अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ५

Submitted by स्वाती२ on 14 August, 2013 - 15:20

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ३
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४
अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up. आजकाल युनिवर्सिटीजमधे देखील undecided students साठी सर्व शक्यता अजमावून निर्णय घ्यायचा पर्याय असतो. निर्णय घेण्यासाठी बरेचदा मिड सोफोमोर पर्यंत अवधी दिला जातो.
साधारण १०वी च्या दुसर्‍या सेमिस्टरमधे पालकांनी आपल्या मुलांशी कॉलेज निवडीबद्दल बोलायला सुरुवात करावी. आपल्या शैक्षणीक खर्चाचे बजेट काय असणर आहे त्याचाही प्रामाणिक आढावा घ्यावा.
बर्‍याचदा पालकांचा प्रश्न असतो - कुठली युनिवर्सिटी चांगली? याचे उत्तर देणे सोपे ही आहे आणि कठीणही. तुमच्या पाल्याला जी युनिवर्सिटी योग्य वाटते आणि जिथला खर्च तुमच्या आवाक्यातला आहे ती तुमच्यासाठी चांगली युनिवर्सिटी.

युनिवर्सिटीची निवड

योग्य युनिवर्सिटी निवडताना विद्यार्थ्याने आणि पालकांनी खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.

१. घराजवळ, होम स्टेट मधे, फार तर शेजारच्या राज्यात की दूर अगदी दुसर्‍या टोकाला
२. मोठे शहर, सबर्ब की रुरल सेटिंग
३. मोठी युनिवर्सिटी की सगळे एकमेकांना ओळखतात टाईप लहान युनिवर्सिटी
४. करीअर चॉइस बद्दल पक्का निर्णय झालाय की अजून नक्की काही ठरत नाहिये
५. इंटर्नशिप प्रोग्रॅम, को-ऑप, स्ट्डी अ‍ॅब्रॉड प्रोग्रॅम
६. इतर क्लासरुममधे तसेच कँपसवर तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टी. उदा. रिसर्चची संधी, क्लास साईझ/ स्टुडंट टिचर रेशो, अ‍ॅकेडेमिक सपोर्ट, रेशिअल डायवर्सिटी, सिंगल जेंडर कॉलेज, कँपस सेफटी, फेथ/धार्मिक कल, कम्युनिटी सर्विसच्या संधी वगैरे
या जोडीला आपला GPA आणि SAT/ACT score देखील विचारात घ्यावा.

