागची, तिच्या निर्णयामागची कारणमीमांसा तपासून पाहताना दिसत आहेत. 'गहाणवट'मधली लीला असो, की 'आईच्या नावानं'मधली स्मिता असो, त्या ज्या निर्णयाला पोचल्या आहेत त्याची जबाबदारी त्या पेलताहेत. कधी आक्रमक होत आहेत. पण त्या इथेच थांबणार नाहीत. पुढील काळात स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे आणखी वेगळे पदर पुढे येतील. कदाचित या नात्याकडे पाहताना स्त्री-पुरुषातील सत्ताकारणाचा विचार बाजूला सारला जाईल आणि माणसाला माणूस म्हणून वागवू पाहणारं एक निर्भेळ नातं चितारलं जाईल. या सार्‍या कथांचा प्रवास त्या दिशेनं सुरू झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. या सार्‍या कथा तांत्रिकदृष्ट्या प्रयोगशील नसल्या, तरी आजच्या काळाविषयी बोलतात, आजच्या जगण्याविषयी बोलतात आणि मुख्य म्हणजे यातल्या बर्‍याचशा कथा या 'मिळून सार्‍याजणी'च्या भूमिकेशी सुसंगत वाटतात हे नमूद करायला हवं.

- नीरजा

***

गोष्टी सार्‍याजणींच्या

संपादन - डॉ. गीताली वि. मं, उत्पल व. बा., मानसी घाणेकर
मेनका प्रकाशन
पृष्ठसंख्या - २४६
किंमत - रु. २५० फक्त

***

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग! पुस्तक लगेचच खरेदी केलं आहे.

मात्र गौरी देशंपाडे, आशा बगे, सानिया यांच्या कथा नाहीत म्हंटल्यावर फारच हिरमोड झाला.

<मात्र गौरी देशंपाडे, आशा बगे, सानिया यांच्या कथा नाहीत म्हंटल्यावर फारच हिरमोड झाला.>

या कथा पूर्वीच इतर संग्रहात प्रसिद्ध झाल्यामुळे या संग्रहात प्रकाशित करता आल्या नाहीत.

या संग्रहात डॉ. छाया नाईक, प्रज्ञा दया पवार, माधुरी तळवलकर, नीरजा, श्रीनिवास भणगे, वंदना भागवत, प्रकाश पाठक, सोनाली कुलकर्णी, दिनानाथ मनोहर, वैशाली पंडित, सुजाता लोहकरे, मधुकर धर्मापुरीकर, शुभदा गोगटे, भारत काळे आणि लता प्रतिभा मधुकर यांच्या उत्कृष्ट कथा आहेत.

...

माझ्या आईची कथा या पुस्तकात असल्याने आणि इतर सुंदर कथांसाठीही पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. निर्मितीचा दर्जा काटेकोरपणे सांभाळला गेल्याचे जाणवते आहे.
अनावरण सोहळ्यात श्री. महेश एलकुंचवार यांनी केलेले भाषण आणि भाषेविषयी मांडलेले चिंतनीय विचार यांचा गोषवारा कोणी देऊ शकेल काय?

<अनावरण सोहळ्यात श्री. महेश एलकुंचवार यांनी केलेले भाषण आणि भाषेविषयी मांडलेले चिंतनीय विचार यांचा गोषवारा कोणी देऊ शकेल काय?>

समारंभातली भाषणं लवकरच मायबोलीवर ऐकायला मिळतील. Happy

>>गेली पंधरा-वीस वर्षं विभावरी शिरूरकर, कमल देसाई, गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया यांसारख्या स्त्री-कथाकारांचा वारसा पुढे नेण्याचं काम मेघना पेठे, मोनिका गजेंद्रगडकर, नीलिमा बोरवणकर, प्रतिमा जोशी, प्रज्ञा दया पवार यांसारख्या कथाकार करत आहेत.>>
१००% सहमत.

>>'मॅन इन थ्री पीस' या कथेत जिवंत माणसांना आपल्या खेळासाठी वापरणार्‍या जादूगाराला भेटल्यावर स्वतःच्या जगण्याचा विचार करणार्‍या स्त्रीची साधी, सरळ गोष्ट आहे. माणसाला तीन भागांत कापून जोडणार्‍या जादूगाराच्या या खेळाशी स्वतःला जोडून घेणारी स्त्री आपल्याला याच नावाच्या कथेत सापडते >> या कथेच्या लेखिका वैशाली पंडित माबोकर कवी अमेय पंडितांच्या आई, ही कथा अनेकांना पूर्वीच आवडली आहे, वेगळीच आहे..

सर्व लेखिकांचं आणि 'मिळून सार्‍याजणी' टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.

मस्त. 'मिळून सार्‍याजणी' हे मासिकही आवडते आहे. त्यांची टीमही मस्त. पुस्तक नक्की घेउन वाचेन. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.