खांडवीच्या वड्या

Submitted by पूनम on 12 August, 2013 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) तांदळाचा रवा*- २ वाट्या
२) गूळ- सव्वादोन वाट्या
३) ओले खोबरे- अर्धी वाटी
४) वेलदोड्याची पूड- १ टेबलस्पून
५) साजूक तूप- ३ टेबलस्पून
६) पाणी- ४ वाट्या

क्रमवार पाककृती: 

खांडवी म्हटले, की गुजराथी तिखट पदार्थच आहे असे वाटायला लागले आहे. पण खांडवी किंवा खांडवीच्या वड्या हा एक अस्सल मराठी, कोकणात केला जाणारा पारंपारिक पदार्थ आहे. रुढ अर्थाने हे एक पक्वान्न नाही. त्यामुळे नेहेमीच्या श्रीखंड, गुलाबजाम, जिलबीसारख्या तुलनेने ग्लॅमरस पक्वान्नांच्या मानाने मागे पडलेला हा पदार्थ आहे. पण आहे साधा, सोपा आणि 'आपला'!

*तांदळाचा रवा काढायची पद्धत- रोजच्या जेवणातले तांदूळ धुवून, निथळवून सावलीत सुकवायचे. सुकले, की मिक्सरवर भरड रवा काढायचा. या रव्याला तांदळाची कणी असेही म्हटले जाते. सहसा लहान मुलांना सॉलिड फूड सुरू करताना अशा रव्याची पेज शिजवून देतात. हा भरड रवा बाजारात विकत मिळतो का, याची कल्पना नाही.

१) तांदळाचा रवा २ टेस्पू तूपावर तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा.
२) पाणी कढईत उकळायला ठेवावे.
३) पाणी उकळले की त्यात गूळ घालावा.
४) गूळ विरघळला, की त्यात रवा घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.
५) वेलदोड्याची पूड घालून एक वाफ द्यावी.
६) एका मोठ्या ताटाला तूपाचा हात लावून हे शिजलेले मिश्रण त्यावर पसरून थापावे.
७) वरून ओले खोबरे पेरून वड्या पाडाव्या.

khandavi.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ वाट्या रव्याच्या ताटभर वड्या होतील.
अधिक टिपा: 

गूळाऐवजी साखर घालता येईल.
रवा मात्र तांदळाचाच हवा. त्या ऐवजी साधा रवा वापरला तर तयार होणार्‍या पदार्थाला 'सांजा' म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक, आई, आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी दिसत आहेत फोटोत. Happy माझे लहानपणापासुनच रव्याच्या गोड पदार्थांशी वाकडे असल्याने तोंपासु झाले नाही. पण एकुणच फोटो बघुन फक्कड जमली आहे हे कळत आहे.

मस्त आहे पाकृ, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आता करणे मस्ट. Happy

माझ्या लहानपणी आईच्या हातच्या खांटोळ्या खाल्ल्यात भरपुर. तेव्हा मला खांटोळ्या ह्या शब्दाची खुप गंमत वाटायची. हाती तलवार घेऊन आई ताटात थापलेल्या पदार्थाची खांटोळी खांटोळी करतेय आणि म्हणुन त्या तुकड्यांना खांटोळ्या म्हणतात असा भास मला तेव्हा व्हायचा. आजही खांटोळी आठवली की मनापासुन हसु येते. Happy

अगदी घरगुती चवीचा स्वादिष्ट प्रकार! मी एकदा आजीने चुलीवर केलेली खांडवी खाल्ली होती लहानपणी. नंतर कधी त्या चवीची खांडवी खाल्ली नाही. तो चुलीचा खास धुरकट स्वाद आठवणीत जाऊन बसलाय. Happy

जबरी फोटो.

खांडवी गुजराथी प्रकार वाटायचा. रवा-नारळाच्या लाडवांना म्हणतो तसं याला रवा-खोबर्‍याच्या वड्या का नाही म्हणायचं? Proud

इडलीचा रवा वापरून बघावा का?

खांडवी म्हटले, की गुजराथी तिखट पदार्थच आहे असे वाटायला लागले आहे >>> हो. मला तर हा पदार्थ नव्यानेच कळला Happy छान दिसताहेत!
मी पण इडली रव्याने कराव्या का या विचारात आहे. तेवढाच वेळ वाचेल Happy

वर्षानुवर्षे खांडवी ना॑गपंचमीला खाल्ली आहे. म्हणजे निमित्त ना.पं. च. Wink आई त्यात आलं घालत असे आधणातच. त्या दिवशी डब्यात पोटभरीला खांडवीच नेत असे मी.

पूनम, एकदम सोपं करुन सांगितलंयस Happy

इडली रवा चालेल की! पहिल्या पानावर मंजूडीनी तिच्या रेसीपीची लिंक दिलीय. ती इडली रवा वापरूनच आहे.

जबरी. मला प्रचंड आवडतात खांडवी. माझी आजी जबरी करायची. मी यात आमरस घालून केलेली खाल्ली आहेत. तीही मस्त लागतात.

मस्त! Happy

आई आणि आजीच्या हातच्या खल्यात वड्या Happy मला या वड्या दुधात कुस्करुन खायला आवडायच्या Happy आता केल्या पहिजेत एकदा..

नको मंजू, मला जास्त रिस्क घ्यायची नाहीये. Proud
मी इडली रवा वापरून केल्या. पण तो फक्त निवडून घेतला. तू धुवून वाळवून घ्या लिहीलंयस ते ड्यांजर वाटलं मला. Uhoh
तर, आज तमाम खांडवीवडी और वैनी को मद्देनजर रखते हुए पाकादालत मुजरिम आशूडी को कलम 44580 तहत दो बार अंजीर बर्फी बिगाडने के इल्जामसे बाइज्जत बरी करती है. और ये सिफारीश भी करती है की वो खांडवी बरी करती है.
Proud

इथलाच मेसेज तिकडे लिहीणार होतो पण साधा प्रतिसास पण मुद्दाम भडकाऊ प्रतिसाद वाटत असल्याने त्या वाटेलाच गेलो नाही. परत कटकट नको.

Pages