कॉलेज शोध मोहिमेत आम्हाला खूप उपयोग झाला तो कॉलेज बोर्ड बिग फ्युचर आणि कॉलेज कॉन्फिडेन्शिअल या दोन संकेत स्थळांचा. या साईट्सवरची टुल्स वापरुन तुम्हाला योग्य युनिवर्सिटीज तुम्ही शॉर्ट लिस्ट करु शकता. त्याशिवाय शाळेमधे दरवर्षी कॉलेज फेअर असते. वेगवेगळ्या युनिवर्सिटीच्या अ‍ॅडमिशन ऑफिसतर्फे बुथ्स असतात. बर्‍याच युनिवर्सिटीज चांगले विद्यार्थी मिळावेत म्हणून अमेरीकेच्या वेगवेगळ्या भागात इवेंट्स ठेवतात. युनिवर्सिटीजच्या साइटवर जाऊन तसेच वर्च्युअल टुर घेऊनही अधिक माहिती मिळवता येते. तुमची शॉर्ट लिस्ट तयार झाली की या युनिवर्सिटीजना औपचारिक भेट देण्याचे ठरवावे. इथे शाळा देखील खास कॉलेज विजीट्ससाठी अनुपस्थीती म्ह्णून वेगळी सवलत देतात. त्यासाठी वेगळा फॉर्मही भरुन घेतात. युनिवर्सिटीजचे अ‍ॅडमिशन ऑफिस देखील इच्छूक विद्यार्थी आणि पालकांसाठी कॉलेज विझीट्सचा वेगळा उपक्रम वर्षभर राबवतात. युनिवर्सिटीजच्या संकेतस्थळांवर भावी अंडरग्रॅड स्टुडंट्सनी कॉलेज विझिट कशी प्लॅन करावी याबद्दल माहिती असते. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. यात युनिवर्सिटीबद्दल छान पद्धतीने माहिती दिली जाते. आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळतात. हायस्कूल नंतर पुढील ४-६ वर्षे या ठिकाणी घालवायची आहेत हे विचारात घेऊन विद्यार्थी आणि पालक दोघांनीही विझिट्स साठी जाताना काय प्रश्न विचारायचे त्याची नीट यादी करावी. तिथल्या डायनिंग हॉलमधेच जेवावे. डॉर्म्स पहाव्यात. शक्य झाल्यास गाईड बरोबर टुर झाल्यावर स्वतंत्रपणे फिरुन कॅम्पस बघावा. ज्या विषयात मेजर करायचे त्या डिपार्टमेंटमधील प्रोफेसर्सना शक्य असेल तर भेटावे. युनिवर्सिटीने दिलेल्या माहितीपत्रकांच्या जोडीला आपणही नोंद करावी. काही वेळा युनिवर्सिटीजचे वेगळे इनविटिशन ओन्ली इवेंट्स असतात. यात विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस वेगवेगळ्या लेक्चरना बसता येते, लॅब मधे नेतात. काही वेळा एक रात्र डॉर्म मधे रहाता येते. अशा इवेंटला जाण्याची संधी मिळाल्यास जरूर जावे. मुलांच्या ओळखीची सिनियर मित्र मंडळी मदत करणार असल्यास इन्फॉर्मल विझिट्ही घेता येतील. कॉलेज विझिट्स घेऊन कुठे अप्लाय करायचे त्याची शॉर्ट लिस्ट शक्यतो १२वीचे वर्ष सुरु होण्याआधी तयार असावी.


शैक्षणिक खर्चाचा अंदाज

आपल्या पाल्याला योग्य वाटणार्‍या युनिवर्सिटीचा शोध घेताना एकीकडे शैक्षणीक खर्चाचा अंदाज घ्यावा.
शैक्षणिक खर्चाला Cost of attending university असे म्हणतात. यात फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च, इतर फीज, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य, आणि वैयक्तीक खर्च याचा समावेश होतो. प्रत्येक युनिवर्सिटीच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती असते. या खर्चापैकी फी सोडल्यास इतर खर्च जवळ जवळ सारखाच असतो.
विद्यार्थ्याच्या शैक्षणीक खर्चासाठी किती मदत मिळेल हे ठरवण्यासाठी कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा आणि मिळकतीचा विचार करुन विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी किती खर्च कुटुंबाने करणे अपेक्षित आहे ते निश्चित केले जाते. या रकमेला EFC (Expected Family Contribution) असे म्हणतात. EFC मोजण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात - FAFSA, CSS Profile ,568 Consensus . यापैकी FAFSA हे फेडरल एड साठी वापरले जाते तसेच बर्‍याचदा कॉलेजेस प्रायवेट ग्रांट साठी देखील FAFSA विचारात घेतात. काही वेळा त्या जोडीला स्टेटचा वेगळा फॉर्म देखील भरावा लागतो. FAFSA हा फॉर्म भरण्यासंबंधी सर्व माहिती शाळा देते तसेच http://studentaid.ed.gov/fafsa या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध आहे. याशिवाय जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त प्रायवेट युनिवर्सिटीज CSS Profile वापरतात. अनेक स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स देखील CSS Profile वापरतात. याबाबतची माहिती http://student.collegeboard.org/css-financial-aid-profile या ठिकाणी मिळेल. या व्यतिरिक्त सिलेक्टेड २५ कॉलेजेस Consensus पद्धत वापरतात. यात FAFSA आणि CSS Profile हे दोन्ही फॉर्म्स वापरले जातात मात्र अ‍ॅसेट वेगळ्या प्रकारे मोजले जातात. प्रत्येक पद्धत वेगवेगळे नियम वापरते याचे एक उदा. ५२९ प्लॅन मधले पैसे विचारात घेताना FAFSA ५.६% विचारात घेते, CSS Profile २०% आणि Consensus ५% . त्यामुळे तुमचे इनकम आणि अ‍ॅसेट काय आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने मोजले जाणार आहेत यावर तुमचे Expected Family Contribution वेगवेगळे येऊ शकते. शैक्षणिक खर्चाचा साधारण अंदाज येण्यासाठी विद्यार्थी ११वी(ज्युनिअर) ला असताना EFC Calculator वापरून बघावा.
त्याच बरोबर विशिष्ठ कॉलेज मधे शिकण्याची नेट प्राईस काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्या युनिवर्सिटीचा कॅलक्युलेटर वापरावा. कारण एखाद्या कॉलेजचा खर्च (स्टीकर प्राईस) जास्त असला तरी EFC साठी वापरलेली पद्धत, उपलब्ध असलेल्या ग्रांट्स वगैरे विचारात घेतल्यावर येणारी नेट प्राईस तुमच्या आवाक्यातील आहे की नाही याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेता येतात.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट युनिवर्सिटी इन स्टेट आणि आउट ऑफ स्टेट अशी वेगवेगळी फी आकारते. काही वेळा पब्लीक युनिवर्सिटीच्या out of state tuition मधे सवलत मिळू शकते, मात्र अशी सवलत मिळ्ण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही कुठल्या स्टेट मधे रहाता, कुठल्या स्टेटच्या युनिवर्सिटीत जाऊ इच्छिता , कुठल्या विषयात्/कुठल्या प्रकारची डिग्री हवी आहे त्यानुसार तुम्हाला सवलत मिळणार की नाही ते ठरते. काही वेळा प्रायवेट युनिवर्सिटी देखील out of state tuition reduction program मधे सहभागी होते. अशावेळी प्रायवेट युनिवर्सिटीसाठी असलेल्या नियमानुसार सवलत मिळते. याबद्दलच्या अधिक माहिती साठी खाली दुवे देत आहे.

http://www.nebhe.org/programs-overview/rsp-tuition-break/overview/
http://www.sreb.org/page/1304/academic_common_market.html
http://wiche.edu/wue
http://msep.mhec.org/MidwestStudentExchangeProgram

कॉलेज अ‍ॅडमिशन
विद्यार्थ्याचा करीअर पाथ, इतर वैयक्तिक आवडनिवड , शैक्षणिक खर्चाचे बजेट वगैरे बाबी लक्षात घेऊन १२वी चे वर्ष सुरु होताना युनिवर्सिटीज शॉर्ट लिस्ट केल्या की सुरुवात होते ती प्रवेश प्रक्रियेची. तुम्ही निवड केलेल्या कॉलेजच्या संकेत स्थळावर कॉलेज अ‍ॅडमिशनची सर्व माहिती दिलेली असते. युनिवर्सिटी कॉलेज कॉमन अ‍ॅप्लीकेशन वापरणार की युनिवर्सल कॉलेज अप्लिकेशन वापरणार की स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन वापरणार त्या प्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी बदलते. कॉमन किंवा युनिवर्सल अ‍ॅप मधे तुम्ही एक कॉमन फॉर्म भरता आणि जोडीला विशिष्ठ कॉलेजसाठी वेगळे सप्लीमेंट अ‍ॅप्लीकेशन करता तर स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन असेल तर तुम्ही त्या विशिष्ठ युनिवर्सिटीचा प्रवेश अर्ज भरता. पब्लीक युनिवर्सिटीला प्रवेश घेणार असाल तर त्यांच्या मेरीट स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जावे म्हणून प्रवेशाचे अर्ज लवकर (साधारणतः १५ नोवेंबर डेडलाईन) पाठवणे आवश्यक असते. प्रायवेट युनिवर्सिटीजच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ली डिसीजन, अर्ली अ‍ॅक्शन , सिंगल चॉइस अर्ली अ‍ॅक्शन, रेग्युलर असे वेगवेगळे प्रकार असतात. युनिवर्सिटीजच्या साईटवर त्या संबंधीचे नियम लिहिलेले असतात. प्रवेश प्रक्रियेसाठी कुठला पर्याय योग्य याचे उत्तर प्रत्येक केस मधे वेगवेगळे असू शकते. याबाबत अधिक मदत लागल्यास शाळेच्या काउंसेलरशी बोलावे. माझ्या मुलाने तीन पब्लीक युनिवर्सिटीजना मेरीट स्कॉलरशिप मिळावी म्हणून लवकर अर्ज केले होते. त्यातील एक युनिवर्सिटी त्याच्या लिस्टमधे दुसरा चॉइस होती. त्याचा पहिला चॉइस असलेल्या प्रायवेट युनिवर्सिटीला त्याने अर्ली अ‍ॅक्शन पर्याय घेतला तर अजून एका प्रायवेट युनिवर्सिटीला अर्ली डिसीजन ऐवजी रेग्युलर अ‍ॅडमिशनसाठी अर्ज केला. असे केल्याने त्याला काही युनिवर्सिटीजचे होकार ख्रिसमस आधीच कळले होते शिवाय अ‍ॅडमिशन मिळाल्यावर युनिवर्सिटीजनी देऊ केलेल्या स्कोलरशिप्स्/एड पॅकेजेसची तुलना करुन निर्णय घेण्यासाठी नॉर्मल डेडलाईन पर्यंत थांबता आले.
कॉलेज प्रवेश प्रक्रिये मधे निबंध लेखन, रेकमेंडेशन्स, टिचर आणि काउंसेलर इवॅल्युएशन फॉर्म्स, ट्रान्सक्रिप्ट्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. वेगवेगळ्या डेडलाईन्स सांभाळाव्या लागतात. साधारण १ ऑगस्टला अ‍ॅप्लीकेशन फॉर्म्स ऑनलाईन असतात. ते डोळ्याखालून घालावेत. किती निबंध लिहावे लागतील, त्यांचे विषय काय आहेत ते पहावे. निबंधाचे विषय विचारपूर्वक ठरवावेत. निबंधलेखनासाठी पुरेसा वेळ द्यावा. इंग्लीशच्या शिक्षकांना आधी विनंती केल्यास ते ड्राफ्ट फायनल करण्यापूर्वी वाचून आवश्यक असल्यास सुधारणा सुचवतात. रेकमेंडेशन्ससाठी ज्या व्यक्तींना विनंती करणार आहात त्यांना शक्य तितक्या लवकर भेटावे. बर्‍याच युनिवर्सिटीजना टिचर्सची रेकमेंडेशन्स लागतात. अशावेळी शक्यतो ११वी संपताना याबद्दल तुमच्या शिक्षकांशी बोलून ठेवावे. स्कॉलरशिप्ससाठी देखील रेकमेंडेशन्स लागतील. त्याबद्दलही बोलून ठेवावे. शिक्षकांना बरीच रेकमेंडेशन्स लिहावी लागतात. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यावर लवकरात लवकर रेकमेंडेशन साठी विनंती पाठवावी म्हणजे घाई गडबड न होता योग्य मुदतीत काम पूर्ण होईल. अनावधानाने होणार्‍या चुका टाळण्यासाठी प्रत्येक युनिवर्सिटीसाठी वेगळे फोल्डर करावे. त्यात आवश्यक गोष्टी आणि डेड्लाईन्सची नोंद करावी. जसजशी पूर्तता होत जाइल तसे चेक मार्क करावे. १२वी चा अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स वगैरे सांभाळून ही सगळी कामे करायची असल्याने विकेंड्सना यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.

शैक्षणीक खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पालकांनी शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे, मुलांनी केलेले सेविंग याच्या बरोबर स्कॉलरशिप्स, फेडरल आणि स्टेट कडून मदत मिळण्याची शक्यता, शैक्षणीक आणि इतर लोनची तयारी या गोष्टींचा विचार केला जातो. .


स्कॉलरशिप्स

युनिवर्सिटी मेरीट स्कॉलरशिप्स - पब्लिक युनिवर्सिटीज मेरीट स्कॉलरशिप्स देतात. तसेच प्रायवेट युनिवर्सिटीज देखील मेरीट स्कॉलरशिप्स देतात. काही युनिवर्सिटीज नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाल्यास ती रक्कम मॅच करतात. नीड ब्लाईंड युनिवर्सिटीज प्रवेश दिल्यावर EFC नुसार एड पॅकेज देत असल्याने वेगळ्या मेरीट स्कॉलरशिप्स देत नाहीत.
त्याशिवाय इतर अनेक स्कॉलरशिप्स लोकल, स्टेट आणि नॅशनल लेवलवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या हॉबीजपासून ते वेगवेगळ्या कॉलेज मेजर्स पर्यंत अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध असतात. पालकांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील काही स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत का याची देखील चौकशी करावी. फक्त हायस्कूल सिनियर्ससाठी स्कॉलरशिप्स असतात असा एक समज असतो. पण अंडरक्लाससाठी देखील स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.
स्कॉलरशिप्स शोधण्यासाठी उपयोगी साईट्सची यादी खाली देत आहे. Every little bit helps so happy searching. Happy

www.fastweb.com
www.finaid.org
www.scholarships.com
www.scholarshipexperts.com
http://www.petersons.com/college-search/scholarship-search.aspx
www.freschinfo.com
www.salliemaefund.org
www.naas.org
http://www.scholarshippoints.com/about.php
www.schoolsoup.com

स्कॉलरशिप्स मिळवायला मदत करतो असे सांगुन कुणी फी चार्ज करत असेल तर तो स्कॅम समजावा.

फेडरल आणि स्टेट एड
युनिवर्सिटीत शिक्षण घेण्यासाठी उत्पन्नाच्या नियमानुसार Federal Pell Grant , Federal Supplemental Educational Opportunity Grant (FSEOG) , तसेच स्टेट एड मिळू शकते. या मदतीसाठी आर्थिक परीस्थिती हा निकष असतो. FAFSA फॉर्म भरावा लागतो.

लोन
शिक्षणासाठी लोनचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
1. Federal Student Loan
2. Private Student Loan

Federal Student Loan
1. Federal Perkins Loan - हे कर्ज अंडरग्रॅड आणि ग्रॅड स्टुडंटसाठी असते. कॉलेज कडे असलेले फंड्स आणि विद्यार्थ्याची आर्थिक परीस्थिती या निकषावर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज कॉलेज देते आणि यावरील व्याज हे विद्यार्थी जोपर्यंत कमीत कमी अर्धवेळ शिकत आहे तोपर्यंत डिफर होते.
2. Direct Subsidized Loan - हे कर्ज देखील आर्थिक निकषावर आधारीत असून अंडरग्रॅड साठी मिळते. हे कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. व्याज विद्यार्थी कमीत कमी अर्धवेळ शिकत असेल तोपर्यंत डिफर होते.
3. Direct Unsubsidized Loan - या कर्जासाठी आर्थीक निकष नाही. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.
4. Direct PLUS Loan - हे कर्ज अंडरग्रॅड स्टुडंटचे पालक किंवा ग्रॅड/ प्रोफेशनल स्टुडंट यासाठी असून आर्थीक निकष लागत नाही. क्रेडीट हिस्ट्री वाईट नसावी. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.

Private Student Loan हे कर्ज खाजगी बँका किंवा पतपेढ्या देतात. क्रेडीट हिस्टरी चेक करतात. व्याज दर जास्त असतो. प्रायवेट लोन हा प्रकार शक्यतो टाळावा.

Federal Work Study Program :
या प्रकारात कॉलेज खर्चासाठी पार्ट टाईम जॉब करणे अपेक्षित असते. आर्थिक निकष आणि इतर काही अटींची पूर्तता करावी लागते. आर्थिक निकष अपेक्षित खर्चानुसार बदलतो. उदा. 'अ' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्ट्डी प्रोग्रॅम लागू होणार नाही पण 'ब' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्टडी प्रोग्रॅम लागू होईल. कॉलेजकडे पुरेसे फंडिंग नसेल तर वेटिंग लिस्टवर ठेवतात. आठवड्याला किती तास काम करता येइल यावर लिमिट असते. क्लास स्केड्युलही विचारात घेतले जाते. वर्क स्ट्डी जॉब्ज ऑन कॅम्पस तसेच ऑफ कॅपस उपलब्ध असतात.
कॉलेज खर्चासाठी या वर्क स्ट्डी प्रोग्रॅम व्यतिरिक्त ऑन कॅम्पस अणि ऑफ कॅम्पस इतरही जॉब उपलब्ध असतात. आर्थिक निकष लावला जात नाही. बरीच मुले खर्चाची मिळवणी करण्यासाठी तसेच नेटवर्किंगसाठी असे जॉब करतात. यात ऑन कॅम्पस जॉब बर्‍याचदा जास्त सोइचे पडतात.
बर्‍याचदा वर्क स्टडी प्रोग्रॅम मधले जॉब्ज तसेच इतर ऑन कॅम्पस जॉब्ज कॉलेज सुरु होण्याआधीच लिस्ट केले जातात. तेव्हा जॉब सर्च करायला कॉलेज सुरु होईपर्यंत थांबू नये.

खाली मी माझ्या मुलाच्या हायस्कूल प्रवासाची टाइमलाइन देत आहे.

timeline.png

अमेरीकेतील हायस्कूल प्रवासासाठी ज्यु. मायबोलीकरांना आणि त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा!

टीप - अनुभवी मायबोलीकरांनी यात जरूर भर घालावी. अ‍ॅथलेटिक स्कॉलरशिपवर कॉलेजला जाणार्‍यांचा प्रवास थोडा वेगळा असतो. इथे कुणाला अनुभव असेल तर त्यांनीही आपले अनुभव शेअर करावेत. माझ्या मुलाच्या काही मित्रांनी ROTC चा पर्याय निवडला. तुमच्या पाल्याला आवडणार असेल तर जरूर विचार करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलेजसाठी लागणारा वेळ आणि फी (थोडी) कमी करण्याचा एक अगदी वेगळा मार्ग माझ्या मुलीने शोधून काढला आणि यशस्वी पार पाडला. हा मार्ग त्या त्या विद्यापीठाच्या नियमांवर आधारीत आहे.

तिच्या विद्यापीठात ( Tufts University) प्रत्येकाला फॉरेन लँग्वेज या मथळ्याखाली काही Credits घेणे आव॑श्यक होते. ते घेतले तर तुम्हाला इतर विषयांचे क्रेडीट घेणे जमत नाही (वेळ, अभ्यासाचा ताण आणि इतर कारणांसाठी)
पण त्याच विद्यापीठाचा असाही नियम आहे की जर विद्यापीठात न शिकवली जाणारी एखादी भाषा तुम्हाला येत असेल आणि विद्यापीठ पातळीवर तुम्हाला ती येत आहे हे परीक्षा देऊन तुम्ही सिद्ध करू शकलात तर परकी भाषेचे Credit तुम्हाला लगेच मिळतात.

तिने मराठी भाषा येत आहे असे कळवले. अमेरिकेत काही विद्यापीठात (उदा. Penn State) विद्यापीठ पातळीवर मराठी शिकवली जाते. तिथल्या प्राध्यापकांनी दुरुन तिची मराठीची परिक्षा घेतली आणि त्यात ती अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला सगळा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर ३.५ वर्षात पार पाडता आला आणि त्यामुळे फी देखील ४ वर्षांची भरण्याऐवजी ३.५ वर्षांचीच भरावी लागली.

"मराठी इथे अमेरिकेत शिकून काय उपयोग" या प्रश्नाला हे अत्यंत प्रात्यक्षिक, अनुभवावर आधारीत उत्तर आहे. हा मार्ग सगळ्याच विद्यापीठांना लागू होईल असे मात्र नाही.

अमेया, मृण्मयी, अजय, साती, चैत्राली, धन्यवाद.

मृण्मयी, ROTC बद्दल जरुर लिहा. माझ्या लेकाचे ROTC चे स्वप्न हेल्थ प्रॉब्लेम्समुळे ३री-४थीतच विरुन गेले.

अजय, मस्त माहिती. टफ्ट मधून साडे तीन वर्षांत म्हणजे वॉव! मराठीचे असे क्रेडीट्स मिळवणे म्हणजे ग्रेटच!

चैत्राली, एखाद्या कोर्ससाठी जे इन्स्ट्रक्शनचे किंवा लॅबचे वर्ग असतात त्यांना क्रेडिट आवर्स म्हणतात. असे ठरावीक क्रेडीट आवर्स एकत्र केले की एक क्रेडीट. जेव्हा एखादा कोर्स २ क्रेडीट्सचा असे म्हणतो तेव्हा त्याचे आठवड्याला दोन वर्ग असतात.

साती, आम्हालाही हा प्रवास स्वप्नवतच वाटला. या काळात आयुष्य समृद्ध करणार्‍या अनेक संधी त्याला मिळाल्या. त्याच्या शाळेने आणि गावकर्‍यांनी वेळोवेळी दिलेला आधार आणि भरभरून केलेले प्रेम यामुळेच हा प्रवास आनंददायी झाला.

स्वाती आणि अजय चांगली माहिती दिलित. स्वाती तुम्ही लिहिलेले सगळे भाग वाच्ले. धन्यवाद. माहिती देण्या मागची चांगली भावना जाणवली
अजय तुमच्या मुलीने मराठी चा अभायास्क्रम long distance course पूर्ण केला का फक्त परीक्षा देउओन credit मिळाले ?

वा! हा भाग तर फारच उपयोगाचा आहे! अजय ची माहिती पण फार उपयुक्त! बाकी लिन्क्स अजून वाचते आहे.
अनेक धन्यवाद सगळ्यांना !!

अजय,
युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामधे पण अशी सोय आहे. मी काही मुलांच्या कोकणीचे इव्हॅलुएशन केले आहे अन त्या मुलांना फॉरेन लँग्वेज क्रेडिट मिळाले आहे

अतिशय माहितीपुर्ण लेख आहेत स्वाती ...तुम्ही लिहिलेले सगळे भाग वाचले ....२ रा तर अगदी आवडला...माझी मुले अजुन लहान आहेत (७ व २ वर्ष वय) पण एकंदर पुढच्या प्रवासाची कल्पना आली ..खुप धन्यवाद !
Happy

दिनेश, LAMarathi, maitreyee, यशस्वीनी, मामी, मेधा, पिंकस्वान, सिंडरेला, धन्यवाद.
मेधा, माहितीबद्दल धन्यवाद.
maitreyee, सुचनेप्रमाणे बदल केलाय. Happy

@Chaitrali
याचा अगदी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे काही विषयाचा अमूक एक तास (आठवडे) अभ्यास करणे. काही विषयांना जास्त वेळ द्यावा लागतो तर काहीना कमी.

@LAMarathi
तिने फक्त परिक्षा दिली. मराठीचा अभ्यास घरीच केला.

@मेधा
कोकणीबद्दलही सोय आहे हे कळून खूप छान वाटले.

खूप माहितीपूर्ण लेख!
आजपासूनच कोर्सेरा वर (आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी) Applying to U.S. Universities हा ४ आठवड्यांचा कोर्से सुरु झाला आहे. यात ते UG साठीची प्रोसेस सांगणार आहेत आणि PG ला अप्लाय करणार्यांसाठी एक आढावा, कि नेमकी काय आहे प्रोसेस ते सांगणार आहेत Happy

स्वाती२ धन्यवाद!

तुमच्या ह्या ५ लेखाच्या जोरावर आणि मुलाची मेहनत ह्या जोरावर मुलगा जुन मध्ये high school graduate करुन Ohio State University मध्ये जाणार आहे.
साधारण दिड वर्षापुर्वी आम्ही अमेरिकेत आलो. मुलानी भारतात १०वी केली होती. ईकडे येण्याचा आधी तुमचे ५ लेख वाचलेले होते. अमेरिकेत आल्यावर दोन पब्लिक शाळेला भेट दिली.तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या शाळेची counselor चांगली त्या शाळेत प्रवेश घेतला. ( आगोदर शाळा ठरऊन त्याच परिसरात घर भाड्याने घेतले). counselor चे पहिलेच वर्ष असल्याने तिने पण बरीच मेहनत घेतली. आधीचे शिक्षण भारतात झाले असल्याने extra curricular activity जवळ जवळ न्हवत्याच, तसेच अमेरिकेचा इतिहास, politics वगैरे केले न्हवते. तसेच ५० तास समाजसेवा, resume build up, ACT,PSAT, SAT, AP वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. पहिल्या आठवड्यात counselor बरोबर मुलाचा दिड वर्षाचा plan बनवला. काही विषय summer holiday मध्ये टाकले. ACT आणि SAT च्या परिक्षेच्या तारखा वेगळ्या असल्याने आम्ही ACT आणि SAT Subject Test द्यायचे ठरवले. resume बनवण्यासाठी मुलानी डिबेट तसेच सायन्स औलम्पियाड मध्यी भाग घेतला , तसेच student counsel वर निवडुन आला. ह्या दिड वर्षात त्याचा प्रत्येक आठवडा काही ना काही activity मध्यी तो व्यस्त होता आणि त्याकरिता तुमचे ५ लेख (खास करुन टाईमलाइन) आणि counselor ह्याची फार मदत झाली.

युनिवर्सिटी निवडताना पण तुमच्या लेखाचा खुप उपयोग झाला. लेखात दिल्याप्रमाणे युनिवर्सिटी shortlist करुन त्याना भेटी दिल्या. तुम्ही दिल्याप्रमाणे ज्या युनिवर्सिटी जास्त मेरिट स्कॉलरशिप देतात त्या युनिवर्सिटी मध्ये apply केले. अमेरिकन किवा green card नसल्यामुळे लोन मिळणे शक्य न्हवते आणि निड्बेस स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे in state युनिवर्सिटी ला प्राधन्य दिले.

थोडक्यात सांगायचे तर ही लेखमाला वाचुन अमेरिकन शिक्षणपद्धतीचा काही अनुभव नसेल तरी सुध्धा हे ५ लेख वाचुन high school graduate करुन योग्य युनिवर्सिटी ला प्रवेश घेउ शकतो. त्याकरता पुन्हा एकदा तुमचे आभार!

साहिल शहा,
तुमच्या मुलाने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. हार्दिक अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा! तुम्हाला इथल्या लेखांचा उपयोग झाला हे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आम्ही मोठी मुलगी पाचवीत असताना उसगावात गेलो. पाचवी ते सातवी तिचे शिक्षण उसगावात झाले. शाळेत ती खूप छान रमली होती. पण का कोण जाणे तिकडच्या शाळांमधील वातावरण, एकंदरीत शिक्षणपद्भती नाही मानवली. लोकांनी वेडयात काढले. पण नीट विचार करुन अजिबात भावूक न होता, कोणत्याही मोहाला बळी न पडता गाशा गुंडाळून भारतात परतलो. अत्यंत वैयक्तिक विचार फक्त सहज शेअर केला आहे.